रविवार, १३ सप्टेंबर, २०१५

‘भाकड’ पुराणकथा आणि सत्यकथा



पन्नाससाठ वर्षापुर्वी कॉलेजला जाईपर्यंत अगदी मुंबईसारख्या महानगरातील शाळकरी मुलांनाही चित्रपट बघायला मिळत नसायचे. मात्र आपल्यापेक्षा थोराड वा कॉलेजात जाणार्‍याने कुठला सिनेमा बघितला तर त्यात काय होते, त्याचा तपशील अशा ‘वडीलधार्‍या’कडून ऐकून थक्क होणे, एवढाच शाळकरी वयातला थरार होता. अशा वयात  इंग्रजी चित्रपट तर दूरची गोष्ट होती. पण आमच्या टोळीला एकाकडून तेव्हा खुप गाजलेल्या ‘सायको’ नामक परदेशी चित्रपटाची कहाणी ऐकायला मिळाली होती. म्हणूनच संधी मिळेल तेव्हा हिचकॉकचा तो चित्रपट बघायचाच, अशी एक महत्वाकांक्षा त्या कोवळ्या वयात बाळगली होती. पुढे जेव्हा संधी मिळाली आणि ‘सायको’ बघितला, त्याचा प्रभाव अजूनही मनावर आहे. इतक्या मोठ्या त्या पटगृहाच्या पडद्यावर एक तरूणी पाठमोरी उभी आहे आणि एकूणच शंकास्पद वातावरण आहे. अशावेळी एकदम संपुर्ण पडदा व्यापणारा हात तिला झाकत पुढे सरकतो आणि तिच्या मानेकडे जातो. तत्क्षणी अंगावर शहारे यायचे आणि पटगृहात सुस्कारे सुटायचे. कितीदा तरी तो चित्रपट पुढल्या काळात बघितला. पण प्रत्येकवेळी त्याचा तोच प्रभाव राहिला. हिचकॉक या दिग्दर्शकाची तीच खासियत होती. प्रेक्षकाच्या मनातल्या भितीचा तो थेट ताबा घ्यायचा आणि मग तुमच्या मनाशी खेळ करायचा. तुम्हाला तो खेळ आवडायचाही. त्या थक्क चकीत होण्यात वा शहारण्यात एक अजब अनुभव असायचा. आजच्या पिढीला त्याचा किती आनंद लूटता येईल याची शंका आहे. कारण आता आपले नित्यजीवनच सतत थरारक होऊन गेले आहे. घराघरात येऊन पोहोचलेल्या वाहिन्या व उथळ नाट्यमय बातमीदारीने थराराची इतकी सवय अंगवळणी पडली आहे, की जे अनुभवले ते विसरून पुढल्या थराराला कायम सज्ज रहावे लागते. गेल्या आठवड्यात तुर्कस्थानच्या समुद्र किनार्‍यावर पडलेल्या एका कोवळ्या बालकाचे उपडे शव बघून त्याचा नवा अनुभव आला. हिचकॉक आठवला. कारण ते चित्र टिपणार्‍या व प्रदर्शित करणार्‍याचा हेतू हिचकॉकपेक्षा किंचितही वेगळा नव्हता. त्यातून प्रेक्षकाच्या मनात भय व सहानुभुती अशा संमिश्र भावना एकाचवेळी जाग्या करायचाच हेतू त्यामागे होता. हे आता नेहमीचेच झालेले नाही काय?

