गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१३

श्रद्धा-अस्मितेच्या पायावर राष्ट्राची उभारणी होते.


   कुठल्याही समाज, राष्ट्र वा मानवी समुहाची एक ओळख असते आणि ती ओळखच त्या समाज समुहाला एकत्र बांधून ठेवत असते. जसा माणूस स्वत:चा बचाव करत असतो, तसाच नेहमी त्या ओळखीचाही प्राणपणाने बचाव करत असतो. कोणी त्याला अस्मिता, कोणी अभिमान वा कोणी अस्तित्वभान असे वेगवेगळे नाव देतात. पण तशी ओळख नसलेला माणूस विरळा असतो आणि असा बिनचेहरा व बिन-ओळखीचा माणूस स्वत:चा बचाव करू शकत नाही, की अन्य कोणाचा बचाव करू शकत नाही. मग अशी ओळख ही श्रद्धाच असते. ती कधी भाषेची, प्रांताची वा धर्माची असू शकते. कधी जातीपातीचीही असू शकते. पण ती नसेल तर तुम्हाला ओळखच नसते. साधी गोष्ट घ्या. परवा कोणी त्या ऑस्करच्या सोहळ्यात ‘नमस्ते’ असा शब्द वापरला आणि एकाहुन एक बड्या नामवंत भारतीयांनी त्याची अभिमानाने आपल्या मतप्रदर्शनात दखल घेतली. ज्यांच्या वागण्या जगण्यात सहसा भारतीयत्व दिसत नाही किंवा आपल्यावर भारतीयत्वाचा शिक्का बसू नये, याची जी माणसे अगत्याने काळजी घेत असतात, अशीच ही मंडळी आहेत. शोभा डे किंवा तत्सम जे आंग्लाळलेले समाजातील प्रतिष्ठीत आहेत, असेच लोक इथे भारतात काही कोणी अस्मितेचा विषय काढला; मग त्याची हेटाळणी करण्यात नेहमी बौद्धिक धन्यता मानतात. अशा लोकांनाच कुणा अमेरिकन परदेशी नामवंताने नुसते ‘नमस्ते’ म्हटल्याने आभाळ केवढे ठेंगणे झाले होते. कमाल आहे ना? ज्यांना नित्यजीवनात भारतीय असल्याची लाज वाटत असते, त्यांना त्या नमस्तेचे इतके कौतुक कशाला असावे? कारण त्यांनी कितीही स्वत:ला भारतीय मानले नसले तरी परदेशी जातात, तेव्हा त्यांची दखल भारतीय म्हणूनच घेतली जात असते. दखल म्हणजे यांना फ़डतुस वागणूक दिली जात असते. मग त्यांच्या मनाचा कोंडमारा होत असतो. तिथे यातला कोणी कधी ‘नमस्ते’ चुकून बोलणार नाही. अमेरिकेनांपेक्षा अमेरिकन असल्याचे दाखवायची स्पर्धा चालते. पण तरीही त्यांच्या कातडीच्या रंगामुळे यांना तिथे भारतीय म्हणूनच हलकी वागणूक मिळते. त्याची जी छुपी वेदना असते; ती अशावेळी अस्मिता होऊन बाहेर येते. शोभा डे किंवा तत्सम लोकांनी त्या ‘नमस्ते’ शब्द उच्चारणाचे इतके कौतुक केले; कारण अशा लोकांना जगासमोर आपल्या भारतीयत्वाची लाज वाटत असते. त्याचा उच्चार अभिमानाने वा ठामपणे करायचीही हिंमत त्यांच्यामध्ये नसते. पण जेव्हा भारतीयत्व शिरजोर होताना दिसते; तेव्हा हीच मंडळी आपले भारतीयत्व दाखवायला अगत्याने आघाडीवर येताना दिसतील.

   कुठे बलात्कार झाले वा दंगली झाल्या, मग लगेच भारतीय असल्याची लाज वाटते; म्हणताना हेच लोक पुढे सरसावलेले दिसतात. असेच असेल तर कोणी मोठ्या परदेशी समारंभात नमस्ते म्हटल्यावर अभिमान कशाला? जो शब्द परदेशी जाऊन तुम्हाला उच्चारण्याची लाज वाटते, तो परदेशी माणसाने उच्चारला तर अभिमान तरी कशाला वाटतो? शोभा डे ज्या वर्तुळत वावरतात; त्या वर्तुळातील सगळे उच्चभ्रू बघितले, तर गुजरातच्या दंगलीपासून कुठल्याही बाबतीत पदोपदी ही मंडळी आपल्याला भारतीय असल्याची लाज वाटते असे म्हणताना व लिहिताना दिसतील. मग ती लाज किंवा ती अपराधी भावना; अशा प्रसंगी कशाला अभिमानाची होते? अभिमान असो, की लज्जास्पद असो, तुमची जी ओळख असते ती सर्वांगिण असते. ती सोयीनुसार कमीअधिक होत नसते. आपण अमुक आहोत, ही ती ओळख वा श्रद्धा असते. आणि तिचा अभिमान असेल तरच तिच्या समर्थनासाठी तुम्ही पुढे येता किंवा झुंज देऊ शकत असता. त्यातूनच तुमचे कर्तृत्व उभारले जात असते. त्यात यश व अपयश दोन्हींचा समावेश असतो. त्यामुळेच जेव्हा आपण समाज किंवा राष्ट्र म्हणून जगत असतो, तेव्हा त्याच्या भल्याबुर्‍या गोष्टींसाठी लाज बाळगून चालत नाही. भल्या गोष्टींचा अभिमान बाळगावा, बुर्‍या गोष्टी टाळायचा प्रयास करावा. परंतू कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली जी ओळख किंवा श्रद्धा असते; तिची लाज वाटून चालत नाही. जेव्हा अशी लाज वाटू लागते, तेव्हा आपण दुसर्‍या श्रद्धा वा दुसर्‍या विचारांना आपल्यावर मात करण्याची संधी देत असतो. कारण आपण जे कोणी असतो, त्याचा अभिमान विसरत असतो. सेक्युलर किंवा उदारमतवाद अशा अस्मितांची सतत टवाळी करताना दिसेल. आणि म्हणूनच उदारमतवादाच्या आहारी गेलेल्या अनेक महाशक्ती असलेल्या देशांची आज पुरती दुर्दशा झालेली आपण बघत असतो. अमेरिका आज जगातली एकमेव महाशक्ती मानली जाते. पण तिला अफ़गाणी जिहादींशी दोन हात करता आलेले नाहीत. त्याचे प्रमुख कारण आजच्या अमेरिकनांना आपल्या ओळखीचीच लाज वाटू लागली आहे. आपला देश इतरांवर अन्याय करतो, लुटमार करतो अशी एक अपराधी भावना तिथल्या समाजात यशस्वीरित्या राबवण्यात उदारमतवादी व सेक्युलर मंदळी यशस्वी झालेली आहे. त्याचेच परिणाम अमेरिका भोगते आहे. दुसरीकडे अर्धशतकापुर्वी अर्ध्या जगावर अरज्य करणारे युरोपीयन विकसित व श्रीमंत देश बघा. त्यांचीही अशीच दुर्दशा झालेली दिसेल. कारण आपण जगावर राज्य केले या अभिमानापेक्षा त्या देशातील समाजामध्ये अपराधीपणाची भावना आज अधिक आहे. परिणामी समाज म्हणून त्यांची उपजत प्रतिकार शक्तीच खच्ची होऊन गेली आहे. त्यांचा राष्ट्राभिमानच उध्वस्त होऊन गेला आहे. त्यांच्या धर्मश्रद्धा निकामी होऊन गेल्या आहेत.

   युरोपियन देशांची आजची दयनीय अवस्था त्यांच्यातल्या अपराधी भावनेतून आलेली आहे. सेक्युलर व बहुविध समाज घडवण्याच्या नादात युरोपियन देशांनी मोठ्या प्रमाणात परदेशी लोकांना नागरिकत्व बहाल केले; त्यातून त्यांच्या आजच्या समस्या उफ़ाळून आलेल्या आहेत. आणि त्यापैकी कोणी परदेशातून आलेल्या उपर्‍यांबद्दल नुसती तक्रार केली, तरी स्वकीयांवरच पक्षपात व वंशद्वेषाचा आक्षेप घेतला जातो. जणू त्या देशातले ते पुर्वापार वारस आहेत, हा त्यांचा गुन्हा ठरवला गेलेला आहे. त्यातून त्यांच्यात जी अपराधी भावना जोपासली गेली, त्याचे परिणाम दिसत आहेत. परंपरेने हे देश ख्रिश्चन मानले जातात. कारण कित्येक शतकांपासून त्यांची धार्मिक श्रद्धा व ओळखच ख्रिश्चन अशी होती. पण मागल्या पन्नास वर्षात सेक्युलर विचारसरणीने त्या धार्मिक श्रद्धा उध्वस्त करून टाकल्या. त्यातून या विविध युरोपियन समाज समुहांची आपली ओळखच हरवून गेली आहे. परिणामी तिथे आलेले व नागरिकत्व मिळवलेले परदेशी लोक शिरजोर होत चालले आहेत. कारण अशा बहुतांश परक्या नागरिकांनी तिथे जाऊनही आपल्या जन्मभूमीची संस्कृती व धर्माची कास सोडलेली नाही. मुठभर असूनही असे परके नागरिक तिथे आपल्या संस्कृती व धर्माचे काटेकोर पालन करतात, त्यात स्थानिक कायद्यांना हस्तक्षेप करू देत नाहीत. नुसते आपल्या परक्या संस्कृतीचे जतनच हे नवखे नागरिक करत नाहीत, तर आपल्या धर्मश्रद्धा व संस्कृतीच्या आग्रहासाठी स्थानिक कायद्यांना व संस्कृतीलाही आव्हान देत असतात. पण त्यांना रोखण्याची हिंमत अनेक युरोपीयन समाजांमध्ये उरलेली नाही. कारण बहुसंख्य असूनही हे समाज आपली धार्मिक व सांस्कृतिक ओळखच गमावून बसले आहेत. थोडक्यात ब्रिगेडीयर मलिक म्हणतात, तशा या युरोपियन समाज समुहांच्या धर्मश्रद्धा मोडकळीस आल्याने त्यांना समाज म्हणून नेस्तनाबुत करणे अस्मितावादी व श्रद्धावान अशा मुठभरांच्या छोट्या समुहाना सहजशक्य होते आहे.

   मग प्रश्न असा येतो, की त्या लहानमोठ्या युरोपियन समाज समुहांचा श्रद्धा व ओळखीचा पाया मोडीत काढण्याचे काम ज्यांनी केले; त्यांनीच आक्रमकांचे काम सोपे करून टाकलेले नाही काय? सेक्युलर उदारमतवाद्यांनी व मानवाधिकाराच्या नावाखाली युरोपियन देशात ज्याप्रकारे तिथल्या ख्रिश्चन समाजाचा व श्रद्धेचा पायाच उखडण्यात आला; त्यातून आज त्या समाजांचे मनोधैर्यच पुरते खच्ची होऊन गेले आहे. भारताच्या तुलनेत युरोपियन देशातील मुस्लिमांची संख्या खुपच कमी वा नगण्य आहे. पण त्या मुस्लिमातील जिहादी घातपात्यांनी युरोपियन समाजामध्ये निर्माण केलेली दहशत भारतापेक्षा थरारक आहे. आज देखील शस्त्रास्त्रांच्या क्षमतेमध्ये बघितल्यास अमेरिकाच नव्हेतर ब्रिटन, फ़्रान्स, इटाली व जर्मनी हे बलाढ्य़ देश मानले जातात. पण इतकी शस्त्रास्त्रे  व तंत्रज्ञान सज्जता असूनही त्यांना तिथले मुठभर जिहादी हैराण करून सोडत आहेत. पण जोवर त्यांच्या राष्ट्रीय अस्मिता व धर्मश्रद्धा भक्कम होत्या, तोवर त्या देशांची जगावर हुकूमत चालत होती. दुसरीकडे चीनसारखा निधर्मी वा साम्यवादी देश बघता येईल. त्याची श्रद्धा धर्माची नसेल. पण राजकीय, राष्ट्रीय अस्मिता पक्की व कडवी आहे. त्या श्रद्धेला धक्का बसेल असे कुठले कृत्य चीन सहन करत नाही. तिआनमेन चौकातील हत्याकांडाची लाज वाटेल; त्याला चीनम्ध्ये स्थान नसते. बर्‍यावाईट गोष्टीसह तिथल्या समाजाच्या अस्मिता श्रद्धा भक्कम आहेत आणि तो देश महाशक्ती म्हणून पुढे आलेला आहे. त्याला कोणी भयभीत करू शकत नाही. श्रद्धेची व अस्मितेची ही किमया आहे.  ( क्रमश:)
 भाग   ( १०० )    १/३/१३

बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१३

भारतीयत्वाचा अभिमानच लज्जास्पद बनवायची रणनिती?


   कुठे बलात्कार वा कुठली अशीच अमानुष घटना घडते तेव्हा लगेच आपल्याकडले अतिशहाणे भारतीय असल्याची लाज वाटते; अशी भाषा बोलू लागतात. आणि मग आमच्यातले बहुतांश खुळे आपल्या चांगुलपणाचे प्रदर्शन मांडण्यासाठी त्यांच्याच सुरात सुर मिसळून भारतीय असल्याबद्दल अपराधी भावना व्यक्त करू लागतात. यांना त्या हीन कृत्याची लाज वाटते, की आपल्या भारतीय असण्याची लाज वाटते? सव्वाशे कोटी भारतीय गुन्हेगार असल्यासारखी ही भाषा मला नेहमी संतापजनक वाटते. कारण मी कुठलाही गुन्हा केलेला नसताना माझ्या मनात त्याविषयी अपराधी भावना जागवण्याची ती रणनिती आहे. जेव्हा तुमच्या मनात अशी आपल्याच अस्तित्वाविषयी अपराधी भावना प्रभावी होत जाते; तेव्हाच तुम्ही तुमच्या अस्तित्वाचा बचाव करायची शक्ती गमावून बसत असता. तुमच्यातल्या प्रतिकार शक्तीचे त्यातून खच्चीकरण होत असते व केले जात असते. आज इतकी वर्षे पाकिस्तानने किती म्हणून गुन्हेगारी कृत्ये केली आहेत. पण कुणी तिथे आपल्या पाकिस्तानी असल्याची लाज वाटते; अशी भाषा वापरली आहे काय? जिहादी हिंसाचाराने जगभर हजारो निरपराधांचे हकनाक बळी घेतले आहेत, म्हणून कुणी मुस्लिम असल्याची लाज वाटते असे म्हणतो काय? श्रीलंकेच्या खेळाडूंवर पाकिस्तानात भर रस्त्यावर गोळ्या झाडल्या गेल्या; म्हणून कुणा पाकिस्तानी क्रिकेटपटूने तरी आपल्या पाकिस्तानी वा मुस्लिम असण्याची लाज वाटते, अशी भाषा वापरली आहे काय? ते फ़क्त कृत्याचा निषेध करतात, पण तेवढ्याच आवेशात इस्लाम म्हणजे शांतता व इस्लाम धर्म हिंसेला मान्यता देत नाही, असे त्याच्याच पुढे अगत्याने सांगतात. मग आम्ही उठसुट भारतीय असल्याची किंवा हिंदू असल्याची लाज वाटते अशी भाषा कशाला वापरत असतो? त्यातून आपण स्वत:च्याच अस्तित्वाला गुन्हा ठरवत असतो. ज्याचा अभिमान बाळगायचा त्याचीच लाज वाटू लागली; तर त्याचा बचाव करायची हिंमत येणार कुठून? म्हणूनच मग पाकिस्तानी सैनिकांनी वा तिथल्या जिहादींनी नियंत्रण रेषेवर भारतीय सैनिकाचे मुंडके कापल्याची पाकिस्तान्यांना लाज वाटली नाही, की कुणा मुस्लिमाला हे जिहादींनी इस्लामच्या नावावर केले असूनही मुस्लिम असल्याची कुणा मुस्लिमाला लाज वाटली, असे त्यापैकी कोणी म्हणाला नाही. कारण कृती करणार्‍याचे पाप त्या संपुर्ण समाजाचे नसते. अशा कृतीचा राग यावा. पण त्यासाठी स्वत:च्या अस्तित्वाबद्दल अपराधी भावना असायचे कारण नाही. आणि जो कोणी मुद्दाम तुमच्यात अशी जाणीव निर्माण करत असतो; तोच तुमचे मानसिक खच्चीकरण करत असतो. तुमच्या असण्याचे, तुमच्या अस्तित्वाचे व पर्यायाने तुमच्या मनोधैर्याचे त्यातून खच्चीकरण होत असते. एकदा तुमचे असे खच्चीकरण झाले; मग तुमच्या हाती कुठलेही भेदक हत्यार असले; तरीही स्वत:चा बचावही करू शकत नसता. कारण प्रतिकार व लढण्याची इच्छाच तुम्ही गमावून बसलेले असता. म्हणूनच घटना कितीही भीषण वा अमानुष असली, म्हणून आपल्या भारतीय असण्याची लाज वाटायचे कारण नाही. असे काही करणारा भारतीय आहे, हिंदू आहे म्हणून त्याला आधीच ओळखून आपण आपल्यातून हाकलून लावला नाही, याची लाज वाटायला हरकत नाही. पण ज्या जाणिवा, श्रद्धा व ओळखीने तुम्ही भारतीय वा हिंदू असतात, त्याची लाज वाटायचे कारण नाही.

   अशी लाज वाटण्याची भाषा जाणिवपुर्वक व योजनापुर्वक आपल्या प्रतिकार शक्तीचे खच्चीकरण करण्यासाठीच योजलेली असते. तिचे परिणाम आपण भोगत आहोत. काश्मिरच्या सीमारेषेवर दोघा सैनिकांची हत्या झाली व एकाचे मुंडके कापुन नेल्यावर आपल्या देशाचा पंतप्रधान वा सेक्युलर सरकार कुठलीही प्रक्षुब्ध प्रतिक्रियासुद्धा देऊ शकले नव्हते. कारण त्यांना आपल्या भारतीय असण्याचीच लाज वाटत असेल, तर त्यांनी आपल्या जवानाचे मुंडके कापून नेल्याने चिडावे कशाला व कसे? कोणालाही चीड येते वा प्रतिकार करावासा वाटतो, तो मुळात त्याच्या अभिमानाला धक्का बसला, इजा झाली तर. ज्याचा अभिमानच वाटत नसतो, त्याचा प्रतिकार करायची इच्छाच होणार कशी? म्हणूनच ते मुंडके कापून नेल्यावरही आमचे सरकार शांत बसून होते, संरक्षणमंत्री व परराष्ट्रमंत्री विचारमंथन करत बसले. पण त्याचवेळी तुमच्या माझ्यासारखे लाखो करोडो नागरिक प्रक्षुब्ध झाले होते, पाकिस्तानवर हल्ला करा; म्हणूनही मागणी करू लागले होते. पण पंतप्रधान शांतच होते ना? कारण आपल्याला आपण भारतीय असल्याची लाज वाटत नाही, तर अभिमान आहे. म्हणून आपण चिडून उठलो होतो. पण भारतीयत्वाचीच लाज वाटणारे पंतप्रधान वा सेक्युलर जे कोणी आहेत; त्यांना त्या जवानाचे मुंडके कापल्याचे सोयरसुतक नव्हते ना? म्हणूनच कारण कुठलेही असो; आपल्याला आपल्या भारतीयत्वाची, हिंदू असण्याची लाज वाटता कामा नये. ती वाटू लागली, की आपण संपलो म्हणून समजा. कारण त्याचीच लाज वाटू लागली तर आपली प्रतिकारशक्ती त्याच्याबरोबरच क्षीण व निकामी होऊन जात असते. तिथेच मग कसाब किंवा कोणीही बॉम्बस्फ़ोट घडवणारा अर्धी लढाई जिंकत असतो. आणि तेच तर पाकिस्तानी सेनाधिकारी ब्रिगेडीयर मलिक आपल्याला समजाऊन सांगत आहेत. ते काय म्हणतात, ते म्हणूनच काळजीपुर्वक समजून घेण्याची गरज आहे. जोवर तुमची श्रद्धा पक्की व भक्कम असते, तोपर्यंत हत्यारे वा हिंसा दहशत माजवू शकत नाहीत, अशीच मलिक यांनी ग्वाही दिलेली आहे ना?

   कितीही प्रतिकुल परिस्थितीत तुमचा बचाव व्हायचा असेल; तर त्यातून सहीसलामत सुटण्याची इच्छा आवश्यक आहे. त्यासाठी साधने मग दिसू लागतात व उपलब्धही होतात. पण इच्छाच नसेल तर समोर व हाताशी साधने असूनही तुम्ही काहीच करू शकत नाही. ती साधने निकामी व निरूपयोगी असतात. म्हणून तर ज्याच्या हाती कुठलेही साधन व अधिकार नव्हता असा माणूस त्या जवानाचे मुंडके कापले गेल्यावर आपला भारतीयत्वाचा अभिमान दाखवू शकला, त्याचे नाव नरेंद्र मोदी. जेव्हा तीस लाखाची फ़ौज हाताशी असूनही मनमोहन सिंग आणि त्यांचे सरकार हात चोळत बसले आणि जवानाचे मुंडके तरी परत द्या; अशा गयावया पाकिस्तानकडे करत होते, तेव्हा मोदी यांनी त्यांच्या गुजरातच्या गुंतवणूक योजनेसाठी आलेल्या पाकिस्तानी शिष्टमंडळाला तसेच माघारी पाठवून दिले होते. ह्या माणसाने आमंत्रिताला परत पाठवण्याची ती हिंमत कुठून आणली? तर त्याला आपल्या गुजराती, हिंदू व भारतीय असण्याची अजिबात लाज वाटत नाही. गेली दहा वर्षे त्याच्यावर नरभक्षक, मौतका सौदागर असे शेकडो आरोप झाल्यावरही त्याने एकदाही माफ़ी मागितली नाही; हीच त्याची ताकद आहे. चुका वा गुन्हे गुजराती हिंदूंकडून झाले असतील, तर त्यांना शिक्षा द्यायला हरकत नाही. पण त्यासाठी गुजराती हिंदू असणे हा ज्याने गुन्हा मानला नाही, त्याच्याविषयी लाज बाळगली नाही, म्हणूनच मोदीमध्ये ही हिंमत दिसू शकली. ती देशाच्या सर्वशक्तीमान मानल्या जाणार्‍या सेक्युलर सरकारला दाखवता आलेली नाही. गुजरातच्या दंगली वा तो हिंसाचार याच्याविषयी अपराधी भावना कुरवाळत बसला असता, तर त्यालाही इतकी हिंमत दाखवता आलीच नसती.

