मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०१४

आक्रमक चळवळीची प्रेरणा

(झुंडीचे राजकारण -२)


  रविवारी आम आदमी पक्षातल्या बंडखोर आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी आपल्यासोबत आणखी दोन आमदार पक्षावर नाराज असल्या्चे पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. मग त्यांनी त्या बळावर सरकारचा पाठींबा काढून घेण्य़ाची धमकी दिली होती. तेव्हा त्यांच्या समवेत दोन अन्य अपक्ष आमदार होते. पण रात्री उशीरा व सोमवारी सकाळी मदनलाल नावाचा ‘आप’ आमदार बंडखोरांच्या बैठकीला हजर असल्याची बातमी झळकली. मात्र सोमवारी दुपारी त्याच मदनलाल नामक आमदाराला ‘आप’नेते संजय सिंग व आशुतोष यांनी पत्रकारांसमोर हजर केले. त्याने आपल्याला पक्षातून फ़ोडण्याचे कसे डावपेच खेळले गेले, त्याची मोठी मनोरंजक कथाच कथन केली. अर्थात आम आदमी पक्षात सगळेच सत्यवचनी राजा हरिश्चंद्र असल्याने त्यांनी कोणावरही कसलेही आरोप करावेत, त्याला पुरावे साक्षी लागत नसतात. त्यामुळेच मदनलाल यांनी नरेंद्र मोदीपासून अरूण जेटली व डॉ. हर्षवर्धन यांच्यावर फ़ोडाफ़ोडीचे आरोप केल्यास, ते खोटे कसे म्हणता येईल? शिवाय आम आदमी पक्षाचा साक्षात ईशकृपेनेच अवतार झालेला असल्याने, त्यांना स्थल काळाचेही बंधन उरत आही. इथेही तेच झाले होते. मदनलान नावाचा ‘आप’ आमदार जी कहाणी सांगत होता, ती निवडणूक निकाल लागून तो आमदार व्हायच्या आधीची होती. म्हणजेच आपण सामान्य माणसे ज्याला धडधडीत खोटारडेपणा म्हणतो, तशीच होती. पण सांगणारा आम आदमी पक्षाचा असल्यावर ती आपोआप खरी होऊन जाते ना?

   मदनलाल याच्या कथनानुसार कोणा अज्ञात व्यक्तीचा त्याला ७-८ डिसेंबरच्या मध्यरात्री सव्वा बारा वाजता फ़ोन आला आणि त्याने फ़ोडाफ़ोडीच्या गोष्टी केल्या. त्यानुसार मदनलाल यांनी ‘आप’चे नऊ आमदार फ़ोडायचे होते. त्या बदल्यात भाजपाच्या पाठींब्याने मदनलाल यांना मुख्यमंत्री केले जाणार होते. तर दोघांना मंत्रीपद दिले जाणार होते. जे मंत्री होतील, त्यांना प्रत्येकी दहा कोटी आणि जे नुसतेच पक्ष सोडतील, त्यांना प्रत्येकी वीस कोटी रुपये दिले जाणार होते. आता नऊ आमदारच कशाला फ़ोडायचे? तर नऊ म्हणजे २७ पैकी नऊ; म्हणजे एक तृतियांश होतात आणि त्यांना पक्षांतराचा कायदा लागू होणार नाही, असा डाव होता. पण असे सांगणारा कोण होता, ते या गृहस्थांना माहित नाही. पण त्याने अरुण जेटली व नरेंद्र मोदींचे नाव घेतले, म्हणून हा सगळा भाजपाचा डाव असल्याचा ‘आप’चा दावा आहे. यातला प्रत्येक शब्द पुरावा नसताना जरी खरा मानायचा ठरवला, तरी निदान तो आरोप तर्कशास्त्रात तरी बसायला हवा ना? त्यात तरी गफ़लत होऊ नये, अशी अपेक्षाही कोणी करू नये काय? यातून काही प्रश्न उपस्थित होतात.   

   १) विधानसभेचे मतदान ४ डिसेंबर रोजी झाले आणि मतमोजणी ८ डिसेंबरला सकाळी आठ वाजल्यानंतर व्हायची होती. म्हणजे मदनलाल यांना आलेल्या फ़ोनची वेळ, तेच सांगतात ती खरी मानायची; तर मतमोजणी सुरू व्हायच्या तब्बल पावणे आठ तास आधी यांना तशी ऑफ़र देण्यात आलेली होती. प्रत्यक्ष मदनलाल वा अन्य ‘आप’ आमदार निवडून आल्याची घोषणा होण्य़ाच्या पंधरावीस तास आधीच, त्यांची खरेदी सुरू झालेली होती. याचा अर्थ अशी खरेदीविक्री करायला आलेला मोठा अंतर्यामी असला पाहिजे. किंवा खुद्द मदनलाल तितके अंतर्यामी असायला हवेत. अन्यथा आमदार नसलेल्यांना कोणी इतक्या आधी खरेदी कशाला करणार?