त्यात हे बालक हकनाक मृत्यूमुखी पडले वा अन्य कुणाच्या राजकीय वा भलत्या महत्वाकांक्षेने त्याचा बळी घेतला, याची कुठलीही वेदना यातना ते चित्र पेश करणार्‍या पत्रकार वा वाहिनीकडे नव्हती. त्यातून एक ठराविक राजकीय परिणाम साधण्यासाठीच हे प्रदर्शन योजनापुर्वक करण्यात आलेले होते, त्यातून सिरिया-इराक येथून युरोप खंडातील पुढारलेल्या देशात घुसू बघणार्‍या तथाकथित निर्वासितांविषयी जगभर सहानुभूती निर्माण करणे आणि पर्यायाने त्यात अडसर झालेल्या युरोपियन देशातल्या राज्यकर्त्यांबद्दल चीड निर्माण करणे, इतकाच उद्देश त्यामागे होता. तसे झाले मग सुखवस्तु युरोपियन नागरिकांमध्ये आपल्या सुखवस्तु जगण्याविषयी अपराधगंड निर्माण झाला पाहिजे आणि त्याखाली त्यांचे राज्यकर्ते दबले पाहिजेत. यासाठीच हे सर्व नाटक होते. त्यातली माणुसकी वा भावना खरी असती, तर मागली दोनतीन वर्षे याच प्रदेशात जे काही मृत्यूचे अमानुष तांडव चालू आहे आणि जिवंतपणे हजारो मुले महिला नरकवास भोगत आहेत, त्याविषयी चीड निर्माण करणार्‍या कथानकाचा समावेश झाला असता. तशा डझनावारी हृदयद्रावक कहाण्या त्याच परिसरात घडत आहेत आणि त्याविषयी फ़ारसा कुठे गाजावाजा होऊ दिला जात नाही. किंबहूना होत असेल तर त्यावर पांघरूण घालणार्‍या इतर काही गोष्टींचा गवगवा केला जातो. त्यातून मग त्या खर्‍या सहानुभूतीला पात्र असलेल्या बातम्या व कहाण्या दडपल्या जात असतात. दाखवले असे जाते आहे, की सिरीया-इराक येथे जे युद्ध व यादवी चालू आहे, त्याच्या परिणामी लक्षावधी लोकांना घरदार सोडून देशोधडीला लागायची पाळी आली आहे आणि माणुसकी म्हणून त्यांना युरोपियन राष्ट्रे आश्रयही देताना हात आखडता घेत आहेत. पण म्हणून वस्तुस्थिती तशीच आहे काय? बारकाईने त्या निर्वासित म्हटल्या जाणार्‍या लोकांकडे बघितले तर त्यातला कोणी कुपोषित वा उध्वस्त जीवनाचे चटके सोसलेला दिसत नाही. चांगले स्वच्छ कपडे परिधान केलेले हे जमाव कुठल्याही कागदपत्राशिवाय तुर्कस्थान वा ग्रीसच्या सीमेवर येऊन थडकले आहेत. हा प्रकार आजचा वा तिथल्या यादवीचा परिणाम आहे काय?

मागल्या काही वर्षात मध्य आशियातील मुस्लिम अरब देशातून शेकड्यांनी लोक असेच अवैध मार्गाने युरोपियन देशांमध्ये घुसखोरी करीत राहिले आहेत. कधी नौकेत बसून तर कधी कुठल्या कंटेनर ट्रेलरच्या बंदिस्त खोक्यातून, त्यांनी या देशात घुसण्याचे सतत प्रयत्न केलेले आहेत. इकडे युरोपापासून तिकडे दक्षिण गोलार्धातील ऑस्ट्रेलियापर्यंत हजारोच्या संख्येने मुस्लिम अरबी लोकांनी घुसखोरी केलेली आहे. अर्थात पकडले जाण्याचे भय त्यांना अजिबात नाही. पकडले गेलो तरी बेहत्तर! तिथे आपली खाण्यापिण्याची सोय संबंधित पुढारलेल्या देशाला करावी लागेल, अशी त्यांना पुर्ण खात्री आहे. म्हणजेच कुठलाही कायदा मोडल्याचा गुन्हा केला तरी जीवावर बेतणार नाही, याची हमीच त्यांना तसे करायला प्रोत्साहित करते आहे. आता दुसरी बाजू बघा. जिथून हे हजारो लोक जीव मूठीत धरून पळत असल्याचा गवगवा केला जातो, तिथून अशी माणसे सर्वात प्रथम युद्धक्षेत्र नसलेल्या जवळच्या प्रदेशात जाण्याचा प्रयत्न करतील ना? म्हणजे सौदी अरेबिया, कुवेत, ओमान वा दुबई, कतार अशा अरबी व ओळखीच्या प्रदेशात कुठेही युद्धाची सावली नाही आणि परिचयाचा प्रदेश आहे. संस्कृती व धर्मानेही जवळीक सांगता येणारे हे देश हाकेच्या अंतरावर म्हणावेत असे आहेत. पण या लक्षावधी मुस्लिम अरबांची नजरही तिकडे नाही. त्यांना हजारो मैल दूर असलेल्या युरोपातच जायचे आहे. कारण संस्कृती व धर्माच्याही नात्याने जवळचे असलेले तितकेच श्रीमंत अरबी देश त्यांना दारातही उभे करणार नाहीत, याची पुरेपुर खात्री आहे. शिवाय नुसतेच पकडून हाकलून देतील असे नाही. कायदा मोडला वा बिना कागदपत्रे तिथे घुसण्याचा प्रयत्न केला तरी जीवाशी गाठ आहे. हातपाय तोडले जातील वा थेट गोळ्या घालूनही मारले जाण्याची शक्यता आहे. थोडक्यात कायदा मोडण्याची मुभा नसलेले श्रीमंत देश जवळ असले तरी नको आहेत आणि जिथे कायदा धाब्यावर बसवून धुमाकुळ घालायची मोकळीक असेल, तिथेच यांना आश्रीत व निर्वासित म्हणून जायचे आहे.

अर्थात हा नुसता संशय मानायचे कारण नाही. त्याची अनुभूती कायम येते आणि आताही येत आहे. तुर्कस्थानच्या किनार्‍यावर त्या बालकाचे शव दाखवले गेल्यावर युरोपियन देश दबावाखाली आले आणि त्यांच्या सीमेवर रोखून धरलेल्या या निर्वासितांनी पोलिस बंदुकांना झुगारून घुसखोरी सुरू केली. शेकडो व हजारोच्या संख्येने घुसणार्‍यांना पोलिस वा बंदुका रोखूही शकल्या नाहीत. पण अशा रितीने जर्मनीच्या एका निर्वासित छावणीत काय घडले? तिथे इराकी सिरीयन व अफ़गाण निर्वासित आहेत. त्यातल्या कुणा एकाने पवित्र ग्रंथ कुराणाची पाने फ़ाडली व शौचालयात फ़ेकली. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने मग त्याचा पाठलाग केला. छावणीचे पोलिस त्याला वाचवायला गेल्यावर दगड व सळयांनी पोलिसांवरच निर्वासित जमावाने हल्ला केला. छावणीतले मदतकार्य संभाळणारे कार्यालयच फ़ोडून टाकले. ह्यांना निर्वासित ठरवले जात आहे. ज्यांच्या अंगात इतकी खुमखुमी आहे, की खाण्यापिण्याची सोय नसताना धर्मग्रंथाचा अपमान झाला म्हणून परक्या देशातही दंगल केली जाते. खरेच इतकी खुमखुमी होती, तर त्यांनी मूळ देशातील घरदार सोडून येण्य़ाचे कारणच काय? धर्मग्रंथाच्या नुसत्या अवमानाने ज्यांच्यात इतकी विरश्री संचारते, त्यांना मुळच्या देशातल्या अतिरेक्यांशी दोन हात करताना भिती कसली वाटत असते? युरोपियन देशातील पोलिस वा त्यांच्या हातातल्या बंदुका ज्यांना घाबरवू शकत नाहीत, त्यांनाच इसिस वा अन्य कुणा घातपात्याच्या हातातली हत्यारे भयभीत करू शकतात काय? कोण कोणाच्या डोळ्यात धुळफ़ेक करतो आहे? हा सगळा मामला काय आहे? जी मस्ती निर्वासित छावणीत दाखवली जाते, तिथे मानवाधिकार नावाच्या वेसणीने पोलिसांच्या मुसक्या बांधलेल्या आहेत. म्हणून त्याच्यावर हल्ला करण्यापर्यंत परागंदा झालेल्यांमध्ये विरश्री संचारते. पण त्यांच्याच मायदेशी इसिसचे लढवय्ये किंवा शेजारच्या अरबी श्रीमंत देशात कुठल्याही मानवी अधिकारांना स्थान नाही. तिथे याच धर्मप्रेमी निर्वासितांची विरश्री गर्भगळित होते.

कुठल्या धर्माच्या व त्यातील कुठल्या पवित्र गोष्टीच्या विटंबनेसाठी हे निर्वासित इतका धुमाकुळ घालू शकतात? ज्या धर्माच्या नावाने इसिस नावाची संघटना त्यांच्याच मायदेशात राजरोस बलात्कार करते आहे, त्याचेच पावित्र्य जपण्यासाठी जर्मनीत दंगल? एका बाजूला यांना आपल्या पवित्र ग्रंथाची पानेही फ़ाडली तर सहन होत नाही. पण दुसरीकडे त्यांच्याच मायभूमीत यझदी वा अन्यधर्मिय मुली महिलांना गुलाम बनवून धर्माच्या नावाने बलात्कार केले जात आहेत. एका बारा वर्षाच्या किशोरवयीन मुलीची भयंकर कहाणी याच दरम्यान उघड झाली आहे. एक जिहादी लढवय्या रोज तिच्याकडे येऊन धर्मकार्य व अल्लाशी जवळीक साधण्यासाठी तिच्यावर बलात्कार करायचा. तिचे हातपाय बांधून प्रार्थना करायचा आणि मग बलात्कार उरकून पुन्हा प्रार्थना करायचा. हा धर्माचा सन्मान आहे काय? ज्यांनी कोणी तिथे जर्मनीत धर्माच्या प्रतिष्ठेचे कारण दाखवून दंगल केली, त्यांना मायभूमीत फ़ैलावलेला इस्लाम धर्माचीच विटंबना असल्याचे तरी वाटते काय? असेल तर त्याविषयी त्यांना संताप कशाला येत नाही? जिथे बेछूट गोळ्या झाडल्या जातील याची खात्री आहे. तिथल्या धर्माच्या पावित्र्य वा विटंबनेची त्यांना फ़िकीर नाही. तिथला धर्म विटंबनेसाठी सोडून त्यांनी युरोपकडे धाव घेण्याचे कारणच काय? एक तर त्यांचे जीव मुठीत धरून युरोपकडे पळ काढणे हे निव्वळ नाटक आहे किंवा तिथे पोहोचल्यावर धर्माच्या पावित्र्यासाठी दंगलीची खुमखुमी दाखवणे तरी खोटे आहे. पण यातले काही दाखवले जाणार नाही, सांगितले वा समजावले जाणार नाही. दाखवले जाईल फ़क्त आयलान कुर्दी नामक त्या बालकाचे उपडे निपचित पडलेले शव! जेणे करून तुमच्या मनात अपराधगंड तयार व्हावा. याला रणनिती म्हणता येईल. एका बाजूला आपल्याच धर्मबांधवांनी इतरांवर अन्याय अत्याचार करावेत आणि अत्याचारितांच्या धर्मबांधवांनीच पुन्हा आपल्याला आश्रय देवून आपला बोजा उचलला पाहिजे. जुन्या किंवा कुराणाच्या भाषेत त्याचे उत्तर धिम्मीट्युड असे आहे. म्हणजे तुम्ही मुस्लिम नाही म्हणूनच सर्व बोजा तुमच्यावर! भारतीयांना समजण्यासाठी आपण त्याला जिझीया कर म्हणू.

जगातल्या लिबरल म्हणजे उदारमतवादी वा सेक्युलर असलेल्या बुद्धीमंतांचे युक्तीवाद कसे बघा. त्यांना इराकमध्ये यझदी लोकांची शेकड्यांनी कत्तल झाली किंवा त्यांच्या पळवलेल्या मुली महिलांना गुलाम म्हणून विकण्याचा प्रकार चालू आहे, त्याची अजिबात फ़िकीर नाही. एकाच वेळी शेकड्यांनी बिगर मुस्लिमांची इराक-सिरीया प्रदेशात कत्तल चाललेली आहे. त्यांचेही शेकड्यांनी निर्वासित कुठे ना कुठे मिळतील. त्यापैकी कोणी दंगल माजवली असे दिसले आहे काय? काश्मिरातून जीव मूठीत धरून पळून आलेले पंडित दिल्लीच्या रस्त्यावर निर्वासित म्हणून तीन दशके पडलेत. त्यांनी कधी दंगल केली आहे काय? अरबी मुस्लिम देशातून पळालेले बिगर मुस्लिम लाखोच्या संख्येने अन्यत्र निर्वासित म्हणुन पडलेत. त्यांच्या दंगलीची बातमी कुठे कानावर येत नाही. पण जे लोक काल जीव मुठीत धरून जर्मनीत आश्रय घ्यायला आलेत, ते दोन दिवसात तिथे धर्माच्या नावाने दंगल माजवतात. ही युरोपमध्ये येऊ घातलेल्या संकटाची नांदी आहे. ज्या युरोपच्या पुराणकथा वा ऐतिहासिक कथांमध्ये टोजन हॉर्सची गोष्ट कित्येक पिढ्या सांगितली गेली व जगभर ऐकवली गेली, त्याची पुनरावृत्ती होऊ घातली आहे काय? कुठल्या युरोपिय देशाच्या राज्यकर्त्या नेत्याला तरी ती कथा आठवते काय? अभेद्य किल्ला वा तटबंदीमुळे जे राज्य अजिंक्य होते, त्याला ट्रोजन हॉर्स नामक रणनितीने भुस्कटासारखे पराभूत करण्याची किमया घडवणारी ती गोष्ट आहे. इतिहास विसरलेल्यांची वा नाकारणार्‍यांमुळे इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते ना?

दिर्धकाळ अनिर्णित असलेल्या त्या युद्धात एके सकाळी किल्ल्याच्या भव्य दारात एक प्रचंड लाकडी घोडा उभा दिसतो. बाकी कोणी शत्रूसैन्य नसते. दिवसभर बुरूज व तटबंदीवरून त्या घोड्याचे निरिक्षण चालू असते आणि संध्याकाळ होताना दरवाजा उघडून तो निर्जीव घोडा किल्ल्यात ओढून पुन्हा दरवाजा कडेकोट बंद केला जातो. मग अपरात्री त्या लाकडी घोड्यात लपलेले शत्रूसैनिक बाहेर पडतात आणि किल्ल्याची दारे उघडून दडी मारून बसलेल्या आपल्या बाकीच्या सेनेला रस्ता मोकळा करून देतात. किल्ल्याच्या झोपलेल्या सैनिकांना गाफ़ील धरून मारले जाते आणि ते साम्राज्य धुळीला मिळवले जाते, अशी ती कहाणी आहे. इथे आज आपण बघतो आहोत त्यात काय वेगळे घडते आहे?

मागल्या दशकात युरोपच्या विविध लहानमोठ्या देशात दोन ते दहा टक्के असलेल्या मुस्लिम संख्येने तिथल्या कायदा व्यवस्थेला ओलिस ठेवले आहे. जर्मनी, फ़्रान्स वा स्वीडन, नॉर्वे अशा देशातही इस्लामची सत्ता हवी म्हणून धुमाकुळ घातला आहे. काही महिन्यापुर्वीच फ़्रान्सच्या ख्यातनाम शार्ली हेब्दो नामक नियतकालिकाच्या कार्यालयावर ‘अल्ला हो अकबर’ अशा घोषणा देत हल्ला झाला आणि संपादकासह अनेकाची राजरोस कत्तल झाली. पॅरीसमध्ये महिनाभर अल्जिरीयन आश्रीत मुस्लिमांनी मोटारींची जाळपोळ चालविली होती. नेदरलॅन्ड देशात ‘व्हेल’ म्हणजे बुरखा नावाचा चित्रपट काढला त्यात इस्लामवर टिका होती, म्हणून मोरक्कन आश्रित मुस्लिमाने त्या दिग्दर्शकाची हत्या केली. स्वित्झर्लंड येथे सर्वात उंच मशिदीचा मिनार उभा करण्यावरून सार्वमत घेण्याची पाळी आणली गेली. हा सगळा प्रकार आश्रित निर्वासित असल्याचा पुरावा असतो काय? पाच दहा टक्के लोकसंख्या असताना जर इतके भयंकर प्रकार होत असतील, तर त्यात दुपटीने भर पडली मग उद्या युरोपचा पश्चिम आशिया व्हायला कितीसा वेळ लागणार आहे? दुसर्‍या महायुद्धानंतर लेबानॉनच्या बहुसंख्य ख्रिश्चनांना मायदेश सोडून पळ काढावा लागला आणि आता तर इस्लामी देश अशीच त्याची ओळख राहिली आहे. इजिप्तमध्ये कॉप्टिक ख्रिश्चन नामशेष होत चालले आहेत. हा इतिहास आहे आणि त्याची पुनरावृत्ती लोकसंख्येच्या फ़ेरबदलाने युरोपातही होऊ शकते. हे स्पष्ट दिसत असताना बाहु पसरून युरोपियन राज्यकर्ते चाळीस लाख निर्वासित म्हणून सिरीयन इराकींना सामावून घेण्याची भाषा करणार असतील तर ते विनाशाला आमंत्रण देत आहेत असेच म्हणावे लागते.

मात्र त्यासाठी अरबी देशातल्या त्या इसिस वा अन्य कुठल्या जिहादी संघटनेला वा अरबी राज्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवता येणार नाही. कारण त्यापैकी कोणी युरोपला वा त्या खंडातील देशांना निर्वासित घेण्याची सक्ती केलेली नाही. तो मध्य पश्चिम आशियातील विविध मुस्लिम देशातील अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यात हस्तक्षेपच करायचा तर अमानुष वागणार्‍यांना क्रुरपणे संपवण्याची मदत पुढारलेले युरोपियन देश करू शकत होते. यातले कोणी आपल्या देशात आले, तरी हाच घिंगाणा करतील म्हणून सौदी, दुबई, कुवेत असा कोणीही निर्वासितांना आपल्याकडे घ्यायला तयार नाही, की त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारीही घ्यायला राजी नाही. ह्यात जिहादी घुसखोरी करून येतील असे कारण देवून त्यांना आश्रित म्हणूनही घ्यायला आखाती देशांनी साफ़ नकार दिला आहे. मग उदारमतवादाचे नाटक रंगवून युरोपने हे संकट आपल्या गळ्यात घेण्याचे कारणच काय? तर त्याचे कारण आपण इथे भारतातही शोधू शकतो. याकुब मेमनसाठी गळा काढणारे वा काश्मिरी लोकांच्या हक्कासाठी मातम करणारे आपल्याकडेही नाहीत काय? पण त्यांना काश्मिरी पंडितांचे हाल दिसत नाहीत. बघता येत नाहीत. त्यांचेच भाईबंद युरोपातही तेच उद्योग करत आहेत. ज्यांना सामुहिक जबाबदारी म्हणून ग्रीससारख्या छोट्या देशाची दिवाळखोरी भरून काढताना नाकीनऊ आलेत, त्यांनी चाळीस लाख अरबी निर्वासितांच्या पुनर्वसनाचा बोजा उचलण्याचा दावा करण्यात कितीसा अर्थ आहे? कारण हा लोंढा इथेच थांबणारा नाही, की जे येत आहेत त्यांना आवरणेही युरोपच्या कायदा व राज्यकर्त्यांच्या आवाक्यातली गोष्ट नाही. त्यांना लिबीयाचा हुकूमशहा कर्नल गडाफ़ीचे शाप भोवत आहेत म्हणावे काय?

चार वर्षापुर्वी ट्युनीशिया व तहरीर चौकतील इजिप्शियन क्रांतीनंतर तेच अरब क्रांतीचे लोण लिबीयात पोहोचले. तेव्हा गडाफ़ीने ते चिरडण्याचा पवित्रा घेतला होता. पण तेव्हा मानवतेच्या युरोपियन पुरस्कर्त्यांनी गडाफ़ीला शह देण्यासाठी बंडखोरांना मदत केली. गडाफ़ीचा महाल व सैनिकी तळावर नाटोने हल्ले चढवून गडाफ़ीला पुरता नामोहरम करण्याची रणनिती राबवली होती. तेव्हाच गडाफ़ीने इशारा दिला होता. मला संपवून युरोप पन्नास लाख निर्वासितांना आमंत्रण देत आहे. याचा अर्थ अगदी स्पष्ट होता. ज्यांच्यावर मी पाशवी हुकूमतीने राज्य करतो आहे, त्यांना तुमच्या सभ्य नागरी जीवनाची सवय नाही आणि माझी सद्दी संपली, तर हे लोक तुमच्याच उरावर बसतील. असेच गडाफ़ीला म्हणायचे होते. युरोपियन राज्यकर्ते उदारहस्ते निर्वासितांना दरवाजे मोकळे करून गडाफ़ीचे शब्द खरे करीत आहेत. मात्र त्याचे परिणाम इतक्यात दिसणारे नाहीत. कारण जेव्हा इतक्या सहजतेने घुसता येते असे दिसेल, तेव्हा निर्वासित म्हणून अरबी प्रदेशातून युरोपात त्सुनामीसारख्या लाटा येतच रहाणार आहेत आणि मग बंदुकीच्या गोळ्याही त्या लोंढ्याला रोखू शकणार नाहीत. कारण मग बंदुकधारी युरोपियन पोलिस व लष्कराला आतले घरभेदी आणि बाहेरचे घुसखोर अशा दोन्ही बाजूने लढावे लागणार आहे.

यापासून घ्यायचा धडा सोपा साधा आहे. साधू भिक्षेकर्‍याचे रूप घेऊन येणारा मायावी रावण किंवा श्रीरामाचा आवाज काढून लक्ष्मणाला हाका मारणारा मायावी मारीच नुसत्याच भाकड वा पुराणकथा नसतात. त्यात काही बोध सांगितलेला असतो. ज्यांना घ्यायचा त्यांनी घ्यावा. नाहीतर प्रभूचा अवतर असून रामचंद्रालाही त्याच्या परिणामांपासून सुटका नसते. आपण तर सामान्य माणसे आहोत ना?

पूर्वप्रसिद्धी:  तरूण भारत (नागपूर) रविवार, १३ सप्टेंबर २०१५