   म्हणूनच एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे. कुठलीही अमानुष घटना कृती कोणकडून घडली आणि तो आपल्यातला असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला राग जरूर यावा, त्या माणसाचा तिटकारा जरूर वाटावा. पण तो आपल्यातला आहे, म्हणून आपण स्वत:चाच तिटकारा करण्यासारखा मुर्खपणा नाही. कारण तसे करण्यातून आपणच स्वत:ला हतबल व असहाय करून टाकत असतो. त्या जवानाच्या मुंडके कापल्यानंतरची आपण व्यक्त केलेली हतबलता, अगतिकता ही सेक्युलर देणगी आहे. जिने आपल्याला स्वत:चीच निर्भत्सना करायची सवय लावली आहे. या सेक्युलर देणगीने आपल्यातली प्रतिकार शक्ती खच्ची करून टाकली आहे. आपल्याला स्वत:च्या अस्तित्वाचीच लाज वाटू लागते; तेव्हा आपण त्या अस्तित्वासाठी लढायला उभे राहू शकत नाही. त्याचा बचाव करू शकत नाही, की त्याला टिकवू शकत नाही. एवढा खंडप्राय देश भारत आज जगासमोर अगतिक आहे, कारण त्याला स्वत:ची ओळख नाही, कारण आजचा भारत आपल्या श्रद्धा व आपली ओळखच गमावून बसला आहे. सेक्युलर ग्लानीने त्याला स्वत:ची ओळखच उरलेली नाही. मग त्याने लढायचे कशाला आणि कशासाठी? ब्रिगेडीयर मलिक सांगतात, तशी आपल्या मनातली दहशत ही आपण गमावलेल्या श्रद्धेमुळे आलेली आहे. म्हणूनच त्यावरचा उपाय शस्त्रास्त्रे नसून आपल्या भारतीयत्वाच्या व हिंदू असण्याच्या श्रद्धाच आपले सुरक्षा कवच आहे, जी श्रद्धा आपल्याला बचाव वा लढायला प्रवृत्त करू शकते. दहशतवादाशी सामना करायचा असेल तर आपण सर्वप्रथम आपल्या श्रद्धा व आपली ओळख प्राणपणाने जपली पाहिजे. त्याची लाज वाटता कामा नये. कोणी काही गैरकृत्य केले तर त्याला दोषी मानावा. पण भारतीय म्हणून लाज वाटायचे कारण नाही. जो कोणी असा आपल्या मनात अपराधी भावना जोपासू पहात असेल तो त्या दहशतवाद्यांचाच हस्तक असतो, हे विसरता कामा नये. ( क्रमश:)
 भाग   ( ९९ )    २८/२/१३

मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३

सेक्युलॅरिझमने जिहादला खतपाणी घातले का?




   गेली दहा पंधरा वर्षे तरी आपण एक पोपटपंची नित्यनेमाने ऐकत आलेलो आहोत; ती म्हणजे दहशतवादाला धर्म नसतो. पण इथे तर त्याच जिहादी दहशतवादाचा प्रणेता म्हणावा, असा ब्रिगेडीयर मलिकच दहशतवादाला म्हणजे जिहादला धर्माचाच भक्कम आधार असल्याची ग्वाही देतो आहे. आणि तेवढेच नाही तर जिहाद लढताना मुस्लिमेतरांच्या धर्मश्रद्धा मोडून काढल्या; तरच जिहादींची दहशत निर्माण करता येते, इतक्या स्पष्ट शब्दात मांडणी करतो आहे. मग आपण या समस्येचे निवारण कसे करणार आहोत? ती इथल्या हिंदू मुस्लिमातील तेढ म्हणून त्याकडे बघून चालेल काय? तसे केल्यास मग समस्येचे निदानच चुकते आणि म्हणून आपोआपच उपाय सुद्धा चुकतच जाणार, त्याचा परिणाम मिळण्यापेक्षा त्याचे दुष्परिणामच भोगावे लागणार ना? भारतातील हिंदू-मुस्लिम समस्या वेगळी आणि जागतिक जिहादचे भारताला बसणारे चटके वेगळे. एक साधी गोष्ट घ्या. ही हिंदू-मुस्लिम समस्या असेल तर इथल्या मुस्लिमांचे इथल्या ज्यु लोकांशी कुठले वैर आहे? त्याचा हिंदू-मुस्लिम वैमनस्याशी संबंध काय आहे? कसाबच्या टोळीने नरिमन हाऊस या ज्य़ुंच्या धार्मिक स्थळावर हल्ला करण्याचे कारण काय? पुण्यात जर्मन बेकरीनजिक जो स्फ़ोट करण्यात आला; त्याला लक्ष्य बनवण्याचे कारणही तिथून जवळ असलेल्या ज्यूधर्मियांच्या छबाड हाऊसशीच होता ना? मग त्याचा हिंदूंशी संबंध काय? ज्युधर्मियांचा गुजरातच्या दंगलीशी संबंध आहे काय? नसेल तर स्फ़ोट व जिहादी हल्ल्यात ज्यूधर्मियांचा संबंध कशाला आला? तर असे हल्ले हे भारतीय संदर्भातले नसून त्याच संबंध जागतिक जिहादशी आहे. म्हणूनच जिहादी हल्ल्याचा व दहशतवादाचा विचार करताना हिंदू-मुस्लिम विषय बाजूला ठेवून जागतिक जिहादच्या संदर्भात त्यावर विचार करण्याची गरज आहे. तो विषय एकूणच जगभर चाललेल्या जिहादी कारवायांशी संबंधित आहे. आणि इतके स्पष्टपणे विचार करू लागले, मग त्यातले योग्य संदर्भ समोर येतात.

   उदाहरणार्थ बंगलोर येथील कबील अहमद नावाचा उच्चशिक्षित मुस्लिम तरूण ब्रिटनमध्ये पुढील शिक्षणासाठी गेलेला होता. त्याने तिथे जॉर्डनच्या तरूण डॉक्टरशी संपर्क साधून इराकी युद्धाविरोधात स्कॉटलंड येथे विमानतळावर स्फ़ोटकांनी भरलेली जीप घुसवण्याचा प्रयास कशाला करावा? त्याचा गुजरात वा काश्मिरच्या मुस्लिमांशी काही संबंध होता काय? कबीलचा इराकच्या युद्धाशी संबंध काय? मुस्लिम असणे वगळता त्याचा एकूण प्रकरणाशी दुसरा संबंध जोडता येतो काय? म्हणजेच जसे काही हजारो मुस्लिम तरूण अफ़गाण जिहादसाठी आपल्या राष्ट्रीयत्वाला विसरून तेव्हा मुजाहिदीन व्हायला पाकिस्तानात पोहोचले, तसाच कबील स्कॉटलंडच्या विमानतळावर हल्ला करायला पोहोचला नाही काय? त्याच्या त्या घातपातामध्ये तो यशस्वी झाला असता तरी त्यामुळे इराकी मुस्लिमांना कोणता न्याय मिळणार होता? समोर दाखवता येईल असा कुठलाच न्याय विमानतळावरील निरपारध मारले गेल्याने इराकी जनतेला मिळणार नव्हता. पण त्यामुळे जिहादी दहशत स्कॉटलंडच्या लोकसंख्येमध्ये निर्माण होऊ शकली असती ना? ती दहशत कसली असणार होती? कबीलच्या धर्माचा शोध तपासामध्ये उघड झाल्यावर; तिथल्या जनतेमध्ये कसली दहशत निर्माण झाली असती? कुणाविषयी दहशत निर्माण झाली असती? इतका उच्चशिक्षित तरूण जेव्हा असा घातपात धर्मासाठी वा धर्मबांधवांसाठी करू शकतो; तेव्हा इस्लाम व मुस्लिमांबद्दल स्थानिक रहिवाशांमध्ये दहशत निर्माण होत असते व ती लोकसंख्या भयभीत होऊन तमाम मुस्लिमांकडे संशयाने व शंकेने बघू लागत असते. तीच तर अशा घातपात्यांची अपेक्षा असते. तसे होत गेले, की मुस्लिमांना आपोआप अन्य धर्मिय लोकसंख्येपासून वेगळे पाडता येत असते. आणि तेच तर जिहादी दहशतवादाचे मूळ उद्दीष्ट आहे. मुस्लिमेतरांच्या मनामध्ये एकूणच मुस्लिमांविषयी शंका व संशय निर्माण झाला; मग अलग पडणार्‍या मुस्लिमांना बहिष्कृत समाज म्हणून सहजगत्या संघटित करता येत असते. म्हणजे जिथे मिश्र धर्मिय लोकसंख्या असते; तिथे अशा प्रकारे अन्य धर्मियांच्या मनात शंका निर्माण करून त्यांना त्यांच्याच अवतीभवती वावरणार्‍या मुस्लिमांकडे संशयाने बघायला भाग पाडायचे आणि दुसरीकडे मुस्लिमांकडे संशयाने बघितले जाते; अशी बोंब ठोकत रहायचे, अशी एक रणनिती पद्धतशीरपणे राबवली गेलेली दिसेल.

   म्हणजे जिथे जिथे म्हणून जगात संमिश्र धर्मिय लोकसंख्या आहे; तिथे तिथे आपल्याकडे संशयाने बघितले जाते, अशी एक सार्वत्रिक तक्रार आपल्याला ऐकायला नेहमी मिळते. कशी गंमत आहे बघा, घातपाताचे बहुतांश बळी सामान्य नागरिक व मुस्लिमेतर असतात. पण त्याचे परिणाम म्हणून जो दुरावा निर्माण होतो, त्यातून उलट मुस्लिमच आपण संशयाचे बळी आहोत, अशी ओरड करताना दिसतील. आणि या गडबडीत जे सामान्य नागरिक खरोखरच बळी पडत असतात, त्यांच्या न्यायाचा विचारही होत नाही. त्याला किंमतही दिली जाताना दिसणार नाही. आता बघा, मुंबईत कसाबच्या टोळीने ज्यांचे मुडदे पाडले वा आधीच्या स्फ़ोट मालिकेमध्ये ज्यांचे शेकड्यांनी बळी गेले वा शेकड्यांनी जे कायमचे जखमी झाले, त्याबद्दल कुणाला फ़िकीरही दिसत नाही. पण त्या घटनांच्या आरोपांखाली ज्यांची धरपकड झाली, त्यांच्यावर मुस्लिम म्हणूनच अन्याय होतो, अशी तक्रार सातत्याने होताना दिसेल. पण जे बहुसंख्य त्यात मारले गेले ते मुस्लिमेतर म्हणूनच मारले गेलेले नाहीत काय? त्यात मुस्लिमही बळी पडले असतील तर एकूण लोकसंख्येच्या सुरात सुर मिसळून इथले मुस्लिमही जिहाद वा दहशतवादाच्या विरोधात आवाज उठवायला का समोर येत नाहीत? जेवढा संघटित आवाज धरपकड झालेल्यांच्या बचावासाठी उठवला जातो, तितका आवाज घातपाती हिंसेला बळी पडलेल्या मुस्लिमांसाठी का उठत नाही? ह्या शंका घेतल्या जाणे गैर कसे? असाच आवाज कोणी मालेगावच्या घातपातासाठी पकडलेल्या पुरोहित वा साध्वीसाठी उठवला, मग त्याच्यावर हिंदूत्ववादी असा आक्षेप घेतला जातो, मग जे मुस्लिम पकडले जातात, त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवणार्‍यांना इस्लामिस्ट का म्हटले जात नाही? इथे गल्लत होते की नाही?

   मग एक युक्तीवाद आपल्याला हमखास ऐकू येतो, जे गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा द्यायलाच पाहिजे. मुस्लिम असला म्हणून माफ़ करायची गरज नाही. पण गुन्हा सिद्ध कसा होणार? संशय घेऊन, पुरावे गोळा करून, तपास खटल्याअखेरच गुन्हेगार असल्याचे सिद्ध होणार ना? मग धरपकड झाल्यापासून निर्दोष पकडल्याचा कांगावा कशाला होतो? आणि तसा कोणी साध्वीबद्दल केला, तर त्याच्यावर हिंदूत्ववादाचा आरोप कशाला होतो? कसाब किंवा अफ़जल गुरूबद्दल इतकी सहानुभूती कशाला असते? की त्यातून पुन्हा धार्मिक विभागणीचा पद्धतशीर प्रयत्न असतो? आरोपीकडे धर्माचा अनुयायी वा धर्मबांधव म्हणून बघायची काय गरज आहे? त्यातही धर्माचा अट्टाहास कशाला असतो? दहशतवादाचा धर्माशी संबंधच नसेल; तर ज्यांची धरपकड होते, त्यांच्या धर्माकडे कशाला बघितले जाते? त्यांच्यावर समजा अगदी अन्याय झाला असेल; तर तो भारतीय नागरिक म्हणून अन्याय झाल्याची भाषा कशाला नसते? मुस्लिमांवरच अन्याय झाला, असे अगदी ठळकपणे का म्हटले जात असेल? आणि असे आक्षेप व अशी भाषा केवळ भारतातच ऐकू येत नाही. जगातल्या ज्या देशामध्ये म्हणून जिहादी घातपाताच्या घटना घडत असतात; तिथे नेहमी धरपकड झालेल्या आरोपीत मुस्लिम असला मग मुस्लिमांनाच खड्यासारखे बाजूला काढून छळतात; अशी भाषा कानावर येत असते. याला योगायोग म्हणता येणार नाही. म्हणून अशा तमाम संदर्भांना ब्रिगेडीयर मलिक यांच्या जिहादी व्याख्येशी जोडूनच बघण्याची गरज आहे. कारण एका बाजूला जिहादी घातपात चालतात आणि दुसरीकडे त्यातून जिहादींना हवे तसे मुस्लिम अन्य मुस्लिमेतरांपासून अलिप्त पाडायचेही प्रयास यशस्वीरित्या पार पाडले जात असतात. जेणे करून त्यांनी स्थानिक लोकसंख्येशी फ़टकून वागावे आणि परिणामी एकूणच मुस्लिमेतरांनी त्यांच्याकडे अधिकच संशयाने बघावे. शिवाय माध्यमातूनही सेक्युलर असल्याचे नाटक रंगवण्यासाठी अशा कांगवखोर मुस्लिम नेत्यांना अधिक प्रसिद्धी दिली जात असते. जे खर्‍या शांत व धर्मांध नसलेल्या मुस्लिमांचा आवाज दाबून टाकत असतात. एकूणच मुस्लिमांबद्दल संशयाचे धुके अधिक दाट करीत असतात. ही काहीशी रणनिती असल्याप्रमाणे राबवली जात असते. त्यातून परिस्थिती अधिकच चिघळत गेलेली आहे. परस्पर विश्वास निर्माण होण्याऐवजी मुस्लिम व मुस्लिमेतरांमध्ये संशयाचे धुके दाट होत गेले आहे. याचे कारण ब्रिगेडीयर मलिक यांची रणनिती समजून न घेताच त्याच्याशी लढायचा केलेला अपयशी प्रयत्न आहे. किंबहूना जिहादी रणनितीला आवश्यक तशीच सेक्युलर व उदारमतवादाची धोरणे राबवली गेली; तर जिहादशी दोन हात व्हायचे कसे? त्याऐवजी मग अधिकाधिक मुस्लिम तरूण जिहादी होण्यासच हातभार लागतो आहे. म्हणूनच मलिक यांची रणनिती समजून घेऊन जिहादी दहशतवादाचा प्रतिकार करण्याची गरज आहे. आणि तो मार्ग सेक्युलर थोतांडाचा अजिबात नाही.   ( क्रमश:)
 भाग   ( ९८ )    २७/२/१३

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३

धर्मश्रद्धा मोडून टाकली तरच दहशत निर्माण होते


   सोवियत युनियनच्या आक्रमणाविरुद्ध जिहाद पुकारणार्‍या मुजाहिदीनांना जे प्रशिक्षण देण्यात आले, ते नुसते युद्धाचे वा शस्त्रास्त्रांचे नव्हते. त्यांच्या लढण्याची प्रेरणा अत्यंत महत्वाची होती. कुठल्याही सेनेतील, फ़ौजेतील सैनिक आपल्या जीवावर उदार होऊन लढतो, तेव्हा आपण प्राण गमावणार आहोत हे त्यालाही पक्के ठाऊक असते. आपण जर या संघर्षात काही मिळवण्यापेक्षा गमावणारच आहोत, तर माणूस मरायला पुढे सरसावेलच कशाला? माणसाची सगळी धडपड जगण्यासाठी असते. त्याचा उत्साह काहीतरी मिळवण्यासाठी असतो. तोच माणूस तेच जीवन उधळायला कशाला तयार होईल? मग बलिदान वा शहिद होणे वगैरे भंपक कल्पना नाहीत काय? पण अनेकदा असे जीवावर उदार झालेले व मरणाला हसतमुखाने सामोरे जाणारे लोक आपण पहातो, तेव्हा आपण भारावून जातो किंवा थक्क होतो. आपण थक्क होतो, जेव्हा कोणी इतर बाबतीत निष्कारण स्वत:च्या मरणाला सामोरा जाताना बघतो. म्हणजे कोणी काही अतर्क्य करताना दिसतो आणि त्या धाडसात त्याचा बळी पडतो, तेव्हा आपण थक्क होतो. कारण आपल्याला तो काही प्रमाणात धाडसापेक्षा निव्वळ मुर्खपणा वाटत असतो. म्हणूनच त्याला वेडे धाडस असेही म्हटले जात असते. पण फ़िदायिन म्हणजे स्वत:च्या अंगालाच स्फ़ोटके गुंडाळुन त्याचाच स्फ़ोट करणारे अनेकजण आता आपण ऐकलेले आहेत. राजीव गांधींची हत्या करण्यासाठी तोच प्रकार वापरण्यात आला होता किंवा अफ़गाण वा इराकच्या युद्धात असे नित्यनेमाने घडत आलेले आहे. ही माणसे अशी स्वत:लाच मारायला कशाला प्रवृत्त होतात, ते कोडे आपल्याला उलगडत नाही, म्हणूनच आपल्याला त्यांचे वागणे अतर्क्य वाटत असते. कारण आपण सतत जीवाला जपुन पाऊल टाकत असतो. दुसरीकडे कुठल्याही फ़ौजेतील सैनिक असतात, तेही काही प्रमाणात तसेच धाडस करणरे असतात. पण ते अकारण थेट मृत्यू ओढवून आणत नाहीत. ते सावधपणे शत्रूचा खात्मा करण्यासाठी चढाई करीत असतात आणि त्यात त्यांचाही बळी पडण्याची शक्यता गृहीत धरून सावध जुगार खेळतात, असे म्हणता येईल. असे सैनिक मरायला उतावळे नसतात, जसे फ़िदायिन मरायला उतावळे असतात. फ़िदायिन मरायच्या तयारीनेच पुढे सरसावत असतात. तसे सैनिकाचे नसते. तर सैनिक देश, समाज वा मातृभूमी असे कुणाचे संरक्षण करण्याच्या उदात्त हेतूने मृत्य़ूचा धोका पत्करणारे असतात. पण लढायला सज्ज असले तरी मरायला उतावळे नसतात. त्यांनाही जगायची इच्छा असते. पण कर्तव्य म्हणुन ते मृत्यूशी झुंज घ्यायला तयार असतात. हा सैनिक व फ़िदायिन यातला फ़रक असतो.

   पण दोन्हीकडे एक मुद्दा समान दिसेल, त्यांना म्रुत्यूचे भय रोखू शकत नसते. आपल्या शौर्य व कुठल्यातरी उदात्त हेतूसाठी बलीदान ही दोघांची प्रेरणा समान असते. आणि तीच प्रेरणा लढण्यासाठी अत्यंत निर्णायक असते. दोन देशाचे सैनिक लढाईत आमनेसामने असतात, तेव्हा त्याच्यात कुठे व्यक्तीगत वैर नसते. तर दोघांचे भांडण वा संघर्ष तत्वांचा व हेतूचा असतो. एकाला आक्रमक हटवायचा असतो तर दुसर्‍याला आक्रमण टिकवायचे असते. पण दोघेही  त्याला उदात्त वाटलेल्या हेतूसाठी आत्मबलिदानाला सिद्ध झालेले असतात. ती त्यांच्या जीवन उधळून टाकण्यामागची प्रेरणा असते. पण अफ़गाणिस्तान ह्या देशावर झालेले सोवियत आक्रमण ह्टवण्यासाठी पाकिस्तानी, सौदी वा मलेशियन, येमेनी मुस्लिमाने येऊन का लढावे? अफ़गाण ही काही त्याची जन्मभूमी, मातृभूमी नाही. त्याच्याकडे त्या देशाचे नागरिकत्वही नाही. मग अफ़गाण मुक्तीसाठी व ती भूमी बळकावणार्‍या सोवियत सेनेशी जगातल्या अन्य मुस्लिमाने कशासाठी लढायचे होते? अफ़गाणांनी लढावे हे ठिक होते. आणि म्हणूनच या जगभरच्या अन्य देशातील मुस्लिम तरुणांना अफ़गाणी जिहादसाठी तयार करताना निव्वळ शस्त्रास्त्रे देऊन भागणार नव्हते. त्यासाठी त्यांना जीव ओवाळून टाकण्यासाठी प्रेरणा देणे आवश्यक होते. ती प्रेरणा खुप महत्वाची होती. ती राष्ट्रवादी किंवा मातृभूमीच्या मुक्तीची नव्हती. ती प्रेरणा अफ़गाण बंडखोरांसाठी पुरेशी होती. पण जे बाहेरचे मुस्लिम तरूण त्यासाठी आले; त्यांना प्रशिक्षण देताना जो कुठला उदात्त हेतू समजावण्यात आला; तीच आधुनिक जिहादची खरी प्रेरणा आहे. त्यामुळेच मग सोवियत सेना माघारी जाऊनही जिहाद संपू शकलेला नाही. तो अफ़गाण भूमी सोवियत फ़ौजेच्या हातून मुक्त झाल्यावर अन्यत्र धुमाकुळ घालू लागला. आणि म्हणूनच सोवियत आक्रमणाला तोंड देणारी वा परतून लावणारी लढायची प्रेरणा समजून घ्यावीच लागेल. तरच मग श्रीनगरमध्ये वा भारतात अन्यत्र होणार्‍या हिंसाचाराचा उलगडा होऊ शकतो किंवा भारताच्या दुसर्‍या टोकाला जन्मलेला कोणी मुस्लिम तरूण पाकिस्तानी हेरसंस्था आयएसआय किंवा तिथल्या तोयबा, मुजाहिदीन संघटनांसाठी आपल्याच स्वकियांच्या विरोधात घातपाताला कशामुळे प्रवृत्त होतो; त्याचा अंदाज येऊ शकेल. आणि त्याचे तत्वज्ञान, त्याची प्रेरणा जिहादमध्ये सामावलेली आहे, जी व्याख्या पाकचे निवृत्त ब्रिगेडीयर एस. के मलिक यांनी मांडलेली आहे. युद्धाची त्यांनी पवित्र कुराणाच्या आधारावर मांडलेली संकल्पनाच आज जगभरच्या जिहादची मूळ प्रेरणा आहे. आणि तिच्याच शिकवणीतून अफ़गाण जिहाद व पुढे तालिबानी मानसिकता उदयास आलेली आहे. ते काय म्हणतात?

      ‘दहशत माजवा, पण दहशतीखाली दबू नका. जिहादी युद्धाची व्याप्ती अखेरीस मानवी हृदय, मन, आत्मा व श्रद्धा यांच्यापुरती असते. जर शत्रूची श्रद्धा ढासळून टाकली, तरच त्याच्या काळजात धडकी भरवता येते. म्हणजेच त्याला दहशतीच्या प्रभावाखाली आणता येतो. म्हणूनच अंतिमत: शत्रूची धर्मश्रद्धा डळमळीत करण्यालाच सर्वाधिक महत्व असते.’ 

   दहशत माजवायची असते, पण दहशतीखाली प्रभावित व्हायचे नसते. मलिक यांचे एक एक वाक्य काळजीपुर्वक वाचून समजून घेण्याची गरज आहे. कारण त्यांनी नुसताच दहशत माजवायचा मार्ग सुचवलेला नाही; तर दहशतीवर मात करण्याचाही मार्गही स्पष्टपणे सांगितलेला आहे. दहशत माजवणार्‍याने स्वत: मात्र दहशतीखाली येऊन चालणार नाही. आणि अशी ही दहशत कशी व कुठे निर्माण होऊ शकते? दहशत मानसिक असू शकत नाही आणि तशी दहशत निर्माण केली तरी ती फ़ारकाळ प्रभाव पाडू शकत नाही. काही काळाने अशी मानसिक दहशत ओसरू लागते. म्हणूनच दहशत ही काळजात भरवली पाहिजे. आणि ती काळजात कशी भरवता येते? तर आत्म्याची जी भक्कम श्रद्धा असते, ती सैल व निकामी झालेली असेल तरच काळजात दहशत माजवता येत असते. ही श्रद्धा काय भानगड आहे? ती श्रद्धा म्हणजे तुमची जी असेल ती धर्मश्रद्धा होय. ती पक्की असेल तर मग कितीही हल्ले व अत्याचार दहशत माजवू शकत नाहीत. असेही मलिक म्हणतात. म्हणजेच त्यांच्या शिकवणीचा मूळ गाभा काय आहे? दहशतीच्या युद्धात धर्मश्रद्धेला हत्यार व युद्धसाधनापेक्षा अधिक महत्व आहे. हत्यारे, स्फ़ोटके ही धर्मश्रद्धेचा भेद करू शकत नाहीत; असेच त्यांना सांगायचे नाही काय? ज्याची धर्मश्रद्धा पक्की व भक्कम असेल; त्याला दहशत म्हणजे हत्यारातून होणारी हिंसा भयभीत करू शकत नाही. आणि जिहादमध्ये सोवियत फ़ौजेचा पराभव नेमका तिथेच झालेला होता. त्यांना अफ़गाण भूमीवर राज्य करायचे होते, सत्ता राबवायची होती. पण कम्युनिस्ट फ़ौजेला धर्म नव्हता आणि युद्ध कधीतरी संपवून त्यांना आपली अधिसत्ता तिथे प्रस्थापित करायची होती. उलट जिहादी लढवय्यांची कहाणी होती. त्यांना विजय पराजयाशी कर्तव्यच नव्हते. अफ़गाणिस्तानवर सत्ता प्रस्थापित करणे असा कुठला हेतू जिहादींचा नव्हता. त्यांना आपल्या धर्माच्या अनुयायांची भूमी मोकळी, म्हणजे सोवियत फ़ौजेच्या कब्जातून मोकळी करायची होती. मुस्लिमेतर सेनेच्या कब्जातून इस्लामी भूमी मुक्त करायची होती.

   म्हणजेच जे योद्धे जिहादसाठी अमेरिकेच्या पैशावर तयार केले, ते सोवियत फ़ौजेच्या पराभवासाठी व गनिमी युद्धासाठी तयार होत आहेत; अशी अमेरिकेची समजूत होती. पण त्यांना जिहादी प्रशिक्षण देणार्‍या पाकिस्तानी सेनाधिकार्‍यांनी मात्र त्यातून जिहादी जन्माला घातले होते. त्यांना इस्लाम धर्माच्या विजय व दिग्विजयासाठी घडवलेले होते. सोवियत फ़ौज वा त्यांच्या पाडावासाठी पैसा ओतणार्‍या अमेरिकेसाठी ते फ़क्त अफ़गाण युद्ध होते. पण पाकिस्तानात प्रशिक्षित होणार्‍या जिहादींसाठी ती धर्माच्या जागतिक दिग्विजय मोहिमेसाठीची तयारी होती. म्हणूनच सोवियत फ़ौज मागे घेऊन जिहाद संपला नाही, की अमेरिकाही त्यातून सुटली नाही. उर्वरित जगाचीही त्यातून सुटका झाली नाही. मुस्लिम वा सेक्युलर विचारवंत अथवा भारतातील बावळट हिंदूत्ववादी काय बकवास करतात, त्याला काडीचा अर्थ नाही. इतकी ही बाब गुंतागुंतीची आहे. म्हणूनच आपण भारतीय वा अन्य अनेक देश त्या अफ़गाण जिहादचे दुष्परिणाम भोगत आहोत. त्यावरचे चुकीचे उपाय सोवियत फ़ौजेला वाचवू शकले नाहीत किंवा अमेरिकनांना दहा वर्षात त्या जिहादवर मात करता आलेली नाही. मग कायदा सुव्यवस्थेचा विषय म्हणून भारतात चाललेला मुर्खपणा आपल्याला कुठली सुरक्षितता देऊ शकतो? कारण मलिक सांगतात तोच उपाय आहे, पण तिकडे वळून बघायलाही आपल्याकडे कोणी तयार नाही. कुठला आहे तो उपाय?    ( क्रमश:)
 भाग   ( ९७ )    २६/२/१३

रविवार, २४ फेब्रुवारी, २०१३

जिहादचे तर्कशास्त्र बारकाईने समजून घ्यावेच लागेल.


   दहशतवाद किंवा दहशत हा शब्द आपण गेली दोन दशके सातत्याने ऐकत आहोत. पण त्याचे स्वरूप व व्यापकता आपण कितीशी ऐकली वा समजून घेतली आहे? तीन दशकांपुर्वी सोवियत लालसेनेने अफ़गाणिस्तानात घुसून तिथली सत्ता काबीज केली. मग स्थानिक कम्युनिस्टांना आपल्या कठपुतळ्या बनवून सत्ता राबवली. तेव्हा शीतयुद्धाचा काळ चालू होता. अमेरिका व सोवियत युनीयन या जगातल्या मोठ्या बलशाली महासत्ता मानल्या जायच्या. त्यांच्या इशार्‍यावर जगातली लहानमोठी युद्धे खेळली जात असत. व्हिएतनाममध्ये स्थानिक सत्ताधीशांना कम्युनिस्ट चळवळीने सशस्त्र लढ्यातून शह दिल्यावर डळमळीत झालेल्या सत्तेने अमेरिकेची मदत घेतली. तर सोवियत युनीयन कम्युनिस्टांच्या पाठीशी उभे राहिले. त्याची परतफ़ेड अमेरिकेने अफ़गाणिस्तानात केली. तिथे सोवियत सेनेला शह देण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीने अफ़गाण बंडखोर उभे केले. त्यांना शस्त्रास्त्र साठा पुरवला. त्या बंडखोरांना मुजाहिदीन म्हणून ओळखले जात होते. त्यात जगभरच्या मुस्लिमांना सहभागी व्हायचे आवाहन करण्यात आले होते, अफ़गाण सीमेच्या अलिकडे पाकिस्तानात अशा परदेशी लढवय्यांना प्रशिक्षण देण्याची शिबीरे वसवण्यात आलेली होती. त्यांची युद्धप्रेरणा काय होती? यातले सगळे लढवय्ये मुस्लिमच असले तरी त्यातले मुठभरच अफ़गाण होते. बाकीचे इस्लामी भूमी सोवियत म्हणजे काफ़ीरांच्या तावडीतून मुक्त करायला आलेले बिगर अफ़गाण मुस्लिम होते. थोडक्यात हे परदेशी लढवय्ये धर्मकार्य करायला आलेले होते. त्यांना युद्धशास्त्र शिकवतानाच जे धार्मिक कर्तव्य पढवून धर्मासाठी लढायची शिकवण दिली जात होती, तीच खरी आजच्या जिहादची प्रेरणा आहे. तिचे व्यापक स्वरूप ब्रिगेडीयर मलिक यांनी आपल्या पुस्तकातून मांडलेले आहे. जिहादी युद्ध हे दहशतीचे असून ती दहशत मानसिक नव्हे तर काळजाला जाऊन भिडणारी असायला हवी; असेही त्यात मलिक म्हणतात. शिवाय त्यातला धर्माचा संदर्भ नेमका आहे. धर्मश्रद्धा व दहशतवादाचा नेमका संबंध मलिक यांनी त्यातून समजावला आहे. ते म्हणतात,

   ‘दहशत माजवा, पण दहशतीखाली दबू नका. जिहादी युद्धाची व्याप्ती अखेरीस मानवी हृदय, मन, आत्मा व श्रद्धा यांच्यापुरती असते. जर शत्रूची श्रद्धा ढासळून टाकली, तरच त्याच्या काळजात धडकी भरवता येते. म्हणजेच त्याला दहशतीच्या प्रभावाखाली आणता येतो. म्हणूनच अंतिमत: शत्रूची धर्मश्रद्धा डळमळीत करण्यालाच सर्वाधिक महत्व असते. ज्यांच्या धार्मिक श्रद्धा पक्क्या व भक्कम असतात, त्यांच्यावर दहशतीचा कुठलाही परिणाम होत नाही. म्हणूनच दुबळी धर्मश्रद्धा दहशतीला आमंत्रण देत असते. त्यामुळेच जिहादच्या पुर्वतयारीसाठी मुस्लिमेतर शत्रूच्या धर्मश्रद्धा डळमळीत करण्याची अत्यावश्यक असते. पण त्याचवेळी मुस्लिमांच्या धर्मश्रद्धा कडव्या करण्याचीही गरज असते. मानसिक दुबळेपणा तात्पुरता असतो, पण धार्मिक श्रद्धेचा दुबळेपणा कायमस्वरूपी असतो. मानवी आत्म्याला फ़क्त दहशतच स्पर्श करू शकते.’

   ब्रिगेडीयर एस. के. मलिक यांच्या निरुपणाचा हा गोषवारा आहे. त्यावरच अफ़गाण मुजाहिदीन व तालिबान युद्धसज्ज झाले हे विसरता कामा नये आणि फ़क्त अफ़गाण भूमीतून सोवियत सेनेला पळवून लावण्यावरच जिहाद थांबला नाही. तो अव्याहत जगाच्या कानाकोपर्‍यात जाऊन पोहोचला आहे. म्हणूनच हे मलिक साहेब जे सांगतात; ती जिहाद व दहशतीची व्याख्या समजून घेण्याची गरज आहे. ज्यांना दहशतवाद समजल्या जाणार्‍या जिहादशी दोन हात करायचे आहेत, प्रतिकार करायचा आहे; त्यांना तरी त्याची प्रेरणा व सुत्र समजून घ्यावेच लागेल. जो दहशत हा शब्द इतक्या सहजतेने आपण नेहमी वापरत असतो, त्याची व्याप्ती व व्याख्या आपण कधी इतक्या मुळापासून समजून घेतली आहे काय? इथे जिहादसाठी लढताना व ज्यांना दहशत घालायची आहे, त्यांच्याही धार्मिक श्रद्धांना मलिक महत्व देतात. ते स्फ़ोटके, बंदूका, रणगाडे, रॉकेट अशा कुठल्याही साधनांचा उल्लेख सुद्धा करत नाहीत. ते शक्ती वा बळाचा उल्लेख करत नाहीत; तर धर्मश्रद्धेचे अशा युद्धातील वा प्रतिकारातील महत्व सांगत आहेत. आणि असे विश्लेषण करणारा मलिक हा कोणी धरमार्तंड नाही. तो कसलेला सेनापती व युद्धानुभवी सेनाधिकारी आहे. त्याच्याच या तत्वज्ञान व संकल्पनेच्या आधारे आरंभीचे मुजाहिदीन घडवण्यात आले; हे विसरता कामा नये. म्हणूनच अशा जाणकाराचे शब्द गंभीरपणे समजून घेण्याची गरज आहे. तो जिहादी दहशतवादाचे युद्धशास्त्र व त्यातील महत्वाच्या साधनांचे विवेचन करतो आहे, आणि त्यातले प्रमुख हत्यार म्हणून धर्मश्रद्धेचा उल्लेख करतो आहे. पण कुठेच शस्त्रास्त्रे व शस्त्रसामग्रीचे नाव घेत नाही. किती विचित्र गोष्ट आहे ना?

   आपल्या माध्यमातून, वॄत्तपत्रातून वा टिव्हीच्या वाहिन्यांवर जे शहाणे दहशतवादाबद्दल बोलत असतात, त्यांना मी पोपटपंची करणारे म्हणतो, तेव्हा मी असा कोण शहाणा लागून गेलो आहे, असा प्रश्न वाचकाच्या मनात येऊ शकतो आणि तो अजिबात चुकीचा नाही. तेव्हा आधी असे मी का म्हणावे; त्याचा खुलासा करणे अगत्याचे आहे. त्याचे कारण असे, की या सगळ्यांपेक्षा ब्रिगेडीयर मलिक यांच्या मताला अधिक महत्व आहे. कारण ज्या जिहादचा अनुभाव आपण नित्यनेमाने घेत असतो, त्याची रणनिती व व्याख्या मुळात याच मलिकनी तयार केलेली आहे. त्यामुळेच त्याबाबतीत त्यांचे मत बाकी सर्वांपेक्षा मोलाचे व निर्णायक आहे. अफ़गाण जिहादसाठी अमेरिकेने पैसा व शस्त्रे पुरवली तरी त्यासाठी मुजाहिदीन तयार करण्याचे व त्यांना शहिद होण्याचे खास प्रशिक्षण पाक सेनेने दिले व त्यांची पायाभूत मानसिक जडणघडण त्याच पाकिस्तानी प्रशिक्षकांनी केलेली आहे. आणि ते प्रशिक्षण ज्या पायावर उभे आहे तो मूळ सिद्धांत ब्रिगेडीयर मलिक यांनी मांडला आहे. त्यावरील त्यांच्या विवेचनपुर्ण पुस्तकाला झिया उल हक यांनी खास प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यामुळेच बाकीचे काय बोलतात, त्याला मलिक यांच्या मूळ सिद्धांताची जोड व संदर्भ नसेल; तर त्यांची सगळी बडबड निव्वळ पोपटपंचीच ठरते. आणि इथे मलिक यांचा सिद्धांत नेमका लक्षात घेतला, तर आपण नेत्यनेमाने ऐकत असलेले विवेचन किती दिशाहिन व फ़सवे आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. मलिक यांच्या सिद्धांतानुसार ज्यांना मुजाहिदीन बनवून शहिद व्हायला पुढे करण्यात आले, ते विविध देशातले, संस्कारातले व विविध भाषा बोलणारे भिन्न वंशातले मुस्लिम तरूण होते. पण ते सगळे एकदिलाने, एकजुटीने आत्मसमर्पण करायला सज्ज होऊ शकले. त्यामागची श्रद्धा व प्रेरणा अगत्याची होती. हेतू, उद्दीष्ट यासाठी सर्वस्व अर्पण करायची ती जबरदस्त इच्छाच त्यामागची चालना होती. तीच ज्यांना ठाऊक नाही, ते मग स्फ़ोटकांचे पदार्थ, त्याचा पुरवठा वा संघटनांची नावे शोधत बसतात आणि दहशतवादाचा बंदोबस्त बाजूला पडतो. ज्या जिहादला आपण सामोरे जात आहोत, त्यात शस्त्रास्त्रे वा स्फ़ोटके, हत्यारे इत्यादीला काडीचे महत्व नसून; त्यात श्रद्धेला सर्वाधिक प्राधान्य आहे. आणि ती श्रद्धा ही धर्मश्रद्धा आहे. नुसती ही धर्मश्रद्धेची लढाई नाही, तर आपली धर्मश्रद्धा कडवी करून शत्रूची धर्मश्रद्धा खिळखिळी करण्याची ही लढाई आहे. त्यातला परिणाम धर्मश्रद्धेच्या बळावर किंवा दुबळेपणावर साधला जातो, हा त्यातला मुळ सिद्धांत आहे आणि आपण रोजच्या चर्चेतून काय ऐकत असतो? दहशतवादाला धर्म नसतो. आता सांगा तुम्ही बोधप्रद चर्चा ऐकत असता कि दहशतवाद जिहाद यावर पोपटपंची ऐकत असता?

   एक गोष्ट उघड आहे. सोवियत असो, की अमेरिकन सेना असो, तिच्याशी आमनेसामने लढणे कुठल्याही मुजाहिदीन वा तामिळी वाघाला, दहशतवाद्याला शक्य नसते. कारण या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या फ़ौजेइतकी साधनसामुग्री जमवणे बंडखोरांना शक्यच नसते. त्यामुळेच खुलेआम खरेखुरे युद्ध या बंडखोरांना शक्य नसते. म्हणूनच ते गमिनी युद्ध खेळत असतात. पण त्यात पुन्हा माणुसकी, नातीगोती अशा मानवी मानसिक दुबळेपणाच्या समस्या येत असतात. तुमची माणसे, नातेवाईक, कुटुंबिय, मित्र अशा बाबतीत हळवे होणारा सैनिक दुबळा होतो. तोच दुबळा झाला, मग त्याच्या हाती असलेल्या शस्त्राचा उपयोग रहात नाही. तेव्हा त्याला त्यापेक्षाही काही मोठ्या आस्थेमध्ये गुंतवून, अशा सर्व समजुती व भावनांच्या पलिकडे घेऊन जाणे अगत्याचे असते. त्याला श्रद्धा म्हणतात, आपण काही महान पवित्र कार्यात आहोत आणि त्यात आप्तस्वकीयांचा बळी पडला वा द्यावा लागला, तरी ते सत्कार्यच आहे, अशीच त्या लढणार्‍याची धारणा असायला हवी, तरच तो बेफ़िकीर होऊन पुढे सरसावू शकतो. त्यालाच मलिक धर्मश्रद्धा म्हणतात. कडवी श्रद्धा माणसाला कितीही व कुठल्याही यातना व कष्ट सोसायची ताकद देत असते. तर त्यातला दुबळेपणा हातातल्या भेदक शस्त्रालाही बोथट निकामी करून टाकत असतो. म्हणूनच मलिक श्रद्धेला इतके महत्व का देतात ते समजून घ्यावे लागेल. आणि त्यासाठी आधी आपण नेहमी ऐकत असतो, ती पोपटपंची बाजूला ठेवावी लागेल. सततच्या जिहादी हल्ल्यांना समर्थपणे सामोरे जायचे असेल, तर आपल्या धर्मश्रद्धा दुबळ्या असणे; हाच दहशतवाद जिहाद समोरचा आपला दुबळेपणा कसा आहे, ते आधी समजून घ्यावेच लागेल. आणि ते समजून घ्यायचे, तर आजवरच्या खुळेपणाकडे साफ़ पाठ फ़िरवून मलिक सांगतात, समजावतात ते जिहादचे तर्कशास्त्र अत्यंत बारकाईने समजून घ्यावेच लागेल.   ( क्रमश:)
 भाग   ( ९६ )    २५/२/१३

शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

दहशत हत्यार वा हिंसेने माजवता येत नाही?