   २) मतमोजणीच्या आधीच पंधरावीस तास भाजपाला आपण बहूमत मिळवत नाही, याची एकवेळ खात्री असू शकेल. पण आम आदमी पक्षाचे २७ आमदार निवडून येणार, हे भाजपाला कसे कळू शकले? शिवाय इतकी वर्षे फ़ोडाफ़ोडीचे राजकारण खेळणार्‍या ‘बदनाम’ भाजपाकडे एकतृतियांश आमदार वेगळे झाल्याने पक्षांतर कायदा लागू होत नाही, इतके अज्ञान असू शकते काय? २००३ सालात या कायद्यात बदल झाला असून दोन तृतियांश आमदार वेगळे झाले, तरच त्याला पक्षांतर समजले जात नाही, अशी दुरूस्ती करण्यात आलेली आहे. ते एकवेळ नवख्या आम आदमी पक्षाला माहित नसेल. पण फ़ोडाफ़ोडीची ‘बदमाशी’ करणार्‍या भाजपाला तरी नक्कीच ठाऊक असणार ना? मग त्याच भाजपाचे दोन मोठे नेते नऊच आमदार फ़ोडायची ऑफ़र कशाला देतात? 

   ३) मतमोजणीच्या आदल्या रात्री अशी ऑफ़र आलेली असताना आम आदमी पक्षाच्या नेत्यांपासून त्या आमदारापर्यंत सगळे लोक पुढले आठ आठवडे गप्प कशाला बसतात? प्रत्येक बाबतीत पारदर्शकतेचा आग्रह धरणार्‍या ‘आप’चे हे नेते त्याबद्दल पोलिसात जाऊन साधी तक्रार कशाला करीत नाहीत? बिन्नी व अन्य दोन आमदारांनी सरकारचा पाठींबा काढून घेण्याची धमकी देण्य़ाची प्रतिक्षा कशाला करतात? पावणे दोन महिन्यांनी त्याच मदनलालचे नाव बंडखोरांच्या बैठकीत हजर राहिला म्हणून घेतले जाणार आणि त्यावेळी हा फ़ोनवरील ऑफ़रचा आरोप तुरूपचा पत्ता म्हणून वापरता येईल; असे त्यांना वाटले होते काय? असूही शकेल. पण मग पावणे दोन महिन्यानंतर अशाच प्रकारे आपले नाव बंडखोरांच्या बैठकीत हजेरी लावण्यासाठी घेतले जाण्याचा पुर्व अंदाज येऊ शकणारे मदनलाल व आम आदमी पक्षाचे नेते खरोखरच अंतर्यामीच असले पाहिजेत. मग त्यांची भाषा, त्यांचे आरोप, त्यांचे आक्षेप, त्यांचे अजब तर्कशास्त्र आपल्यासारख्या सामान्य माणसाला म्हणजे हिंदीतल्या आम आदमीला कसे उमगावे? 

   असे तर्कशास्त्र व भाषा उमगण्यासाठी तुम्ही आम आदमी पक्षाची टोपी डोक्यावर चढवावी लागते. मग तुमचा सामान्य मेंदू निकामी होऊन, जे कही डोक्यात भरवले जाईल ते विनासायास तुम्हाला खरे वाटू लागते. त्याचे पुरावे, साक्षी किंवा वास्तविकता आवश्यक रहात नाही. एकदा तुमच्या डोक्यात तिरस्काराची व द्वेष करण्यासारखी कल्पना रुजवली; मग वास्तवाशी नाते उरत नाही. छू म्हणायची खोटी, की तुम्ही अंगावर धावून जायला लागता. आणि त्याची प्रचिती मग मंगळवारी आली. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एक मोठा घोळका भाजपा नेते अरूण जेटली यांच्या निवासस्थानी जमला आणि त्याच्या निषेधाच्या घोषणा करू लागला. कुठलाही पुरावा नाही की कोणी साक्षीदार नाही, पण नेत्यांनी सांगितले आणि आरोप केला, म्हणजे जेटली ‘आप’ सरकार पाडणारे कारस्थानी होऊन जातात. त्याच्या विरोधात घोषणा देणे म्हणजेच मग राष्ट्रकार्य, समाजकार्य आणि राजकीय परिवर्तनाचे महान पवित्र कार्य होऊन जाते. सोमवारचा टिव्हीवरील आम आदमी पक्षाच्या नेते, प्रवक्त्यांचा धिंगाणा व पोपटपंची बघितली होतीच. पण मंगळवारी जेटली यांच्या घरावर जमलेल्या व गदारोळ करणारी टोपीवाली झुंड बघितली आणि हिटलर आठवला. द्वेषाच्या नावाने माणसे जितकी झटकन जवळ येतात, तितकी ती प्रेमाच्या नावाने एकत्र येत नाहीत. चळवळीसाठी मित्रांपेक्षा शत्रूच्या नावाचा जप आवश्यक असतो. वास्तवातला शत्रू किंव संभाव्य कल्पनेतला शत्रू त्यासाठी आवश्यक असतो. शत्रू वा सैतानाच्या भयाने जितकी लौकर आक्रमक संघटना उभी करता येते, तितकी ती देवाच्या वा कल्याणाच्या नावाने उभी रहात नाही. जितका शत्रू प्रभावी व सामर्थ्यवान भासवला जातो, तितकी चळवळ अधिक झुंजार करता येत असते. ही प्रक्रिया जरा काळजीपुर्वक समजून घेण्याची गरज आहे. मानसशास्त्रामध्ये त्याला झुंडीचे राजकारण वा सूचनाप्रवण झुंडशाही संबोधले जाते. अडॉल्फ़ हिटलर त्याचे नेमके विश्लेषण किंवा स्पष्टीकरण देतो. हिटलरला विचारण्यात आले, की ज्यू जमातीचा संपुर्ण नि:पात केला पाहिजे, असे तुझे मत आहे काय? त्यावर हिटलर उत्तरला.....