   प्रत्येक युद्ध वा खेळाचे काही नियम असतात, तसेच त्याचे स्वत:चे असे तर्कशास्त्र असते. तसेच शासन व्यवस्था वा प्रशासनाचे किंवा अगदी अराजकाचे सुद्धा आपले असे एक तर्कशास्त्र असते. त्याच्या आधारेच त्याचा गाभा समजून घेता येतो. एका विषयातले तर्कशास्त्र वापरून दुसर्‍या विषयातले तर्कशास्त्रच मुळात समजून घेता येत नसते. मग तो विषय समजणे खुपच दुरची गोष्ट झाली. म्हणजे असे, की क्रिकेटचा जो खेळ आहे, त्यामध्ये अनेक नियम व त्याचे तर्क आहेत. त्यात तुम्ही हॉकी वा बेसबॉल अशा खेळांचे तर्क वा नियम लावून काहीही करू शकत नसता. युद्ध, दहशतवाद किंवा अराजक व दंगल सुद्धा अत्यंत वेगवेगळे विषय आहेत. त्यांचे आपले आपले तर्कशास्त्र आहे. एकाचे तर्कशास्त्र दुसर्‍याला लावले तर विचका होऊन जात असतो. दिल्लीतल्या किंवा गुजरात, मुंबईच्या दंगलींना दहशतवाद ठरवणे म्हणूनच मुर्खपणा असतो. दुसरीकडे नक्षलवाद, माओवाद यांची तुलना जिहादशी करणेही अत्यंत मुर्खासारखा युक्तीवाद असतो. साधी गोष्ट घ्या नक्षलवाद आपल्या देशात जिहादी घातपात सुरू होण्याच्या खुप आधीपासून धुमाकुळ घालतो आहे. पण नक्षलवादी अथवा माओवाद्यांनी कधी आपल्या प्रभावक्षेत्राबाहेर जाऊन घातपात किंवा हिसाचार केलेला आढळणार नाही. ते लोकांमध्ये वा जनतेमध्ये घबराट माजवतात. पण तेवढ्यावर समाधान मानत नाहीत. तर जो काही आटोपशीर प्रदेश परिसर असेल; तिथे आपली हुकूमत प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयास असतो. पोलिस वा प्रशासन यांचे कायदे नाकारून हे लोक आपली सत्ता त्या मर्यादित प्रदेशात राबवायचा प्रयत्न करतात. प्रसंगी पोलिस वा शासनाच्या सेनेशी दोन हातही करतात. पण आपल्या प्रभावक्षेत्राच्या बाहेर जाऊन अकारण कुठल्याही लोकसंख्येला भयभीत करायचा वा हकनाक हत्या करण्याचा प्रकार माओवाद्यांकडून होताना आपल्याला दिसणार नाही. बंगाल, ओरिसा, बिहार, छत्तीसगड वा झारखंडाच्या विविध भागात अनेक तालुके नक्षलप्रभावित मानले जातात. तिथे सत्ता व हुकूमत त्यांची असते. पोलिस वा सरकारशी सहकार्य करायलाही स्थानिक लोक घाबरतात. पण त्यातले कोणी माओवादी दिल्ली वा मुंबईत येऊन मोठी घातपाती घटना घडवत नाहीत. कारण त्यांचे प्रभावक्षेत्र म्हणजे आपण भारत सरकारच्या हुकूमती खालून मुक्त केलेला स्वतंत्र प्रदेश; अशी त्यांची कल्पना आहे. पण तसे कधी जिहादी घातपातामध्ये घडलेले दिसणार नाही. जिहादी मंडळी शक्य तेवढ्या लोकांना हकनाक मारून मोठ्या लोकसंख्येच्या मनात दहशत निर्माण करायला उत्सुक असतात. त्यात आपला संशय सुद्धा येऊ नये याची काळजी घेतात. त्या घटनेचे धागेदोरे सापडू नयेत याचीही काळजी घेतात. असा मोठा फ़रक दोन्ही बाजूंमध्ये दिसेल. जिहादचे टोक नेमके उलटे आहे.

   जिथे आपल्याला लगेच सत्ता प्रस्थापित करायची नाही, तर लोकांच्या मनात प्रस्थापित सरकार व सत्ता यांच्या हुकूमतीबद्दल शंका निर्माण करून कायद्यावरील विश्वास उध्वस्त करण्यातून अराजकाची स्थिती निर्माण करायची; अशी जिहादी भूमिका दिसून येईल. अमूक प्रदेशात सत्ता प्रस्थापित करणे, तिथला कारभार चालवण्यासाठी प्रशासकिय व्यवस्था निर्माण करणे; असे काही जिहादी करताना दिसणार नाहीत. मग विषय काश्मिरचा असो, सिरिया वा मुंबईचा असो. शक्य तिथे अराजक निर्माण करण्याचाच उद्योग चालू असलेला दिसेल. उल्फ़ा किंवा तामिळी वाघांची कहाणी अजून वेगळी आहे. त्यांना आपापल्या प्रदेशात सार्वभौम वेगळे राज्य व राष्ट्र हवे अशी भुमिका दिसेल. म्हणूनच ज्या भूमीशी निगडीत त्यांच्या मागण्या आहेत व त्याच्या आड येणारी सत्ता आहे त्यांच्याशीच संघर्ष करताना असे दहशतवादी दिसतील. श्रीलंका व तामिळनाडू अशा मर्यादेत वाघांचा धुडगुस चालू राहिला. तर उल्फ़ा, बोडो यांच्या कारवाया इशान्य भारतापुरत्या मर्यादित आढळतील. पण जिहादी घातपाताचे प्रकार या सर्वापेक्षा एकदम वेगळे दिसतील. असे घातपात करणार्‍यांना काय साधायचे आहे; तेच आपल्याला लक्षात येत नाही. आता ताजी हैद्राबादची घटना घ्या. त्यात जे मारले गेले वा जखमी झाले, त्यांच्याशी स्फ़ोट घडवणार्‍यांचे काही भांडण नव्हते. मग त्यांनी साधले काय? आता जिहाद म्हटल्यावर त्याला धर्माचा रंग दिला जातो असाही आरोप होईल. पण जे मारले जातात, त्यातही काही प्रमाणात मुस्लिमही असतात. मग जो धर्मयुद्ध म्हणून अशी हिंसा करतो, तो मुस्लिमांनाही कशाला मारतो आहे; असाही प्रश्न पडतो ना? माओवादी सरकारी पोलिस व कर्मचार्‍यांना घातपातातून मारतात. तसे जिहादी हल्ल्यात दिसत नाही. जिहादी कुणाही निरपराधाला समोर सापडला म्हणून जीवे मारतो. पण मग त्यातून साधतो काय? कायद्या विरुद्ध वा सत्तेविरुद्ध त्याची लढाई असेल तर त्याच्या अशा जिहादी हल्ल्यात सहसा कोणी सरकारी नेता, अधिकारी मारला जात नसतो. मग अशा हिंसेतून नेमके काय साध्य करायचे असते, जिहादी दहशतवाद्याला?

   म्हणजे समजा आपल्याला नक्षलवादी, माओवाद्यांशी बोलणी करायची असतील तर ते ठराविक आदिवासी, वनवासी जंगलपट्टा वेगळे राज्य वा राष्ट्र हवे अशी मागणी करतील. उल्फ़ा बोडो यांची तशीच मागणी आहे. तामिळी वाघांची तीच मागणी होती. पण काश्मिर वगळता जिहादींची अशी कुठलीच मागणी नाही. मग हैद्राबाद वा मुंबईत स्फ़ोट वा घातपात कशाला केले जातात? काश्मिर देऊन टाकले तर तिथे शांतता नांदणार आहे का? दिर्घकाळ पॅलेस्टाईनचा विषय असाच निकाली काढायचा प्रयत्न झाला. म्हणून तिथला जिहाद संपला आहे काय? एक सार्वभौम नाही तरी स्वयंशासित प्रदेश अशी इस्रायलने पॅलेस्टाईनला मान्यता दिली, तर तिथे दुसरा जिहादी गट उभा राहिला व त्याने त्या समझौत्याला झुगारून इस्रायलवरचे हल्ले चालूच ठेवले. तेवढेच नाही. अराफ़त या जुन्या घातपाती नेत्यालाही झुगारून लावले. हमास व फ़ताह अशा दोन गटातच तुंबळ हिंसाचार सुरू झाला. मग काश्मिरचा प्रश्न नुसत्या भूमीमुळे सुटणार आहे काय? असे अनेक मुद्दे लक्षात घेतले तर समजू शकेल, की मुळातच दहशतवाद ही सत्ता प्रस्थापनेसाठीची युद्ध संकल्पना असून जिहाद ही त्याच्याहीपेक्षा अगदी वेगळी अशी काहीतरी बाब आहे.

   इथेच मग अमेरिका किंवा जगभरच्या तमाम सत्ताधीशांची जिहादी दहशतवादाच्या बाबतीत फ़सगत होते. ते अशा दहशतवादाची तुलना अन्य घातपाती हल्ले व कारवायांशी करतात आणि जिहादचा धर्माशी संबंध नाही असा ‘अभ्यासपुर्ण’ दृष्टीकोन बाळगतात. पहिली गोष्ट म्हणजे जिहाद हा पारंरारिक युद्धप्रकार नाही. आणि दुसरी गोष्ट विसाव्या शतकाच्या मध्यानंतर जो दहशतवाद उदयास आला, त्याचेही जिहादी घातपाती भूमिकेशी साम्य साधर्म्य नाही. अमेरिकेने लादेन व तालिबानांना धडा शिकवण्यासाठी दहशतवाद विरोधी युद्धाची घोषणा करून टाकली. पण त्यात त्यांनी जिहादी संकल्पनाच समजून घेतली नव्हती. त्यामुळेच युद्धाच्या पद्धतीने त्यांनी परिस्थिती हाताळताना सगळीकडून मार खाल्ला. त्यांनी प्रत्यक्ष युद्धात मार खाल्ला आहे तर अन्य देशांनी आपापल्या अधिकार क्षेत्रामाध्ये त्याच जिहादी दहशतवादाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न समजून हाताळल्याने त्यांचाही त्याबाबतीत पराभवच झाला आहे. कारण जिहाद पारंपारिक युद्ध नाही तसाच पारंपारिक दहशतवाद देखिल नाही. दहशतवाद किंवा युद्ध हे संघटित पातळीवर होत असते. जिहादची कल्पनाच मुळात धर्मातून आलेली असून त्याची प्रेरणाही धर्मच आहे आणि त्याचा पाया अफ़गाणिस्तानात घातला गेला, तो म्हणूनच समजून घ्यावा लागेल. पाकचे तेव्हाचे लष्करशहा जनरल झिया उल हक यांनी अमेरिकेच्या मदतीने या जिहादची उभारणी केली. त्यासाठी जगभरच्या विविध देशातील मुस्लिम धर्मवेड्या तरुणांना त्यात सहभागी करून घेतले. त्याची मूळ संकल्पना त्यांच्याच उत्तेजनाने एका पाक सेनाधिकार्‍यांनी एका पुस्तकातून मांडलेली आहे. त्या पुस्तकाचे नाव The Quranic Concept of War  म्हणजे ‘कुराणातील युद्ध संकल्पना’ असे आहे. त्यात जिहादी युद्धाची प्रेरणा व संकल्पना अत्यंत सुटसुटीत करून मांडलेली आहे. त्यावर झियांनी शिक्कामोर्तबही केले आणि मगच त्याचा जगभर प्रसार व प्रचार झाला आहे. आज आपण अवघ्या जगाला भेडसावणारा जो जिहाद बघतो व अनुभवतो आहोत, तो त्याच प्रेरणेवर चालतो. त्याचे तर्कशास्त्र समजून घेतले तरच त्यावरचे उपाय शोधता येतील. दहशतीचे किती व कसे प्रकार असतात व जिहाद मधून कुठली दहशत साध्य करायची असते ते या पुस्तकात सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते बारकावे आणि मुद्दे समजून घेतले तर लक्षात येऊ शकेल, की आपल्याकडे स्फ़ोटासारख्या घटना घडल्यावर जी पोपटपंची चालते तो निव्वळ मुर्खपणा असतो आणि त्यावरले जे उपाय सुचवले जात असतात; तो त्यापेक्षाही मोठा मुर्खपणा असतो. दहशत हत्यार वा हिंसेने माजवता येत नाही हे त्याचे सुत्र किती चमत्कारिक वाटते ना?  ( क्रमश:)
 भाग   ( ९५ )    २४/२/१३

शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१३

दहशतवादाची व्याख्या तरी कोणाला ठाऊक आहे?




   तब्बल चार आठवड्यापुर्वीची गोष्ट आहे. ‘पुण्यनगरी’च्या याच स्तंभातून मी केंद्रिय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या जयपूरच्या विधानातील खोटेपणा स्पष्टपणे कथन केलेला होता. तेव्हा अन्य माध्यमे त्यावर सावधपणे बोलत होती. लौकरच सुशिलकुमार आपली चुक वा खोटेपणा मान्य करतील व त्याची कबुली देतील असेही मी तेव्हाच म्हटलेले होते. मात्र ती वेळ इतक्या लौकर येईल, अशी माझी अपेक्षा नव्हती. पण संसदेच्या अधिवेशनाची कोंडी व्हायची पाळी आल्यावर शिंदे यांनी आपले शब्द मागे घेतलेच. अधिक दिलगिरीही व्यक्त केली आहे. माझ्या दृष्टीने ती दिलगिरी वा शिंदे खोटे पडण्याला महत्व नाही. त्यापेक्षा अतिशय महत्वाची बाब आहे; ती दहशतवादाच्या बाबतीतल्या अडाणीपणाची. मुस्लिम वा हिंदू दहशतवाद अशी लेबले लावून जे घाणेरडे मतांचे राजकारण चालते, त्याने देशाची सुरक्षा व जनजीवन किती धोक्यात आणले आहे, याचा त्यावर पांडीत्य करणार्‍यांनाही थांगपत्ता नसावा ही बाब अधिक घातक आहे. ज्याला रोगराई वा वैद्यकशास्त्राचे काडीचे ज्ञान नाही, अशा लोकांच्या इस्पितळात एखाद्या रोग्याला भरती केल्यास त्याच्या जीवाशी कोणकोणते खेळ होतील, त्याची कल्पना करा. म्हणजे आज आपला देश व समाज दहशतवादाचा शिकार का झालेला आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. कारण दहशतवाद म्हणजे नेमके काय त्याचाच थांगपत्ता नसलेले लोक यातले जाणकार म्हणून मिरवत असतात व पोपटपंची करीत असतात. त्यामुळे गल्लीतल्या दंगलीपासून बॉम्बस्फ़ोट व घातपातापर्यंत कशालाही ते दहशतवादाच्या व्याख्येत आणुन बसवतात. त्यामुळे होते काय? साधा ताप आणि डेंग्यू वा स्वाईनफ़्लू; यातला फ़रकच लोकांना कळेनासा होता. जेवढे अशा विषयातील अज्ञान अधिक, तेवढी रोगाची साथ झपाट्याने फ़ैलावत असते. म्हणूनच दहशतवाद म्हणजे नेमके काय व त्यातल्या दहशत शब्दाचा नेमका अर्थ काय; हे जाणून घेणे अगत्याचे आहे. त्यातही पुन्हा जिहाद व दहशतवाद यात जमीन अस्मानाचा फ़रक आहे. त्या दोघांची तुलना होऊच शकत नाही.

   पहिली गोष्ट म्हणजे गुजरातची दंगल वा अन्य कुठलीही दंगल आणि घातपाती कारवाया; यांच्यात कसलेही साम्य नाही. दंगल ही जमावाकडून घडते वा तशी घडवून आणली जाऊ शकते. पण त्यात कितीही माणसे मारली गेली, म्हणून त्याला दहशतवाद म्हणता येणार नाही. कारण दंगल ही स्थानिक समाजघटक व त्यांचे जमाव यांच्यात होत असते आणि त्याला स्थानिक संदर्भ असतात. त्यामागे स्थानिक राजकीय शक्तीसुद्धा असू शकतात. पण त्यातून प्रस्थापित राजकीय सत्तेला आव्हान दिले जात नसते. उलट दहशतवाद हे प्रस्थापित सत्तेला दिलेले आव्हान असते. त्यामागे देशाबाहेरील सत्तेचा हात असतो. त्याकरिता बाह्य शक्ती कार्यरत असते. उदाहरणार्थ मुजाहिदीन, तोयबा वा अलकायदा अशा ज्या जिहादी संघटना आहेत; त्यांच्यामागे वेळोवेळी अमेरिका, पाकिस्तान व अन्य सत्ता उभ्या राहिलेल्या आहेत. तीन दशकांपुर्वी अफ़गाणिस्तानमध्ये जिहाद पुकारण्यात आला, त्यामागे अमेरिकेची प्रेरणा होती. आजच्या भारतातील व काश्मिरातील घातपातामागे पाकिस्तान सरकारची शक्ती उभी आहे. आपण कितीही नाकारणार असलो; तरी श्रीलंकेतील तामिळी वाघांच्या दहशतवादामागे भारत सरकारची शक्ती उभी होती. अगदी त्यांना आरंभीच्या काळात घातपाती लष्करी कारवायांचे प्रशिक्षण भारतीय सेनेकडून देण्यात आलेले होते, हे नाकारता येणार नाही. कारण त्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. पुढल्या काळात चीन वगैरेंनी तामिळी वाघांचा उपयोग आपल्या राजकारणासाठी करून घेतला. आज आसामातील उल्फ़ा वगैरे संघटनांच्या दहशतवादाला बंगला देशच्या माध्यमातून चीन मदत करीत असतो. त्याचप्रमाणे नक्षलवादी माओवादी दहशतवादाला चीनचे सहाय्य लाभत असते. तर तोयबा व अन्य जिहादी संघटनांना पाकिस्तान, सौदी अशा देशांची खुली वा छुपी मदत मिळत असते. थोडक्यात मुद्दा इतकाच, की दहशतवाद हा कुठल्या तरी देशाच्या सत्तेचा पाठींबा असल्याशिवाय होऊच शकत नाही. त्यामुळेच हिंदू दहशतवाद असा जो आरोप केला जातो, त्यात काडीमात्र तथ्य नाही, कारण अशा कुठल्याही अतिरेकी हिंदू संघटनेला जगातल्या अन्य कुठल्याही देशाच्या सत्तेकडून मदत मिळू शकत नाही. मिळालेली नाही. ती मिळू शकली असती, तर मालेगाव किंवा तत्सम चिरकुट स्फ़ोटात ही मंडळी पकडली गेली नसती. त्यांना दंगलखोर म्हणता येईल. ते हौशी हिंदूत्ववादी आतिरेकी माथेफ़िरू नक्कीच आहेत वा असतील. पण त्यांची गणना कुठल्याही दहशतवाद्यांमध्ये होऊ शकत नाही.

   म्हणूनच ज्याला हिंदू वा भगवा दहशतवाद असे संबोधले जाते त्यांची संख्या व साधने बघितली, तरी त्यांच्या हौशीपणाची साक्ष मिळू शकते. उलट कुठल्याही जिहादी घातपाताच्या घटना बघा, त्यातल्या कारवाया लष्करी सफ़ाईने पार पाडण्यात आलेल्या दिसतील. कारण त्यामागे सत्ता व कुठले तरी सरकार उभे आहे. दहशतवादाचा मूळ हेतू कुणाला मारण्याचा वा जीव घेण्याचा अजिबात नसतो, तर मृत्यूच्या भयाने ठराविक लोकांना शरण यायला भाग पाडणे, हाच त्यामागचा खरा हेतू असतो. हिंदू दहशतवाद म्हणून ज्याचा गवगवा केला जातो, त्या मालेगाव, अजमेर वा मक्का मशीदीच्या घटना नुसत्या बारकाईने बघितल्या, तरी त्यातली दंगलखोर वृत्ती लपत नाही. सुडाला पेटलेल्या माथेफ़िरुंची कृती असा तो प्रकार आहे. पण कसाब, अफ़जल गुरू, मुंबई वा अन्यत्रचे अनेक जिहादी स्फ़ोट सुडाची परिणती नसून त्यामागे पद्धतशीर युद्धयोजना दिसून येते. त्यामागे पाकिस्तानचा हात दिसून येतो. म्हणूनच जिहाद किंवा दहशतवाद म्हणजे नेमके काय प्रकरण आहे, ते समजून घेण्याची गरज आहे. कसाब किंवा अफ़जल हे सामान्य मोहरे होते, असाही दावा केला जातो, ते खरे सुद्धा आहे. पण दहशतवाद असाच खेळत असतो, त्यात कर्नल पुरोहित सारखा महत्वाचा माणूस कधी अडकू शकत नाही किंवा सापडू शकत नाही. म्हणूनच साध्वी किंवा पुरोहित अडकले; हाच त्यांच्या दहशतवादी नसल्याचा व सूडबुद्धीने बेभान झालेले असण्याचा पुरावा आहे. कारण त्यांना दहशत माजवायची होती असे दिसत नाही. त्यांना दहशत कशी निर्माण होते ते सुद्धा ठाऊक नसावे. त्यांनाच कशाला आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांना तरी दहशतवाद म्हणजे काय व ती दहशत कशी निर्माण होते; त्याचा थांगपत्ता आहे काय? आपल्या देशाचे बाजूला ठेवा. अकरा वर्षापुर्वी न्युयॉर्कचे जुळे मनोरे उध्वस्त झाल्यावर अफ़गाणिस्तानला धडा शिकवायला निघालेल्या अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी थेट युद्धाचा पवित्रा घेतला व त्याला दहशतवाद विरोधी युद्ध असेही नाव दिले. पण अकरा वर्षे उलटून गेल्यावरही त्यांना त्या दहशतवादाचा पराभव करता आलेला नाही. आता थकूनभागून अफ़गाणीस्तान मधून माघार घेण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. कारण इतकी वर्षे घालवल्यावर आणि इतके नुकसान सोसल्यावर त्यांना दहशतवादाचे खरे रूप लक्षात आलेले आहे. त्या दहशतवादाशी पारंपारिक युद्ध छेडून त्याला पराभूत करता येणार नाही, याच्या साक्षात्कारानेच अमेरिकेला माघार घ्यायची पाळी आणली आहे. मात्र दुसरीकडे दहशतवादाचे खरे रूप ओळखून त्याचा नि:पात करायला कंबर कसलेल्या श्रीलंकेने वर्षभरात तामिळी वाघांचा निर्णायक पराभव केलेला आहे. दोन देशांच्या या अनुभवातून आपण काही शिकणार आहोत काय; एवढाच प्रश्न आपल्यासमोर आहे.

   ज्या रोगावर उपाय करायचा असतो किंवा ज्या समस्येचे निवारण करायचे असते, ती निदान आधी नेमकी समजून घेतली पाहिजे. तरच तिच्यावरचे उपाय शोधता येतात व योजता येतात आणि मगच त्याचे योग्य परिणाम मिळण्याची अपेक्षा बाळगता येत असते. अत्याधुनिक सेना व साधनसामग्री हाताशी असूनही अमेरिकेला अफ़गाण युद्धात माघार का घ्यावी लागली आहे? त्याच्या तुलनेत अत्यल्प साधने व मोजकी सेना हाताशी असताना श्रीलंकेच्या सेनेला तामिळी वाघांचे निर्दालन का करता आले; याचा अभ्यास म्हणूनच आवश्यक आहे. तो केला तरच दहशतवाद, जिहाद, नक्षलवाद आणि हिदू दहशतवादाचा बागुलबुवा यातला फ़रक लक्षात येऊ शकेल. त्यानंतरच त्यावरचे उपाय शोधता व अंमलात आणता येतील. या विषयात अमेरिकेमध्ये खुप अभ्यास चालतो. पण त्या पुस्तकी अभ्यासाचा उपयोग नसतो. ज्या अफ़गाण युद्धात अमेरिका जिहाद मोडून काढायला सरसावली; तिला दहशतवाद म्हणजे नेमके काय ते ठाऊक नव्हते, तिथेच तिचा पराभव झाला. कारण नेहमीचे युद्ध व त्यामा्गची प्रेरणा आणि जिहाद व दहशतवाद यामागची प्रेरणा, यातला फ़रकच अमेरिकन युद्ध जाणकारांना नव्हता. दहशत कशी व कोणत्या बळावर माजवली जाते आणि कुठल्या कारणास्तव दहशत माजवता येत नाही, याचे विश्लेषण म्हणूनच खुप मोलाचे आहे. त्याचे नवे युद्धशास्त्र आहे, जे सय्यद कुतुब वा ब्रिगेडीयर एस, के. मलिक अशांनी मांडलेले आहे. आपल्या वाहिन्यांवर पोपटपंची करणार्‍या कितीजणांना हे ठाऊक आहे? त्यांना ही नावे तरी माहित असतील की नाही, याची शंका आहे. धर्माचा दहशतवादाशी संबंध नाही ह्या दाव्यापासूनच मुळात चुक सुरू होते, चुकीच्या वाटेने जाऊन ध्येयापर्यंत पोहोचणार कसे? पाकिस्तानचे निवृत्त सेनाधिकारी ब्रिगेडीयर मलिक त्याचे नेमके तपशील देतात. धर्माचा व दहशतवादाचा नेमका संबंध कसा असतो?

गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१३

शरद पवार म्हणजे, ‘कहीपे निगाहे कहीपे निशाना’


   भास्कर जाधव या आपल्याच पक्षाच्या नवख्या व तरूण मंत्र्याला फ़ैलावर घेणार्‍या राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष शरद पवारांना सोनेरी शर्ट घालणारा दत्ता फ़ुगे नावाचा आपलाच एक निष्ठावंत ठाऊकच नाही काय? राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या या कार्यकर्त्याची जागतिक किर्ती कशामुळे झाली, तेही पवारांना ठाऊक नसेल काय? खुप जुनी गोष्ट नाही. दोनच महिन्यांपुर्वी आधी मराठीत व मग अन्य भाषा माध्यमातून दत्ता फ़ुगे हा पुण्यातला राष्ट्रवादी कार्यकर्ता जगभर फ़ेमस झाला. त्याचे कारण जगाचे डोळे दिपवणारा तो सोन्याचा माणूस झाला होता. तब्बल साडेतीन किलो वजनाचा सोन्याचा शर्ट त्याने बनवला आणि परिधान करून जगाचे डोळेच दिपवले होते. अशी कुठली वाहिनी वा वृत्तपत्र नसेल, की तिथे दत्ता फ़ुगे आपल्या सोन्याच्या शर्टासह झळकला नाही. मग त्या कालखंडात पवारांना गाढ झोप लागली होती काय? दोनचार दिवस सर्वत्र चर्चा चाललेल्या आपल्याच कार्यकर्त्याचा हा पराक्रम त्यांना कसा दिसला नाही? की मंत्री वा आमदारापुरताचा त्यांच्या झोपेचा नियम लागू आहे? दत्ता फ़ुगे हा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील एका नगरसेविकेचा पति आहे. पावणे दोन लाख रुपये खर्चून त्याने पुण्याच्या विख्यात ज्वेलर्सकडून हा सोन्याचा शर्ट बनवून घेतला व प्रसिद्धी मिळवली. ही बातमी गेल्या गेल्या डिसेंबर अखेर बहुतांश वृत्तपत्रतून झळकली होती. पण तेव्हा पवारांची नाराजी वगैरे कोणाच्या कानावर आली नव्हती. मग हे पैशाचे ओंगळवाणे प्रदर्शन नव्हते, फ़क्त लग्नाच्या जेवणावळीच उधळपट्टी असते; असे मानायचे काय? एका नगरसेविकेचा पति जर अशी सोन्याची वस्त्रे परिधान करीत असेल; तर आमदाराने काय करावे आणि मंत्र्याने त्याच्याही पुढे जायला नको का? मग या दोन महिन्यांच्या प्रदिर्घ काळात पवारसाहेब शांत का झोपत होते? की आता वेगळ्याच कारणाने झोपमोड झाली आणि त्यांनी भास्कर जाधवांचा बळी देण्याचा पवित्रा घेतलेला आहे? झोपमोडीचे कारण उधळपट्टी असावे, हे अजिबात पटणारे  नाही. ते भलतेच काही असावे अशी म्हणूनच शंका येते. शिवाय त्यांच्या व अजितदादांच्या भूमिकांमधला विसंवादही त्याच संशयाला खतपाणी घालणारा आहे.

   गेल्या काही महिन्यांपासून, की वर्षांपासून पवारांची झोप उडाली आहे असे वाटते. अजितदादा पवार यांनी आपला उपमुख्यमंत्री होण्याचा अट्टाहास पुर्ण केला, तेव्हापासून पवारांची झोप उडाली आहे काय? दिवसेदिवस पक्षावर अजितदादांनी आपली हुकूमत प्रस्थापित केल्याचा विपरित परिणाम थोरल्या पवारांच्या झोपेवर झाला आहे काय? कारण अशोक चव्हाणांना ‘आदर्श’ प्रकरणात जावे लागल्यावर ज्या पद्धतीने दादांनी भुजबळांना बाजूला करण्य़ाचा डाव खेळला होता, तो खरेच पवारांची झोप उडवणारा होता. त्यानंतरच देशात प्रथम एक नवा पायंडा पवारांनी निर्माण केला. आजवर तमाम राजकीय पक्षाच्या युवक शाखा होत्या. त्यातच युवतींचाही समावेश होत असे. शिवाय वेगळी महिला शाखाही असायची. पण कुठल्याही पक्षात युवती शाखा वेगळी असल्याचा इतिहास नाही. पवारांनी आपल्या कन्येसाठी युवती राष्ट्रवादी कॉग्रेस जन्माला घालून त्याच्या राज्यव्यापी शाखा काढायचा सपाटा लावला होता. ती प्रत्यक्षात युवती संघटना आहे; की अजितदादांना शह देणारी वेगळी पर्यायी संघटना आहे? गेल्या पाच वर्षात अजितदादांनी महाराष्ट्रात व पक्षात जी आपली हुकूमत निर्माण केली, तेच पवारांना आव्हान वाटू लागले आहे काय? अन्यथा त्यांच्यात आणि पुतण्यात विसंवाद सतत का वाढत चालला आहे? दादांनी राजिनामा दिला, तेव्हा पक्षाचे सर्व मंत्री व आमदारही दादांच्या बाजूने उभे राहिले होते. पण पवारांनी राजिनामा मंजूर करण्याचा पवित्रा घेऊन सर्व आमदार मंत्र्यांना गप्प बसवले होते. मग एकेदिवशी थेट दादा पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. मध्यंतरी काय घडले? पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनापासूनही दादांना दूर ठेवण्यात आलेले होते. त्यांचा चेहराही अधिवेशनात कुठे दिसू नये याची काळजी घेण्यात आली. इतकेच नव्हेतर तिथे सर्वत्र पवार व सुप्रिया यांचेच चेहरे झळकत होते. जणू दादा नावाचा पवारांचा कोणी वारसच नाही, असे त्या पक्ष अधिवेशनातले चित्र होते. तरीही दादा पुन्हा मुसंडी मारून मंत्रिमंडळात आले आणि अजून त्याचीच बोचणी झोप लागू देत नाही काय?

   अशा अन्य संदर्भात भास्कर जाधवांच्या शाही विवाहाकडे बघण्याची गरज आहे. यात कोण दादांच्या गटातला आहे आणि कोणावर बालंट आणले गेले, याचाही विचार होण्याची गरज आहे. ज्या दादांकडे जलसंपदा खाते आहे, त्याच्याशी संबंधित ठेकेदाराला विवाह खर्चाबद्दल गोवण्यात आलेले आहे. मग ही सगळी झोपेची खेळी की गोळी अजितदादांसाठी आहे काय; असाच प्रश्न पडतो. दादांच्या निष्ठावंत व निकटवर्तियांना पक्षातली व सार्वजनिक जीवनातील त्यांची खरी जागा दाखवून देण्यासाठी पवार साहेबांचे हे ‘जागरण’ सुरू झाले आहे काय? खरी खेळी तीच दिसते आहे. भास्कर जाधव यांच्यावर पवारांचे घसरणे, हे प्रत्यक्षात अजितदादांच्या निष्ठावंतांना दिलेला संकेत असू शकतो. खुलेआम आपल्या शत्रूला किंवा प्रतिस्पर्ध्याला जागवून अंगावर घेण्याचे पवारांचे तंत्र कधीच नव्हते. नेहमी दुसर्‍यांना गाफ़ील पकडून त्यांच्यावर वार करणे, घाव घालणे अशीच पवारनिती राहिली आहे. आतासुद्धा बीडचे जिल्हाधिकारी यांच्या बदलीचे निमित्त होऊन अचानक वादळ लागोपाठ उठलेले आहे. त्यात कोण फ़सले आहेत बघा. कोणावर त्या बदलीचे खापर फ़ोडले जात आहे? बीडचे दादानिष्ठ आमदार व मंत्री यांनाच असा कर्तबगार जिल्हाधिकारी नको आहे; कारण तो राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराला निपटून काढणारा आहे, असा गवगवा सुरू झाला आहे. भास्कर जाधव प्रकरण सुरू असतानाच बीडच्या दादानिष्ठांवर आणखी एक बालंट आणले गेले आहे. याच बीड जिल्ह्यात दादांनी भाजपाचे वरिष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांच्या पुतण्याला फ़ोडून मोठी बाजी मारली होती. तिथे आता नेमक्या त्यांच्याच विश्वासू सवंगड्यांवर आरोप सुरू झाले आहेत. दादांच्या विरोधातल्या या राजकारणाचा आरंभ काकांच्या झोप उडण्यातून व्हावा, हा निव्वळ योगायोग मानायचा काय? जाधवांच्या लग्नाची नाराजी संपण्याआधीच चि्चवडच्या दादानिष्ठ अपक्ष आमदाराच्या जेवणावळीच्याही बातम्या झळकल्या होत्या. त्याच दरम्यान नव्या मुंबईतील उपमहापौराच्या विवाह सोहळ्याचाही लगेच गाजावाजा झाला. हे सगळेच नेमके दादानिष्ठ निवडून काढलेले असावेत, हा कितीसा योगायोग आहे? की दादांना त्यांची पक्षातील व महाराष्ट्रातील खरी जागा दाखवून देण्याचा प्रयत्न चालू आहे?

   अजितदादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये आपल्या महत्वाकांक्षा कधी लपवल्या नाहीत. त्याचवेळी त्यांनी श्रीमंती वा भपकेबाज कार्यक्रमांबद्दल कधी लाज बाळगली नाही. पैसेवाले व प्रसंगी गुंडगिरी करू शकणार्‍यांचा गोतावळा भोवती असण्याची खंत बाळगली नाही. ती दादांची स्टाईल आहे. पण थोरल्या पवारांना ती मंजूर नसली, तरी आज स्वबळावर राजकारण करू लागलेल्या दादांना त्याची पर्वा नाही. आणि तेच बहुध पवारांच्या झोप उडण्याचे खरे कारण आहे. पण त्याला पायबंद कसा घालायचा व शह कुठे द्यायचा; त्याचा गोंधळ उडालेला आहे. थेट डाव खेळणे हा पवारांचा कधीच स्वभाव नव्हता. अगदी स्वत: तरूण असतानाही पवार नेहमी कुटील नितीचाच वापर करत आलेले आहेत. गोड बोलून केसाने गळा कापणे असे म्हणतात, ती पवारांची राजनिती राहिली आहे. ती अशी आपल्याच घरच्यांमध्ये वापरली जाईल अशी कोणी अपेक्षा बाळगत नाही. पण शेवटी राजकारणात आपला परका असे भेदभाव करून चालत नाही. जिथे डोईजड होते, तिथे तुकडा पाडावाच लागतो. तशी वेळ शरद पवार यांच्यावर आली आहे काय? की सुप्रियाला आपला वारस नेमण्यातल्या अडचणी दूर करण्याचे डावपेच सुरू झाले आहेत? तोंडाने जा किंवा बाजूला व्हा; म्हणायचे नाही, पण समोरच्यावर तशी पाळी आणायची, यालाच राजकारण म्हणत असतात. आणि ते साधण्यासाठी शरद पवार नेहमी आडवाटेने खेळी करत आलेले आहेत. पितृतुल्य यशवंतराव चव्हाण किंवा वसंतदादा पाटील अशा बड्यांना त्यांनी अशाच खेळीत गुंतवून नामोहरम केले होते, तर त्यांच्याच आशीर्वादाने व कृपेने राजकारणात जम बसवलेल्या पुतण्याला त्याच औषधाची चव चाखायची वेळ पवारांनी आणली तर आश्चर्य मानायचे कारण नाही. अर्थात त्यासाठी आपल्याला काही वर्षे तरी ह्या रहस्याचा उलगडा व्हायला वाट पहावी लागेल. आजच्या घडामोडींचे परिणाम दिसतील, तेव्हाच भास्कर जाधव किंवा अनेकांना पवार साहेबांची झोप कशामुळे उडाली होती, त्याचा पत्ता लागू शकेल. तोपर्यंत आपल्याला नुसते डोळे चोळत जागरण करण्याखेरीज गत्यंतर नाही. कारण पवारांचे सुशिलकुमार शिंदे यांच्यासारखे नाही, की झटपट खरे सांगुन माफ़ी मागुन मोकळे व्हावे. शिंदेसरकारांच्या माफ़ीनाम्याचे रहस्य उद्या बघू. ( क्रमश:)
 भाग   ( ९३ )    २२/२/१३

बुधवार, २० फेब्रुवारी, २०१३

शरद पवारांनी अन्य कुणाची झोप उडवली का?



    या आठवड्यात शरद पवार यांनी आपल्याच पक्षाच्या एका मंत्र्याने मुलामुलीच्या विवाहावर मोठी उधळपट्टी केल्यावर आपली झोप उडाल्याचे वक्तव्य केले आणि सगळीकडे खळबळ माजली आहे. अखेर त्या मंत्र्याने जाहिर माफ़ी मागितली आणि आपल्या त्या शाही विवाह सोहळ्याचा प्रायोजक कोण होता; त्याचे नावही जाहिर करून टाकले आहे. आता त्या ठेकेदार प्रायोजकाच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर खात्याच्या धाडी पडल्या आहेत. शिवाय शरद पवार यांच्या पक्षनिरपेक्ष वृत्तीची जगाला साक्षही मिळालेली आहे. पण यातून कृषिमंत्र्यांना काय साधायचे आहे? शरद पवार हा असा राजकीय नेता आहे, की काहीतरी साध्य करण्यासाठीच ते चाल खेळत असतात. आपल्याच मंत्र्याचा बळी ते उगाच देणार नाहीत. त्यामुळेच राजकारणाचे अभ्यासकही हैराण असतील, की या ज्येष्ठ नेत्याने असा आपल्याच एका निष्ठावान कार्यकर्त्याचा बळी कशाला दिला असेल? तसे बघायला गेल्यास पैशाची उधळपट्टी किंवा दुष्काळाच्या निमित्ताने साधेपणाने जगण्याची शिकवण देण्य़ाच्या खुप संधी अलिकडल्या कालखंडात पवार साहेबांना मिळालेल्या आहेत. पण त्याबद्दल त्यांनी सदोदित मौन पाळलेले आहे. 

      अगदी अलिकडल्या काळातीलच उदाहरण द्यायचे तर पुण्यातील एक वादग्रस्त उद्योजक अविनाश भोसले यांच्या मुलांच्याही शाही विवाह सोहळ्याला किती खर्च झाला होता? तिथे कित्येक पुढारी हजेरी लावून गेले, त्यात पवार नव्हते काय? त्या शाही विवाह सोहळ्यासाठी मुंबई बंगलोर राजरस्त्यावरही वाहतुकीचा काही तास खोळंबा झाल्याच्या बातम्या होत्या. त्यातलीच एक कहाणी वृत्तपत्रांनी अगत्याने दिली व वाहिन्यांनी दाखवली होती. सुप्रियाताई आपल्या (अजित) दादाला अगत्याने फ़ोटोसाठी आग्रह धरतात, त्याची ती बातमी होती. त्या शाही सोहळ्यात किती खर्च झाला होता? त्यातले व्याही राज्याचे एक ज्येष्ठमंत्री पतंगराव कदम होते. त्याबद्दल तर पवारांनी नाराजी व्यक्त केल्याचे कोणाच्या ऐकीवात नाही. तत्पुर्वी सिंचन घोटाळा म्हणून जे प्रकरण उजेडात आले, त्यात ज्येष्ठ मंत्री सुनील तटकरे यांच्या मुलाच्या शंभरावर कंपन्या असल्याचे व त्यांनी अफ़ाट माया गोळा केल्याचे चर्चेतले प्रकरण होते, त्याबद्दल झोप उडाल्याचे पवार कधी म्हणाले नाहीत. त्याच सिंचन घोटाळ्याने बरेच राजकारण खेळले गेले, अजितदादांना तडकाफ़डकी राजिनामा द्यावा लागलेला होता. सिंचनाचा दुष्काळाशी थेट संबंध असूनही पवारांची झोप त्या घोटाळ्यातील आकड्यांनी उडवली नाही. इथे महाराष्ट्रात असले मग पवार साहेब गावोगावी फ़िरत असतात; असे अगत्याने सांगितले जाते. त्यांना खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेले भव्यदिव्य वाढदिवसांच्या फ़्लेक्स फ़लकांचे दर्शन कधी झालेच नाही काय? मग त्यातली साधनसंपत्तीची नासाडी त्यांची कधीच झोप विचलित का करू शकली नाही? फ़क्त एका भास्कर जाधवच्या शाही विवाह सोहळ्याने पवार इतके कशाला व्यथित झाले आहेत? इतके की विनाविलंब त्या विवाहाच्या खर्चाची आयकर विभागाकडून छाननी सुरू व्हावी? 

   इथे पवार दुष्काळच नव्हे तर अन्य प्रसंगीही असे श्रीमंतीचे प्रदर्शन मांडू नये, असा दावा करीत आहेत. पण दुस्रीकडे त्यांचेच पुतणे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा मात्र आपल्या मंत्र्यावर बालंट आणले गेल्याच्या भाषेत बोलत आहेत. दुष्काळ कोकणात नाही, ज्या जिल्ह्यात दुष्काळ नाही, तिथल्या लोकांनी सोहळा केल्यास काय बिघडले, अशा थाटाची भाषा अजितदादांनी वापरली आहे. म्हणजेच पवारांची झोप उडाल्याचे बिचार्‍या भास्कर जाधव यांनाच आश्चर्य वाटलेले नाही. खुद्द पवारांच्या पुतण्यालाही काकांचा आवेश लक्षात आलेला दिसत नाही. बाकी कोणाहीपेक्षा अजितदादा आपल्या काकांना खुप चांगले व जवळून ओळखतात; हे नाकारता येणार नाही. तेव्हा दादांनी चुलत्याच्या विधानाला छेद देण्याच्या भाषेत बोलणे चमत्कारिक नाही काय? आपल्या दिर्घकालीन राजकीय जीवनात पवार खरेच पैशाच्या अशा ओंगळवाण्या प्रदर्शनाने विचलित होत राहिले असतील; तर ते सर्वात जास्त त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना माहिती असेल ना? म्हणजेच त्यामागची तात्विक भूमिका अजितदादांना जास्त माहित असायला हवी. मग दादांनी पवार साहेबांच्या आक्षेपाचे जोरात समर्थन करण्याऐवजी त्याचेच खंडन करणारी भूमिका कशाला घ्यावी? कुठेतरी मोठी गडबड नक्कीच आहे. शिवाय नुसते आरोप होताच सरकारची यंत्रणाही कधी नव्हे तो आळस झटकून कामाला लागावी, हा चमत्कारच नाही काय? पवारांचे वागणे असेच नेहमी अनाकलनीय राहिले आहे. की त्यामागेही काही गंभीर राजकारण साहेबांनी खेळलेले आहे? हा सगळा प्रकार कुठून सुरू झाला तेही बघण्यासारखे आहे. कुठल्या समारंभात बोलताना किंवा पत्रकार परिषदेत मतप्रदर्शन करताना पवार साहेबांनी भास्कर जाधव यांना फ़ैलावर घेतलेले नाही. त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये गौप्यस्फ़ोट केल्याप्रमाणे या विषयाला सुरूवात झालेली आहे. शिवाय योगायोगाने घेतलेली मुलाखत वा वार्ताहराला दिलेली ती मुलाखत नाही. एकाच वाहिनीच्या थेट संपादकाला दिलेली मुलाखत आहे, तिथून ह्या विषयाला तोंड फ़ुटलेले आहे. म्हणूनच सगळा विषय अनाकलनीय होऊन जातो. 

   कुठेतरी काका पुतण्यातल्या बेबनावाचे हे राजकारण आहे काय, अशी म्हणूनच शंका येते. कारण इथे नुसत्या एका मंत्र्याच्या मुलांच्या शाही विवाहाचे प्रकरण नाही. त्यातला एक मोठा ठेकेदारही त्यात अडकवला गेला आहे. सहसा अशा विषयात अन्य पक्षांकडून आरोप होतात आणि स्वपक्षीय सहकारी समर्थनाला पुढे सरसावत असतात. अजितदादा किंवा सुनील तटकरे यांच्यावर आरोप झाले; तेव्हा राष्ट्रवादीचे तमाम प्रवक्ते व नेते समर्थनासाठी पुढे आलेले होते. पण आज भास्कर जाधव हा त्यांच्याच पक्षाचा मंत्री एकाकी पडलेला आहे आणि खुद्द पक्षाध्यक्षानेच त्याच्यावर आरोप केल्यासारखी नाराजी व्यक्त केली आहे. मग विनाविलंब त्या प्रकरणाची कायदेशीर चौकशी सुरू झालेली आहे. एकटे उपमुख्यमंत्री अजितदादा काही प्रमाणात भास्कर जाधव यांच्या समर्थनाला पुढे आले असून बहुतांश बाकीचे त्यांच्याच पक्षातले नेते कोणत्याच बाजूने बोलायला तयार नाहीत. हा गोंधळ म्हणायचा काय? कसला गोंधळ आहे? काका पुतण्यांच्या या अजब भांडणात कोणाच्या बाजून उभे रहावे; असा तो गोंधळ आहे काय? म्हणजेच फ़क्त भास्कर जाधव एकाकी पडलेले नाहीत, तर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातील बहूतांश मंडळीच एकाकी पडलेली आहेत. त्यांना काय योग्य म्हणावे आणि काय चुक म्हणावे; त्याचाच अंदाज येत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणूनच घडलेला सगळा प्रकार अधिकच गोंधळात पाडणारा आहे. पवारही सहजगत्या बोलून गेलेले नाहीत; तर मुद्दाम मुलाखत देऊन त्यांनी हा विषय उकरून काढलेला आहे. मग त्यामागे त्यांचा हेतू काय ते शोधण्याची गरज आहे. कारण पवारांची निती कायमच ‘कहीपे निगाहे कहीपे निशाना’ अशीच राहिलेली आहे. मग इथे भास्कर जाधव हाच त्याचा निशाना असेल, असे मानता येत नाही. त्यांची निगाहे व नजर जाधव यांच्या विवाह सोहळ्यावर आहे यात शंकाच नाही. पण त्यांनी नेम कुठे धरलाय, त्याला अधिक महत्व आहे. तो नेम तर जाधव वाटत नाही. ज्याप्रकारे अजितदादांनी काकांचे मतप्रदर्शन खोडून काढायचा प्रयत्न केला, त्यामुळे अजितदादा मात्र जखमी झाल्यासारखे वाटतात. मग प्रश्न असा पडतो, की पवार साहेबांचा निशाणा कोणावर आहे? 

   तसे पाहिल्यास सगळे प्रकरण इतक्या थराला जायला नको होते. कारण जाधव यांनी ज्या ठेकेदाराचे नाव झटपट सांगून टाकले, तो आता गोत्यात आलेला आहे. जाधव यांनी ते नाव झटपट कशाला सांगावे? दुसरी बाब अशी, की हा ठेकेदार खुप जुना कॉग्रेसशी संबंधित आहे आणि यशवंतराव चव्हाणांपासून खुद्द शरद पवार यांच्याही जवळचा मानला जातो. अशा जुन्या सहकार्‍याशी पवार साहेब असे शत्रुवत वागण्याची अजिबात शक्यता नाही. माणसे जोडण्यासाठीच पवारांची ख्याती आहे, ते इतक्या छोट्या प्रसंगातून आपल्या निष्ठावान कार्यकर्ता जाधव आणि आपल्या जुन्या परिचित मित्र ठेकेदाराला गोत्यात आणायची शक्यता अजिबात नाही. शिवाय पवार ज्या स्तरावर काम करतात, त्या पातळीवर हा ठेकेदार किंवा भास्कर जाधव; ही अगदीच क्षुल्लक माणसे आहेत. तेव्हा त्यांचा काटा काढण्यासाठी पवार इतके मोठे गाजणारे नाट्य घडवतील अशी शक्यता जवळपास नगण्य आहे. मग त्यांनी या विषयाला इतके महत्व देण्याचे कारण काय असावे? की हा ठेकेदार व जाधव एकूण मोठ्या राजकीय डावपेचातील मोहरे आहेत? तीच शक्यता अधिक मोठी वाटते. दिसायला पवारांनी या उधळपट्टीवर आघात केला आहे व पक्षातल्यांनाही बेछूट वागण्याला आपण क्षमा करीत नाही, असा छान देखावा निर्माण केला आहे. पण खरोखरच सगळा विषय त्या उधळपट्टीपुरता मर्यादित असेल असे अजिबात वाटत नाही. कारण पवार यांनी त्यांच्या आयुष्यात कधी इतक्या साध्यासरळ गोष्टी केलेल्या नाहीत. धुर्त चाल हा त्यांच हातखंडा राहिला आहे. मग या सगळ्या शाही विवाह नाट्यामागचे राजकारण काय असेल? झोप पवारांची उडाली आहे की त्यांनी दुसर्‍याच कुणाची झोप उडवली आहे?   ( क्रमश:)  
 भाग   ( ९२ )    २१/२/१३

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१३

तर लोक मोदींकडे ढुंकूनही बघणार नाहीत


   दोन वर्षापुर्वी विश्वचषक भारताने जिंकला, तेव्हा प्रत्येक भारतीयाची छाती फ़ुगलेली होती. जणू आपले क्रिकेटपटू म्हणजे तो जगज्जेता सिकंदर असल्यासारखे आपण बोलत होतो. पण त्यानंतर जी भारतीय क्रिकेटची घसरगुंडी सुरू झाली; तेव्हा आपली तोंडे बघण्यालायक झालेली होती. कारण एकाहून एक महा दिग्गज खेळाडू भारतीय संघात होते, त्यांच्या नावावर मोठमोठे विक्रम क्रिकेटच्या इतिहासात नोंदलेले आहेत. पण जेव्हा इंग्लिश संघासमोर त्यांच्या देशात किंवा इथे मायदेशी खेळायची वेळ आली; तेव्हा आमचे एकाहुन एक महान फ़लंदाज ढेपाळत गेले आणि कुठलाच गोलंदाज भेदक गोलंदाजी करू शकत नव्हता. त्यावेळी आपल्या म्हणजे भारतीय क्रिकेट्वेड्यांच्या मनात कसले विचार घोळत होते? याच्या जागी तो अमुकतमूक असता तर? किंवा पाचसहा फ़लंदाज अवघ्या शेसव्वाशे धावात गारद झाल्यावर आम्ही कोणाकोणाच्या तोंडाकडे धावा जमवण्यासाठी बघत होतो? हरभजन किंवा रविंद्र जडेजा यांनी दोनतीनशे धावा खेळून काढाव्यात, अशीच भाषा बोलली जात नव्हती काय? चांगले नावाजलेले फ़लंदाज गारद होऊन जातात, तेव्हाच लोक अशा अन्य वेळी फ़लंदाज म्हणून उपयुक्त न मानलेल्या खेळाडूंकडून अपेक्षा करू लागतात. त्या अपेक्षांना कुठला तार्किक आधार नसतो, तर ती चमत्काराचीच अपेक्षा असते. म्हणूनच ती कितीही तर्कशुन्य असली तरी एका विचित्र तर्काच्या आधारे केलेली अपेक्षा असते. असा कुठला तो तर्क असतो? अमूक सामन्यात कधी हरभजनने ऐंशी वा जडेजाने शंभर वगैरे केलेल्या धावा आपल्याला आठवत असतात. आणि आजही त्याने तशीच धुवांधार फ़लंदाजी करावी; अशी ती खुळी अपेक्षा असते. त्यासाठी आपण जुगार खेळल्यासारखे बोलत असतो. तर्काने ती अपेक्षा खोडून काढता येऊ शकते. पण असेच चमत्कार पुर्वी कधी घडलेले असतात, त्याचे काय? निराश माणूसच मग चमत्काराकडे वळत असतो. किती लोकांना तीन दशकांपुर्वीचा भारताने जिंकलेला पहिलापहिला विश्वचषक आठवतो? तेव्हा तर एकदिवसीय क्रिकेटची जाणच भारतीयांना नव्हती. अन्य कुणा स्पर्धक संघाच्या गुणसंख्येत भर टाकायला जाणारा संघ एवढीच भारतीय संघाची १९८३ सालातली ओळख होती.

   तेव्हा प्रथमच तरूण व अननूभवी कपील देवला कर्णधार करून स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेले होते. त्यात आधीच्या दोन स्पर्धांप्रमाणेच क्लाईव्ह लॉईडचा वेस्ट इंडीज संघच जिंकणार हे सर्वांचे गृहित होते. पण तिथे पहिल्याच फ़ेरीत पहिल्याच सामन्यात चमत्कार घडला. दोनदा जगज्जेता असलेल्या लॉईडच्या वेस्ट इंडीजला नवख्या कपील देवच्या संघाने; पहिल्याच सामन्यात पराभूत करून सर्वांना थक्क करून सोडले. तो अर्थात योगायोगच होता. लॉईडचा संघ गाफ़ील होता, तिथेच त्यांचा पराभव झाला होता. मात्र परतीच्या सामन्यात त्यांनी भारताला पाणी पाजून हिशोब चुकता केला. पण गंमत वेगळीच होती. त्या प्राथमिक साखळी स्पर्धेत दुबळ्य़ा पुर्व आफ़्रिकेशी झालेल्या सामन्यात भारताची अक्षरश: धुळधाण उडाली होती. अवघ्या १९ धावात भारताचे पाच खंदे फ़लंदाज तंबूत परतले होते. अशा स्थितीत कपील देव बॅट घेऊन मैदानावर उतरला. तेव्हा बाद होऊन माघारी येणारा संदीप पाटिल त्याची माफ़ी मागत होता. पण त्याच्या पाठीवर थाप मारीत कपील म्हणाला, ‘डोन्ट वरी, देख अब मै क्या करता हू.’ संदीप मनातल्या मनात हसत तंबूत आला. कारण हा तापट माथ्याचा जाट उलटीसुलटी बॅट फ़िरवून लगेच विकेट फ़ेकणार याची संदीपला खात्री होती. पण जसजसा सामना पुढे सरकत गेला, तसतशी सर्वांनाच तोंडात बोट घालायची पाळी आली. कारण समोर जे काही घडत होते, तो निव्वळ चमत्कार होता. तेव्हा कपीलने आपल्या बॅटचा असा दांडपट्टा फ़िरवायला सुरूवात केली, की त्याच पूर्व अफ़्रिकेच्या गोलंदाजांसह क्षेत्ररक्षकांना धावायला व चेंडू अडवायला मैदान अपुरे पडू लागले. त्या दिवशी पहिल्या भारतीयाने मर्यादित षटकांच्या स्पर्धेतले शतक ठोकले होते आणि तो फ़लंदाज म्हणजे कपील देव तिथेच थांबायला तयार नव्हता. त्याने शेवटपर्यंत किल्ला लढवला आणि विश्वचषक स्पर्धेतील एका डावात सर्वाधिक धावांचा वैयक्तीक उच्चांक साजरा केला. तो सामना त्या स्पर्धेतला निर्णायक होता. कारण त्याच विजयाने भारताला प्रथमच बाद फ़ेरीत जाण्याची संधी मिळवून दिली होती. आणि नंतर बाद फ़ेरीतही बाजी मारून भारताने वेस्ट इंडीजसह लॉईडचे हॅटट्रीक करायचे मनसुबे धुळीला मिळवले होते. तो खरेच चमत्कार होता. पण तो झाला होता.

   चमत्कार असेच असतात आणि आयुष्यात अशा घटना घडत असतात, त्यांची अनेकदा तर्कसंगती लागत नसते. जेव्हा ते घडत असतात, तेव्हा भल्याभल्यांची मती गुंग होऊन जात असते. ती खेळी कपील खेळला नसता तर मुळात बाद फ़ेरीतच पोहोचणेच शक्य नव्हते. आणि १९ धावांवर पाच खंदे फ़लंदाज बाद झाल्यावर सर्वांच्या अपेक्षा कपीलवर खिळल्या असल्या तरी तो विक्रमी खेळी करील, यावर कोणी विश्वास ठेवायला तयार होता का? पण तेव्हा तो चमत्कार घडला. नुसता घडला नाही तर नावाजलेले फ़लंदाज तंबूत बसून तशी तर्कबाह्य अपेक्षाही करत होते. भारतीय क्रिकेटशौकीन तशी अपेक्षा बाळगून होते. जेव्हा कुठल्याही अपेक्षा करायला जागा उरत नाही, तेव्हाच माणूस चमत्काराची अपेक्षा करत असतो. मग ती कधी हरभजनकडून अधिक धावांची असते तर कधी एखादी मोक्याची विकेट सचिन वा गांगूलीने काढावी अशी असते. वास्तव नित्यजीवनातही तसेच अनेकदा होत असते. एकाहून एक मोठे अनुभवी राजकीय नेते तोकडे पडले; तेव्हा इंदिराजींनी देशाचे नेतृत्व समर्थपणे करून दाखवले होते. अराजकातून देशाला बाहेर काढून दाखवले होते. तशी लोकांनी अपेक्षा का करावी? आज मोदींकडून लोक इतक्या अपेक्षा का करीत आहेत, त्याचे उत्तर तशा अतर्क्य तर्कशास्त्रात शोधावे लागेल. आजवरच्या अनुभवी राजकीय नेते व विचारवंतांनी केलेल्या विवेचन, मार्गदर्शन व निर्णयातून देशाचे प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंत होत व वाढत गेलेली आहे. पण त्याच कालखंडामध्ये सगळीकडून नालायक ठरवण्यात आलेल्या एका मुख्यमंत्र्याने अपेक्षेपलिकडे यशस्वी कारभार करून दाखवला आहे. त्यातून या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. वाजपेयींपासून अडवाणींपर्यंत किंवा सोनियांपासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत बहुतेकांनी केलेली धडपड व प्रयास अपयशी ठरल्यावर लोक पर्याय शोधू लागले आहेत. त्यातून या अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत. बाकीच्या नामवंतांचे अपयश त्या अपेक्षेची जननी आहे. काही केले तर मोदीच करू शकेल, असा तो खुळा आशावाद म्हणता येईल. पण जेव्हा शहाणा आशावाद भ्रमनिरास करतो; तेव्हा सामान्य माणसाला खुळ्या आशावादाच्या अपेक्षांवर जगायची पाळी येत असते. आणि हा बदल केवळ इथल्या जनमानसापुरता मर्यादित नाही. परदेशी राजकीय नेते व सरकारांची मोदी विषयक भूमिकाही झपाट्याने बदलताना दिसते आहे. ते कुणाला आवडो किंवा न आवडो.

   या अपेक्षेला एक वेगळी झालर सुद्धा आहे. ती आहे देशातल्या दहशतवादाची. जिहादी दहशतवाद ही कमालीची डोकेदुखी होऊन बसली आहे. एकीकडे जिहाद व दुसरीकडे माओवादी नक्षलवाद यांच्या कैचीत देशाचा कायदा नामोहरम झालेला असतानाच तिसरीकडे गुन्हेगारी बोकाळली आहे अधिक भ्रष्टाचार लोकांचे जीवन नकोसे करून सोडतो आहे. अशा चहुकडून गांजलेल्या सामान्य भारतीयाला गुजरातच्या खर्‍याखोट्या प्रगतीच्या गोष्टी ऐकायला मिळतात, तेव्हाच त्याच्या मनात खुळ्या अपेक्षा जाग्या होत असतात. त्या नुसत्या दंगलीची रसभरीत वर्णने करून संपवता येणार नाहीत. तर ज्या समस्यांनी जनतेला आज गांजलेले आहे. त्यापासून मुक्तता करण्याचा दुसरा उपलब्ध पर्याय दाखवावा लागेल. ती संधी दोनदा सत्ता हाती आलेल्या कॉग्रेसने गमावली आहे. मातीमोल करून टाकलेली आहे. दुसरीकडे मोदींनी एका राज्यात का होईना यशस्वी काम करून दाखवले आहे. त्याचेच प्रतिबिंब मग मतचाचण्यांमध्ये पडत असते. ते सत्य नाकारून युक्तीवाद होऊ शकतो, पण मोदींना रोखण्यासाठी तो उपयुक्त नाही. कारण त्या सेक्युलर म्हणून चाललेल्या खेळाचे दुष्परिणाम दहा वर्षे लोक भोगत आहेत आणि त्या्पासूनच तर लोकांना मुक्ती हवी आहे. तर तोच नको असलेला पर्याय लोकांसमोर ठेवून मोदींना कसे रोखता येईल? मोदीविषयीचे आकर्षण नेमके कशामुळे आहे, त्याचा तरी त्यांच्या विरोधकांनी विचार केला आहे काय? शोध घेतला आहे काय? हरभजन वा अन्य गोलंदाजांकडून धावांची अपेक्षा का केली जाते, ते त्या वेळच्या सामन्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते. मोदींविषयीच्या लोकांच्या अपेक्षा आजच्या राजकीय परिस्थितीने आणल्या आहेत. त्यापेक्षा उजवा व उत्तम पर्याय असेल तर लोक मोदींकडे ढुंकूनही बघणार नाहीत. पण पर्याय आहेच कुठे? फ़लंदाज उरलेतच कुठे?      ( क्रमश:)
 भाग   ( ९१ )    २०/२/१३

सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१३

दिशाभूल करणारे आपल्याला वाचवतील काय?


   गेली दहा वर्षे गुजरातच्या दंगलीचे इतके स्तोम माजवण्यात आलेले आहे, की जणू देशात त्यापुर्वी कधी हिंदू-मुस्लिम दंगली झाल्याच नव्हत्या. पण वस्तुस्थिती तशी नाही. त्या कालखंडामध्ये देशात भाजपाप्रणित एनडीएचे वाजपेयी सरकार सत्तेवर होते, आणि त्याला कोंडीत पकडायला अन्य कुठला महत्वाचा मुद्दा सेक्युलर विरोधकांकडे नव्हता. म्हणूनच त्या दंगलीला हिंदू दहशतवादाचा चेहरा लावण्याचा तो पद्धतशीर प्रयत्न करण्यात आला होता. केवळ विरोधी पक्षच नव्हेत, तर स्वत:ला सेक्युलर मानणार्‍या माध्यमांनीही खोटेनाटे काहीही सांगत त्या दंगलीचे इतके स्तोम माजवले, की देशाबाहेरही त्याला नरसंहार ठरवण्याची स्पर्धाच सुरू झाली. मग त्याचेही अपप्रचारासाठी भांडवल करण्यात आले. अगदी वाजपेयी यांच्यासारखा नेताही आपली सेक्युलर प्रतिमा जपण्यासाठी मोदींना ‘राजधर्म’ शिकवण्यास पुढे सरसावला. पण त्याआधी गुजरातमध्ये किंवा अन्यत्र तेवढ्याच भीषण हिंदू मुस्लिम दंगली झालेल्या होत्या व त्यातही अल्पसंख्यांक असल्याने मुस्लिमांचेच अधिक नुकसान झालेले होते. पण ज्यांनी नुसती एकच बाजू ऐकण्यात धन्यता मानली व ज्यांना त्यातच रस होता; त्यांच्यासाठी तेच सत्य होऊन बसले. नुसते सत्य नव्हे, तर पवित्र सत्य होऊन बसले. अशी एक घट्ट श्रद्धा तयार झाली, मग त्यातून बाहेर पडणे अशक्य असते. भल्याभल्यांना त्यातून बाहेर पडता येत नाही. मग ज्यांना भाजपा वा मोदी यांचा तिटकाराच आहे, त्यांनी त्या समजूतीमधुन कसे बाहेर पडावे? सहाजिकच अशी जी माणसे असतात, त्यांची मानसिकता एक ठराविक पद्धतीने काम करत असते. ती समजूत, ती पक्की अंधश्रद्धाच त्यांची एक मोजपट्टी बनून जाते. जगातल्या सगळ्या गोष्टी वा अनुभव ही माणसे त्याच मोजपट्टीने मोजू बघतात. त्यांची मते वा विरोध त्यातूनच आकार घेत असतो. सहाजिकच मग मोदी द्वेषाने भारावलेल्या माणसाला मोदीविषयक चांगले सत्य आवडत नाही, उलट त्यासंबंधातले विरुद्ध पण खोटेही खुप प्यार असते. त्यामुळेच मी मोदी संबंधाने काही तथ्य व सत्य मांडतो आहे, ते त्यांना समजून घेणे अवघड झाले तर नवल नाही. त्यामुळेच मग मी शरद पवार याच्या राजकीय विरोधाभासावर विडंबन लिहिले तर त्यातही; त्यांना माझे मोदी भजन दिसू शकते.

   आता साधा विचार करा, की पवार यांची कोणी खोटी निंदानालस्ती केली वा बदनामी केली म्हणून त्याचा मोदी यांना कुठला फ़ायदा होऊ शकतो तरी का? मग पवारांच्या विडंबनात यांना मोदीभक्ती कशाला दिसावी? तर सवाल पवारांचा नाहीच. त्यांना मोदी विषयक सत्य पचवण्याचा त्रास होत असतो. तेवढ्य़ासाठी मग अशी मंडळी कारण नसताना पवारांच्या बचावाला धावून येतात आणि पवारांचे शाही विवाहाविरुद्धचे मत कसे लोकांना आवडणारे आहे असे सांगू लागतात. पण हे विसरून जातात, की काही लोकांना आपले साधेपण आवडावे, म्हणूनच पवारांनी असे मत व्यक्त केलेले असते, त्यांना साधेपाणाशी सोयरसुतक नसते. तसे असते तर पवारांनी आपल्या पक्षाच्या विविध समा्रंभ, सोहळे व सभांमध्ये होणार्‍या अवाढव्य खर्चीक उधळपट्टीवर कधीच नाराजी व्यक्त केली असती. ज्या एकूलत्या एक मुलीचा साधेपणाने विवाह साजरा केला, असे पवार अगत्याने सांगतात, तीच मुलगी सुप्रिया सुळे आज बारामतीच्या खासदार असून युवती कॉग्रेसचे भव्यदिव्य मेळावे नित्यनेमाने आयोजित करीत असतात. त्यावरचा भपकेबाज खर्चही डोळे दिपवणारा असतो. त्यात सहभागी होणार्‍या प्रत्येक तरूणीला भगवे फ़ेटे बांधण्याचा खर्च उधळपट्टी नाही, असा दावा कोणी करू शकेल काय? एका मेळाव्यात दोनतीन हजार मुलींना नवे कोरे फ़ेटे बांधायचा खर्च किती असतो? त्यासाठी गावोगावी उभारण्यात येणार्‍या प्रचार फ़लकांवर किती रुपये खर्च होतात? आणि असे जिल्हावार मेळावे आतापर्यंत डझनावारी झालेले आहेत. त्याला साधेपणा व बिनखर्चिक आयोजन असे पवार म्हणणार आहेत काय? की त्यातून कित्येक दुष्काळी गावांमध्ये कोरड्या विहीरीमध्ये नवे पाण्याचे झरे फ़ुटत असल्याने त्या मेळाव्याचा खर्च दुष्काळ निवारणाचा खर्च आहे असा पवारांचा दावा आहे? एका आमदाराच्या घरगुती समारंभावर इतक्या जाहिर तोफ़ा डागताना सारासार विचार शरद पवारांसारखा जाणता नेता करणार नसेल आणि केवळ लोकांना भारावून टाकायला अशी फ़ुसकी भाषा वापरणार असेल; तर लग्नाच्या भपक्यापेक्षा ती घातक नाही काय? आणि असे दिशाभूल करणारे आपण बोलतो, याची कबुली खुद्द पवार यांनीच दिलेली आहे. परिणाम साधण्यासाठी आपण धडधडीत खोटे बोलतो, असे पवारांनी एका वाहिनीच्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे. त्यामुळे इथे देखील त्यांना उधळपट्टीच्या विरोधापेक्षा आपल्या जाणतेपणाचा आभास निर्माण करायचा होता हे उघड आहे.

   १९९३ सालात शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चौथ्यांदा झालेले होते. तेव्हा मुंबईत पहिल्यांदाच भीषण बॉम्बस्फ़ोट मालिका घडली होती. तिचे पाकिस्तानशी व मुस्लिमांशी असलेले संबंध त्यांना ठाऊक होते व दिसलेले होते. पण सामान्य मुंबईकराची दिशाभूल करण्यासाठी पवारांनी चक्क धुळफ़ेक करणारी वक्तव्ये केली होती. मुस्लिम व पाकिस्तानविषयी लोकांना संशय येऊ नये हा परिणाम साधण्यासाठी आपण खोटे बोलल्याची कबुली स्वत: पवारांनी एनडीटीव्ही या वाहिनीच्या मुलाखतीमधून दिलेली आहे. इतक्या गंभीर बाबतीत खोटे व दिशाभूल करणारे बोलू शकणारा माणुस; कधी कसे विधान करतो, हे म्हणूनच जपुन बघावे लागते व समजून घ्यावे लागते. पण पवार स्वत: जरी स्वत:चा खोटेपणा कबुल करू लागले तरी, त्यांचे भक्त त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. हीच तर अंधश्रद्धेची किमया असते. आपल्या पूजनीय व्यक्ती वा बुवांवर त्या भक्तांची इतकी अढळ श्रद्धा असते, की त्याने स्वत:चा गुन्हा कबूल केला वा खोटे कबुल केले; तरी त्याचे भक्त त्याला खोटा मानायला तयार नसतात. याची उलट बाजू अशी, की ज्याच्यावर त्यांचा राग असतो किंवा ज्याचा अशी माणसे द्वेष करीत असतात; त्याने कितीही चांगले केले तरी, त्यात त्यांन दोष वा गुन्हाच दिसत असतो. तेव्हा अशा मोदी विरोधकांना मोदीने चांगले काही केले असेल, तरी दिसणार कसे? नावडतीचे मीठ अळणी अशी आपल्या मराठी भाषेत जुनीच म्हण आहे ना? तशीच यांची गत असते. त्यामुळे उद्या नरेंद्र मोदी देशाचा पंतप्रधान झाला तरी त्यांना ते कितपत मान्य होईल, देवजाणे. अशी ज्यांची अवस्था आहे त्यांच्यापर्यंत सत्य घेऊन जाता येत नाही आणि अनेकदा त्यांना इजा पोहोचली तरी ते सत्याचा स्विकार करीत नाहीत. आपल्या समजूतीमध्ये मशगुल असण्यातच हे स्वत:ला सुरक्षित मानत असतात.

   माझी त्यांच्याबद्दल अजिबात तक्रार नाही. त्यांनी खुशाल अशा समजूतीमध्ये गुण्यागोविंदाने नांदावे. पण अजाणतेपणी त्यांच्या मागे जाणार्‍यांचे मात्र त्यात हकनाक बळी जात असतात. त्यांची दया करावी की कींव करावी ते समजत नाही. सत्य ओरडून सांगावे लागते, ते अशा शहाण्यांसाठी नव्हे तर त्यांना शहाणे समजून त्यांच्यामागे अजाणतेपणी जात असलेल्या अनभिज्ञांसाठी. गेल्या दहावीस वर्षात आपल्या देशात जिहादी दहशतवादाने जे हकनाक बळी घेतलेले आहेत, ते अशाच अंधश्रद्धेचे बळी आहेत. त्यात जसे हिंदू व अन्य धर्मिय बळी गेले आहेत; तसेच अनेक मुस्लिमही बळी गेलेले आहेत. फ़रक असेल तर तो किंचित समजूतीचा आहे, मुस्लिम अशा घटनेत बळी पडतो, तेव्हा त्याला दु:ख, खेद वा यातना होण्यापेक्षा समाधान मिळत असते, कारण तो धर्मासाठी शहिद झाला अशी त्याची धारणा असते आणि अन्य बिचारे हकनाक मारले गेलो; म्हणून मृत्यूला सामोरे जात असतात. अफ़जल गुरू असो, की अजमल कसाब असो, त्यांची फ़ाशी जाण्यापुर्वीची मनस्थिती बघा. आपण धर्मासाठी काही पवित्र कार्य केले अशीच ती मानसिकता आहे. म्हणून तर गुन्हेगार ठरून फ़ाशी गेलेल्या त्यांचा अभिमान देशाच्या अनेक भागातील मुस्लिमांना वाटलेला आहे. अनेकांनी तो अभिमान रस्त्यावर येऊन, घराबाहेर पडून उघडपणे बोलून दाखवला आहे. त्यांचा आपल्याला राग येणे स्वाभाविक आहे. पण कधी आपण त्यांच्या त्या मनस्थितीत जाण्याचा प्रयत्न केला आहे काय? अफ़जल गुरू. अजमल कसाब असो किंवा आता खटल्यात अडकलेला अबू जुंदाल असो; त्यांची मनस्थिती अशी का आहे, याचा आपण विचार केला आहे काय? कधीतरी पकडले गेलो, घातपात करताना फ़सलो, तर मारले जाऊ; अशी भिती त्यांच्या मनाला स्पर्श का करत नसेल? तो एम आय एम या मुस्लिम पक्षाचा पुढारी अकबरुद्दीन ओवायसी अशी आक्रमक बोली का बोलू शकतो? शंभर कोटी हिंदूंना मारण्याची भाषा बोलताना त्याच्या मनाला आपणच मारले जाऊ; अशा भितीचा स्पर्श का होत नाही? उलट शंभर कोटी लोकसंख्या असूनही हिंदू का भयभीत असतात? ही दहशत काय भानगड असते? दहशतवाद धर्माचा असतो की दहशतीचे वेगळे काही तर्कशास्त्र आहे? आपल्या देशातले सेक्युलर शहाणे त्याचे योग्य व समजू शकणारे उत्तर कधी देऊ शकलेले नाहीत. कारण त्यापैकी कोणी मुळात आपल्या श्रद्धा व समजूतीच्या बाहेर पडून वास्तविक समस्येकडे पारदर्शक नजरेने बघायचा प्रयत्नच केलेला नाही. त्यामुळेच मग मोदी, हिंदू भगवा दहशतवाद असे फ़सव्या शब्दांचा भुलभुलैया निर्माण केला जातो. सत्य त्यांनाच बघता येत नसेल तर ते आपल्याला सत्य सांगणार काय आणि समजावणार तरी कसे? दहशत कशी असते आणि कशामुळे असते किंवा दहशतीवरचा सर्वात प्रभावी उपाय कोणता? कधी अशा प्रश्नांची उत्तरे आपण शोधली तरी आहेत काय? उलट त्याबाबतीत ज्यांचे भ्रम आहेत, त्यांच्यावरच विसंबून आपण घातपाताला बळी पडत राहिलो ना? आणि आपल्याला वाचवण्याचा प्रयास करणार्‍यांनीच आपल्याला दिशाभूल करून दहशतवादाच्या जबड्यात नेऊन सोडले आहे.   ( क्रमश:)
 भाग   ( ९० )    १९/२/१३

रविवार, १७ फेब्रुवारी, २०१३

शरदाच्या चांदण्याला झोप का ग येत नाही




  श्रद्धा, अंधश्रद्धा किंवा दहशतवाद हे शब्द हल्ली आपण खुपच ऐकत असतो. पण कधीतरी साकल्याने त्यांचा मानवी जीवनातील संबंध व प्रभाव आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो का? त्यांचा मानवी जीवन घडवण्या विघडवण्यातला घनिष्ट संबंध असतो. माणूस आपल्या शारिरीक यातना, वेदना किंवा इजा यापेक्षाही आपल्या श्रद्धांना अधिक जपत असतो. त्याच्या पलिकडे गेल्याखेरीज तुम्हाला विज्ञाननिष्ठ, विवेकनिष्ठ वगैरे होणे शक्य नसते. त्यामुळेच अगदी विज्ञाननिष्ठ व बुद्धीवादी देखील अनेकदा एखाद्या अंधश्रद्ध भक्तांसारखे वागताना दिसतात. कुण्या बुवा बापूच्या भक्ताने आपल्या परम पूजनीय दैवताचा विवेक सोडून बचाव करावा; तसे तर्कहीन युक्तिवाद असे बुद्धीवादी करताना दिसतील आणि तसे करताना ते अप्रामाणिक असतात, असे मी म्हणणार नाही. ते श्रद्धेच्या आहारी गेल्यानेच तसे अविवेकी होत असतात. शनिवारची गोष्ट आहे, सर्वच वृत्तपत्रात व वृत्तवाहिन्यांवर चिपळूणचे आमदार व राज्याचे एक मंत्री भास्कर जाधव यांच्या मुलाच्या शाही विवाह सोहळ्याच्या बातम्या गाजत होत्या. त्यापेक्षा त्याबद्दल त्यांचे पक्षाध्यक्ष व केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्या उधळपट्टीबद्दल व्यक्त केलेल्या नाराजीने तो विवाह सोहळा अधिक गाजला. आपण आपल्या एकूलत्या एक मुलीचा विवाह किती साधेपणाने साजरा केला होता, त्याची आठवण सांगुन पवारांनी आपल्याच पक्षाच्या एका मंत्र्याच्या उधळपट्टीवर जाहिर नाराजी व्यक्त केली. त्याचा गाजावाजा चालू होता. राज्यामध्ये दुष्काळ असताना आणि नसला तरी; असे पैशाचे ओंगळवाणे प्रदर्शन निषेधार्ह आहे, अशी पवारांची प्रतिक्रिया सामान्यत: कोणालाही भारावून टाकणारीच होती. पण ती कितपत प्रामाणिक आहे; याचा तपासच करू नये काय? आपल्या बुवा बापूंच्या थोरवीबद्दल तपास केलेला त्यांच्या भक्तांना आवडत नाही, तसेच हल्ली अनेक राजकीय, सामाजिक नेते, पुढार्‍यांच्या बाबतीत झालेले आहे. त्यामुळेच माझ्या फ़ेसबुकवरील मित्रयादीतील काही पवार भक्तांच्या श्रद्धा दुखावण्याचा प्रमाद माझ्याकडून घडला. झाले असे, की पवारांची प्रतिक्रिया कितीही भारावून सोडणारी असली तरी ती दिखावू होती, याबद्दल माझ्या तरी मनात शंका नव्हती. कारण परिणाम साधण्यासाठी पवार कधीकधी बेधडक खोटे बोलतात किंवा लोकांची दिशाभूल करीत असतात. हा माझा आरोप नाही. त्यांनीही तसे अनेकदा स्पष्टपणे सांगितलेले आहे. त्यामुळेच भास्कर जाधव यांनी योजलेल्या शाही विवाह सोहळ्याबद्दलची पवारांची प्रतिक्रिया, मला दिखावू वाटली. त्याचेही कारण आहे. पवारांना ते खरेच आवडले नसेल तर त्यांनी मुलभूत प्रश्नाला का हात घातला नाही?

   त्यांनी पैशाच्या उधळपट्टी व प्रदर्शनावर संताप व्यक्त केला आणि तो सोहळा टिव्हीवर बघून आपल्याला झोप लागली नाही, इतके टोकाचे विधान केले. मग प्रश्न असा पडतो, की इतका खर्च आपला एक आमदार मंत्री करतो, तो ओंगळवाणा असेल, तर तो पैसा त्याने उधळायला आणला कुठून; असा प्रश्न पवारांना का पडला नाही? जो कनिष्ठ मंत्री लग्नात इतका पैसा उधळू शकतो, त्याच्यापाशी आणखी किती पैसा असेल आणि त्याने तो कुठल्या मार्गाने मिळवला; असा प्रश्न पवारांच्या मनात का आला नाही? नुसत्या खर्च व उधळपट्टीने झोप उडाली असेल; तर इतका अगणित पैसा मिळवण्याच्या मार्गाच्या नुसत्या विचारानेच पवारांना निद्रानाशाचा विकार जडायला नको काय? पण तसे काही झालेले नाही. त्यांनी चुकूनही त्या मंत्र्याच्या उत्पन्नाचा मार्ग कुठला याबद्दल शंकाही उपस्थित केलेली नाही. तेवढेच नाही, गेले काही महिने राज्यात दुष्काळ आहे आणि त्याला कारणीभूत असलेल्या सिंचन घोटाळ्यात अब्जावधी, हजारो को्टी रुपयांचा अपहार झाल्याचे आरोप झालेले आहेत. पण त्यातून पवारांची झोप उडाल्याचे वा त्यांनी संबंधितांचे कान उपटल्याचे वृत्त कुठल्याही माध्यामातून लोकांपर्यंत आलेले नव्हते. म्हणूनच हजारो कोटीच्या अपहारातील आरोपींच्या (सुनील तटकर व अजितदादा) पाठीवर मायेचा हात फ़िरवणारा माणूस; दोनचार कोटी रुपये विवाह सोहळ्य़ात खर्च झाल्याने विचलित झाला; याचे नवल वाटणे स्वा्भाविक नाही काय? या दोन वागण्यात व प्रतिक्रियांमध्ये प्रचंड विरोधाभास आढळून येत नाही काय? ज्यांना जाणवत नसेल ते पवार भक्त असू शकतात. अन्यथा कुठल्याही चौकस माणसाला पवारांच्या या झोप उडण्याच्या विधानातला टोकाचा विरोधाभास दिसायलाच हवा. आणि मला दिसला तर नवल नाही. बहुतांश लोकांना तो दिसला. म्हणूनच पुढल्या दोन दिवसात पवारांच्याच राष्ट्रवादी पक्षातल्या एका उपमहापौराने मुलीचा लग्नावर केलेली उधळपट्टी व चिंचवडच्या कुणा आमदाराने वाढदिवसासाठी घातलेल्या जेवणावळीच्या साग्रसंगीत बातम्या माध्यमांनी अगत्याने पेश केल्या. अन्यथा त्यांना प्रसिद्धीच मिळालीच नसती. कारण असे चित्र आजच्या राजकारणात अजिबात नवे राहिलेले नाही. पण पवारांचा आव ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’ असा होता, म्हणूनच तो संशयास्पद होता. त्यातल्या त्याच विरोधाभासाने मला एक विडंबन सुचले आणि मी ते मुद्दाम फ़ेसबुकवर टाकले होते. दिवसभरात शेकडो मित्रांनी त्याला दाद दिलीच. पण शंभराहून अधिक मित्रांनी त्याची कॉपी करून पुढे त्यांच्या मित्रांपर्यंत ते विडंबन पोहोचवले. ते अन्यायकारक व अतिशयोक्त असते, तर त्याला इतका उत्स्फ़ुर्त प्रतिसाद मिळाला नसता. पण त्यांच्या मनातही पवारांचे विधान शंकास्पद असल्यानेच माझे विडंबन त्यांना भावले असेल ना? ‘लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई’ या मुळ अंगाई गीताचे ते विडंबन असे होते,

चिपळूणाच्या माळावरी भास्कर झोपला ग बाई
शरदाच्या चांदण्याला झोप का ग येत नाही

पंचपक्वान्ने पोटात ढेकरांची गर्दीघाई
जाधवाच्या मांडवात स्ररकारी सरबराई
उघड पाकळ्य़ा ओठांच्या तुजलाही घे मलाई
शरदाच्या चांदण्याला झोप का ग येत नाही

नाही इथे गांधी कोणी फ़क्त टोपी डोईवरती
खिशामध्ये टाटाबिर्ला खादी आहे अंगापुरती
जगावेगळी ही क्षमता दुष्काळाची भरपाई
शरदाच्या चांदण्याला झोप का ग येत नाही

मित्रांनो; तुम्हीच ठरवा यात मी कुठे शरद पवार या राष्ट्रीय नेत्यावर अन्याय केला आहे काय? त्यांच्या मुळ विधानातून व शाही विवाह सोहळ्यावरच्या प्रतिक्रियेतून जो प्रतिसाद तुमच्या मनात उमटला असेल, त्याच्याशी या विडंबन काव्याची तुलना करून बघा. यातली गंमत समजून घ्यायची की राजकारण बघायचे? मी राजकारणात नाही, तर पत्रकार आहे आणि जगात वा राजकारणात जे घडत असते, त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे हाच माझा पेशा राहिलेला आहे. यात माझे कुठे चुकले आहे काय? पण मित्रयादीतल्या एका मित्राचे चित्त माझ्या या बोचर्‍या प्रतिक्रियेने विचलित झाले आणि त्याने माझ्यावर हिंदूत्व व मोदी समर्थनाचा आरोप केला. या विडंबनात मोदी वा हिंदूत्वाचा संबंध तरी येतो काय? शरद पवार, त्यांचा पक्ष, त्यांचे अनुयायी व त्यांचे राजकारण इतकाच यातला विषय मर्यादित आहे ना? मग त्या मित्राने विचलित का व्हावे? तर त्याची पवारांवर अनन्य भक्ती असली पाहिजे. त्या भक्तीमुळे पवारांचे दोष त्याला बघता येत नाहीत किंवा दाखवले तर त्यात त्याला अन्य कुणाचे गुणगान देखील सापडू शकते. असे का व्हावे माणसाचे? अर्थात हा कोणी सामान्य पवारभक्त किंवा त्यांचा पक्षानुयायी नाही. तरी तो इतका विचलित झाला. तर त्याचे कारण मला शोधावेसे वाटते. कारण मला माझे काय योग्य व रास्त आहे, त्यापेक्षा दुसर्‍याला आपण सांगितलेले कळत नसेल, तर त्याबद्दल कमालीची उत्सुकता असते. तो कसा विचार करतो? इतरांना कळलेले व सहज समजू शकलेले अशा हुशार व्यक्तीला का समजले नाही; ते शोधण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो. शिवाय इथे तर त्याने कारण नसतांना माझ्यावर मोदी वा हिंदूत्वाचा आक्षेप का घ्यावा? असाही वेगळा प्रश्न आहेच. त्याचे कारण इतकेच, की सामान्य माणूस समोर दिसते ते निरागस नजरेने बघू शकतो. पण अभ्यासू, बुद्धीमान माणसांच्या भूमिका व मते ठरलेली असतात. त्यामुळे समोर दिसते, ते आहे ही माणसे तसेच बघू शकत नसतात, तर त्यात त्यांना हवे तेच शोधत असतात आणि नाही सापडले, तरी ते असल्याचाही शोध लावून उलट आरोप करीत असतात. या उपरोक्त विडंबन काव्यात म्हणूनच त्या मित्राला मोदीभजन व हिंदूत्व सापडू शकले. यालाच भक्ती वा अंधश्रद्धा म्हणतात. जी तुम्हाला वास्तव आणि सत्यापासून पारखी करीत असते. कशी ते उद्या बघू.   ( क्रमश:)
 भाग   ( ८९ )    १८/२/१३

मतांची टक्केवारी आणि मिळणार्‍या जागांचे गणित


   गंमत कशी असते बघा. समोरचा माणूस काही तरी सांगायचा प्रयत्न करीत असतो. पण तो काय म्हणतो ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही; तर काहीही उपयोग नसतो. आपल्या डोक्यात काही असते वा आपले एखाद्या गोष्टीबाबत एक ठाम मत असते. आपण त्याच्या पलिकडे जाऊन ऐकायच्या मनस्थितीमध्ये नसलो, तर समोरच्याने कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी उपयोग नसतो. ‘हेडलाईन्स टूडे’ वाहिनीचा संपादक राहुल कन्वलची तशीच बाब होती. कुंभमेळ्यात जमलेल्या साधूंच्या मेळ्यात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याची मागणी झाली; तेव्हा पत्रकारांशी बोलताना हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांनी मोदी हे नेहरूंइतके लोकप्रिय असल्याचा दावा केला होता. पत्रकारांनी मग त्यांची खिल्ली उडवली. असे का व्हावे? त्यापैकी कोणीतरी सिंघल यांचा तो दावा त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न तरी केला काय? समजा अगदी सिंघल हा माणूस मुर्खासारखा बोलत असेल, तरी त्याच्या डोक्यात काय आहे, ते जाणून घ्यायचा प्रयत्न का होऊ नये? जर सिंघल हा माणूस मुर्खच असेल व मुर्खासारखा बडबडत असेल; तर त्याची बडबड माध्यमे मनावर तरी कशाला घेतात? त्याच्या मुर्खपणाकडे पाठ फ़िरवायची होती. का नाही फ़िरवायची? मुर्खपणाला दाद देणेही मुर्खपणाच नाही काय? पण ज्याअर्थी पत्रकार अशी दाद देतात, त्याअर्थी त्यांना सिंघल हा माणूस मुर्ख वाटत नसावा. मग तो काय म्हणतो, ते तरी समजून घेण्याचा संयम हवा की नाही? नेहरू व त्यांची लोकप्रियता हा आपल्याकडे दंतकथेसारखा विषय आहे. त्याबद्दल शंका घेतली वा प्रश्न विचारले; तरी विद्वानांना आवडत नाही. सहाजिकच सिंघल यांनी मोदी व नेहरू यांची तुलना केली, म्हणजेचे मर्यादा ओलांडली होती. तात्काळ त्यांना मुर्ख ठरवण्याची शर्यत सुरू झाली. पण हा माणूस नेमके काय म्हणतो आहे; ते समजून घेण्याची इच्छाही कोणाला झाली नाही, यातच पत्रकारांचा उथळपणा लक्षात येऊ शकतो. त्यातल्या त्यात या राहुल कन्वलने निदान त्याच विषयावर सिंघल यांची वेगळी मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानेही सिंघल काय म्हणतात, ते समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण तरीही मी त्याचे आभार मानेन. कारण राहुलच्या त्याच प्रयत्नामुळे सिंघल यांना नेमके काय म्हणायचे आहे, तिकडे माझे लक्ष जाऊ शकले.

   खरे सांगायचे, तर सिंघल यांनी मोदींची नेहरूंशी केलेली तुलना मलाही हास्यास्पद वाटली होती. कारण पहिली निवडणूक लढवण्यापुर्वीच नेहरू राष्ट्रीय नेता म्हणुन देशाला परिचित होते आणि त्यांनी कॉग्रेसचा अध्यक्ष वा नेता म्हणून आपली स्वातंत्र्य चळवळीवर छाप पाडलेली होती. त्यामुळेच एका राज्याचा विकसनशील मुख्यमंत्री अशी प्रतिमा असली म्हणून काय झाले? आधुनिक भारताचा भाग्यविधाता अशी ज्याची प्रतिमा गेल्या अर्धशतकात कायम जनतेच्या मनावर ठसवण्यात आली आहे; त्याच्याशी एका राज्याच्या मुख्यमंत्र्याची तुलना कशी होऊ शकते? मलाही म्हणूनच सिंघलचे विधान खटकले होते. पण सिंघल तेवढे एकच वाक्य बोलले नव्हते. त्याच्या पुढेमागे काहीतर संदर्भ असणार आणि तो सापडला, तरच त्यांच्या डोक्यातला विचार आपल्याला समजू शकेल, असे मला वाटत होते. त्याचे उत्तर ‘हेडलाईन्स टूडे’साठी कन्वलने घेतलेल्या मुलाखतीमध्ये सापडू शकले. त्यात बोलताना वाजपेयी यांच्याइतके मोदी लोकप्रिय आहेत का; अशा प्रश्नाचे उत्तर देताना सिंघल यांनी जो मुद्दा मांडला, तोही कोणाला न पटणारा होता. कारण वाजपेयी सुद्धा नेहरू व इंदिराजीच्या काळापासूनचे जनसंघाचे लोकप्रिय नेता होते. ज्या काळात कोणी मोदी यांचे नावही ऐकलेले नव्हते. पण या मु्लाखतीमध्ये सिंघल एक वाक्य असे बोलले, की त्यातून मला एक नवी दिशा सापडली. त्यांनी सांगितले, की वाजपेयी जनतेमध्ये लोकप्रिय नव्हते तर माध्यमे, राजकीय विचारवंत व अभ्यासकांमध्ये प्रिय होते. म्हणजेच त्यांच्या लोकप्रियतेचा डंका माध्यमांनी पिटलेला असला, तरी जनमानसात ती लोकप्रियता तेवढी नव्हती. याच एका वाक्याने मला चकीत केले आणि मी त्याचा शोध घेऊ लागलो. शेवटी मी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन जुन्या काही निवडणूक निकालाचे आकडे तपासले. तर मला धक्काच बसला. कारण सिंघल म्हणतात तेच सत्य होते. कारण वाजपेयींचा डंका माध्यमांनी पिटलेला असला, तरी खुद्द भाजपाच्या पाठीराख्या मतदारामध्ये मात्र वाजपेयी तेवढे लोकप्रिय नव्हते. उलट वाजपेयी यांच्या हाती माजपाचे नेतृत्व गेल्यामुळेच भाजपाच्या मतदारामध्ये घट होत गेली.

   म्हणूनच आपल्या डोक्यात जे असेल ते बाजूला ठेवून समोरच्या माणसाला समजून घेणे अगत्याचे असते. जर समजूनच घ्यायचे नसेल व आपल्या मनात आहे, त्यावरच विसंबून रहायचे असेल; तर दुसर्‍याशी संवाद तरी कशाला करायचा? दुसरी गोष्ट जेव्हा दुसर्‍याला समजून घ्यायचे असेल, तर त्याला आधीच मुर्ख ठरवून चालत नाही. तो कसा विचार करतो व तसाच विचार का करतो; यातही डोकावून बघण्याची गरज असते. इथे वाजपेयी हाच भाजपाचा लोकप्रिय चेहरा होता, हा भ्रम इतरांप्रमाणे माझाही होता, हे मी नाकारणार नाही. सिंघल काय म्हणाले, त्याचा निवडणुकीच्या निकालातील आकड्यांमध्ये शोध घेतला नसता, तर माझाही गैरसमज कायम राहिला असता. पण ज्याला सिंघलचा मुर्खपणा मानले जाते; तेच वास्तव असल्याचा शोध मला कशामुळे लागला, तर मी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला म्हणून. आणि हे आकडे थक्क करून सोडणारे आहेत. ती सगळी आकडेवारी अभ्यासली तर माध्यमे व त्यातले दिडशहाणे आपल्याला किती उल्लू बनवतात, त्याची साक्षच मिळत जाते. पराभवालाही विजय व अपयशालाशी यश ठरवण्यापर्यंत माध्यमांची कशी मजल जाते, त्याची साक्ष निवडणूक निकालाचे आकडे देतात. थोडक्यात प्रकार असा चालतो, की पाण्याचे गणित मांडताना लिटरमध्ये बोलण्याऐवजी फ़ुट इंचात बोलायचे आणि कापडाचे गणित सांगताना लिटर मध्ये बोलायचे, अशातला प्रकार आहे. मोदी बाजूला ठेवा आणि सोनियांची कहाणी घ्या. मागल्या दोन लोकसभा निवडणुकीमध्ये सोनियांनी कॉग्रेसला सत्तेवर आणून बसवले, हे खरे असले; तरी त्यांनी कॉग्रेस पक्षाला पुर्वीचे वैभव प्राप्त करून दिल्याचा डंका गेल्या दहा वर्षात पिटला गेला, ही नुसती धुळफ़ेक होती. आणि ते आकड्यानेच सिद्ध होते. राजीव गांधींच्या पराभवातही त्यांना जितक्या जागा व मते मिळाली होती; त्यापेक्षा सोनियांनी कॉग्रेसला मिळवून दिलेली मते कमीच आहेत. अगदी नरसिंहराव व सीताराम केसरी यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसने मिळवलेल्या अपयशापेक्षा सोनिया गांधी थोडीही प्रगती करू शकलेल्या नाहीत, हे वास्तव माध्यमांनी दडपलेले सत्य आहे. अशी माध्यमे मोदी यांच्याविषयी सत्य सांगू शकतील काय?

   आणि म्हणूनच माध्यमे मोदींच्या लोकप्रियतेचे आकडे चाचण्या घेऊन स्वत:च दाखवत असतात, पण त्याचे निष्कर्ष मात्र चुकीचे काढून आपली दिशाभूल करत असतात. म्हणजे एबीपी माझा वाहिनीने भाजपाला आताच निवडणूका झाल्यास देशात ३९ टक्के मते मिळतील आणि मोदी भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील तर ४९ टक्के मते भाजपाला मिळतील असा दावा केला आहे. जेव्हा आपण असे आकडे सांगतो, तेव्हा त्या आकड्यांचे जागांमध्ये कसे रुपांतर होते, त्याचा अभ्यास या लोकांनी कधी केला आहे काय? उदाहरणार्थ राजीव गांधींच्या कॉग्रेसचा १९८९ सालात दारूण पराभव झाला, तेव्हा व्ही पी सिंग यांचा नेतृत्वाखाली मतविभागणी टाळायचा मोठा प्रयास झाला होता. तरी राजीवनी ३८ टक्के मतांसह १९७ जागा जिंकल्या होत्या. आणि १९८४ सालात त्यांना ४९ टक्के मते मिळाली तर ४१५ जागा जिंकता आल्या होत्या. मग तेवढीच मते भाजपाला मिळत असतील तर त्या पक्षाला किती जागा मिळू शकतील? मोदी नसतील तर ३९ टक्के मते व दोनशेच्या जवळपास जागा आणि मोदी उमेदवार असतील तर ४९ टक्के मतांसह किमान ३०० जागा म्हणजे स्पष्ट बहूमत मिळू शकेल की नाही? वाहिन्यांची चाचणी शंभर टक्के बरोबर नसेल. पण जी काही आहे, त्यानुसार आकड्यांचा अर्थ कसा लागतो? तो आधीच्या निकालाशी ताडून बघता येतो ना? मग चाचणीनंतरच्या चर्चेत ३९ टक्के मते असताना दिडशेपेक्षा कमी जागा कशा सांगितल्या जातात? तर त्यांना मोदी वा भाजपा जिंकणार हे मान्य करायचे नसते. म्हणुन आकडे बरोबर सांगायचे पण निष्कर्ष मात्र चुकीचे काढायचे, असला प्रकार चालतो. त्याचे हेच कारण आहे, सिंघल काय सांगतात वा आकडे काय दाखवतात, ते बघायची इच्छा नाही, की तयारीच नाही. मग ज्यांना सत्य बघायचीच हिंमत नाही, ते सत्य आपल्याला सांगणार तरी कसे? त्यांना मोदींची हिंदू व्होटबॅन्क दिसणार तरी कशी? तिची तुलना मग हे शहाणे मुस्लिम व्होटबॅन्केशी करणार तरी कशी? थोडक्यात मुळ समिकरणच चुकीचे मांडले तर योग्य वा खरे उत्तर सापडणारच कसे?   ( क्रमश:)
 भाग   ( ८८ )    १७/२/१३

शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१३

चाचण्य़ांमध्ये मोदी आघाडीवर का दिसतात?


   मुस्लिम मतांचा गठ्ठा किंवा मुस्लिम गठ्ठ्य़ानेच कुणाला तरी मतदान करतात, असे आपल्या देशातील एक राजकीय गृहीत आहे. कुठल्याही निवडणूकांचे विश्लेषण होते; तेव्हा हा मुद्दा सातत्याने चर्चिला जात असतो. सतत एकच बोलत वा सांगत राहिले; मग त्याचा लोकांवरच नव्हे तर शहाण्यांवरही परिणाम होतो. इथेही मुस्लिम मतांच्या गठ्ठ्याची दंतकथा तशीच आहे. ते प्रत्येक निवडणुकीत खरे असतेच असे अजिबात नाही. काही वेळा खरे असेलही. पण असे माध्यमातून व राजकीय विश्लेषणातून सतत सांगितले गेल्याचा एक परिणाम; जसा राजकीय क्षेत्रावर झाला आहे, तसाच तो मुस्लिम मानसिकतेवरही झालेला आहे. त्यातून काही प्रमाणात मुस्लिमांची मते एकगठ्ठा होत गेली आहेत. मात्र त्याचा परिणाम हिंदू मानसिकतेवरही होऊ लागणे स्वाभाविक होते. कारण सगळेच पक्ष मुस्लिम मतांचा गठ्ठा मिळण्यासाठी मुस्लिमांचे लांगुलचालन करतात, अशी एक समजूत वाढीस लागली. प्रामुख्याने गुजरातच्या दंगलीनंतर याचा देशव्यापी राजकीय वापर झाला. उदाहरणार्थ लालूप्रसाद यांनी बिहारच्या निवडणुकांमध्ये मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी गुजरातच्या दंगली व हिंसाचाराची छायाचित्रे मुद्दाम प्रचारात वापरली होती. अन्य ठिकांणी भाजपा विरोधासाठी त्याचीच पुनरावृत्ती होत गेली. पण अशा गृहीताची दुसरी बाजू अशी, की हिंदू मतांचा गठ्ठा तयारच होणार नाही. विविध जातीमध्ये विभागल्या गेलेल्या हिंदूंचा मतांचा गठ्ठा कधीच होणार नाही, याची जणू प्रत्येकाला खात्रीच होती. मोदींनी धक्का दिला आहे, तो त्याच गृहीताला. निदान सध्या तरी मोदी यांनी गुजरातमध्ये त्या गृहीताला धक्का देऊन दाखवले आहे. हे त्यांचे हिंदू मतांच्या गठ्ठ्याचे गृहीत अजून कोणाच्या डोक्यातही आलेले दिसत नाही. म्हणूनच हे मतांच्या गठ्ठ्याचे मोदी मांडू बघत असलेले समिकरण समजून घेण्याची गरज आहे. अगदी जे लोक मोदींना पराभूत करायला उत्सुक आहेत, त्यांनीही हे समिकरण समजून घेतले पाहिजे. गुजरातमध्ये तेच समजून न घेतल्याने मोदींना पराभूत करणे कोणाला शक्य झालेले नाही. अगदी मागल्या दोन निवडणुका त्यांचे जुने सहकारी मोदींना पराभूत करण्यासाठी सज्ज झाले; तरी ते शक्य झालेले नाही. आणि आज सगळे सेक्युलर व भाजपातले विरोधकही मोदींचे समिकरण समजून घ्यायला तयार नाहीत, तीच मोदींची जमेची बाजू होऊन गेली आहे. काय आहे ते समिकरण?

   मुस्लिमांची देशातील लोकसंख्या सतरा अठरा टक्के आहे. त्यामुळेच मतदारामध्येही तेवढीच मुस्लिमांची टक्केवारी मानली जाते. ते सर्वच मुस्लिम एक गठ्ठा मतदान करीत नसतील. पण निदान बारा तेरा टक्के मुस्लिम काही वेळी एक गठ्ठा मतदान करतात हे नक्की. पण तो गठ्ठा ज्या पारड्यात पडतो, त्याला आयता विजय मिळतो, यात शंकाच नाही. मग तेवढाच किंवा त्यापेक्षा थोडा अधिक वजनदार मतांचा गठ्ठा दुसर्‍या बाजूला तयार केला; तर त्या बाजूचे पारडे झुकणार ना? मुस्लिमांच्या विरोधात मनस्थिती असलेला हिंदूंचा तसा गठ्ठा तयार केला; तरच मुस्लिम मतांच्या गठ्ठ्यावर सेक्युलर नसताना मात करता येऊ शकेल ना? गुजरातमध्ये मोदी यांनी ते दंगली नंतर यशस्वीरित्या करून दाखवले. मुस्लिमांची संख्या भारतात वीस टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि अन्य धर्मिय सोडले, तरी निदान सत्तर टक्के लोकसंख्या हिंदूंची आहे, हे कोणी नाकारू शकणार नाही. अशी मोठी लोकसंख्या विविध भाषिक, प्रादेशिक, जातीजमाती अशा लहान मोठ्या गटात विभागली गेलेली आहे, यातही शंका नाही. पण त्याच्याही पलिकडे जाऊन स्वत:ला हिंदू मानणारी व धर्माची अस्मिता मानणारी, काही लोकसंख्या नक्कीच आहे. आणि त्या अस्मितेला जागवले तर हिंदूंच्याही मतांचा गठ्ठा तयार होऊ शकतो. तोच गठ्ठा गुजरातमध्ये मोदी यांनी उभा केला आहे. तिथे त्याला त्यांनी गुजरातची अस्मिता असे नाव दिले असले, तरी ती वास्तवात हिंदू अस्मिताच आहे, ज्यामध्ये तमाम लहानमोठ्या हिंदू जातीजमातींचा समावेश होतो. त्या पुढे केशूभाई पटेल यांच्या पटेल जाती अस्मितेलाही त्यांनी पराभुत करून दाखवलेले आहे. तेव्हा त्यांनी प्रत्यक्षात हिंदू अस्मितेचा म्हणजेच मतांचा गठ्ठा होऊ शकतो, याची प्रचिती मागल्या दोन निवडणुकांमध्ये घडवून आणली आहे. दंगल होऊन गेल्यावर पहिल्या निवडणुकीची गोष्ट बाजूला ठेवा. मागल्या दोन म्हणजे २००७ व २०१२ अशा निवडणूका त्यांनी त्याच गठ्ठा मतांवर जिंकल्या आहेत. आणि त्या जिंकताना त्यांच्या विषयी देशाच्या विविध राज्यात जे त्यांचे चहाते तयार झाले, ते विकासाचे पुरस्कर्ते आहेत; असे मानणे म्हणजे स्वत:ची फ़सवणूक करून घेणे असेल. मोदी विकासही करतात, पण त्यांच्या राज्यात मुस्लिमांची दादागिरी चालत नाही, अशी एक समजूत जाणिवपुर्वक निर्माण करण्यात आली आहे. अर्थात गुजरातमध्ये मुस्लिम जीव मुठीत धरून जगतात, असे चित्र सेक्युलर माध्यमे व राजकीय पक्षांच्या आरोपातून तयार झाले आहे. ते अनेक राज्यातल्या अनेकांना आवडणारे आहे, त्याचे काय?

   उदाहरणार्थ मध्यंतरी आसाममध्ये ज्या दंगली झाल्या किंवा मुंबईत त्याच दरम्यान रझा अकादमीच्या मोर्चामध्ये जी दंगल माजवण्यात आली; तेव्हा मोदीच त्याला पायबंद घालू शकतील, अशी भावना बळावत असते. आज अशा भागात तुम्ही गेलात तर मोदींचे अधिक चहाते तुम्हाला आढळून येतील. आपल्या राज्यात वा देशात मोदींसारखा सत्ताधारी वा मुख्यमंत्री असेल, तर मुंबईत रझा अकादमीने घातला तसा गोंधळ घालायची हिंमत मुस्लिमांना होणार नाही; असे सामान्य हिंदूला वाटले तर नवल नाही. मध्यंतरी कमल हासनच्या ‘विश्वरूपम’ चित्रपटावरून गदारोळ झाला. तसा गुजरातमध्ये झाला नाही, याकडे लोकांचे लक्ष असते. सामान्य माणूस असे बारकावे लक्षात घेत असतो व लक्षात ठेवत असतो. मोदी पंतप्रधान असल्याने असे प्रसंग टाळले जातील, याची आताच कोणी खात्री देऊ शकत नाही. पण तशी अपेक्षा करणार्‍यांसाठी एक नेता तर समोर आहे ना? त्यातूनच मोदींची लोकप्रिय प्रतिमा उभी राहिलेली आहे. त्यातूनच त्यांनी हिंदू मतांचा गठ्ठा निर्माण केलेला आहे. हा त्यांचा चहातावर्ग त्यांचा मतदार आहे. सीमेवर दोन जवानांची हत्या झाल्यावर देशाचा पंतप्रधान चार दिवस गप्प होता आणि पाकिस्तानातून गुजरातला उद्योग मेळाव्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाला तसेच माघारी पाठवण्याची हिंमत मोदींनी केली होती. अशा प्रसंगातून त्यांची प्रतिमा निर्माण झालेली आहे. त्यातून त्यांनी हिंदू मतांचा गठ्ठा निर्माण केलेला आहे, नुकत्याच झालेल्या दोन मतचाचण्यामध्ये त्याचे नेमके प्रतिबिंब पडलेले दिसते. भाजपाला मिळू शकणारी मते आणि मोदी पंतप्रधान होणार असतील, तर भाजपाची वाढणारी मते त्याचीच साक्ष आहे. एबीपी न्युज वाहिनीच्या चाचणीमध्ये मतदाराने सांगितले, की आताच मतदान झाले तर भाजपाला ३९ टक्के लोक मते द्यायला तयार आहेत. पण मोदीच जर भाजपाचा पंतप्रधान होणार असेल, तर आणखी दहा टक्के लोक भाजपाला मते द्यायला उत्सुक आहेत. इथे मोदींसाठी भाजपाची वाढणारी दहा टक्के मते म्हणजे नेमके काय आहे? त्यालाच मतांचा गठ्ठा म्हणतात.

   ही दहा टक्के मते भाजपाची नाहीत, तर भाजपा कडव्या हिंदूत्वाची भूमिका घेणार असेल तर भाजपाला मत द्यायला तयार आहेत. मोदी यांनी नेमका तोच हेतू डोळ्यासमोर ठेवून गेल्या पाच वर्षात वाटचाल केलेली आहे. एकीकडे त्यांनी गुजरातमध्ये आर्थिक, औद्योगिक प्रगती व विकासाची वाटचाल करताना दुसरीकडे त्यांची कडवे हिंदूत्ववादी नेते अशी प्रतिमा सेक्युलर माध्यमे तयार करतील अशी काळजी घेतली आहे. त्यातूनच मुस्लिम विरोधी असलेल्या लोकसंख्येच्या अपेक्षा आपल्या बाबतीत वाढतील; अशी योजना मोदींनी यशस्वीरित्या राबवली आहे. त्यातूनच हा हिंदू मतांचा गठ्ठा निर्माण झालेला आहे. जो साधारणपणे मुस्लिम मतांच्या गठ्ठ्याची बरोबरी करणारा आहे. मुस्लिम मतांचा गठ्ठा आज देशाच्या विविध राज्यांमध्ये, विविध पक्षांच्या व नेत्यांच्या मागे जाणारा आहे. एकाच पक्षाची वा नेत्याची त्या मुस्लिम गठ्ठ्यावर मक्तेदारी नाही. पण हिंदू मतांचा गठ्ठा जो आकाराला येत आहे, त्यावर मात्र मोदींची एकट्याची मकेदारी असणार आहे किंबहूना आहेच. त्यावर भाजपाही आपला हक्क सांगू शकत नाही, इतका तो मतदार मोदींशी एकनिष्ठ बनत चालला आहे. जितक्या प्रमाणात मुस्लिमांचा शत्रू अशी मोदींची प्रतिमा निर्माण केली जाईल; तेवढा असा गठ्ठा वाढत जाणार आहे, त्यासाठी मोदी स्वत:च प्रयत्नशील असतात, हे आता लपून राहिलेले नाही. अर्थात कोणी अजून डोळे उघडून मोदींच्या या हिंदू व्होटबॅन्क समिकरणाचा विचारही करत नसतील, तर त्यांचे डावपेच कोणाला कसे कळणार? मोदी यांनी जो कालबाह्य डाव गुजरातमध्ये मागल्या दहा वर्षात उधळून लावला, तोच मुस्लिम मतांच्या गठ्ठ्याचा डाव देशाच्या राजकारणात उलटवण्यास आता मोदी सज्ज झालेले आहेत. पण त्यांच्या विरोधकांच्या डोक्यात त्याचा प्रकाशही पडलेला नाही. मग मोदींच्या यशापयशाचे अंदाज त्यांना कसे करता येतील?  ( क्रमश:)
 भाग   ( ८७ )    १६/२/१३