     ‘छे छे, ज्यू नावाचा कोणी अस्तित्वातच नसेल तर तो अस्तित्वात आहे असे दाखवावे लागेल. खरा ज्यू नसेल तर काल्पनिक ज्यू तरी हवाच. चळवळ उभी करायची तर ज्याचा द्वेष करावासा वाटेल, ज्याच्या नावाने द्वेषाची चिथावणी देता येईल, असा कोणी हाडामासाचा खराखुरा शत्रू आवश्यक असतो. असा खरा शत्रू नसेल तर लोकांना चिथावता येत नाही. केवळ अमूर्त कल्पना पुढे करून ती गोष्ट साध्य होत नाही.’ (हर्मान रॉशनिंग, हिट्लर स्पिक्स). 

   गेल्या दोन महिन्यात अरविंद केजरीवाल व त्यांच्या टोळक्याने ज्याप्रकारची झुंडशाही चालविली आहे, त्यामागची प्रेरणा ही अशी आहे. जनलोकपाल आणि भ्रष्टाचारमुक्त समाज ही अमूर्त कल्पना आहे. तिच्याभोवती अधिक काळ लोकांना रमवता येणार नाही. लोकांना खराखुरा हाडामासाचा शत्रू दाखवावा लागतो. त्या शत्रूला, त्या भ्रष्टाचार्‍याला, समाजशत्रूला चेहरा व नाव असावे लागते. ज्याचा द्वेष करावा असा मुखडा लागतो. छू म्हटल्यावर तात्काळ ज्याच्यावर तुटून पडावे, अशी शिकार चळवळीला आवश्यक असते. ही कुठल्याही चळवळीची अतीव निकड असते. ही बाब लक्षात घेतली तर केजरीवाल आणि त्यांची टोळी नित्यनेमाने कुणावरही कसलेही बिनबुडाचे व भ्रामक आरोप कशाला करतात, ते लक्षात येऊ शकेल. त्यांनी आरोप केलेली माणसे खरीखुरी व हाडामासाची असतात. पण त्यांच्यावरचे आरोप संदिग्ध व बिनबुडाचे असतात. बाकीच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळी तितक्या यशस्वी होत नाहीत वा झाल्या नाहीत. कारण त्यांनी भ्रष्टाचारावर हल्ले केले, तरी त्यातल्या शत्रूला चेहरा नाही की नाव नाही. ज्याचा मनापासून द्वेष करावा असा कोणी हाडामासाचा शत्रू त्या अन्य चळवळीच्या नेत्यांनी कधी समोर ठेवला नाही. उलट आम आदमी पक्षाच्या स्थापनेपासून व जनलोकपाल आंदोलनात असताना, त्याच पक्षाच्या नेत्यांनी सतत कुठल्या ना कुठल्या व्यक्तीवर, नेत्यावर बेछूट आरोप केलेले दिसतील. जे आम आदमी पक्षात सहभागी झाले नाहीत, अशा अण्णा टिमच्या इतर नेत्यांनी मात्र असे कधी कुणावर बिनबुडाचे आरोप केले नाहीत की व्यक्तीगत नावे घेतली नाहीत. केजरीवाल व आता ‘आप’नेत्यांनी मात्र अगत्याने हिटलरच्या सल्ल्याचे अनुकरण केलेले दिसेल. सोमवार मंगळवारी अरूण जेटली यांच्या घरापर्यंत पोहोचलेला घोळका तसाच कमालीच्या द्वेषाने धगधगताना दिसत नव्हता काय? जनलोकपाल आंदोलन आणि आम आदमी पक्ष यांच्यातला हा मूलभूत फ़रक आहे. केजरीवाल तिथून बाजूला कशाला झाले आणि उर्वरीत अण्णा टीम त्यांच्या सोबत का येऊ शकली नाही, त्यामागे हे झुंडीचे कारण निर्णायक आहे. पारंपारिक राजकीय पक्ष वा चळवळींच्या निकषावर म्हणूनच या पक्ष वा घटनाक्रमाला समजून घेता येणार नाही. त्यामागची झुंडीच्या मानसशास्त्राची प्रेरणा उलगडावी लागेल. (अपुर्ण)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा