गुरुवार, ३१ जानेवारी, २०१३

कुणा व्यक्तीचे दैवतीकरण कसे सुरू होते?


  दैववाद व दैवतीकरण किती सहजगत्या सुरू होत असते आणि त्याचे अंधश्रद्धेत कसे अनवधानाने रुपांतर होते, ते आपल्या लक्षातही येत नाही. चिकित्सक वृत्ती वा विवेकबुद्धी निकामी वा निष्क्रीय करण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे माणसाच्या चांगूलपणाचे रुपांतर त्याच्या अपराधी भावनेत करणे. एखादा माणूस सदभावनेने कुणाशी चांगला वागत असतो, तेव्हा बोलता बोलता त्याच्यात ही अपराधी भावना निर्माण करता येत असते. आपण काही गोष्टी नित्यनेमाने सहज कुणाच्याही बोलण्यातून ऐकत असतो. ‘अमुकतमुक होते वा झाले; तर त्याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. काय चालले आहे? शरमेची गोष्ट आहे. तुझ्यासारखा माणूस असा बोलतो? कमाल आहे तुमची, तुम्हीसुद्धा अशा बाजूने उभे?’ रोजच कुठे ना कुठे आपण हे शब्द ऐकत किंवा वाचत असतो. त्यांचा इतका सातत्याने आपल्यावर भडीमार होतो, की कसलाही विचार न करता, आपला कसलाही संबंध नसलेल्या गोष्टीबद्दल आपल्या मनात एकप्रकारची अपराधी भावना निर्माण होत असते. आपणही त्या घटनेला, गोष्टीला जबाबदार आहोत; असे त्या वाक्यातून आपल्या मनात ठसवले जात असते. प्रत्यक्षात आपला त्याच्याशी दूरान्वये संबंध नसतो. मग आपणही उठून आपण त्यातले वा तसले नाही; हे दाखवायला पुढे सरसावत असतो. आणि कधीतरी नकळत आपणही तीच भाषा बोलू लागतो. त्या वाक्यांचा अर्थ वा हेतूही आपल्याला ठाऊक नसतो. पण आपण असेच बोलत असतो.

   दिल्लीत सामुहिक बलात्कार झाला किंवा मेळघाटला बालकांचे कुपोषण होते. तेव्हा त्यावर तावातावाने बोलणारे व लिहिणारे अशीव वाक्ये आपल्या अंगावर फ़ेकत असतात. मग आपण भारतीय आहोत; म्हणूनच आपल्याला उगाच गुन्हेगार वाटू लागते. त्या अपराधापासून मुक्त होण्याची तीव्र इच्छा आपल्या मनाच्या चांगुलपणातून उत्पन्न होते. आणि त्यात आपण काहीच करू शकणार नसतो. दिल्लीतला बलात्कार किंवा मेळघाटच्या कुपोषणात मुंबई वा पुण्याचा नागरिक जबाबदार नसतोच. पण त्यात तो कुठलाही हस्तक्षेपही करू शकत नसतो. पण असले शब्द सतत कानावर पडले; मग आपण काहीतरी केले पाहिजे, तरच अशा पापातून आपल्याला मुक्ती मिळू शकेल, अशी धारणा तयार होते. पण ज्याला आपण जबाबदार नाही व ज्यात आपला कसला हात नाही; त्याचा पश्चाताप व प्रायश्चित्त आपण का करायचे, असा साधा प्रश्न आपल्या मनाला शिवत नाही. इतके आपण त्या आदळणार्‍या शब्द व वाक्यांच्या प्रभावाखाली आलेले असतो. थोडक्यात अशा शब्दांनी व त्यांच्या मार्‍याने आपली चिकित्सक बृत्ती व विवेकबुद्धी पुरती निष्क्रीय होऊन जात असते. आणि परिणामी प्रायश्चित्त म्हणून आपणही तशीच बडबड करू लागतो, त्यातून सुटकेसाठी धडपडू लागतो. आपण त्या पापाचे भागिदार नाहीच; पण कडवे विरोधक आहोत, असे भासवण्याची संधी शोधू लागतो. त्यासाठी मग आपल्याला अन्य पापी व अपराधी शोधून त्यांना त्यांच्या पापाची जाणिव करून देणे अगत्याचे वाटू लागते. हे पाप कुठल्याही दैववाद, दैवतीकरण, बुवाबाजी व महात्म्याचा उदय होण्यासाठी अगत्याचे असते. कारण पापच नसेल तर पुण्याला अर्थ उरत नाही आणि आपोआपच पुण्यात्म्यालाही अर्थ उरत नाही. म्हणून कुठल्याही देवधर्माची व श्रद्धेची जन्मभूमी मुळातच पापाने सुपीक असावी लागते आणि पाप नसेल, तर पापाचे सिंचन तिथे करावे लागते.

   अर्थात हे फ़क्त दैवावादाच्याच बाबतीत होत नाही. अगदी नास्तिकता दाखवायलाही असेच पाप-पुण्य़ाचे नाटक खेळावे लागत असते. तुम्ही इतके सुशिक्षित आणि तुम्ही असल्या भानगडीत पडता? हे वाक्य आपण कितीदा ऐकतो? जणू तुमच्या कुठल्याही वर्तनाला किंवा जगण्याला कुणाची तरी मान्यता असायला हवी आणि ती मान्यता घ्यायची, तर त्यांचे जे निकष, नियम असतील त्यानुसार बनलेल्या चौकटीत तुम्ही बसायला हवे. तुम्ही त्या चौकटीला आव्हान देता कामा नये किंवा नाकारता कामा नये, असाही आग्रह असतो. त्यामुळेच आपण कुठे चुकलो किंवा काय पाप केले असे विचारणेही पाप असते. डोळे झाकून आस्तिकता किंवा नास्तिकतेचे नियम स्विकारायचे असतात. आपल्या बुद्धीला पटण्याचा वगैरे काही संबंध नसतो. देवधर्मावर श्रद्धा असण्याला जसा हा नियम आहे; तसाच तो नसण्यालाही लागू होतो. कारण तुम्ही श्रद्धावान नाही हे सिद्ध करण्यासाठी जे दुसर्‍या बाजुचे नियम असतात, त्याचे पालन करावे लागत असते. असे नियम बनवणारे हे कोण व आपल्यावर असे नियम लादणारे ते कोण, असा प्रश्न विचारला तरी ते लोक विचलित होतात. तुम्ही कुणा बुवाबापूच्या भक्ताला त्याच्या मठाधीशाबद्दल शंका विचारा, तो जसा अस्वस्थ होतो, तसाच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतला कार्यकर्ताही त्यांच्या खरेखोटेपणाची छाननी सुरू झाली, मग अस्वस्थ होताना दिसेल. मग त्याची पहिली प्रतिक्रिया असते, ‘तुम्ही सुद्धा’? आपली सफ़ाई वा कारणमिमांसा ते देऊ शकत नसतात. कारण तशी मिमांसा त्यांनीही केलेली नसते. त्यांनी जे थोर सत्य म्हणून स्विकारले आहे, त्याचा फ़ोलपणा सिद्ध झाल्यास आपण मुर्ख ठरू या भयापोटी ते लोक आपल्या समजूतीचे समर्थन करायला सरसावत असतात. म्हणूनच एका बाजूला देवधर्म, बुवाबापू यांचे अंधश्रद्ध तर दुसर्‍या बाजूला नास्तिकता वा विज्ञाननिष्ठेचे अंधश्रद्ध आपल्याला आढळून येतात. दोघेही सारखेच कडवे असतात. दोघांनाही चिकित्सा व विवेकाचे भय सतावते.

   ज्या दोन वाचकांच्या प्रतिक्रिया मी काल दिल्या होत्या; त्यांनी माझे मुद्दे खोडून काढले असते; तर मला नक्कीच आवडले असते. पण तसे न करता त्यांनी मी ‘पत्रकार असून सुद्धा’ अशी भाषा वापरली आहे. आणि त्यांच्याच विधानातला विरोधाभासही बघण्यासारखा आहे. एकाच वाक्यात ते काय म्हणतात बघा, ‘इतके लोकांना गृहीत धरणे तुमच्यासारख्या पत्रकारांना शोभते का?’ इथे मी लोकांना म्हणजे वाचकाला गृहीत धरतो असा त्यांचा आक्षेप आहे. पण त्यांनी मात्र पत्रकार म्हणून मला गृहीत धरायला माझी कुठलीच हरकत असता कामा नये, असाही आग्रह त्यातच आहे. म्हणजे पत्रकाराने काय लिहावे, काय लिहू नये, त्याचा अधिकार त्याला स्वत:ला नाही. तो अधिकार यांनी ठरवायचा का? आणि त्यांच्या अशा अधिकाराची सनद त्यांना कोणी दिली? दाभोळकरांच्या भक्तीला लागले; मग त्यांना पत्रकाराने काय लिहावे; मगच त्याला शोभते, ते ठरवण्याचा अधिकार मिळत असतो का? की पत्रकाराने दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचे निमूटपणे गोडवे गायचे, असे कोणी ठरवले आहे? असे बुवाबापूंच्या बाबतीत असते. त्यांची महानता निमूटपणे स्विकारल्यासच त्यांच्या संप्रदायात प्रवेश असतो. त्यांच्या महानतेबद्दल किंवा खरेखोटेपणाबद्दल शंका घेण्यास बुवाबाजीत वाव नसतो. पण मग दाभोळकर भक्तांची तरी वेगळी अपेक्षा कुठे दिसते आहे? अन्य कोणी पत्रकार किंवा संपादक असे प्रश्न विचारत नाहीत, हे मला माहित आहे. कारण मी जेव्हा यापुर्वी अनेकदा दाभोळकर वा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळी विषयी प्रश्न उपस्थित केले; तेव्हा अनेक पत्रकारांनी मला हटकले होते. कशाला इतकी हिंमत करतोस असेही विचारले होते. पण इतर कोणी अशा शंका विचारत नाहीत, म्हणुनच दाभोळकर म्हणतील ती विज्ञाननिष्ठा; असेच त्यांच्या भक्तांचे गृहीत होऊन बसले आहे आणि एका पत्रकाराने शंका विचारताच ते विचलित झाले असावेत.

   पण त्यांच्या प्रतिक्रिया बघा. ‘शोभते का?’ असे शब्द वापरून ते असे दाखवू बघत आहेत, की मी अंधश्रद्ध आहे किंवा त्याचा समर्थक आहे. म्हणूनच ते म्हणतात, ‘तुम्हाला श्रद्धा किंवा काय ठेवायची आहे ती ठेवा ना.’ हे कशाला सांगायला हवे? तर त्यातून तुम्ही अंधश्रद्धा जोपासणारे असाल तर असा, पण त्यासाठी आमच्या बापूंचा बळी कशाला देता? आमच्या श्रद्धेचा कशाला बळी देता; अशी तक्रार आहे. नेमकी हीच गोष्ट कुठल्याही महाराज वाबा बापूच्या भक्तांमध्ये आढळून येईल. तुमची श्रद्धा तुमच्यासाठी. आमची आमच्यासाठी. एकमेकांच्या अध्यातमध्यात नको. पण त्यातून आमच्या श्रद्धेची तपासणी थांबवा. तशी हमी द्या. कशी गंमत आहे बघा. अन्य बापूबुवाची शक्ती वा कुवत काही असेल; तर ती दाभोळकर तपासणार. मात्र त्यांची कुणी तपासणी करता कामा नये. बालमोहन हे वाचक तर अन्य दाभोळकर भक्तांना गप्प कसे, असे आवाहन करीत आहेत. 'अंनिस'चे कार्य ज्यांना ठाऊक आहे ते लोक गप्प बसून हे कसे काय सहन करतात?’ असे म्हणताना ह्या भाषेतून त्यांना काय सुचवायचे आहे? ज्यांना कार्य ठाऊक आहे त्यांनी माझा आवाज बंद करावा असे म्हणायचे आहे काय? मग बापू मंडळीचे भक्त तरी काय वेगळी भाषा बोलतात? पण मुद्दा तो नाही. दैववाद व कुठल्या गोष्टीचे दैवतीकरण कसे सहजगत्या सुरू होते, तो मुद्दा आहे. ते असे सच्चे अनुयायी जोडण्यातून होत असते. मग विषय आशय मागे पडतो आणि व्यक्ती दैवत बनून जाते. आणि मजेची गोष्ट म्हणजे त्या दैवतीकरणाचा पर्दाफ़ाश करायला निघालेलेच नवे दैवत उभे करत असतात. विज्ञाननिष्ठा व चिकित्सक वृत्ती बाजूला पडून कधी नरेंद्राचे तर कधी दाभोळकरांचे स्तोम माजवले जाते. समाजालाही उद्धारक हवाच असतोच. आणि बुवा उद्धारकाला आंधळे भक्त हवे असतात.    ( क्रमश:)
भाग   ( ७२ )    १/२/१३

बुधवार, ३० जानेवारी, २०१३

दाभोळच्या नरेंद्र बापूभक्तांसाठी स्पष्टीकरण


   अनेक लेखातून नरेंद्र दाभोळकर यांच्यावर जे तोंडसुख घेतलेले आढळते ती काय भानगड आहे? ज्या अंधश्रद्धेची उदाहरणे दिली जातात बरीचशी राजकारणातील त्यांचा व दाभोळकर यांचा काडीचा देखील संबंध नसतो. 'अंनिस'चे कार्य ज्यांना ठाऊक आहे ते लोक गप्प बसून हे कसे काय सहन करतात? (बालमोहन, अमेरिका)

   हे काय चालवले आहे तोरसेकर? तुम्हाला लिहिता येते किंवा हा स्तंभ चालवत आहात म्हणून वाटेल ते लिहिले तरी ते लोकांना पटेल असे तुम्हाला वाटते का? इतके लोकांना गृहीत धरणे तुमच्यासारख्या पत्रकारांना शोभते का? तुम्हाला श्रद्धा किंवा काय ठेवायची आहे ती ठेवा ना! पण तुमच्या लेखांवर विश्वास ठेवणे हा काय दोष असेल का? बालमोहन यांनी जे लिहिले याला माझी पूर्ण सहमती आहे. (भाऊ नावाचे कुणी वाचक)

   नरेंद्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाला मी बुवाबाजी का म्हणतो, त्याचे उत्तर या दोन प्रतिक्रियातून मिळू शकते. त्यांच्या या दोघा चहात्यांना आपल्या पूजनीय बापूंची टिंगल आवडलेली नाही. त्यातले एक म्हणतात, माझ्या लेखातून दाभोळकरांवर तोंडसुख घेतलेले आढळते. मग खुद्द दाभोळकरांच्या मूळ लेखामध्ये तरी दुसरे काय आहे? त्यांनी अन्य बुवाबापूंवर तोंडसुख घेतलेले नाही काय? पण जे तोंडसुख आपला पूजनीय बुवाबापू घेतो, ये न्याय्य आणि अन्य कुणी त्याच्याबद्दल शंका घेतली, तरी ब्रह्महत्येचे पाप, असाच आशय या प्रतिक्रियांमध्ये दिसून येत नाही काय? त्यातले बालमोहन तर दाभोळकरांना त्यांच्याच व्याख्येतलेच बुवा बनवून टाकतात व स्वत: त्यांचे अनन्य भक्त असल्याची साक्षही देतात. ते म्हणतात, 'अंनिस'चे कार्य ज्यांना ठाऊक आहे ते लोक गप्प बसून हे कसे काय सहन करतात?’ ही दाभोळकर भक्तीच नाही काय? कारण आपल्या मूळ लेखात तेच दाभोळकर लिहितात, ‘बाबांचा शब्द हीच त्याच्या साम्राज्याची घटना असते. बाबांचा शब्द हे ब्रह्मवाक्य व नैतिकता असते. विरोधी ‘ब्र’ उच्चारणार्‍याला धमकावण्यापासून ते ठोकण्यापर्यंत सर्व मार्ग वापरले जातात.’ बाबा बुवांचे भक्त विरोधी बोलणार्‍याचे सहन करत नाहीत, ही माझी व्याख्या नाही, दाभोळकर बापूंची आहे आणि बालमोहन यांचे वाक्य त्यांच्या भक्तीभावाचाच प्रत्यय आणून देणारे नाही काय? तोच तर माझा मुद्दा आहे. बुवाबाजी व तिच्या नादाला लागणार्‍या अंधश्रद्धेच्या ज्या व्याख्या खुद्द दाभोळकरांनी केल्या आहेत, नेमक्या त्याचेच अनुकरण त्यांच्यासह त्यांच्या संप्रदायाकडून होत असते.

कशी गंमत आहे बघा. ज्यांची दाभोळकरांवर इतकी भक्ती आहे व त्यांच्या कार्यावर इतकी श्रद्धा आहे, त्यांनी तरी दाभोळकरांना किती समजून घेतले आहे? बालमोहन यांच्या मते मी उपस्थित केलेले प्रश्न वा अंधश्रद्धेची उदाहरणे बरीचशी राजकारणातील असून त्याच्याशी दाभोळकरांचा काडीमात्र संबंध नाही. परंतू स्वत: दाभोळकर त्याच मूळ लेखात काय म्हणतात?

१) खरे तर प्रश्न प्रामुख्याने जोडलेले असतात समाजाच्या जडणघडणीशी. ते सोडविण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाच्या लढय़ात उतरावे लागते.
 २) कोणताही बाबा व्यवस्था परिवर्तनाबद्दल चकार शब्द काढत नाही. स्वत:ला शरण येण्याचे फर्मान काढतो, त्यातच मुक्ती असल्याचा पुकारा करतो.
 ३) व्यक्तिगत कर्तृत्वाने समाजव्यवस्था बदलू अशी आशा बहुसंख्य जनसामान्यांना राहिलेली नाही. त्यासाठी त्यांना कोणी तरी स्वामी, महाराज, बापू, संत-महंत लागतो.
 ४)ही बाबा मंडळी स्वत:मध्ये विलक्षण गुंतलेली असतात. त्यांची सर्व आखणी व्यक्तिमहात्म्य वाढवणार्‍या तंत्राची असते.

   खुद्द दाभोळकरच बहुतांश समस्या राजकारण व व्यवस्थेशी संबंधित व त्यातूनच आल्याचे सांगतात. तेवढेच नाही तर ते प्रश्न चुटकीसरशी सुटण्याच्या आमिषाने लोक बुवांच्या आहारी जाऊन अंधश्रद्ध होतात, असेही म्हणतात. म्हणजेच अंधश्रद्धेचे मुळ राजकारण व त्याची सर्वव्यापी व्यवस्था, हेच असल्याचे खुद्द दाभोळलरच सांगतात. मग अंधश्रद्धा निर्मूलन तिथूनच सुरू व्हायला नको का? पण त्यांचेच भक्त किंवा चहाते बालमोहन म्हणतात, ‘ज्या अंधश्रद्धेची उदाहरणे दिली जातात ती बरीचशी राजकारणातील त्यांचा व दाभोळकर यांचा काडीचा देखील संबंध नसतो.’ मग प्रश्न असा पडतो, की बालमोहन दाभोळकरांच्या व्यक्तीमहात्म्याच्या आहारी गेलेत काय? कारण त्यांच्या विवेकबुद्धीचा वापर करून त्यांनी दाभोळकरांची विधाने व दावेही तपासलेले दिसत नाहीत. आपल्या पूज्य व्यक्तीवर टिकेचे आसुड ओढले गेल्याने ते कमालीचे व्यथित झालेले आहेत. हे विवेकबुद्धीचे लक्षण असे त्यांना वाटत असेल तर त्याबद्दल माझी तक्रार नाही. उलट त्यातूनच ते माझ्या आक्षेपाला दुजोरा देत आहेत. दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली दुसर्‍या पद्धतीची बुवाबाजी चालवली असून आपला एक अंधभक्त संप्रदाय निर्माण केला आहे, असाच तर माझा दावा आहे.

   बुवा बापू व त्यांचा संप्रदाय यांची हीच तर गंमत असते. त्यांना नावडत्यावर टिका झाली व तोंडसुख घेतलेले ऐकायला मिळाले, मग गुदगुल्या होतात. पण उलट आपल्या आराध्य दैवत वा पूजनीय संकल्पनेला धक्का लागला; मग चीड, संताप येत असतो. पण दोन्हीतला नीरक्षीर विवेक करायची इच्छा निकामी झालेली असते. वैज्ञानिक भूमिका नेहमी कठोर परिक्षणाची व सत्यशोधनाची असते. ती कुणाला विनापरिक्षा स्विकारत नाही की पूजनीय मानत नाही. माझी भूमिका तशीच आहे व असते. अंधश्रद्धा निर्मूलन या शब्दासह त्यानिमित्ताने होणार्‍या कृती व त्यातील व्यक्ती; यांचीही छाननी मला महत्वाची व अत्यावश्यक वाटते. विज्ञानाच्या नावावर कोणी आपण सांगतो तेच ब्रह्मवाक्य मानावे, अशी सक्ती मी मान्य करत नाही. आणि दाभोळकरांच्या अवैज्ञानिकतेचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्यांनी डॉ. श्रीराम लागू यांना दिलेली प्रतिष्ठा होय.

   वैद्यकीय पदवीधर असलेल्या लागूंनी अभिनय क्षेत्रामध्ये हयात घालवली. त्यापैकी त्यांच्या एका जाहिरातीवर भारताच्या मेडीकल कौन्सिलने आक्षेप घेतला होता. एनासिन वेदनाशामकाच्या जाहिरातीमध्ये त्यांनी मॉडेल म्हणून भूमिका केली. एक डॉक्टर असून सामान्य ग्राहकाची वैद्यकीय दिशाभूल करणारी अशीच ती जाहिरात आहे, म्हणून लागूंना ताकीद देण्यात आली होती. कारण ते लोकांमध्ये वैद्यकीय अंधश्रद्धाच त्या जाहिरातीमधून निर्माण करत होते. अखेरीस त्यांची वैद्यकीय पदवी कौन्सिलने रद्दबातल केली. तर लागूंचा दावा असा, की अभिनय हा माझा व्यवसाय व पेशा आहे. मग बुवाबापूंचा पेशाही तोच तसाच नाही का? एकाच्या पोटभरू दिशाभूलीला पेशा म्हणून स्विकारायचे आणि दुसर्‍याच्या तशाच वर्तनाला गुन्हा म्हणून डंका पिटत फ़िरणे; ही कुठली विवेकबुद्धी असते? कारण त्याच डॉ. लागूंना दाभोळकर आपल्या मंचकावर बोलावतात व लागू तिथे अंधश्रद्धा व देवाला निवृत्त करायच्या वल्गना करतात. हा विरोधाभास ज्यांना दिसू शकत नाही, त्यांच्या बुद्धीला वैज्ञानिक म्हणायचे, की अंधश्रद्धा म्हणायचे? असेच तार्किक व विवेकबुद्धीचे सवाल अन्य बुवाबापूंना दाभोळकर विचारणार, मग त्यांना तसेच प्रश्न विचारून त्यांची विवेकबुद्धी कोणी तपासायची? त्यांच्यावर अगाध श्रद्धा असणारे तसे कार्य करण्याची शक्यता नसेल; तर दाभोळकरांचे शब्द आणि कुठल्या बापूबुवाचे शब्द सारखेच पोकळ व निरर्थक नाहीत काय?

   यातले दुसरे वाचक आहेत ते म्हणतात; मी जे लिहितो ते लोकांना पटेल असे मला का वाटते? त्यांच्यासाठी खुलासा इतकाच, की माझ्यावर डोळे झाकून कोणी दाभोळकरांप्रमाणे विश्वास ठेवावा ही अपेक्षा मी कधीच केलेली नाही. कारण तो वैज्ञानिक दृष्टीकोन होऊ शकत नाही. तशी दाभोळकरांच्या चहात्यांना सवय असेल तर ती त्यांना लखलाभ होवो. मी दुसर्‍या कुणाच्या विधान वा दाव्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत नाही आणि अन्य कुणी माझ्या लिखाणावर तसा आंधळा विश्वास ठेवावा; हेसुद्धा मला आवडणारे नाही. त्याला आपली विवेकबुद्धी कुणाच्या पायी शरण ठेवणे वा गहाण टाकणे म्हणतात. माझा वाचक असा असू नये; हीच माझी अपेक्षा असते. पण दाभोळकर भक्तीमुळे माझ्या चौकसपणाला आक्षेप घेणार्‍यांचे डोळे उघडे आहेत, हे कसे समजावे? कारण या दोघांनीही दाभोळकरांवर मी घेतलेल्या आक्षेपांची उत्तरे द्यायची टाळली आहेत. उलट मी शंका काढतो, याचा त्यांना राग आलेला आहे. आणि तो माझ्यासाठी नवा नाही. कुठल्याही राजकीय नेत्याचे निष्ठावान पाठीराखे वा बुवाबापूचे भक्तही असेच; त्यांच्या पूजनीय व्यक्तीमहात्म्यावर शंका घेतल्या तर व्यथित होतात. तेव्हा अशा भक्तीभावाशी विवेकबुद्धी व विज्ञाननिष्ठा टक्कर घेऊ शकत नसते. कारण या दाभोळकर भक्तांना त्यांच्याप्रमाणेच मी देखील त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या व्यक्तीची छाननी कऊ नये असे वाटते. त्यांना माझी चिकित्सा विचलीत करते. जेव्हा अशी अढळ निष्ठा तयार होते; तेव्हा तिला बुद्धी नव्हे भक्ती म्हणतात. आणि भक्ती वा श्रद्धेला विवेकी उत्तर नसते. खलील जिब्रान म्हणतो, ‘श्रद्धा हे हृदयातील असे मृगजळ आहे, की विचारांचे कारवान घेऊन चर्चेचे कितीही वाळवंट तुडवले, तरी त्याच्यापर्यंत पोहोचता येत नसते.’ हे जर विज्ञानाची भाषा बोलणार्‍या दाभोळकरांच्या बाबतीत अनुभवास येत असेल, तर निव्वळ भक्तीभाव व श्रद्धेवरच आपला पसारा उभा करणार्‍या बुवाबापूंच्या भक्तांना विवेक व विज्ञानाच्या चिकित्सक मार्गावर आणणे किती अवघड काम असेल? विज्ञानाचा आरंभच चिकित्सेतून होत असतो, त्याची चीड किंवा त्यालाच नकार; हे भक्तीचे व अंधश्रद्धेचे लक्षण असते. दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाने भारावलेल्यांना ते कसे समजवणार? कारण भारावून गेले की विवेकबुद्धी आपोआप निकामी व निष्क्रीय होत असते. आणि त्याची व्याख्या परत मी माझी सांगत नाही, दाभोळकर त्याच लेखात म्हणतात,

     ‘स्वतंत्र बुद्धीने विचार करून त्यासाठी संघर्ष करणे या बाबी भक्तगणांना क्षुल्लक वाटतात. बाबांचे विचार, पारायणे, गुरुभक्ती यातच जीवनाचा आधार व कृतार्थता वाटते. त्यामधून मग अव्वल दर्जाची मानसिक गुलामगिरी निर्माण होते.’?     ( क्रमश:)
भाग   ( ७१ )    ३१/१/१३

मुंबईत बारावा स्फ़ोट कोणी घडवला होता?


  गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या त्या वादरस्त विधानानंतर आठवडाभर आलेल्या प्रतिक्रिया मी काळजीपुर्वक बघत व ऐकत होतो, तेव्हा सेक्युलॅरिझमची नशा किती बेभान करणारी व आत्मघातकी असू शकते; त्याचीच मला अनुभूती आली. कारण एक राजकीय हेतूने केलेले बिनबुडाचे विधान, पक्षीय कारणा्ने केले असताना त्याचा इतका मुर्खासारखा बचाव चालला होता, की त्यात आपण देशाला खड्ड्यात घालतो आहोत, याचे बहुतांश जाणत्यांनाही भान उरलेले दिसत नव्हते. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी यांच्यापासून वाहिन्यांवरचे अर्धवटराव मोठ्या तावातावाने शिंदे यांचा आरोप खरा ठरवायला धडपडत होते. म्हणजेच असा बुद्धीवाद व युक्तीवाद करणारा प्रत्येकजण तोयबा व हफ़िज़ यांच्याच बाजूने साक्ष द्यायला धावत सुटला होता. देशातील पक्षिय राजकारण व हेवेदावे चुकते करण्यासाठी आपण पाकिस्तान व तिथल्या जिहादी संघटनांचे हात मजबूत करतो आहोत; याचेही भान ज्यांना उरत नाही, त्यांच्याकडून कुठल्या देशहीत वा जनहिताची अपेक्षा करता येईल काय? आणि दुसरीकडे शिंदे यांनी जे काही मुद्दे व आरोप केलेत त्यान नवीन काय आहे? गेली पाच सहा वर्षे हेच आरोप नुसते माध्यमातून होत आहेत. पण त्यातल्या कुठल्याही प्रकरणात सरकारने न्यायालयासमोर पुरावे ठेवण्याचे धाडस केलेले नाही. जर पुरावे आहेत असे म्हणता; तर कसाब प्रमाणेच त्या हिंदूत्ववादी दहशतवाद्यांवर खटला क चालवत नाही? कसाब मुंबईत येण्यापुर्वी त्यांची धरपकड झाली आहे. कसाबकडून हेमंत करकरे मारले गेले. त्यांनीच कर्नल पुरोहित व साध्वी प्रज्ञा सिंग यांना अटक केली व सज्जड पुरावे असल्याचा दावा केला होता. मग त्यांना मारणारा कसाब सुप्रिम कोर्टापर्यंत जाऊन दोषी ठरला आणि फ़ाशी सुद्धा गेला. तर पुरोहित व साध्वी यांच्यावरचा खटला कोर्टात उभा कशाला रहात नाही? चार वर्षे सज्जड पुरावे असल्याचे नुसते दावे माध्यमाकडे केले जातात, सभांमधून व वाहिन्यांवरून आरोप केले जातात, तार तेच पुरावे कोर्टात मांडायला काय अडचण आहे? की माध्यमे व सभेच व्यासपिठच कोर्ट आहे असे सरकारला वाटते? की पुरावे नाहीतच, पण आरोपाला निमित्त असावे म्हणून नुसतेच नाटक चालू आहे? नसेल तर कोर्टात जाण्यापासून सरकारला कोणी अडवले आहे?

   हिंदू किंवा भगवा दहशतवाद हे सत्य आहे की निव्वळ सेक्युलर बागुलबुवा आहे? असेल तर चार वर्षे ज्याचा तपास संपून पुरावे गोळा झालेत त्याचा खटला चालू का होत नाही? मी सरळसरळ सरकार व सेक्युलर राजकारणावर खोटेपणाचा आरोप करतोय; असेच कोणाला वाटले तर ते गैर नाही. कारण माझा तसाच आरोप आहे. कारण मला तसा रास्त संशय आहे. त्याचे दोन भाग पडतात. एक म्हणजे पकडलेल्या तथाकथित हिंदू दहशतवाद्यांबद्दल माध्यमात केला जाणारा गवगवा आणि कोर्टात जाण्याचे टाळणे, हे आहे. दुसरा भाग खोटेपणाचा. सरकार किंवा प्रामुख्याने सेक्युलर पक्ष व माध्यमे खोटी बोलू लिहू शकतात का? तर त्यांच्या खोटेपणाचे शेकडो पुरावे आजपर्यंत मी सादर केलेले आहेत. आपल्याला जे योग्य वाटते, तेच सत्य ठरवण्यासाठी अशी बेभान झालेली माणसे बेधडक खोटे बोलू शकत असतात. जर्मन कवी व तत्ववेत्ता हेनरिक हायने म्हणतो, ‘आपल्यालाच सत्य गवसले आहे आणि तेच मानव जातीचे कल्याण करणार आहे, अशी झिंग चढलेला माणूस ते संशयास्पद सत्य सिद्ध करण्यासाठी बिनदिक्कत खोटे बोलू शकतो’

   हायने असे म्हणतो म्हणून त्यावर विश्वास ठेवायचे कारण नाही. तसा काही पुरावा आहे काय? माणसे अशी खरेच बेधडक व बिनदिक्कत खोटे बोलू शकतात का? विशेषत भारताचा गृहमंत्री किंवा एखादा मुख्यमंत्री वा बडा नेता असा धडधडीत खोटे बोलू शकेल? विश्वास नाही बसत ना? कसा बसणार? त्यांचा खरेखोटेपणा तपासणारेच त्या खोटेपणात सहभागी झाले, तर सर्वसामान्य  लोकांसमोर सत्य येणार कसे? त्याची फ़सगतच होणार ना? स्पेक्ट्रम घोटाळ्यात दोन मोठ्या चार्टर्ड अकौंटंटना अटक झालेली आहे, हे विसरता कामा नये. त्याचे कारण अशा लोकांनी हिशोब तपासले, मग त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला जात असतो. पण त्यांनीच खोटेपणावर पांघरूण घातले तर लोकांची फ़सवणूक होते ना? माध्यमांची तिच जबाबदारी असते. इथे धडधडीत खोटे बोललेल्या एका मान्यवर बड्या नेत्याचीच साक्ष मी काढणार आहे. त्यानेही ऐन संकटाच्या काळात आपण कसे लोकांची दिशाभूल केली; त्याची एका मुलाखतीतून कबूली दिलेली आहे. त्याचे नाव शरद पवार असे आहे. १९९३ सालात मुंबईत जे भीषण स्फ़ोट झाले, त्यावेळी पवार मुख्यमंत्री होते आणि एकूण अकरा स्फ़ोट झाले होते. तेही बिगर मुस्लिम वस्तीमध्ये. त्यामुळे मुस्लिमांकडे लोक संशयाने बघतील व गडबड होईल, म्हणुन त्यांनी त्याच संध्याकाळी टिव्हीवर बोलताना मसजीदबंदर या मुस्लिम भागातही बारावा स्फ़ोट झाल्याची थाप ठोकली होती. आणि तेरा वर्षांनी एनडी्टिव्ही या वाहिनीच्या शेखर गुप्ता यांना मुलाखत देताना त्यांनी त्या खोटे बोलण्याची कबूलीही देऊन टाकलेली आहे. मुस्लिमांबद्दल शंका संशय येऊ नये, म्हणून त्यांनी खोटेच सांगितले होते. जनहितासाठी खो्टे बोललो असा त्यांचा दावा होता. म्हणुन सत्य बदलते का? तेवढेच नाही, पाकिस्तानचाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी तामीळी वाघ वापरतात अशी स्फ़ो्टके असल्याचेही खोटेच सांगितले होते. जेणे करून मुस्लिम व पाकिस्तान यांच्याविषयी मुंबईकरांच्या मनात संशय येऊ नये, असाच त्यांचा प्रयत्न होता. पण प्रत्यक्षात ते सामान्य नागरिकाची शुद्ध फ़सवणूकच करत होते ना? खर्‍या आरोपीला पाठीशी घालण्यात नागरिकांचे कल्याण व सुरक्षा कशी असू शकते? जितका नागरिक गाफ़ील, तेवढा तो दहशतवादाचा सहज बळी होऊ शकतो ना? मग त्याची दिशाभूल करून त्यालाच गाफ़ील ठेवण्यात सुरक्षा असल्याची समजुत सत्य असते का?

   पण तमाम सेक्युलर लोकांना तसे वाटते आणि म्हणून त्यालाच ते सत्य समजतात. मग तेच सत्य ठरवण्यासाठी ते बेधडक खोटेही बोलू लागतात. पवार यांनी त्याची २००६ मध्ये कबूली दिली. तेव्हा त्यांनी साधलेल्या जनहिताचे परिणाम मुंबईकर भोगत होते. कारण त्यावेळी मुंबईत दुसरी बॉम्बस्फ़ोट मालिका घडली होती. पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये लागोपाठ स्फ़ोट होऊन दिडशेहून अधिक निरपराधांचा बळी गेला होता. पवार किंवा सेक्युलर मंडळींना हीच सुरक्षा व सत्य वाटत असते; म्हणून ते बिनधास्त खोटे बोलत असतात. आणि सुशिलकुमार शिंदे किंवा दिग्विजय सिंग सेक्युलर आहेत. आपली प्रसारमाध्यमे सेक्युलर आहेत. तेव्हा ते किती सत्य बोलतात व किती धडधडीत खोटे बोलतात; ते प्रत्येकाने आपले आपले ठरवावे. नजरेस आणून द्यायचे काम जागरुक पत्रकार म्हणून माझे आहे आणि मी ते केले आहे. पण सेक्युलर पत्रकार हे काम करणार नाहीत. त्यांना जनकल्याण साधायचे असते. त्यामुळे त्याना त्यांचे सत्य प्रस्थापित करण्यासाठी निरपराध माणसांचा हकनाक बळी जाउ देण्यात कर्तव्यपुर्तीचा आनंद मिळत असतो.

    आता जरा हिंदू दहशतवादाचे खोटे बघू. ज्या दोन महिन्यात कराचीहून मुंबईला येऊन मोठा जिहादी हल्ला करण्याची जमवाजमव पाकिस्तानमध्ये व त्यांच्या मदतीला इथले काही छुपे हस्तक करत होते, तेव्हा आमचे सेक्युलर सरकार, राजकारणी व पत्रकार कोणते जनहित साधत होते? त्या दोन महिन्यात इथे कर्नल पुरोहित व साध्वी प्रज्ञासिंग यांच्या हिंदू दहशतवादाचा डंका जोरजोरात पिटला जात होता. तो इतका जोरात पिटला जात होता, की कसाबची टोळी येते आहे, तिकडे कोणाचे लक्षही जाऊ नये. याला सेक्युलर सुरक्षा व जनहित म्हणतात. आजही त्याच शिळ्या कढीला शिंदे यांनी जयपुरमध्ये ऊत आणला आहे. त्यामुळे मी खरेच भयभीत आहे. जेव्हा जेव्हा असा हिंदू दहशतवाद व मुस्लिम विरोधी आक्रमकतेचा, किंवा मुस्लिमांवरील अन्यायाचा बागुलबुवा केला जातो, तेव्हा तेव्हा काहीतरी मोठा हल्ला वा घातपात होऊन शेकडो निरपराध माणसे मुंबईत मारली गेली आहेत. २००६ मध्ये भिवंडी येथे कबरस्थानचे खोटेच प्रकरण उकरुन दंगल माजवण्यात आली होती व शिवाजी पार्कवरील मीनाताईंच्या पुतळ्याला शेण फ़ासून गडबड माजवण्यात आली होती. मग मुस्लिमांवर संशय नको अशी हाकाटी झाली आणि रेल्वेत स्फ़ोटांची मालिका घडली होती. २६/११ च्या कसाबच्या हल्ल्यापुर्वी दिडदोन महिने साध्वी व कर्नल यांच्या मालेगाव स्फ़ोटाचा बागुलबुवा करण्यात आला आणि काही दिवसातच मुंबईत हत्याकांड झाले होते. आताही पुन्हा हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा चालू झाला आहे, मग ही सेक्युलर जनहितार्थ येऊ घातलेल्या कुठल्या भीषण हल्ल्याची चाहुल तर नाही ना? आपल्या अशा खोट्या बोलण्यातून गृहमंत्री भारतीयांना लौकरच जिहादी घातपाती हल्ला होणार असल्याचा संकेत देत आहेत काय? ते खोटेच बोलत आहेत. पण त्या खोट्यातून ते जनतेला सावध करत आहेत की गाफ़ील ठेवत आहेत?( क्रमश:)
भाग   ( ७० )    ३०/१/१३

मंगळवार, २९ जानेवारी, २०१३

खरे सिद्ध करायला, खोटे बोलायचे का?




     केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी गेल्या रविवारी जयपूर येथील कॉग्रेसच्या चिंतन शिबीरात केलेल्या एका आरोपाने मोठीच राजकीय खळबळ उडवून दिलेली आहे. आपल्या हाती आलेल्या अहवालानुसार संघ व भाजपा यांच्या शिबीरात भगवा दहशतवाद शिकवला जातो व हिंदू दहशतवादी घडवले जातात; अशा स्वरूपाचा तो आरोप आहे. मग त्यांनी हिंदू शब्द वापरला, की भगवा यावर वाद घालण्यात अर्थ नाही. त्यातला आशय स्पष्ट आहे. त्यांनी देशातला व संसदेतला प्रमुख विरोधी पक्ष भाजपा आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या रा. स्व. संघावरच दहशतवाद फ़ैलावत असल्याचा आरोप केलेला आहे. आता त्या आरोपामुळे भाजपा वा संघवाले विचलित झाले, संतापले आणि त्यांनी त्यावर आक्षेप घेतला तर योग्यच आहे. पण त्यावर गदारोळ उठल्यावर शिंदे वा अन्य कॉग्रेसजनांनी केलेला खुलासा कमालीचा हास्यास्पद आहे. तो खुलासा म्हणजे गृहमंत्र्यांच्या विधानाचा विपर्यास झाल्याचा दावा केला जातो. विपर्यास भाजपाने केला म्हणायचा तर नेमका त्यांनी घेतला; तोच अर्थ पाकिस्तानात बसलेल्या लष्करे तोयबाच्या प्रमुखानेही काढला आहे. म्हणजेच गृहमंत्री बोलल्याचा जो आशय इथल्या माध्यमांनी व भाजपाने काढला; तोच त्या विधानाचा सर्वसाधारण अर्थ असू शकतो. त्यावरूनच प्रतिक्रिया उमटणार ना? सवाल असा आहे, की देशाच्या गृहमंत्र्याने कुठलेही विधान करतांना जपुन बोलायचे असते. कारण त्याच्या विधानाचा संदर्भ अनेक गोष्टींसाठी लावला जाणार असतो. पाकिस्तानचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आसिफ़ अली झरदारी यांनी एका जागी बोलताना असेच वादग्रस्त विधान केलेले होते व भारताने त्याचे भांडवल केले आहे, मग शिंदे वाटेल ते बोलून निसटू शकतील काय? ‘पाकिस्तानने काही काळ दहहतवादाचा वापर राष्ट्रीय धोरण म्हणून केला’, असे झरदारी बोलून गेले होते. तो वापर कश्मिर धोरणाच्याच बाबतीत झाला; असे भारताने कायम म्हटलेले आहे. म्हणजे तसे विधान करून झरदारी यांनी भारताला पाकविरुद्ध मुद्दाच पुरवला होता. शिंदे यांनी त्याची परतफ़ेड केली म्हणून त्यांचे जयपूरमधील विधान हा गंभीर मामला आहे.

   भारतातल्या दहशतवाद व जिहादी कारवायांमागे पाकिस्तानचा हात आहे; असे आरोप आपण गेली दोन दशके करीत आहोत. मग मुशर्रफ़ यांच्या कारकिर्दीत बलुचिस्तानमध्ये जो असंतोषाचा भड्का उडाला, त्याला भारताच्या कारवाया कारणीभूत आहेत; असा आरोप पाकिस्तान करू लागला. त्याला कुठला पुरावा नाही. पण आरोप होतच असतो. आपणही तसे आरोप पाकिस्तानवर करता असतो. मुंबईतील हल्ल्याचा सुत्रधार म्हणून आपण लष्करे तोयबाचा प्रमुख हफ़ीज़ सईद याच्याकडे बोट दाखवत असतो. त्या्च्या विरोधातले सज्जड पुरावे मिळाल्याने व जगाला ते दाखवले असल्याने; अमेरिका व राष्ट्रसंघानेही त्यावर बंदी घातली आहे. पण पाकिस्तानने कधीच सईदला त्यातला गुन्हेगार मानलेले नाही वा तसा आरोप स्विकारलेला नाही. उलट त्याने लष्करचे नाव बदलून जमात उद दावा असे केले. ती सेवाभावी संघटना आहे असाच पाकिस्तान प्रत्येकवेळी प्रतिदावा करीत आलेले आहे. मात्र आपल्याकडे हिंदूत्ववादी संघटनांवर जे आरोप सेक्युलर पक्ष व माध्यमांकडून होत असतात, त्याचा आधार पाकिस्तान नित्यनेमाने घेत असते आणि त्याच आधारावर भारतातच हिंदू दहशतवाद बोकाळला असल्याचा प्रतिआरोप केला जात असतो. शिंदे यांच्या जयपूरच्या विधानाने त्याच आरोपाला दुजोरा मिळालेला आहे. इथे शिंदे यांची चुक कुठे झाली, ती लक्षात घेतली पाहिजे. ते कॉग्रेस पक्षात आहेत व कॉग्रेसचे नेताही आहेत. पण त्याचवेळी ते भारत सरकारचे गृहमंत्री सुद्धा आहेत. मग ते बोलतील त्याकडे कॉग्रेस पक्षाच्या नेत्याचा आरोप म्हणून बघितले जाणार नाही. तर भारत सरकारचे मत वा निष्कर्ष म्हणूनही बघितले जाणार असते. शिंदे यांनी केलेला आरोप व दिग्विजय सिंग यांनी केलेला आरोप यात असा मूलभूत फ़रक असतो. म्हणूनच अशा महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने त्याचे कायम भान राहले पाहिजे. शिंदे यांना त्याचेच भान ठेवता आलेले नाही. पण पक्षिय अभिनिवेशामध्ये त्यांनी केलेल्या विधानामुळे भाजपाला किती नुकसान होईल; हा भागा अजिबात महत्वाचा नाही. शिंदे यांच्या त्याच विधानाने भारताचे किती नुकसान केले वा होणार; या गोष्टीला अत्यंत महत्व आहे.
 
   शिंदे यांनी ते भाषण केल्यावर इथे भाजपाने कल्लोळ केला, ह्याला महत्व नाही. त्यापेक्षा पाकिस्तानातून तात्काळ आलेली प्रतिक्रिया महत्वाची होती. लष्करे तोयबाचा मुखिया व २६/११ च्या मुंबई हल्यातला सुत्रधार, आरोपी हफ़ि़ज़ सईद याने भारतातच दहशतवाद पोसला जातो, याला भारताच्या गृहमंत्र्यांनीच दुजोरा दिल्याचे घोषित केले. तेवढ्यावर न थांबता त्यांने तात्काळ तीन भारतीय हिंदू दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याचे आवाहन अवघ्या जगाला करून टाकले. त्यांनी नावे वाचली तर शिंदे किती हास्यास्पद ठरलेत; त्याचा अंदाज येऊ शकतो. हफ़िज़ने बंदीची मागणी केली त्यात संघ व हिंदू परिषदेचे नाव असायला हरकत नाही. पण त्याने बंदी घालायची मागणी केलेल्या तिसर्‍या संघटनेचे नाव ‘शिंदे’ असे दिले होते. म्हणजे त्या माकडाला शिंदे हे व्यक्तीचे नाव किंवा आडनाव असते हेसुद्धा माहीत नाही. अशा माकडाच्या हाती आपण कोलित देतो आहोत, याचे भान गृहमंत्र्यांनी ठेवायचे असते. कारण गृहमंत्र्याचे विधान जाहिर असले; मग ते भारत सरकारचे धोरण वा मत मानले जात असते. जगभर पाकिस्तानी जिहादी धुमाकुळ घालत आहेत. मुंबई हल्ल्यातला हाती लागलेला एकमेव फ़िदायिन अजमल कसाब; यानेही हफ़िज़च आपल्या हल्ल्याचा सुत्रधार असल्याची कोर्टात कबुली दिलेली आहे. त्याचा फ़ोनवरचा आवाजही नोंदला गेलेला आहे. त्याच्या आवाजाचा नमूना द्यायचेही पाकिस्तानने नाकारले आहे. त्याच्यासह लष्कर विरोधातले पुरावेही पाकने नाकारले आहेत. फ़ार कशाला जगाकडे पुरावे असताना लष्कर नावाची संघटना पाकिस्तानात कार्यरत आहे; हे सुद्धा स्विकारण्यास नकार दिला आहे. आणि दुसरीकडे आमचे गृहमंत्रीच ज्या संघटनांबद्दल काही संदिग्ध पुरावे किरकोळ प्रकरणातले आहेत. त्याचा हिंदू दहशतवाद म्हणून जगभर डंका पिटणार असतील, तर पाकने त्याचा गैरवापर करू नये असे कोणी म्हणू शकेल का? आपण भाजपाला शह देण्याचे राजकारण करताना भारत सरकारच्या पायावर धोंडा मारतोय याचे तरी भान शिंदे यांनी ठेवायला नको का? त्याच्या परिणामांचा विचार नको करायला?

   हफ़िज़ने त्याच्याही पुढे जाऊन अनेक मागण्या केलेल्या आहेत. भारताचे गृहमंत्रीच इथे दहशतवादी संघटना आहेत व त्या घातपात हिंसेचे प्रशिक्षण देतात. तेव्हा या निवेदनाच्या आधारे भारताला दहशतवादी राष्ट्र घोषित करावे, अशीही मागणी हफ़िज़ने केली आहे. नशीब अजून पाकिस्तानने तशी मागणी केलेली नाही. पण उद्या नजिकच्या काळात पाकिस्तान तशी मागणी करणार नाही, याची कोणी हमी देउ शकते काय? कारण तशी मागणी करण्यासाठी पाकिस्तानला कुठले पुरावे देण्याची गरज नाही. कारण तसे पुरावे आहेत व तसा अहवालच आपल्या हाती आलेला आहे, असे भारताच्या गृहमंत्र्यानेच खुलेआम सांगून टाकलेले आहे. तेव्हा ती एकप्रकारे भारतात दहशतवादी प्रशिक्षण शिबीरे असल्याची भारत सरकारचीच कबुली ठरते. त्याचे पुरावे राष्ट्रसंघाने पाकिस्त्तानकडे मागायची गरज उरत नाही. ते पुरावे आहेत म्हणणार्‍या भारत सरकार व गृहमंत्री शिंदे यांनाच द्यावे लागणार आहेत. म्हणजेच त्यांनी जे काही नंतर वा आधी भाजपच्या तोंडावर खुलासे टाकले आहेत, ते पुरेसे नाहीत. त्यांना तशी वेळ आली तर जगासमोर त्याचे पुरावे सादर करावे लागणार आहेत. आणि ते पुरावे भाजपा किंवा संघाच्या विरोधातले देऊन चालणार नाही. तर त्यांनाच निर्दोष ठरवणारे पुरावे द्यावे लागतील. कारण भाजपा किंवा संघ दहशतवादी संघटना असतील तर त्यावर भारत सरकारला बंदी घालावी लागेल. कारण तशी माग्णी पाकिस्तानने लावून धरली तर त्यासाठी समोर भाजपा किंवा संघाचा कोणी प्रवक्ता नसेल. समोर असेल राष्ट्रसंघ व अवघे जग. त्यामुळेचे जे कोणी पोपटासारखे भाजपा व संघाला दहशतवादी ठरवण्यासाठी आपली बुद्धी पणाला लावून अकलेचे तारे तोडत आहेत, ते शिंदे यांचे समर्थन करीत नसून भारताला सापळ्यात अडकवत आहेत. मग ते माध्यमातले बावळट सेक्युलर असोत किंवा कॉग्रेसचे मुर्ख नेते असोत. कारण पाकिस्तानने त्याचा आधार घेतला तर जगासमोर नाचक्की भाजपाची होणार नाही ती नाचक्की भारत सरकारची होणार आहे. त्याचे उत्तर भारत सरकार म्हणजे प्रत्यक्षात कॉग्रेसलाच द्यावे लागणार आहे. कारण या आरोप व भाषणाचा आधार पाकिस्तानने घेतला तर भाजपा व संघ बाजूला पडून देशाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.   ( क्रमश:)
भाग   ( ६९ )    २९/१/१३

रविवार, २७ जानेवारी, २०१३

भगव्या दहशतवादाचा निव्वळ बागुलबुवा


    सुशिलकुमार शिंदे खरे बोलले असतील तर पाकिस्तानने उगाच आरोप अंगावर घेतला म्हणायचा का? संयुक्त राष्ट्रसंघाचा प्रस्ताव पण खोटा आहे का? तो प्रस्ताव काय म्हणतो? ‘लष्करे तोयबाचा अन्य सघटनांशी संबंध ठेवणारा प्रमुख संपर्काधिकारी कस्मानी आरिफ़ याने फ़ेब्रुवारी २००७ मध्ये भारतातील पानिपत येथे झालेल्या समझोता एक्सप्रेसच्या बॉम्बस्फ़ोटात महत्वाची भूमिका बजावली. त्याला व अलकायदाला निधी उभारणीसाठी दाऊद इब्राहिमने मदत केली. अन्यत्र आपल्या कृत्याला सहाय्य देण्य़ाच्या बदल्यात अलकायदाने तोयबाला समझौता स्फ़ोटात मदत केली.’ (प्रस्ताव क्रमांक १२६७) हा प्रस्ताव राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने २९ जुन २००९ रोजी संमत केलेला आहे. दोनच दिवसांनी १ जुलै २००९ रोजी आरिफ़सह अन्य तीन पाकिस्तान्यांची नावे घेऊन अमेरिकेच्या अर्थखात्याने (आदेश क्रमांक १३२२४ अन्वये) त्या चौघांनाही दहशतवादी म्हणून घो्षित केले होते. तरी पाकिस्तानने त्याची कबुली द्यायचे नाकारले होते. पुढे सहा महिन्यांनी पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी २४ जानेवारी २०१० रोजी कोड्यात टाकणारे विधान करत त्याची कबुली दिली. ज्यांना अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केले त्या पाकिस्तान्यांचा समझौता स्फ़ोटात हात असल्याचे मान्य केले. पण तसे कस्मानी वगैरेंनी स्वेच्छेने केले नाही. त्यांना कर्नल पुरोहीतने भाडोत्री हल्लेखोर म्हणून सुपारी दिली असा रेहमान यांचा दावा होता.

   मग मालेगाव प्रकरणी पकडण्यात आलेल्या कर्नल पुरोहित व साध्वी प्रज्ञा सिंग यांचा समझौता स्फ़ोटाशी संबंध कसा जोडण्यात आला? तर १४ नोव्हेंबर २००८ रोजी महाराष्ट्र एटीएसने मालेगाव आरोपीच्या विरोधात कोर्टामध्ये नवेच निवेदन सादर केले आणि त्यांचा समझौता स्फ़ोटाशी संबंध जोडला. समझौता स्फ़ोटासाठी कर्नल पुरोहित यांनीच आरडीएक्स पुरवले, असे ते एटीएसचे निवेदन होते. पण हे निवेदन किती खरे मानायचे? कारण तोपर्यंत समझौता तपास पुर्ण झाला होता आणि त्यात पकडलेल्या आरोपींनी गुन्हा मान्यही केला होता. त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे समझौता स्फ़ोटासाठी आरडीएक्सचा वापरच झालेला नव्हता. मग महाराष्ट्र एटीएसने (ज्याचे प्रमुख तेव्हा हेमंत करकरे होते) त्या स्फ़ोटासाठी आरडीएक्स पुरोहितने पुरवल्याचा शोध कुठून लावला? कारण ज्या दिवशी समझौता स्फ़ोट झाला, त्याच्या दुसर्‍याच दिवशी तेव्हाचे मराठी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटिल यांनी त्या स्फ़ोटासाठी आरडीएक्सचा वापर झालेला नाही, अशी ग्वाही दिलेली होती. पुढे हरयाणा पोलिसांनी केलेल्या तपासात त्या स्फ़ोटासाठी पोटॅशियम क्लोरेट वापरण्यात आल्याचे सिद्ध झाले होते आणि तसा दावा कोणा मंत्र्याने नव्हे तर फ़ोरेन्सिक प्रयोगशाळेने केला होता, ज्यांना त्या विषयातले जाणकार मानले जाते. पुढे २० जानेवारी २००९ रोजी महाराष्ट्र एटीएसने अधिकृतरित्या समझौता स्फ़ोटासाठी पुरोहितने आरडीएक्स पुरवले नसल्याचे कोर्टात मान्य केले. म्हणजेच राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या झाला. पण जसजसा तपास पुढे सरकत गेला, तसतसा मुळात राईच नाही असे उघडकीस आले. पण नवे गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे मात्र आभासातल्या पर्वतावर स्वार झालेले आहेत आणि तिथून उतरायलाच तयार नाहीत. ते एकटेही नाहीत. त्यांच्यासह तमाम सेक्युलर अर्धवटरावही त्याच राईच्या पर्वतावर आरुढ होऊन भगव्या दहशतवादाच्या नावाने आरोळ्या ठोकत आहेत. जो पर्वत सोडा जिथे राईसुद्धा अस्तित्वात नाही. 

   जयपूरमध्ये शिंदे यांनी जे राणा भीमदेवी थाटातले भाषण केले; त्यातही त्यांनी पुन्हा समझौता स्फ़ोटाचा दाखला दिलेला आहे. तो कसा धडधडीत खोटा आहे, त्याचे हे पुरावे आहेत. पण त्याचा उपयोग काय? ज्यांना पुराव्याच्या आधारे गुन्हा किंवा निरपराधीत्व सिद्ध करायचे असते त्यांच्यासाठी पुरावे कामाचे असतात. ज्यांनी आपल्या संशयिताला आधीच दोषी मानलेले असते, त्यांच्यासाठी पुरावे समोर असून उपयोग कुठला? या बाबतीत आपल्या देशातील सेक्युलर नेते, माध्यमे व विचारवंतांमध्ये एक कमालीचे साम्य आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्याचे शेकडो पुरावे भारताने आजवर पाकिस्तानला दिलेले आहेत. पण त्यांनी एकतरी पुरावा मानला आहे काय? उलट तोंडाने पाकिस्तान म्हणत असतो, पुरावा तर द्या; हफ़िज़ सईदच्या विरोधात. आता इथे वर दिलेली माहिती ही अमेरिका, राष्ट्रसंघ, भारत सरकार, महाराष्ट्र पोलिस, व तात्कालीन वृत्तपत्रात आलेली आहे, बघणार्‍यासाठी उपलब्ध आहे. पण घट्ट डोळे मिटुन बसलेल्यांना दाखवायचे कसे आणि कोणी?

   नसलेले काल्पनिक पुरावे निर्माण करायचे आणि त्याचा गवगवा करायचा. त्याच्या अतिरंजित बातम्या रंगवायच्या. मग ते पुरावे कोर्टात वा प्रयोगशाळेत खोटे पडले; तरी जुन्या खोट्या बातम्यांचा आधार घेऊन तेच तेच खोटे आरोप करतच रहायचे; ह्याला हल्ली सेक्युलर बुद्धीवाद व युक्तीवाद समजले जाते आहे. आणि खोटे पुरावे कसे निर्माण करतात वा करावेत त्याचा पाठ शरद पवारांनी घालून दिलेलाच आहे. मुंबईत १९९३ सालात झालेल्या स्फ़ोटात पाकिस्तान व मुस्लिमांकडे संशयाचा रोख जाऊ नये म्हणून त्यांनी एअर इंडीयाच्या इमारतीमध्ये झालेल्या स्फ़ोटात दक्षिणेकडुन आलेली स्फ़ोटके असावीत असे खोटेच सांगुन टाकले होते. त्यातून मुजाहिदीन वा तोयबाऐवजी तामिळी वाघ मुंबई स्फ़ोटातले आरोपी असावेत; असा खोटाच संशय लोकांच्या मनात भरवण्याचा आपण प्रयत्न केला, अशी कबुली पवारांनी इंडीयन एक्सप्रेसचे संपादक शेखर गुप्ता यांना कॅमेरासमोर दिलेली आहेच. त्यांच्या वृत्तपत्रात तशी बातमीही त्यांनी छापलेली होतीच. तेव्हा शिंदे आज जो अहवाल सांगत आहेत व मालेगावपासून अन्य कुठल्याही स्फ़ोटामध्ये पुरोहित वा साध्वी यांच्या विरोधातले किंवा अन्य कुणा हिंदू दहशतवाद्याच्या विरोधातले ‘सज्जड व भक्कम’ पुरावे; सापडतात कुठे व असतात कुठे त्याचा पत्ता मिळाला? हे सगळे पुरावे काल्पनिक असतात व सेक्युलर सुपीक डोक्यातून निघालेले असतात. त्यामुळेच ते खर्‍याखुर्‍या न्यायालयात आणता येत नाहीत किंवा सिद्ध करता येत नाहीत. म्हणूनच कर्नल पुरोहितने समझौता स्फ़ोटासाठी आरडीएक्स पुरवल्याचा आरोप व पुरावा न्यायालयात तोंडावर आदळला तेव्हा माघार घेण्यात आली होती. तसा पुरावा नसल्याची एटीएसने कबूली दिली होती. पवारांनीही आपल्या खोटेपणाची स्वत:च कबुली दिलेली आहे. 

   पण सुशिलकुमार किंवा कॉग्रेसवाल्यांची अवस्था ‘थोर’ विचारवंत कुमार केतकर म्हणतात तशी असते. ‘सत्तातुराणां न भयं न लज्जा’. जे लोक सत्तेसाठी लंपट व हपापलेले असतात. त्यांना कसलीच लाज नसते, की फ़िकीर नसते. त्यामुळे ते खोटे बोलू शकतात व सतत खोटे बोलत राहू शकतात. किंबहूना आता सेक्युलर म्हणवणार्‍यांचे तेच व्यवच्छेदक लक्षण बनत चालले आहेत. त्यांना खोटे बोलल्याची लाज उरलेली नाही, की खोटे पकडले गेल्याची शरम वाटेनाशी झाली आहे. उलट खोटे कुठे दिसले, की मिटक्या मारीत ते त्यावर ताव मारताना दिसतात. त्यामुळेच अशा वखवखलेल्यांसाठी शिंदे यांनी जयपुरात पंगत वाढली आणि तमाम सेक्युलर त्यावर तुटून पडले. सोकावलेल्या बिबट्याला गावात धुमाकळ घालू लागला, मग पकडायला सापळा लावावा आणि त्यात तो सापडावा, तशीच सेक्युलर शहाण्यांची आज अवस्था झाली आहे. त्या सापळ्य़ात एका बाजूला शेळी बांधतात व अर्ध्या भागात सापळा असतो. कुठूनही शेळीपर्यंत पोहोचण्याचा हव्यासात उतावळा झालेला बिबट्या शेवटी सापळ्याच्या बाजू्ने पिंजर्‍यात शिरतो आणि जेरबंद होतो. तशीच अवस्था आता भगव्या दहशतवादाच्या सापळ्यात अडकलेल्या सेक्युलरांची होऊन गेली आहे. कारण हे तमाम मुर्ख शिंदे नावाच्या शेळीच्या मागे धावले आणि खोट्या पिंजर्‍यात आयते येऊन अडकले आहेत, दिवसेदिवस त्यांचे हे नाटक लांडगा आलारे आला सारखे होत चालले असून त्यातून सामान्य नागरिकांचा जो भ्रमनिरास होत आहे; तो त्याला मतदार म्हणून नरेंद्र मोदींकडे घेऊन जाणार आहे. जातो आहे. गुरूवारी एबीई व हेड्लाईन्स टुडे नावाच्या वाहिन्यांनी मतदाराचा कल घेऊन प्रेक्षकांना सादर केला. त्यात कॉग्रेसची, पंतप्रधा्नांची लोकप्रियता रसातळाला गेल्याचे स्पष्ट दिसते आहे. दुसरीकडे मोदींची लोकप्रियता वाढताना दिसते आहे. खरे तर ती मोदींची लोकप्रियता असण्यापेक्षा कॉग्रेस व सेक्युलर नाटकाला कंटाळलेल्या लोकांची प्रक्षुब्ध प्रतिक्रिया आहे. निकामी, खोटारड्या व घातक सेक्युलर सत्तेपेक्षा खमक्या व धाडसी नेत्याच्या शोधात लोक आहेत. आणि जितका सेक्युलर खोटेपणा वाढत जाणार आहे; तितका अधिक लोकसमुदाय पक्ष वा विचार नव्हेतर धाडसी व खंबीर नेत्याकडे आकर्षित होणार आहे. मोदींना वाढता पाठींबा प्रत्यक्षात सेक्युलर थोतांडाला झिडकारण्याकडला वाढता कौल आहे. पण ते खोट्या भ्रामक जगात जगणार्‍यांना सांगायचे कोणी व दाखवायचे कोणी?    ( क्रमश:)
 भाग   ( ६८)    २८/१/१३

शुक्रवार, २५ जानेवारी, २०१३

आधुनिक महाभारतातले भरकटलेले अर्जुन


   आपण सत्याकडे पारदर्शक नजरेने बघू शकतो का? म्हणजे जसे समोर आहे ते बघू शकतो का? बहुदा नाही बघत. आपण आपल्या मनात ज्या भूमिका. समजूती, पूर्वग्रह व धारणा असतात, त्याच चष्म्यातून समोरचे दिसणारे बघत असतो. मग सर्वांना दिसते तेच आपल्या डोळ्यांनाही दिसत असते. मग प्रत्येकजण बघतो त्याला समोर आहे ते वेगवेगळे का दिसत असते? कारण समोर आहे ते बघण्यापेक्षा आपल्याला हवे तेच बघायचा मोह आवरता येत नसतो. थोडक्यात आपला अर्जून होत असतो किंवा झालेला असतो.

   आपल्या तमाम शिष्यांना गुरू द्रोणाचार्यांनी समोरच्या झाडावर बसलेल्या पक्षाच्या डोळ्यावर नेम धरायला सांगितले आणि तसेच थांबवून प्रत्येकाला एकच प्रश्न विचारल्याची गोष्ट मोठ्या कौतुकाने सांगितली जाते. त्या प्रश्नाचे प्रत्येकाने दिलेले उत्तर वेगवेगळे असते. कोणाला समोर झाड दिसते, कोणाला पाने, फ़ुले, फ़ांद्या, पक्षी तर कोणाला पलिकडले डोंगर दिसत असतात. एकटा अर्जून म्हणतो, त्याला फ़क्त पक्षाचा डोळा दिसतो आहे. म्हणजे तो एकटाच असा असतो, की ज्याचे लक्ष्यावरच लक्ष असते. बाकीच्यांचे लक्ष भरकटलेले असते, असे त्या कथेचे तात्पर्य आहे. उपदेश म्हणून गोष्ट छान असते. जेव्हा नेम धरायचा असतो, तेव्हा हा उपदेश योग्यच आहे किंवा त्यातली शिकवण योग्यच आहे. पण उर्वरित वेळी आपण दिसणारे सगळे जग बघायचे असते व बघितलेच पाहिजे. त्याऐवजी आपण प्रत्येक गोष्टीत फ़क्त आपले लक्ष्यच बघत बसलो; तर जगण्याचा पुरता विचका होऊन जाईल ना? म्हणजे समजा, एका दिवशी द्रोणाचार्य मुलांना सहलीला घेऊन गेले असते आणि तिथे आल्हाददायक वातावरणात निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठीच जायचे असते ना? अशा वेळी तोच प्रश्न गुरूजींनी सर्वांना विचारला असता; तर त्यांनी तेच उत्तर अपेक्षित धरले असते का? तिथेही अर्जुनाने पक्षाचा डोळाच दिसतो, असे म्हटले असते व अन्य मुलांनी डोंगर, दर्‍या, नदी, पक्षांचा कलकलाट अशी उत्तरे दिली असती, तर गुरूजींनी कोणाची पाठ थोपटली असती?

   सहलीला आल्यावर आपण धनुर्धर नसतो, तर निसर्गाचे सौंदर्य लुटायला आलेले रसिक पर्यटक असतो. तिथे आपली नजर बदलली पाहिजे. आपले लक्ष्य बदलत असते. त्याचे भान नसले तर दिसेल त्या प्रत्येक पक्ष्यावर नेम धरून आपण अवघ्या निसर्गाची नासाडी करण्याचा धोका असतो. म्हणूनच डोळ्यांना सर्वकाही दिसत असते. ते बघण्याचा विवेक बाळगता आला पाहिजे. सर्ववेळी हवे तेवढेच बघायची सवय जडली; मग सगळे जग बघता येत नाही आणि आपली नजर संकुचित होऊन जाते. आपोआपच आपला दृष्टीकोनही संकुचित होऊन जातो. जगाला जे सहज दिसू शकते व उमगू शकते, तेच आपल्याला दिसत असूनही बघायची नजरच हरवून जाते. आजकाल स्वत:ला शहाणे, बुद्धीमान, जाणकार किंवा वैचारिक पातळीवर जगणारे समजणार्‍यांचा एक वर्ग आपल्या समाजात असाच तयार झाला आहे. त्यांचा अर्जुन होऊन गेला आहे. त्यांना समोरचे दिसत असलेले, आहे तसे बघताच येत नाही. आणि अशा अर्जुनांमध्ये एकवाक्यता नसते. कारण प्रत्येकाचा द्रोणाचार्य वेगवेगळा असतो. ज्याचा दोणाचार्य पक्षाच्या डोळ्याला लक्ष्य करायचा धडा देणारा असतो, असा अर्जुन प्रत्येक क्षणी व प्रत्येक जागी फ़क्त पक्षाचा डोळाच बघत असतो किंवा शोधत असतो. दुसर्‍याच्या द्रोणाचार्याने नेमबाजी करताना झाडाच्या आंब्यावर नेम धरायचा धडा दिलेला असेल, त्याला जागोजागी फ़क्त आंबाच दिसत असतो. कुणाचा गुरू पानावर, कुणाचा फ़ुलावर तर कुणाच्या गुरूने झाडाच्या बुंद्यावर नेम धरायचा धडा दिलेला असतो. मग हे अर्जुन उत्तम धनुर्धर होण्यासाठी समोर दिसणार्‍या झाडाचे भिन्नभिन्न वर्णन करत असतात. कारण त्यांना संपुर्ण झाड दिसत असले; तरी ते त्यात त्यांना हवे तेच लक्ष्य शोधत व बघत असतात.

   मग कसा विरोधाभास तयार होतो बघा. मुंबईत बॉम्बस्फ़ोट झाल्यावर शरद पवार लोकांची दिशाभूल करतात व अकरा स्फ़ोट होऊनही बारा स्फ़ोट झाल्याचे बेधडक खोटे बोलतात, तेव्हा ते जनहितासाठी म्हणून योग्यच असते. कारण मुस्लिमांविषयी हिंदूंच्या मनात शंका संशय येऊ नये; म्हणून घेतलेली काळजी असते. समाजाच्या विविध घटकात वैमनस्य होऊ नये, म्हणून पवारांनी सत्याची गळचेपी हेच जनहित असते. पण गुजरातच्या दंगलीबाबत सत्य समोर आले पाहिजेच. मग त्यातून मुस्लिमांच्या मनात हिंदूंविषयी संशय निर्माण होऊन’ विविध समाज घटकात वैमनस्य वाढले तरी बेहत्तर. ही झाली सेक्युलर बाजू. कारण अशा अर्जुनांचा द्रोणाचार्य सेक्युलर असतो आणि त्याने सेक्युलर नेमबाजीचे धडे गिरवून घेतलेले असतात. दुसरी बाजू स्वत:ला हिंदूत्ववादी म्हणवून घेणार्‍यांची आहे. त्यांना नेमके उलट दिसत असते. गुजरातच्या दंगली विसरल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असतो. पण दिल्लीच्या शिखविरोधी दंगली विसरण्याची गोष्ट त्यांना पटत नसते. फ़क्त पंधरा मिनीटे पोलिस बाजूला करा म्हणणारा ओवायसी ज्या पक्षाचा आहे, त्याचे असे प्रक्षोभक बोलणे व्यक्तीगत असते आणि त्यासाठी त्याच्या पक्षाला देशद्रोही ठरवायची गरज नसते; म्हणणारे सेक्युलर अर्जुन मालेगावचा विषय आला मग एकदम बदलून जातात. तेव्हा मात्र मालेगावच्या स्फ़ोटातले संशयित आरोपी कित्येक वर्षापुर्वी कधीतरी संघात होते व आज त्यांचा संघाशी संबंध उरलेला नाही; तरी त्यांच्या व्यक्तीगत कारवाया संघाचेच कारस्था्न असल्याचा दावा करतात. यातला भेदभाव सामान्य माणसाला लगेच लक्षात येऊ शकतो व दिसतो. पण जे शहाणपणाने आवेशात बोलत असतात, त्यांना मात्र तो बघता येत नाही. कारण त्यांना तो बघायचाच नसतो. त्यांचे लक्ष्य संघ वा हिंदूत्ववादी असतात. आणि आता सेक्युलर मंडळींच असा अर्जून होऊन गेला आहे. आणि तेच प्रामुख्याने बुद्धीवादी म्हणून मिरवत असल्याने, तशीच एकूण आजच्या बुद्धीवादाची दुर्दशा आहे. जितक्या द्रोणाचार्यांच्या आश्रमातून हे अर्जून आलेले आहेत तितकी त्यांची भिन्न भिन्न लक्ष्ये आहेत. आणि सामान्य माणसाला साध्या डोळ्यांनी जे स्पष्ट दिसते, तेच या लोकांना चष्मे लावूनही वेगवेगळे का दिसते, त्याचे हेच कारण आहे. कारण ते नेम धरलेले धनुष्यबाण खाली ठेवून एकही क्षण सामान्य माणसाचे जीवन जगायचे विसरून गेलेले आहेत. कायम त्यांच्या धनुष्याची प्रत्यंचा ताणून आपापल्या लक्ष्यावर नेम धरून सज्ज आहेत. आपल्याला सहज दिसणारे जग त्यांना दिसायचे कसे आणि दाखवणार कोण? परिणामी एकमेकांसमोर धनुष्यबाण ताणून उभे असलेले अर्जून अशी आधुनिक महाभारताची कहाणी होऊन बसली आहे.

   त्यामुळेच मग झाले असे, की जयपूर येथे कॉग्रेस पक्षाच्या चिंतन शिबीरात नवे केंद्रिय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी बेभान होऊन भाजपावर हल्ला चढवला. पण आपल्याच देशाला व सरकारला अडचणीत आणले असताना सेक्युलर अर्जुनांना त्यातली हानी व अपाय दिसत असून बघायची हिंमतही झालेली नाही. उलट शिंदे यांनी सत्यच कसे सांगितले व तेच कसे वासतव आहे; ते सिद्ध करण्याची अहमहमिका कॉग्रेस नेत्यांपेक्षा वाहिन्यांवरच्या सेक्युलर पत्रकार व विद्वानांमध्ये सुरू झाली. समोर झाड आहे किंवा नाही, डोळा दिसायला त्यावर तो पक्षी तरी आहे की नाही; याची कोणाला पर्वा होती आणि असते? क्षणाचा विलंब न लावता बहुतांश सेक्युलर पत्रकार, विद्वान आपले बाण सोडून मोकळे झाले. त्यातल्या त्यात सावध म्हणायचे तर छापील माध्यमातले पत्रकार होते, म्हणूनच त्यांनी तात्पुरता सेक्युलॅरिझम बाजुला ठेवून; समोरचे सत्य बघायचा तरी प्रयत्न केला. त्यामुळे छापील माध्यमांनी सत्य आपल्या वाचकासमोर आणायची हिंमत दाखवली. ही खरेच शुभ घटना आहे. कारण काही लोक हळूहळू सेक्युलर नशेतून बाहेर पडत असल्याचे ते लक्षण आहे. काही द्विवसांपुर्वी संघचालक मोहन भागवत जे बोललेच नाहीत ते शब्द ऐकून त्यांच्यावर भराभरा शरसधान करण्याचा असाच मुर्खपणा झालेला होता. तेव्हा त्यापासून मधू किश्वर व किरण बेदी, यांच्यासारख्या नामवंत सेक्युलरांनी स्वत:ला अलिप्त करून घेण्याची सावधानता बाळगली. आता तशी सावधानता बाळगत सेक्युलर नशेतून बाहेर येणार्‍यांची संख्या वाढताना दिसते आहे. महाराष्ट्र टाईम्स वा लोकसत्ता अशा वृत्तपत्रांनी शिंदे यांच्या सेक्युलर मुर्खपणाची पाठराखण न करता; त्यांची चांगलीच हजेरी घेत, त्यातला वेडगळपणा ठळकपणे दाखवण्याचे धाडस केले आहे. जसजसे दिवस जातील; तसतसे आणखी प्रामाणिक बुद्धीवादी या दिग्विजय धुंदीतून बाहेर पडतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही. कदाचित आता सामान्य माणसालाही आपला खुळा बुद्धीवाद फ़सवेनासा झाल्याची ती जाणिव असू शकते. शिंदे यांच्या जयपूरच्या विधानाने देशाचे किती नुकसान केले आहे, त्याचे वास्तव खरोखरच अंगावर काटा आणणारे आहे. पण या सेक्युलर अर्जुनांना दाखवायचे कोणी व कसे?  ( क्रमश:)
 भाग   ( ६७)    २६/१/१३
 (bhaupunya@gmail.com) (facebook.com/bhau.torsekar)

गुरुवार, २४ जानेवारी, २०१३

शाळाप्रवेशातली फ़सगत हे अंधश्रद्धेचेच बळी ना?


   कालचा लेख लिहित असताना वाहिनीवर एक बातमी ऐकायला मिळाली. औरंगाबाद येथे काही मुलांना आता परिक्षा तोंडावर आली असताना तिथल्या बोर्डाने अपात्र ठरवले आहे. आली का समस्या? आता त्यांनी काय करायचे? त्यांचा गुन्हा काय आहे? तर दहावीच्या परिक्षेत त्यांना चाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण मिळाले. तर अशा कमी गुणांच्या मुलांना विज्ञान-शास्त्र विभागात अकरावीसाठी अपात्र मानावे असा नियम आहे. पण असे नियम बोर्डाने, शिक्षण खात्याने बनवले, म्हणजे त्यांची जबाबदारी संपते का? त्याची अंमलबजावणी कोणी करायची? आम्ही नियम बनवले, पुस्तकात छापले व शिक्षण संस्थांकडे पाठवले; मग त्यांचा अंमल सुरू झाला असे कायद्याच्या राज्याचे गृहीत आहे. मग ते नियम मुलांना त्यांच्या पालकांना ठाऊक नसतील व त्यांनी त्याप्रकारे कुठल्या संस्थेत प्रवेश घेतला असेल, तर ती जबाबदारी बोर्डाची वा सरकारची नाही? जे नियम कायदे तुम्ही बनवता, त्याची अंमलबजावणी तुम्ही नाही तर कोणी करायची? ते नियम धाब्यावर बसवून कोणी कुठेही कॉलेज वा शाळा काढत असेल व चालवत असेल; तर सरकार नावाची चीज हवीच कशाला? इतके कर्मचारी अधिकारी जाडजुड पगार देऊन सरकार म्हणजे जनतेने पोसायचे कशाला? मुठभर लोकांनी बसा, नियम बनवा आणि पुस्तकात छापून मोकळे व्हा. ज्याला हवा तो नियमांचे पालन करील, ज्याला मान्य नाही तो हवी तशी मनमानी करील. नाही तरी तेच चालू आहे. कित्येक हजार मुलांना याप्रकारे शाळा व कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात आले, त्यांच्याकडून फ़ी वसूल करण्यात आली. आणि आता बोर्डाच्या परिक्षेच्या वेळी त्या मुलांची पात्रता तपासली जाणार असेल; तर वर्षभर बोर्ड व त्याचे कार्यालय हवेच कशाला? पण हे होतच असते. गुन्हा केला बेकायदा शाळा काढणारे व फ़ी वसुल करणार्‍यांनी. पण शिक्षा कोणाला होते आहे? त्या बिचार्‍या मुलांना व त्यांच्या पालकांना. याला कायद्याचे राज्य म्हणतात. त्यापेक्षा बुवाबाजीची फ़सवणूक काय वेगळी आहे? ताईत देऊन तो योग्यवेळी काम करत नसेल व योग्य परिणाम देत नसेल; ही बापू मंडळींची बुवाबाजी असेल, तर मग सरकार व त्याचे कायद्याचे राज्य तरी काय वेगळे करते आहे?

   हजारो पालक व मुलांना कुठे कुठे अशी कॉलेजेस संस्था निघाल्या आहेत, त्याचा पत्ता असतो. ते तिथपर्यंत जातात व भरपूर फ़ी व देणग्या देऊन प्रवेश घेतात. अगदी आपल्या कामधंद्यातून सवड काढून अशा संस्थांची माहिती मिळवतात. पण त्याच कामासाठी बोर्डात व शिक्षण खात्यात बसून पगार घेणार्‍यांना अशा संस्था व शाळा आहेत याचा थांगपत्ता लागत नाही? ज्यांचे कामच मान्यता देणे वा रद्द करणे आहे; त्यांनाच अशा संस्था कशा सापडत नाहीत? त्यांच्याच नजरेत अशा संस्था का भरत नाहीत? लोकांनी व मुलांनी तिथे प्रवेश घेण्यापुर्वीच त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारून त्यांना टाळे का ठोकले जात नाही? तसे होताना दिसेल, तेव्हाच कायद्याचे राज्य आहे, याची खात्री लोकांना पटेल ना? बुवाकडला खोटा ताईत व मान्यता नसलेली शाळा यात कितीसा फ़रक आहे? दोन्हीकडून होणारी फ़सवणूक सारखीच नाही का? कायदेशीर शाळेतच प्रवेश घेतला पाहिजे, तरच बोर्डाच्या परिक्षेला पात्र असाल, नियमानुसार पात्रता असायलाच हवी, पण ते नियम पाळले जावेत म्हणून जी यंत्रणा आहे, तिची जबाबदारी कोणी पार पाडायची? त्यातले कर्मचारी व अधिकारी पगार घेतात, म्हणजे ती यंत्रणा आहे, ही समजूत म्हणजे भ्रम किंवा अंशश्रद्धाच नाही का? हा प्रकार केवळ शाळा प्रवेशापुरता नाही. कोणी कुठल्या योजनेत घर घेतलेले असेल, कोणी मालमत्ता खरेदी केलेली असेल. कोणी पैसे दुप्पट करतो म्हणून फ़सव्या योजनांचे आमिष दाखवलेले असेल. त्याविषयी कायद्याची यंत्रणा काहीच काम करणार नाही का? मग ती एकूणच यंत्रणा व त्यासाठीचे कायदे; हे बुवांच्या मंत्रांसारखे निकामी शब्द नाहीत काय? आता औरंगाबादच्या त्या लाखो मुलांची फ़सगत कोणामुळे झाली आहे? बेकायदा अनधिकृत शाळाचालकाला मोकाट मनमानी करू देणार्‍या कायद्याने ती फ़सवणूक केलेली नाही का? बिचार्‍या त्या मुलांनी कुणा बापू बुवाच्या सल्ल्याने वा इच्छेनुसार तिथे प्रवेश घेतलेला नव्हता. तर सरकारने चालू दिलेल्या बेकायदा शाळेत प्रवेश घेतला होता. मग त्यासाठी तो कायदा व ते सरकार गुन्हेगार नाही काय? अशा मुलांची दरवर्षी फ़सण्याची संख्या हजारोमध्ये आहे. पण या अंधश्रद्धेबद्दल दाभोळकर कधी एक शब्द तरी बोलले आहेत काय?

   असा प्रश्न विचारला मग नरेंद्र बापूंचे सच्चे अनुयायी संतापून म्हणतात, ते काम दुसर्‍यांनी करावे. ही सुद्धा शुद्ध फ़सवणूक व दिशाभूल आहे. कारण हे काम प्रमुख आहे, जर कायदा पाळावा म्हणणारे कायद्याच्या वैज्ञानिकतेची तपासणी न करता त्याचा आग्रह धरत आहेत; तर त्यांना विज्ञाननिष्ठ कसे म्हणता येईल? ‘लोकप्रभे’च्या लेखात नरेंद्र बापूंनी अन्य तमाम बापू बुवांच्या अवैज्ञानिकतेवर बोट ठेवले आहे. मग त्यांना आपली विज्ञाननिष्ठा दाखवायला नको का? तुम्ही इतरांची मते विज्ञानाच्या सत्यासत्यतेच्या कसोटीवर तपासणार असाल; तर तुम्हालाही विज्ञानाच्या कसोटीमधून सुटता येणार नाही. कायद्याचे म्हणजेच विज्ञानाधिष्ठीत राज्य हवे असा नरेंद्र बापूंचा कायम आग्रह असतो. त्यासाठीच ते अन्य बुवांच्या कृत्याला कायद्याच्या कसोटीत बसवू बघतात. पण मुळात कायदा वैज्ञानिक सत्य आहे काय? वैज्ञानिक कसोटीवर परिणामकारक आहे; हे त्यांनीच दाखवायला नको काय? पण त्याबाबतीत नरेंद्र बापू व त्यांचे अंधश्रद्धा निर्मूलन संप्रदायातले लोक मौन धारण करतात. कायद्याची अपुर्णता, निरुपयोगिता, अपायकारकता याबद्दल त्यांनी कधी बोलून लोकांचे प्रबोधन केले आहे का? नसेल तर मग विज्ञाननिष्ठा ही दाभोळच्या नरेंद्र बापूंची भॊदूगिरीच नाही काय? अन्य कोणी गुन्हेगाराला भाऊ म्हटले तर त्याने बलात्कार केला नसता, म्हटले मग यांना हास्यास्पद वाटते. कोणी मंत्राचा जप करा म्हणाले तर अकलेचे तारे तोडले म्हणून हेच नरेंद्र बापू शेरेबाजी करतात. मग आजच्या संकटातून सुटण्याचा सुयोग्य मार्ग त्यांनी दाखवावा, सुचवावा. तो त्यांनी सुचवलेला नाही. पण पोलिसांकडे व कायद्याकडे धाव घ्यावी, कायद्याचाच मंत्रजप करावा, अशी त्यांची गर्भित सुचना आहे. मग लोक तेच करतात व कायदा निकामी ठरला आहे. मग त्याची जबाबदारी प्रत्येक कायदापूजकाच्या डोक्यावर येत नाही का? सतत कायद्याचे राज्य किंवा कायदा हाती घेऊ नये; असे सल्ले व उपदेश वृत्तपत्रासह वाहिन्यांवरून करणारेही तेवढेच भोंदू नाहीत का? कारण कायदा निकामी ठरला आहे. ती एक अंधश्रद्धा बनली आहे.

   त्या मुलीवर बलात्कार झाला व तिला जखमी अवस्थेत तिथे फ़ेकून देण्यात आल्यावर; घटनस्थळी सर्वप्रथम पोहोचलेल्या पोलिसांच्या गाडीने लगेच तिला उपचारार्थ जवळच्या डॉक्टरकडे नेण्याचे प्रसंगावधान दाखवले नाही. दुरच्या सरकारी इस्पितळात नेण्यात आले. तेसुद्धा दुसर्‍या पोलिस गाडीतून हलवण्यात आले. याला काय म्हणायचे? पोलिस एका महिलेचा जीव धोक्यात असताना नियम व प्रथा संभाळत बसले, याला मंत्रजप नाही तर काय म्हणायचे? तेही बिचारे कायद्याच्या सव्यापसव्यात सापडलेले अंधश्रद्धच ना? आपण माणुसकी म्हणून झटपट त्या मुलीला उचलून नेऊ आणि नंतर काही बरेवाईट झाले, तर खापर आपल्याच माथी फ़ोडले जाईल; या भयापोटीच त्यांनी नियमांच्या शब्दांचा आधार घेतला व आपल्या विवेकबुद्धीला गुंडाळून ठेवले ना? मग हे विज्ञाननिष्ठ नरेंद्र बापू त्याला अंमलबजावणीतला दोष म्हणणार. पण असे नित्यनेमाने घडत असते. आणि अंमलात वा वापरतला दोष अशी पळवाट कुठला बुवा बापू देखिल काढू शकतो. मग तुमच्यात व बुवाबाजी करणार्‍यात काय फ़रक उरला? तुम्ही दाढ्य़ा वाढवत नाही किंवा अंगावर भगवी वस्त्रे परिधान करत नाही; म्हणून तुम्हाला विज्ञाननिष्ठ म्हणायचे काय? हेमंत देसाई व नरेंद्र बापू यांच्या लेखाप्रमाणेच त्या दरम्यान बुवाबापूंवर तोडसुख घेणार्‍या कोणीतरी कायद्याची अंधश्रद्धा या समस्येला हात घातला काय? मग हे सगळेच भामटे बुवाबाजी करणारे नाहीत काय? देशातले बहुतांश गुन्हे कायद्याच्या निकामीपणामुळे होत असताना त्यावर अंधश्रद्धा म्हणून बोट न ठेवता झालेल्या चर्चा आणि त्याच वेळी बुवाबाजीवर डागलेल्या तोफ़ा; हा निव्वळ दुटप्पीपणा होता. खरे तर खर्‍या समस्येवरून लोकांचे लक्ष उडवण्याचा तो लबाड प्रयत्न होता असे मला वाटते. कारण यातल्या कोणीही कायद्याच्या पावित्र्य व किमयेचे कौतुक सांगणार्‍या कुणाही बापू-बुवाला हातही लावला नाही. उलट त्याच कालखंडात तमाम माध्यमे कायदेशीर बुवाबाजीची भजने गात अंधश्रद्धा वाढवण्यात सहभागी झाली होती. संतप्त होऊन रस्त्यावर आलेल्या लोकांवर झालेला लाठीमार व अश्रूधूर त्याच बदमाशीचा पुरावा होता.  ( क्रमश:)
 भाग   ( ६६)    २५/१/१३

बुधवार, २३ जानेवारी, २०१३

पोलिस अधिकार्‍यालाच बाधलेली अजब अंधश्रद्धा


   अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा त्यांच्या चळवळीत काम करणार्‍यांचा आक्षेप मलाही मान्य आहे, की धर्माच्या किंवा चमत्काराच्या नावाने लोकांची फ़सवणूक करणे हा गुन्हा आहे. पण तो गुन्हा बेकायदेशीर आहे तर त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई का होत नाही? याचा अर्थ मुळात त्याच्या बंदोबस्तासाठी असलेला व केलेला कायदा निकामी, निरूपयोगी झाला आहे. ज्यांच्या हाती ही कायद्याची अमोघ शक्ती व अधिकार आहेत, तेही त्याचा वापर न करता त्याच फ़सवणूकीतले भागिदार व आश्रयदाते होऊन बसले आहेत ना? म्हणजे कायदा असून नसल्यासारखाच झाला ना? मग कायद्याचे राज्यही आहे आणि बेकायदा कृत्येही राजरोस चालू आहेत. पण कठोर कायदे बनवू व राबवू म्हणत सहासात दशके निवडणूका लढवणारे व सत्ता उपभोगणारेही सगळे बापूच नाहीत का? त्यांचा राजकारण वा निवडणुका म्हणून जो काही उद्योग चालू आहे, तीसुद्धा एकप्रकारची बुवाबाजीच नाही काय? आणि अशा बुवाबाजीला अनेक नव्हेतर लाखो लोक रोजच्या रोज बळी पडत आहेत. अगदी कुठेही होणारे कुठलेही गुन्हे व त्याबद्दल न होणारी शिक्षा; हा कायदा नावाच्याच अंधश्रद्धेचा चमत्कार नाही काय? लोकांना कायद्याच्या या अंधश्रद्धेतून बाहेर पडायचे असेल तर त्यांनी काय केले पाहिजे? याबद्दल आजच्या घडीला लोकांना उपाय व मार्गदर्शन हवे आहे. पण हेमंतबापूपासून दाभोळच्या नरेंद्रबापूपर्यंत तमाम सेक्युलर पोपट त्यावर अवाक्षर बोलत नाहीत. मग तेही कायदा नावाच्या अंधश्रद्धेचेच मठ स्थापन करून लोकांची फ़सवणूक करत नाहीत का? आणि बापू बुवांच्या फ़सवणूकीपेक्षा ही सेक्युलर विचारवंत बा्पूंनी चालविले्ली फ़सवणूक अधिक घातक आहे. कारण ही अंधश्रद्धा कुणा नागरिकाला नाकारण्याचे स्वातंत्र्य नाही. तिच्यावर विसंबून रहाण्याची सक्ती आहे. तिचे दुष्परिणाम भोगण्याची सक्ती आहे. मग बापूबुवांपेक्षा अशी अंधश्रद्धा फ़ैलावणारे अधिक घातक लोक नाहीत का?

   ज्यांच्यावर रोजच बलात्कार होत आहे, ज्यांची विविधप्रकारे नित्यनेमाने फ़सवणूक होत आहे, ज्यांच्यावर हल्ले व दरोडे घातले जात आहेत. त्यांना अंधश्रद्धेचे बळी का म्हणायचे? तर त्यांना जसा बुवाबापूचा मंत्रतंत्र नाकारण्याचा व स्वत:चे योग्य वाटतील ते उपाय योजण्याचा अधिकार असतो, तसे कायद्याची अंधश्रद्धा नाकारण्याचे स्वातंत्र्य नाही. म्हणजे असे, की एखाद्या वस्तीमध्ये कुणी गुंड आहे, मवाली आहे, तो कुठल्या मुलीचे छेड काढत असेल किंवा चार टपोरी जमा करून दादागिरीच्या बळावर खंडण्या उकळत असेल, तर त्यांनी काय करायचे? कायद्याच्या राज्यात त्यांनी तक्रार करायची असते. मग लगेच कायदा कार्यरत होतो का? त्याच्या गुंडगिरी वा खंडणीखोरीचा बंदोबस्त होतो का? अजिबात नाही. स्थानिक पोलिसांना ती तक्रार दखलपात्र वाटायला हवी, त्यासाठी योग्य असे पुरावे सापडायला हवेत. ते पुरावे, न्यायालयात सिद्ध होण्यासारखे हवेत. आणि त्याच्याही पुढे न्यायालयाला असा खटला ऐकून सुनावणी करायला सवड असायला हवी. तोपर्यंत कित्येक वर्षे निघून जातात आणि तो गुंड तोपर्यंत हजारो गुन्हे करून म्हातारा होऊन निवृत्तही होऊन जातो. त्याच्या जागी नवाच गुंड उदयास आलेला असतो. ही सामान्य माणसाची व्यथा नाही. अगदी आयपीएस म्हणून उच्चपदी कर्तृत्व गाजवलेल्या यादवराव पवार नामक अधिकार्‍याचे हे दुखणे आहे. मुंबईत पोलिस उपायुक्त असताना त्यांचा पाठलाग करून वरदाभाईच्या गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केलेला होता. त्या खटल्याची सुनावणी होईपर्यंत पवार निवृत्त झाले आणि कोर्टात आरोपींना ओळखणेही त्यांना शक्य राहिले नाही. कारण आरोपीही म्हातारे होऊन गेले होते. मध्यंतरी दोन शतकांचा काळ उलटून गेला होता. त्यामुळे आरोपी निर्दोष सुटले. ह्याला कायदा नावाची अंधश्रद्धा नाही तर काय म्हणायचे? पवार या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याचा हा अनुभव असेल, तर एकूणच देशात कायद्याच्या राज्याचे किती धिंडवडे निघालेले असतील ते वेगळे सांगायचे गरज नाही. पण मुद्दा कायम आहे. मग पुस्तकातला कायदा आणि ताईतामध्ये मंत्र लिहून ठेवलेले कागद; यात नेमका फ़रक काय? खुप मोठा फ़रक आहे.

   तुम्हाआम्हाला बुवाबापूंच्या मंत्राचा उपाय नाकारण्याचे स्वातंत्र्य आहे. पण कायद्याचा अधिकार नाकारण्याचा व आपला आपला वेगळा उपाय पर्याय शोधण्याचे स्वातंत्र्य नाही. नाही म्हणजे ते स्वातंत्र्य कायदा नावाची अंधश्रद्धा नाकारत असते. म्हणजे असे की बुवाबापूंपेक्षा पोलिसांकडे, कायद्याकडे जायचे स्वातंत्र्य त्यांनी मला नाकारलेले नाही. पण कायद्याने मात्र मला अन्य पर्याय नाकारलेला आहे. तो असा, की कोणी गुंड गुन्हेगार मला सतावत असेल, कुणा महिला व मुलीला त्रास देत असेल. तर त्याचा बंदोबस्त तिने वा तिच्या मित्र कुटुंबियांनी स्वत:च करायचे ठरवले तर? म्हणजे त्या गुंडाला चोपून काढणे, बदडणे इत्यादी उपाय असू शकतात. कारण तीच त्याची भाषा असते आणि त्याला तीच भाषा समजत असते. तो पर्याय आम्हा नागरिकांना कायद्याची अंधश्रद्धा देते काय? अजिबात नाही. आम्ही स्वत:चे संरक्षण करणे वा आलेला हल्ला परतून लावणे, सतावणार्‍याला चोख उत्तर देणे; असे उपाय आपण योजायला गेलो, तर कायदा हाती घेतल्याचा गुन्हा केला म्हणून पोलिस आपल्यावरच बडगा उचलणार. नागपूरमध्ये  अक्कू यादव नावाच्या गुंडावर एकोणिस बलात्काराचे गुन्हे नोंदलेले होते. पण त्याला एकदाही शिक्षा झालेली नव्हती. कायद्याच्या अंधश्रद्धेत गुरफ़टलेले लोक पुन्हा पुन्हा अक्कू यादवचे बळी होत राहिले. पोलिस त्याला अटक करायचे, तो जामीनावर सुटायचा आणि नवे गुन्हे करायचा. अखेर एक दिवस त्या वस्तीतले लोक कायद्याच्या अंधश्रद्धेतून मुक्त झाले आणि त्यांनी अक्कूचा कायमचा बंदोबस्त करून टाकला. त्यांनी न्यायालयाच्या आवारातचे अक्कूची खांडोळी केली आणि विषय संपला. परिणाम काय झाला असेल? पोलिसांनी त्यांच्यावरच हल्लेखोर खुनी म्हणून तक्रारी दाखल केल्या आणि त्यापैकी काही लोकांना अटक केली. म्हणजे कायद्याची अंधश्रद्धा पाळण्याची सक्तीच नाही का? जो कायदा परिणामकारक नाही, किंव बुवाबापूंच्या ताईताइतकाच फ़सवा आहे, त्यावर कितीही फ़सगत झाली, तरी अढळ श्रद्धा असली पाहिजे, ठेवली पाहिजे ही सक्ती आहे. आणि आपल्या देशातले करोडो लोक त्याचे दुष्परिणाम सातत्याने भोगत आहेत. बुवाबापूंच्या अंधश्रद्धेपेक्षा असे बळी शेकडो पटीने अधिक आहेत. पण दाभोळचे नरेंद्र बापू किंवा तत्सम सेक्युलर कधी त्या अंधश्रद्धेबद्दल अवाक्षर बोलले आहेत काय? उलट ते अशाच निकामी कायद्यामध्ये आणखी एका ताईताची (अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची) भर घालायचा हट्ट धरून बसले आहेत. त्याला अकलेचे तारे तोडणे नाही तर काय चंद्र चांदण्या तोडणे म्हणायचे?

   आज देशाला व सव्वाशे कोटी जनतेला भेडसावणार्‍या खर्‍या समस्या व प्रश्न धर्म किंवा अन्य कुठल्या बुवाबापूने निर्माण केलेले नाहीत; तर गांजलेल्या जीवनातून हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्या बापू बुवांच्या जाहिराती वा वाहिन्यांवर प्रदर्शित होणारे व्हिडीओ बघितले; तरी हे सहज लक्षात येऊ शकते. त्यांच्या समोर आलेल्या अंधश्रद्ध भक्ताने मांडलेल्या समस्या काय असतात? कोणी कुठे घरासाठी बुकींग केले आणि बिल्डरने टांग मारली. कोणी व्यापारी आहे आणि त्याचे लाखो रुपये अडकून पडलेले आहे. कोणाच्या मालमत्तेचे किंवा असाध्य आजाराचे असेच प्रश्न घेऊन लोक देव बुवांना गार्‍हाणी घालताना दिसतात. हे प्रश्न वा समस्या कायद्याने सुटू शकणार्‍या आहेत. कायदा प्रभावी व क्रियाशील असेल, तर मुळात त्या भक्तांना बुवांच्या दरबारात जावेच लागणार नाही. पण इथे स्थितीच उलटी आहे. त्यांच्या जवळपास बहुतांश समस्याच कायद्याने वा कायद्याच्या अधिकारामुळे निर्माण झालेल्या आहेत. कायदा आज गुन्हेगारांसाठी कवचकुंडले झाल्यामुळे कोणीही कोणाची आर्थिक फ़सवणूक करू शकतो, छेडछाड करू शकतो. आणि त्यातला जो बळी वा पिडीत आहे, तो आपल्या बचावासाठी काहीही करू शकत नाही, ही समस्या आहे. शंभर टक्के नव्हेत तरी निदान सत्तर ऐंशी टक्के समस्या कायद्याने निर्माण केलेल्या दिसतील. आणि म्हणूनच मी देशातील सर्वात मोठी समस्या कायद्याचे राज्य आहे असे म्हणतो. कारण त्यातूनच शेकडो गुन्हे घडत असतात व त्यांना कायदा संरक्षण देतो, ही समस्या आहे. कारण कायदा स्वत: कार्यरत होत नाही आणि तुम्ही स्वत:च्या न्यायासाठी पुढे सरसावण्याचा अधिकार त्या्च कायद्याने तुमच्याकडून हिरावून घेतला आहे. सामान्य माणसाला कायद्याने अगतिक करून टाकले आहे. न्याय मागेल त्याच्या डोक्यात कायदा लाठी हाणायला सज्ज आहे. पण गुन्हे करणार्‍याला संरक्षण द्यायलाही कायदा तत्परतेने सज्ज आहे. आणि त्याच फ़सवणूकीला न्याय व कायद्यचे राज्य मानावे अशी सक्ती आहे. या सक्तीच्या अंधश्रद्धेविषयी दाभोळचे बापू अवाक्षर बोलत नाहीत. तर तेवढाच निकामी ठरण्याची खात्री असलेला आणखी एक कायदा व्हावा असा आग्रह धरून धावपळ करतात, तेव्हा भोंदू कुणाला म्हणायचे आसारामला की नरेंद्रबापूला?       ( क्रमश:)
 भाग   ( ६५)    २४/१/१३

मंगळवार, २२ जानेवारी, २०१३

विज्ञान आणि बुवाबाजीत काही फ़रक आहे का?


   मुद्दा सरळ आहे. तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे कधी जाता? तुम्हाला जेव्हा एखादा आजार वा बाधा होते तेव्हा जाता. तिथे गेल्यावर डॉक्टर तुम्हाला काय आजार आहे, कुठे दुखापत झाली आहे वगैरे विचारपूस करतात. मग त्यानुसार आजाराचे निदान करतात व त्याला अनुसरून उपचार सुरू करतात. समजा त्याच्या ऐवजी डॉक्टरने तुम्हाला भविष्यात कुठला आजार होण्याबद्दल सांगायला सुरूवात केली किंवा त्या संभाव्य आजाराच्या उपचारार्थ कुठले औषध घेऊ नये, याचाच सल्ला द्यायला सुरूवात केली तर तुम्ही काय कराल? तापट डोक्याचे असाल तर तुम्ही अशा डॉक्टरला शिव्या द्याल किंवा थप्पड मारून तिथून निघाल. शांत, विवेकी असाल तर दवाखान्याची पाटी लावून कोणी तरी वेडगळ बसलाय म्हणून काढता पाय घ्याल. अन्य काही करणे तुम्हाला शक्य असते काय? इथे तुम्ही त्रस्त आहात आणि कोणी डॉक्टर अन्य डॉक्टरवर दुगाण्य़ा झाडत असेल वा त्याच्या औषधांची निंदानालस्ती करीत असेल, तर त्याला मुर्ख ठरवण्याखेरीज तुम्हाला पर्यायच उरत नाही. कारण असले सल्ले देण्याची ती वेळ नसते. दहा लोक दहा पद्धतीचे उपाय; आपण आजारी वा संकटात असलो मग सुचवत असतात. मात्र आपण डॉक्टर वा अन्य जाणकाराकडे एवढ्यासाठी जातो, की आपल्याला त्या आजारातून सुटका हवी असते. भाषण नको असते. शिवाय कल्पनेतल्या किंवा भविष्यात संभवणार्‍या आजारावर बोलायची तेव्हा सवड नसते. दिल्लीत जेव्हा सामुहिक बलात्कार एका धावत्या बसमध्ये झाला, तेव्हा लोकांचा आपल्या सुरक्षित असण्यावरचा विश्वासच उडाला होता. त्यामुळे लोक धरदार सोडून रस्त्यावर उतरले होते आणि सुरक्षेच्या हमीसठी ठिय्या देऊन बसले होते. तो बलात्कार का होऊ शकला होता?

   देशात कायद्याचे राज्य आहे. इथे कायदे बनवणारे सरकार व कायदेमंडळ आहे. त्याचा अंमल करणारे प्रशासन आहे. त्याचे ताबेदार पोलिस आहेत. त्यामुळे कोणी मनमानी करू शकत नाही; असे लोकांना खात्रीपुर्वक सांगण्यात आलेले आहे. नुसते सरकारच नव्हेतर माध्यमे, जाणकार, राजकीय पक्ष, विचारवंत आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर सुद्धा तेच अहोरात्र सांगत असतात. नागरिकांच्या सुरक्षेसाठी देशात कायदा आहे व कायदा कोणी हाती घेऊ नये, मनमानी करू नये. मग आपल्यासारखी सामान्य माणसे, अशा मान्यवरांच्या शब्दावर विसंबून घराबाहेर पडतात. निर्धास्तपणे आपापले व्यवहार करतात. फ़िरतात, खरेदीविक्री करतात, शाळा कॉलेज वा इस्पितळ, चित्रपटगृहात जातात. तेव्हा रस्त्यावर आपल्याला कसला धोका नाही अशी त्यांना खात्री असते. देवाचे नाव घेऊन वा ‘(आसा)रामभरोसे’ कोणी घराबाहेर पडत नाही. किंवा कुठल्या बुवा फ़कीराचा गंडादोरा ताईत बांधलाय म्हणून आपण सुरक्षितपणे कुठेही जाऊ शकतो, असा लोकांचा भ्रम नसतो. लोक प्रस्थापित कायद्यावर विसंबूनच घराबाहेर पडतात. तेव्हा दिल्लीतला सामुहिक वा अन्य कुठे रस्त्यावरून अपहरण करून होणारा बलात्कार झाला; म्हणजेच समस्या किंवा आजार कायद्याचे उपाय योजूनही झालेला आहे. आणि म्हणूनच दिल्लीचे लोक असे चवताळून रस्त्यावर आलेले होते. त्यांचा कायदा, त्याची अंमलबजावणी करणारे प्रशासन व पोलिसांवर असलेला विश्वासच उडाला होता. कायद्याचे राज्य ही शुद्ध फ़सवणूक आहे, अशा अनुभवाने विचलित झालेले लोकच रस्त्यावर उतरले होते.

   मग कायद्याच्या निरूपायाला काय करायचे अशी चिंता त्यांना भेडसावत होती. अत्यंत वैज्ञानिक व विवेकबुद्धीने वागल्यानंतर झालेल्या अपायाने लोक संतप्त झाले होते. असेच नेमके पुण्यात तीन वर्षापुर्वी घडले होते. रिदा शेख नावाच्या मुलीला तिच्या मातापित्यांनी पुण्यातल्या सर्वात खर्चीक व उत्तम वैद्यकीय उपचार देणार्‍या इस्पितळात दाखल केले होते. तिला कुठल्या फ़कीर बाबाकडे अंगाराधुपारा करायला नेलेले नव्हते. उत्तमातल्या उत्तम जाणकार डॉक्टरांच्या हाती तिला सोपवले होते. आणि तिथले डॉक्टरही तिच्यावर स्तोत्रमंत्र वा अंगाराधुपारा फ़िरवत नव्हते. इंजेक्शने, औषधांचे डोस, कृत्रीम श्वसन अशा तमाम सोयींचा वापर करून तिला बरे करण्याचा प्रयास डॉक्टर्सही करीत होते. पण जितके खर्चीक उपचार चालू होते व पुढली पुढली औषधे रिदाला दिली जात होती, त्यातून तिची प्रकृती सुधारण्यापेक्षा अधिकच बिघडत होती. बिचार्‍या रिदाच्या कुटुंबियांना त्यातले विज्ञान काही कळत नव्हते. आधुनिक वैद्यकशास्त्रही कळत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचे जीवन त्या डॉक्टर्सच्या हाती निर्धास्तपणे सोपवले होते. पण तरीही रिदाचा बळी गेलाच. अर्थात त्याला विज्ञान किंवा तिच्या आईवडीलांचा विज्ञानावरचा विश्वास जबाबदार नव्हता. तर डॉक्टर्सच्या अविवेकी आगावुपणाचा तो दुष्परिणाम होता. तिथे उपचार करणार्‍यांना विज्ञान माहिती होते, पण ते रोगशास्त्रातले सर्वज्ञानी नव्हते. त्यामुळेच त्यांचे जे अपुरे ज्ञान होते, त्यानुसार ते डॉक्टर्स तिच्यावर उपचार करत होते. पण आपले उपचार कुठे चुकतात, त्याचा आढावा घ्यायचा विवेक त्यांना उरला नव्हता. आपल्याला सर्वकाही कळले आहे, अशा विज्ञानाच्या अर्धवट अंधश्रद्धेने रिदाचा बळी घेतला होता. कारण तिला स्वाईनफ़्लू झाला होता आणि डॉक्टर्स तिच्यावर न्य़ुमोनियाचा उपचार करत होते. मग इथे समस्या काय झाली होती? एखाद्या बापू, बुवा, भगत, मांत्रिक जसा स्वत:च्या दिव्यशक्ती वा मंत्रशक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेवतो किंवा त्याचे भक्त ठेवतात; तसाच इथेही प्रकार होता. आंधळा विश्वास रिदाचा बळी घेऊन गेला. कारण तिला कुठला आजार झाला आहे, त्याची पर्वा न करता आपल्या अनुभवाच्या जुन्या ज्ञानावर विसंबून डॉक्टर्स काम करीत राहिले. पण त्यात रिदाचा, तिच्या कुटुंबियांचा काय दोष होता? हानी त्यांची झाली ना?

   नेमकी तशीच दिल्लीच्या किंवा अन्य कुठल्या बलात्काराची कहाणी असते. त्यात बळी पडणारी मुलगी देशात, राज्यात व आपल्या गाव, शहरात कायद्याची हुकूमत आहे, यावर विसंबून जीवन कंठत असते, त्याच विश्वासावर ती घराबाहेर पडत असते आणि तोच विश्वास तिचा बळी घेत असतो. कारण असा प्रसंग वा संकट ओढवते; तेव्हा तो कायदा, त्याचा अंमलदार कुठेच दिसत नाही. त्या कायद्याचा परिणाम वा प्रभाव कुठे जाणवत नाही. मग ज्याला कायद्याचे राज्य म्हणतात, ती एक अंधश्रद्धाच नाही काय? बापू, बुवांच्या ताईतामध्ये कुठले अक्षर लिहून ठेवलेले मंतरलेला कागद, त्यांच्या स्तोत्र मंत्राचे शब्द त्याच कागदावर रहातात. पण त्या मुली महिलेला बलात्कारापासून वाचवू शकत नाहीत, हे सत्यच आहे. पण तेवढेच कायद्याच्या पुस्तकातले निर्जीव शब्द व अक्षरेही निरूपयोगीच नाहीत काय? आणि लोक ज्याच्यावर विश्वास ठेवतात व फ़सतात, त्यालाच अंधश्रद्धा म्हणतात ना? मग आपल्या देशात नित्यनेमाने होणारे बलात्कार, अपहरण, खुन दरोडे व त्यांची अफ़ाट संख्या; कशाचे लक्षण आहे? कायद्याच्या राज्याची की कायदा नावाच्या अंधश्रद्धेची? दिल्लीतल्या बलात्कारानंतर अन्य बापू, बुवांनी जे उपाय सुचवले आहेत, त्यात काडीचे तथ्य नाही हे सांगायची गरज नाही. कारण ते उपाय कुठले लोक करतही नाहीत. ते लोक बापूंची भजने ऐकतात. पण रस्त्यावर रात्री अपरात्री कुणी गुंड अंगावर आला तर कुठला ताईत वा मंत्र आपल्याला वाचवील असे मानत नाहीत. म्हणून तर लोक कायद्याकडे धाव घेतात. कुठे छेड काढली गेली, विनयभंग झाला, तर कोणी बाब बुवाकडे धाव घेत नाही, तर पोलिस ठाण्यात धावतात. तिथे त्यांची कोणी दाखल घेतो का? मग त्या पोलिस ठाण्यात व ताईतामध्ये किंवा कायदा वा मंत्रामध्ये नेमका किती फ़रक राहिला?

   बाबा, बुवा वा बापू यांच्यावर श्रद्धा ठेवणे किंवा त्यांच्या भक्तीला लागणे अयोग्य असेल. पण म्हणून कायद्याची भक्ती खरी असल्याचा पुरावा काय? आणि आज तरी समस्या देशाला व जनतेला भेडसावणारी समस्या आहे ती कायदा व सरकार नावाच्या अंधश्रद्धेने फ़सगत होण्याची. त्यातून उपाय होऊ शकला असता, तर लोकांना दैववादी व्हायची वेळ आली नसती. कारण आजघडीला तरी लोकांसाठी नित्यजीवन रामभरोसे होऊन गेले आहे. जगण्याचे प्रत्येक क्षेत्र असे आहे, की कुठेच कशावर विश्वास ठेवून निर्धास्तपणे जगता येत नाही. म्हणूनच लोक इतके दिवस रस्त्यावर उतरून तोच कायदा बदलण्याचा आग्रह धरून बसले होते. ज्या कायद्याने जीवन धोक्यात आणले आहे व फ़सवणूक चालविली आहे, त्याच अंधश्रद्धा बनलेल्या कायद्याच्या विरोधात लोक रस्त्यावर आले होते. मग खर्‍या अंधश्रद्धा निर्मूलनवाल्याने काय करायला हवे होते? त्या आंदोलनात सहभागी व्हायचे, की भलत्याचे बुबा बापूंच्या बडबडीवर वैज्ञानिक मंत्रोपचरांचे सोपस्कार करीत बसायचे? अकलेचे तारे इतरांनी खुप तोडले. पण मग इतका मोठा लेख लिहून दाभोळचे नरेंद्र बापू त्यापेक्षा काय वेगळे करत होते? इतरांच्या हातून सुटलेले अकलेचे तारे तोडायचाच उद्योग त्यांनी सुद्धा केला नाही काय? भोंदू भगताने फ़सलेल्या ताईतावर चिडलेल्या भक्ताला नवा ताईत द्यावा, त्यापेक्षा दाभोळकरांचे प्रवचन वेगळे आहे काय?     ( क्रमश:)
 भाग   ( ६४)    २३/१/१३

सोमवार, २१ जानेवारी, २०१३

दाभोळच्या नरेंद्रबापूंची दिव्य चमत्कार शक्ती


   दिल्लीतील बलात्कार प्रकरणानंतर प्रतिक्रिया देताना अनेकांनी अकलेचे तारे तोडले. आसारामबापू आणि अनिरुद्धबापू यांनी तर कहरच केला. बलात्कारित तरुणीने सरस्वती मंत्राचा जप केला असता तर बलात्कार झालाच नसता, मी दिलेल्या एका विशिष्ट मंत्रामुळे बलात्कारी नपुंसक होतील, अशी या बुवाबापूंची विधानं म्हणजे निव्वळ भोंदूगिरीच नाही तर समाजाची दिशाभूल आहे. दिल्लीतील बलात्कार पीडित तरुणीच्या मृत्यूने सारा देश व्यथित झाला. संताप उसळला. पुन्हा असे घडू नये यासाठी अनेक उपाय सर्व समाजघटकांतून व स्तरांतून पुढे आले. मग कथित आध्यात्मिक गुरू तरी मागे कसे राहणार? आसारामबापू व अनिरुद्धबापू या दोघांनी सुचवलेले उपाय सर्वत्र गाजले. आसारामबापूंच्या मते घरी सरस्वती स्तोत्र म्हणून जर ती तरुणी बाहेर पडली असती, तर तिच्यावर बलात्कार होऊच शकला नसता. अत्याचार करणार्‍यांपैकी काही जणांना तुम्ही माझे भाऊ आहात, मला वाचवा, अशी मनधरणी तिने करावयास हवी होती. अनिरुद्धबापूंचे म्हणणे असे, की, जर स्त्रीने ‘अनिरुद्ध चालीसा’ रोज १०८ वेळा असे अकरा दिवस म्हटले तर बलात्काराचा प्रयत्न करणारी व्यक्ती आपोआप नपुंसक होईल व तसे सर्वाना कळेल. मुळात ‘अनिरुद्ध गुरुक्षेत्र’ मंत्राचा जप केला तर बलात्कार होऊच शकणार नाही. शिवाय त्यांच्या चंडिका गटाच्या व अहिल्या संघाच्या महिलांना ते असे टेक्निक शिकवणार आहेत की, बलात्कार करणार्‍याला त्या नपुंसक करतील. आसारामबापूंनी याही पुढे जाऊन एका हाताने टाळी वाजत नाही, असेही तारे तोडले. याबाबत टीका करणार्‍या माध्यमांना त्यांनी भुंकणा्र्‍या कुत्र्याची उपमा दिली.  ही बाबा मंडळी स्वत:मध्ये विलक्षण गुंतलेली असतात. त्यांची सर्व आखणी व्यक्तिमाहात्म्य वाढवणार्‍या तंत्राची असते. 

   हा सुरूवातीचा जो परिच्छेद आहे, तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष व जनक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या साप्ताहिक लोकप्रभेच्या २५ जानेवारी २०१३ च्या अंकातल्या लेखाचाही आरंभ आहे. आज हा माझा लेख तुम्ही ‘पुण्यनगरी’मध्ये वाचत आहात त्या दिवशी तारिख आहे २२ जानेवारी २०१३. आहे की नाही चमत्कार? अजून जो अंक ‘लोकप्रभे’च्या तारखेनुसार प्रकाशीत व्हायला दोन दिवस बाकी आहेत, त्यातला दाभोळकरांचा लेख मी आधीच  वाचू शकतो, तुम्ही सुद्धा वाचू शकता. खरे तर त्याच्याही पुढल्या ‘लोकप्रभा’चा अंक आज उपलब्ध झालेला असेल. याला काय म्हणायचे सांगा? जो दिवसच अजून उजाडलेला नसतो, त्या दिवशी प्रकाशित होणारा अंक किंवा नियतकालिक काही दिवस अगोदर वाचणे; कुठल्या विज्ञानानुसार शक्य आहे? तुमच्या आयुष्यात उद्या किंवा चार तासांनी काय घडणार आहे; ते तुम्ही वा कोणी नक्की सांगू शकेल काय? पण दाभोळकर आणि त्यांचे सवंगडी हे भविष्य वर्तवू शकतात. नुसते वर्तवत नाहीत तर एक एक आठवडाभर आधी त्यांच्या मनातले व अंकातले वाचकांपर्यंत पोहोचू शकते. इतक्या पुढारलेल्या भविष्याची अनुभूती घडवणे केवळ आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानालाच शक्य आहे. जुनाट पंचांगाच्या आधारे पत्रिका बनवून, ग्रहदशा बघून भविष्याची भाकिते सांगणारे खुपच मागासलेले असणार ना? कारण असे ज्योतिषी वा भविष्यवेत्ते फ़क्त भाकितेच करतात. तुम्हाला थेट पाचसात दिवस पुढल्या दिवसात नेऊन, काय छापले जाणार आहे, त्याचा साक्षात्कार कधीच घडवू शकत नाहीत. मग मी दाभोळकरांना सर्वात श्रेष्ठ बापू वा बुवा म्हटले तर तो त्यांचा सन्मान आहे की अवमान आहे सांगा?

   असो. ही झाली दाभोळच्या नरेंद्र बापूंची कालचक्रात कुठूनही कुठेही जाऊन पोहोचण्याची अतर्क्य दिव्यशक्ती. त्यासाठी त्यांनी किती साधना केली असेल त्याचे गणितही आपल्यासारख्या सामान्यजनांना मांडता येणार नाही. तेव्हा त्या भानगडीत पडण्यापेक्षा त्या ‘लोक प्रभा’वित करणार्‍या आपल्या उपदेशात नरेंद्र बापू काय म्हणतात ते जरा समजून घेऊ. नरेंद्रबापू आरंभालाच म्हणतात, ‘दिल्लीतील बलात्कार प्रकरणानंतर प्रतिक्रिया देताना अनेकांनी अकलेचे तारे तोडले.’ आता ज्यांनी कोणी तारे तोडले ते तारेच आहेत, हे ज्यांना नेमके कळले ते ग्रहातार्‍यांमध्ये वावरणारे असले पाहिजेत ना? कारण तुम्ही आम्ही सगळी सामान्य माणसे त्या बलात्कारानंतर संतप्त होऊन उठलो होतो. अगदी काहींनी पोलिसांवर दगडही मारले. पण कुठे तारे तुटून पडल्याचे आपल्या लक्षात आले नाही. तारे तुटून पडले वा कोणी तोडले असते; तर काही क्षण का होईना रस्त्यावर उतरलेले लाखो लोक निदर्शने विसरून त्या तार्‍यांचे दर्शन घ्यायला तिकडे वळले असते. पण लोक उपोषण, धरणी, सत्याग्रह, घोषणा वा हिंसाचार अशा विविध कार्यात मग्न होते. पण कोणाचेच तारे तोडले जाण्याकडे अजिबात लक्ष गेले नाही. म्हणजे हे लाखो लोक व अन्य त्यांची निदर्शने बघणारे लोक किंवा ते आपल्या कॅमेरामध्ये टिपून वाहिन्यावर प्रक्षेपित करणारे सर्वजण चक्क आंधळेच असले पाहिजेत. इतके तारे तोडले जात होते आणि कोणाचे म्हणून तिकडे लक्ष जाऊ नये हा आंधळेपणाचा पुरावाच नाही काय? तर असे कोणी कोणी तोडून फ़ेऊन दिलेले तारे नरेंद्र बापूंनी गोळा केले. कदाचित तुटणारे वा तोडलेले तारे दिसायला दिव्यदृष्टी लागत असावी; जी तुमच्या किंवा माझ्यापाशी नसावी. त्यामुळे तो नरेंद्र बापूंचा दोष मानता येणार नाही. उलट आपण त्यांचे आभार मानायला हवेत, की त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीचा सदूपयोग करून असे अनेकांनी चोरून तोडलेले तारे गोळा केले. नाही तर पर्यावरण किती बिघडले असते हो.

   कदाचित आपल्याला हे तोडलेले तारे दिसले नाहीत; याचे एक वेगळेच वैज्ञानिक कारण असू शकते. ते आताच तोडलेले नसतील; भविष्यात कधीतरी तोडले जाणारेही तारे असू शकतील. पण जसा आठ दिवस तारखेपुर्वीच ‘लोकप्रभा’ वाचायला आधीच उपलब्ध होतो, तसे भविष्यात तोडले जाणारे तारेही नरेंद्रबापूंना आधीच दिसू शकत असतील, तुटून खाली पडताना गोळाही करता येत असतील. दिव्यशक्ती आत्मसात केलेल्या विज्ञाननिष्ठांना काय अशक्य आहे? तेव्हा दिल्लीच्या सामुहिक बलात्कारानंतर अनेकांनी अकलेचे तारे तोडले; हे नरेंद्र बापूंचे विधान आपण निमूटपणे मान्य केले पाहिजे. अकलेचे तारे असतात काय व कसे; असले अंधश्रद्धेचे सवाल बापूंना विचारायची आपली लायकी नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मग असले भोळसट सवाल आपल्या मनात येणार सुद्धा नाहीत. आपली विज्ञानावर संपुर्ण निष्ठा असली पाहिजे आणि ते काम फ़ार अवघड नाही. आपण दाभो्ळच्या नरेंद्र बापूंवर नि:शंक विश्वास ठेवला, मग विज्ञानाविषयी आपल्या मनात असले कुठले विचलित करणारे प्रश्नच निर्माण होणार नाहीत. थोडक्यात अकलेला तारे असतात व तोडले जातात आणि नरेंद्र बापूंना ते दिसू शकतात, एवढे मान्य केले, की झालो आपण विज्ञाननिष्ठ. किती सोपे काम आहे ना? अन्य कुणा बापू बुवाप्रमाणे बिल्ले, टोप्या वगैरे खरेदीसाठी पदरमोड करण्याचे कारण नाही. डोळे मिटायचे व नरेंद्र बापूंचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा, की आठ दिवस नंतर येणारा ‘लोकप्रभा’ दिसू लागतो आणि तोडलेले तारे दिसू लागतात. आपल्या विज्ञाननिष्ठेला इतका बहर येतो, की अन्य कुठल्या बापू वा बुवाने कितीही कहर केला तरी आपले चित्त विचलित होण्याचे भय नाही.

   म्हणून असेल कदाचित दाभोळकरांना व त्यांच्या अनेक सहकारी मित्रांना कधीपासून त्यांचेच नामबंधू गुजरातचे मोदी नरेंद्र पंतप्रधान होणार याची भिती वाटू लागली आहे. अजून मोदींनी स्वत: तशी इच्छाही व्यक्त केलेली नाही. पण जे कोणी दाभोळच्या बापूंचे भक्त अनुयायी आहेत, ते मात्र हा दुसरा नरेंद्र शिरजोर होण्याच्या भयगंडाने व्यथित होत आहेत. त्याला रोखण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरले आहेत. त्यासाठी दिव्यदृष्टी लागते. खुद्द नरेंद्र मोदी वा त्यांच्या भाजपा पक्षालाही ते पंतप्रधान होऊ शकतील याची माहिती नाही. पण नरेंद्रबापूंचे तमाम अनुयायी चिंतेत आहेत. आणि खुद्द नरेंद्र बापू मात्र अनिरुद्ध वा आसाराम अशा इतर बापूंनी तोडलेले तारे गोळा करण्यात गर्क आहेत. आपला विज्ञानाचा मंत्र सोडून लोक अन्य बापूंच्या मंत्राच्या आहारी जाण्याच्या भयाने दाभोळचे बापू अस्वस्थ झालेले आहेत. की त्यांना त्यांच्या दिव्य दृष्टीने लोक बापू मंडळींच्या आहारी गेल्याचे आधीच दिसले असावे? तसे नसते तर त्यांनी (तारे गोळा करायचे कार्य अर्धवट सोडून) इतका मोठा लेख लेख लिहिण्यात कशाला वेळ दवडला असता? इतर जे बापू आहेत त्यांनी जे मंत्र तंत्र सांगितले ते निकामी व निरूपयोगी असल्याचे सांगण्यासाठी दाभोळकरांनी इतका वेळ खर्ची घातला; तर काय करावे, त्याचाही उपदेश जरा करायचे कष्ट घेतले असते तर बरे झाले असते. कारण त्या बापूंनी काय उपाय सांगितले वा सांगतात, त्यानुसार त्यांचे भक्तही कधी चालत नाहीत. पण दाभोळच्या नरेंद्र बापूंनी जे उपाय व पर्याय आजवर सांगितले आहेत, त्याचाच लोक अवलंब करतात आणि तरीही बलात्कार होतच आहेत. मग आपण आजवर जे तारे तोडले होते, ते गोळा करून त्याविषयी दाभोळकरांनी लोकांचे प्रबोधन करायला काय हरकत होती? बलात्कारापासून सुरक्षित रहाण्याचा दाभोळच्या या नरेंद्र बापूंचा उपाय व मंत्र कुठला आहे? तो वापरूनही महिला बलात्काराच्या शिकार का होतात, ते उद्या बघू.   ( क्रमश:)
 भाग   ( ६३)    २२/१/१३

रविवार, २० जानेवारी, २०१३

हेमंत जॉनी आणि नरेंद्रबापू यांचे लिव्हर ट्रबल


   हल्ली प्रत्येक मनोरंजन वाहिन्यांवर विनोदी नकलांच्या कार्यक्रमांचा सुकाळ झालेला आहे. त्या कमी म्हणून की काय वृत्तवाहिन्यावरचे कर्मचारी आपापले विदुषकी चाळे करीतच असतात. पण तेही कमी पडतात, म्हणून की काय अन्य वाहिन्यांवरल्या विनोदी नकलांच्या पुन्हा नकला करून दाखवल्या जातात. थोडक्यात टिव्ही ज्यांच्या घरात आहे त्याच्यासाठी विनोदाचे अजीर्णच होत असते. नेहमीच्या विनोदाचा कंटाळा आला; मग थोडे हलके वाटावे म्हणून लोक सौम्य विनोदाच्या आहारासाठी वृत्तवाहिन्यांकडे वळत असतात. माझे ‘पुण्यनगरी’तले वाचक व फ़ेसबुकवरचे अनेक मित्र त्याचे किस्से मला कळवत असतात. कधीकधी मी सुद्धा खुपच थकवा आला; मग वृत्तवाहिन्यांचा आहार घेत असतो. अशाच माझ्या एका फ़ेसबुक मित्राचे एक निरिक्षण मला इथे अगत्याने सांगावेसे वाटते. अंबेजोगाई अशा ग्रामीण भागतल्या या मित्राचे नाव आहे बालाजी सुतार. त्याने मध्यंतरी एक फ़ारच सुंदर व मार्मिक शेरा हाणला. आदल्या रात्री त्याने कायबीइन लोकमतवर ‘सवाल’ बघितला होता. त्यावर भाष्य करताना बालाजी म्हणतो, ‘या निखिल वागळेचे इतके बोलून बोलून हात कसे दुखत नाहीत?’ ही आजच्या सामान्य प्रेक्षक व वाचकाने; पत्रकार व वाहिन्यांच्या जाणकारांची ठरवलेली लायकी आहे. तर अशा या गर्दीत उत्तम विनोदही खुप महाग होऊन गेला आहे. क्वचित राजू श्रीवास्तव किंवा कोणी सुक्ष्म निरिक्षणाने चांगले विनोद करतो, अन्यथा या क्षेत्रातल्या कलावंताचे पत्रकार बुद्धीमंतांनी पुरते हालच करून टाकले आहेत. सगळे बौद्धीक जीवनच विनोदी आणि हास्यास्पद करून टाकले; मग बिचार्‍या नकलाकारांनी तरी व्यंग कुठून शोधून काढायचे? पण काही वर्षापुर्वी अस्सल विनोदाचा इतका दुष्काळ नव्हता. जॉनी लिव्हर, राव ब्रदर्स, जॉनी व्हिस्की असे चांगले नकलाकार सकस विनोदाने लोकांना पोट धरून हसायला भाग पाडत असायचे. त्यातल्या जॉनी लिव्हरचे अनेक किस्से व नकला अजून स्मरणात आहेत. रस्त्यावर गर्दी वर्दळीत धक्का लागला म्हणुन एक दाक्षिणात्य आपल्या तसल्या हिंदीत कोणाशी तरी भांडतो, हुज्जत करतो, अशी ती नक्कल आहे.

  धक्का मारताय, गिर जाता तो? पडलो असतो ना? धक्का मारतोस? मागून बस आली असती तर? तिच्याखाली चिरडून मेलो नसतो? घरी माझी छोटीछोटी मुले आहेत, बायको आहेत. त्यांनी काय झाले असते? साला धक्का मारतो. खड्ड्यात पडलो असतो मग? माझ्या बायकापोरांनी काय करायचे? हरामखोर धक्का मारतोय. माझे कपडे खराब झाले असते मग? माझ्या कुटुंबाला तू पोसणार कायरे? नालायक, धक्का मारतो? माझा हातपाय तुटला असता मग? तु माझा संसार चालवणार होता कायरे? घरी माझी छोटीछोटी मुले आहेत. त्यांचे काय झाले असते? धक्का मारतोस? पडलो आणि अंगावरून गाडी गेली असती तर त्या गाडीवाल्याला भुर्दंड. हॉस्पिटलचा खर्च काय तू करणार होता काय रे?

   असे त्याचे चराट चालूच असते. पण ज्याचा धक्का लागला, त्याला तो बोलूच देत नसतो. जे काही होईल त्याचे वर्णन व जाब मात्र विचारत असतो. आणि धक्का मारतोस, म्हणून आरोपही करत असतो. शेवटी लिव्हर दमतो बोलून बोलून. तेव्हा कुठे त्या समोरच्याला बोलायची संधी मिळते. तो एकाच वाक्यात विचारतो, लेकीन भाईसाब तुम्हाला माझा धक्का लागलाच कुठे? त्यावर उसळून लिव्हर म्हणतो................ धक्का लग जातो तो?

   आता बोला. म्हणजे पंधरा मिनिटे लिव्हर त्याच्यावर आरोपांच्या फ़ैरी झाडत असतो आणि काय काय झाले असते त्याचे धोके सांगून जाब विचारत असतो; पण मुळात धक्काच लागलेला नसतो. म्हणजे सगळी बडबड अकांडतांडव अकारण उगाच चालू असते. आणि ते लक्षात आणुन दिल्यावर तोच आरोपकर्ता बेशरमपणे म्हणतो, धक्का लग जाता तो? त्या नकलांच्या ऑडीओ टेप्स मिळायच्या तेव्हा. मी त्यातला युक्तीवाद अनेकदा ऐकायचो. हल्ली वाहिन्यावर ज्या चर्चा व परिसंवाद चालतात, तेव्हा मला अनेकदा त्या टेप नव्या नकलाकारांकडून ऐकतो आहे काय असे वाटते. कारण अशा चर्चांमध्ये झालेले काय आहे, तो विषय बाजूला ठेवून भलतेच काही झाले असते तर, असा विषय फ़िरत भरकटत जात असतो. मग ह्या तमाम चर्चा करणार्‍यांना व त्याचे संयोजन करणार्‍यांना; जॉनी लिव्हरची बाधा झाली आहे असेच मला वाटू लागते. ज्याला मी लिव्हर ट्रबल असे नाव दिले आहे. गेल्या आठवड्यात असे दोन याच आजाराची गंभीर बाधा झालेले दोन रुग्ण मला आढळले. त्यांची सगळी चर्चा व युक्तीवाद; काय होईल वा झाले असते यावर चालू होता. पण समोर काय झाले आहे, त्याबद्दल मात्र ते अगदी गप्प होते. त्यातल्या एकाचे नाव हेमंत जॉनी उर्फ़ देसाई व दुसरे दाभोळचे नरेंद्र बापू. दिल्लीतल्या बलात्कारामुळे देशभर जी चर्चा चालू आहे, त्यावर त्यांचे लेख मान्यवर वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. त्यात हे दोघेही आसाराम बापू, अनिरुद्ध बापू, संघाचे प्रमुख मोहन भागवत इत्यादींवर घसरले आहेत. कारण बलात्कारावर उपाय म्हणून किंवा असे प्रसंग टाळण्यसाठी त्यांनी जे काही उपाय सूचवले; त्यातला फ़ोलपणा दाखवण्यासाठी या दोघा महंतांनी आपल्या विद्वत्तेचे दिवे पाजळले आहेत. समजा तुम्हाला ही बापू वगैरे मंडळी भोंदू भंपक वाटत असतील तर त्यांच्या मागे जाण्या्ची सक्ती तर नाही ना? त्यांचे उपाय दुर्लक्षित करा. पण आता देशाला भेडसावणारा विषय मुर्ख उपाय सुचवणार्‍यांचा नसून बलात्काराचा अपाय करणार्‍यांच्या बंदोबस्ताचा आहे. मग त्याला सोडून अन्य कोणी सांगितलेले उपाय चुकीचे आहेत आणि त्यामुळे कोणी बलात्कारापासून बचाव करू शकणार नाही, असले युक्तीवाद करण्यत कुठला शहाणपणा आहे?

   त्यापेक्षा गंभीर मुद्दा आहे, तो परिस्थितीचा. जे उपाय योजून व जी दक्षता बाळगूनही बलात्कार राजरोस चालू आहेत, त्यातला फ़ोलपणा दाखवण्याची गरज आहे ना? की बापूंच्या उपायाचा वापर करून भविष्यात निर्माण होऊ शकणार्‍या काल्पनिक धोक्याबद्दल भुई धोपटायची? ज्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाला; तिने कुणा बापू बुवाच्या स्तोत्र वा मंत्राचा जप केलेला नाही, किंवा त्यावर विसंबून ती घराबाहेर पडलेली नाही. तर सरकारपासून देशातले विचारवंत ज्या कायद्याच्या राज्याचा सर्वात सुरक्षित म्हणून हवाला देतात, त्याचाच मंत्रजप करीत ती मुलगी घराबाहेर पडली होती. तीच कशाला देशाच्या कानाकोपर्‍यातल्या महिला त्याच कायद्याच्या मंत्राचा जपजाप करूनच बलात्काराच्या, अपहरणाच्या संकटाचे निवारण होणार या श्रद्धेवर जगत व हिंडतफ़िरत असतात. तेव्हा त्या प्रत्येक महिलेची फ़सगत झाली असेल; तर ती या आधुनिक वैज्ञानिक घटनात्मक राज्य विषयक मंत्रतंत्राने केलेली आहे. तेव्हा देशातल्या महिला मुलींना बलात्काराच्या धोक्यातून सावध करायचे असेल; तर तिला आज असलेल्या पहिल्या सक्तीच्या अंधश्रद्धेतून बाहेर काढणे अत्यावश्यक नाही का? कारण ही कायद्याच्या राज्याची अंधश्रद्धा सक्तीची आहे. बापू वगैरे मंडळींचा सल्ला वा श्रद्धा सक्तीची नाही. त्यामुळे त्यापासूनचा धोका अगदीच किरकोळ आहे. आणि कोणी तो सल्ला गंभीरपणे घेत नाही. अगदी त्यांचे भक्तसुद्धा वास्तव जीवनात कायद्याच्या अंधश्रद्धेवरच सर्वस्वी अवलंबून असतात. दिल्लीतलाच नव्हेतर देशाच्या कुठल्याही भागात होणारा बलात्कार वा गुन्हा हा कायद्याच्या तंत्रमंत्राचा फ़ोलपणा आहे.

   पण हेमंत जॉनी किंवा दाभोळचे नरेंद्रबापू आपल्या लेखामध्ये त्या देशव्यापी सक्तीच्या अंधश्रद्धेबद्दल अवाक्षर लिहित नाहीत, की बोलत नाहीत. उलट ज्यावर विसंबून अजून कोणी बलात्काराची शिकार झालेले नाहीत, त्यामुळे काय काय हाहा:कार माजेल, त्यावर हे काहूर माजवतात. अगदी जॉनी लिव्हरच्या भाषेत. धक्का लग जाता तो? म्हणजे धक्का लागलेलाच नाही तरी ओरडा चालू आहे आणि जिथे धक्का लागून ती मुलगी मेली व अन्य मारल्या लुटल्या जात आहेत; त्याबद्दल अवाक्षर नाही? याला मानसिक आजार नाहीतर काय म्हणायचे? आता याला लिव्हर ट्रबल का म्हणायचे? तर तो पित्तविकार आहे म्हणून. ही दोन्ही विद्वान मंडळी अशी आहेत, की त्यांना हिंदू असा शब्द कुठून कानी आला किंवा वाचनात आला; मग त्यांचे पित्त खवळते व त्यांचा पित्तप्रकोप होतो. त्यातून त्यांना अशा ‘कडवट’ उलट्या वांत्या होऊ लागतात. म्हणून त्याला पित्ताशयाचा आजार म्हणजे लिव्हर ट्रबल असे नाव द्यावे लागले. त्यांचे पित्त त्यांनी कुठेही ओकावे याबद्दल माझी तक्रार नाही. ते कडवट घोट घशाशी आले; मग उलट्या कराव्याच लागतात. पण इथे पित्त खवळण्याचे कारणच काय? धक्का तर लागू देत? तर हे शहाणे तोपर्यंतही थांबायला तयार नाहीत. धक्का लागला तर, म्हणून हुज्जत करू लागतात. आपण सामान्य बुद्धीची माणसे अशा वागण्याला भ्रमिष्ट म्हणतो. वाहिन्यांवर त्यालाच ज्येष्ठ जाणकार विश्लेषक म्हणतात.   ( क्रमश:)
 भाग   ( ६२)    २१/१/१३

शनिवार, १९ जानेवारी, २०१३

अंधश्रद्धा निर्मुलनाच्या जंजाळात फ़सलेले कायदेबापू



   दिल्लीतल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेला त्यानंतर उफ़ाळलेल्या संतापाच्या लाटेने इतकी प्रसिद्धी मिळाली की माध्यमांना त्या विषयातून बाहेर पडायची इच्छाच होत नव्हती. मग त्याबद्दल जो कोणी बोलेल, त्यालाच माध्यमाच्या बातम्यांमध्ये प्रसिद्धी मिळत असते. आणि ज्यांना प्रसिद्धी हवी असते, अशी माणसेही हुशार असतात. ती त्याच बाबतीत बोलून आपल्यावर प्रसिद्धीचा झोत ओढवून घेत असतात. जर कोणी त्याबद्दल बोलले नाही, तर पत्रकार त्याचा पिच्छा पुरवून त्याला बोलायला भाग पाडतात. मग त्याला त्याबद्दल काही माहिती असो किंवा नसो. उदाहरणार्थ राज ठाकरे यांनी बिहारी वा उत्तर भारतीयांच्या विरोधात आंदोलन छेडले असताना आमिरखान किंवा सचिन तेंडूलकर यांचे त्याबद्दलचे मत विचारणारा मुळात बेअक्कल असतो. कारण ही माणसे अशा विषयातली जाणकार नाहीत. कारण मुंबई कोणाची वा मुंबईत येणारी गर्दी, त्यांच्या वाट्याला येतच नसते. ते सामान्य नागरिकांपासून अलिप्त कोंडवाड्यातले जीवन जगत असतात. मुंबईची वाढती लोकसंख्या हा विषय ज्यांच्या अभ्यासाचा वा चिंतेचा असतो, त्यांचेच अशा विषयातील मत महत्वाचे असते. कारण आमिर वा सचिन जे मत व्यक्त करतील, ते ग्राह्य धरून धोरण राबवले गेले, तर त्यातुन निर्माण होणार्‍या समस्यांचे निराकरण करायची कुठली जबाबदारी त्यांच्यावर नसते. त्यामुळे कुठल्याही विषयावर मतप्रदर्शन करण्यात त्यांचे काही जात नाही, की जबाबदारी त्यांच्यावर येत नाही. परंतू माध्यमांना असा खुळेपणा करावाच लागत असतो. चोविस तास वाहिन्या चालवायच्या, तर काहीतरी दाखवायला हवे आणि खुसखुशीत असायला हवे. त्यामुळे वादग्रस्त ठरेल असे शोधावे लागते अन्यथा निर्माण करावे लागते.

   तर अशा या वादाच्या काळात आसाराम बापू, अनिरुद्ध बापू, संघचालक मोहन भागवत, कुठल्या पक्षांचे लहानमोठे नेते इत्यादिंनी आपापले मतप्रदर्शन केले होते. मग त्यांची मते पुढे करून त्यांना मुर्ख किंवा आरोपी ठरवण्याची जंगी स्पर्धा सुरू झाली. इतके पोषक वातावरण तयार झाले; मग काही ‘नेहमीचेच यशस्वी’ कलाकार असतातच. तसे त्यात अंधश्रद्धा निर्मूलनवाले दाभोळकर नरेंद्र बापू घुसले तर नवल कुठले? अर्थात त्याबद्दल माझी तक्रार नाही. पण ज्या शब्द, वाक्ये वा मुद्दे यासाठी अशा बापू व बुवांना ओलिस ठेवण्याची स्पर्धा लागली होती; त्यांनी एका अत्यंत व्यक्तीकडे साफ़ दुर्लक्ष करावे हे धक्कादायक होते. त्या व्यक्तीचे नाव सिंधूताई सकपाळ असे आहे. त्यांनीही अंगप्रदर्शन व अपुरे कपडे बलात्काराचे कारण असल्याचे व महिलांनी अंगभर कपडे घालण्याचे आवाहन त्याच दरम्यान केले होते. किंबहूना बाकीचे बुवा, बापू तसे बोलण्याआधी सिंधूताईंनी आपले मतप्रदर्शन केले होते. पण  त्यावरून कोणा पत्रकार वा माध्यमाने काहूर माजवले नाही. जणू ही सगळी मंडळी बापू, बुवा बोलण्याच्या प्रतिक्षेत होती. म्हणजे काय बोलला याला महत्व नव्हतेच. कोण बोलला याला महत्व होते. सिंधूताई सकपाळ समाजसेविका असल्याचे डंके ज्यांनी दिर्घकाळ पिटलेले आहेत, त्यांचे विधान आक्षेपार्ह असले तरी त्यातून सेक्युलर धर्मनिरपेक्षता सिद्ध होणार नव्हती ना? त्यामुळेच माध्यमे मुघ गिळून गप्प बसली. निव्व्ळ बातमी देऊन विषय संपला. पण तशाच पद्धतीचे विधान संघ वा बापू यांच्याकडून होताच आभाळाचा सर्व भार पेलणारा सेक्युलर खांबच उखडला गेला आणि आभाळ कोसळले.

   भागवत यांनी इंडियात बलात्कार होतात व भारतात होत नाहीत असे म्हटले. म्हणजे काय तर पुढारलेल्या फ़ॅशनेबल तरूणी जे अंगप्रदर्शन करतात, त्यातून चिथावण्या दिल्याप्रमाणे कामुकतेला प्रोत्साहन दिले जाते; असेच त्यांना सुचवायचे होते. तसे ग्रामीण भागात होत नाही, तर शहरी भागात होते. शहरे म्हणजे इंडिया व भारत म्हणजे ग्रामीण अशी विभागणी त्यांनी केली. हे मलाही मान्य नाही. पण जो मुद्दा त्यांनी उपस्थित केला; तोच सिंधूताई सकपाळ यांनीसुद्धा केलाच होता ना? मग सेक्युलर माध्यमांना तेव्हाच तो का उचलून धरता आला नाही? आणि तेव्हा उचलला नसेल तर भागवत यांच्यावर झोड उठवताना सिंधूताई देखिल असेच बोलल्या; याचे नवल का विचारले गेले नाही? याचा अर्थच सरळ आहे, की कोण काय म्हणाले यानुसार चुक वा गुन्हा ठरत असतो. काय बोलला वा काय केले ते दुय्यम आहे. सिंधूताई बोलल्या तर बिघडत नाही. संघाचा कोणी बोलला मग भयंकर मुर्खपणा होत असतो. याला न्याय म्हणत नाहीत की पत्रकारिता व विवेकबुद्धी म्हणत नाहीत. त्याला बदनामीची मोहीम म्हणतात. आणि त्यावर भाष्य़ करायला पुन्हा दाभोळचे नरेंद्र बापू आणायचे. आसाराम बापू किंवा अनिरुद्ध बापू यांनी कुठले स्तोत्र म्हणून वा राखी बांधून बलात्कार रोखता येतो असे खुळचट विधान केले. त्यात तथ्य नाही तर शुद्ध मुर्खपणा आहे, हे मान्यच करायला हवे. कारण बापू वा बुवांना काय वाटते; त्याच्याशी संबंध नसून ज्या मुलीला अशा घटनेचे परिणाम भोगावे लागतात, त्या मुलीच्या अनुभवाला प्राधान्य आहे. मग बापूच्या स्तोत्रात वा धर्माच्या ग्रंथात कोणते शब्द आहेत, त्याला काडीमात्र अर्थ नाही. अर्थ असतो, तो त्या शब्दांच्या परिणामाला. वास्तव जीवनातील त्याच्या परिणामाला महत्व असते, कारण ते परिणाम कोणाला तरी भोगावे लागत असतात, इजा करून जात असतात किंवा त्याच्या जीवाशी खेळणारे असतात. त्यामुळेच अशी स्तोत्रे म्हटल्याने कुणावर होणारा बलात्कार थांबला किंवा गंडादोरा बांधल्यामुळे बलात्कार रोखला गेल्याचे कोणाच्या अनुभवात नाही की ऐकीवात नाही. म्हणूनच ती स्तोत्रे व ग्रंथ अशा विषयात निकामी आहेत; यात शंकाच नाही, त्यावर विश्वास ठेवणेही मुर्खपणाच आहे. नुसता मुर्खपणा नव्हेतर अंधश्रद्धाच आहे याबद्दलही वाद होण्याचे कारण नाही.

   पण अशा शब्द, स्तोत्रे व ग्रंथांवर ‘डोळे झाकून’ विश्वास ठेवायला सांगणारे बुवा, बापू जर भंपक असतील तर तशाच निरर्थक, निकामी शब्द व ग्रंथावर तसाच आंधळा विश्वास ठेवायला भाग पाडून; मुली महिलांना बलात्काराच्या कराल दाढेत ढकलणारे दुसर्‍या बाजूचे जे सेक्युलर धर्मनिरपेक्ष महंत बापू आहेत, त्या मुर्खांचे काय करायचे? दिल्लीत ज्या मुलीला अशा सामुहिक बलात्काराच्या भीषण अनुभवातून जावे लागले; तिने कोणा बापू बुवाचा गंडादोरा बांधला नव्हता, की कुणा महाराजाने सांगितलेल्या स्तोत्राचे पठण केले नव्हते. तर तिने मी सांगतो, त्या सेक्युलर बुवबाजीवर आंधळा विश्वास ठेवला होता. त्यातूनच तिला अशा नरकवासातून जायची पाळी आली, हे सत्य कोणी नाकारू शकणार आहे काय? अशा कोणत्या अंधश्रद्धेबद्दल मी बोलतो आहे? पहिली अंधश्रद्धा म्हणजे आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. आपल्या देशात पोलिस आहेत. गुन्हेगारीचा कायद्याने बंदोबस्त केला जातो, कायदा मोडणार्‍याला कायद्यानुसार शिक्षा होते. कायद्याचे राज्य असल्याने नागरिक सुरक्षित आहेत. अशा शेकडो अंधश्रद्धा आहेत, आणि त्याच अंधश्रद्धेने त्या मुलीचा बळी घेतला. दिल्लीमध्ये कायदा सुव्यवस्था भक्कम आहे, असा दावा सातत्याने करणारे सरकार आणि कायद्यानेच प्रत्येक गोष्ट व्हायला हवी असा आग्रह धरणारे सगळे पुस्तकातल्या शब्दांचेच महात्म्य सांगत असतात ना? कायद्याच्या पुस्तकातले व विधीमंडळाने संमत केलेले शब्द अत्यंत प्रभावी असल्याचा दावा कोणा आसाराम वा अनिरुद्ध बापुचा नाही ना? मग जेवढी त्यांची स्तोत्रे निकामी आहेत, निष्प्रभ आहेत, त्यापेक्षा हे संमत होऊन पुस्तकात छापलेले कायद्याचे शब्द निकामीच नाहीत का? कारण ती मुलगी किंवा तशा बलात्कार विनयभंगाच्या बळी होणार्‍या मुली महिला, त्याच कायद्याचा धावा अहोरात्र करीत असतात. त्यावेळी कधी व कुठला कायद्याचा शब्द, स्तोत्र, मंत्र त्यांच्या मदतीला धावून आला आहे?

   कायदा नावाचे जे काही थोतांड या देशात आहे, त्याने आपला चमत्कार कधी दाखवला आहे? तसे असते तर त्याच थोतांडाच्या विरोधात लाखोंच्या संख्येने लोक दिल्ली वा अन्यत्र रस्त्यावर का उतरले असते? दिल्लीतला सामुहिक बलात्कार हा नुसताच गुंडगिरीचा बळी नाही. तो कायदा नावाच्या एका भीषण अंधश्रद्धेचा बळी आहे ना? आणि अशा त्या अंधश्रद्धेच्या जंजाळात सामान्य जनतेला गुंतवणारे कोण आहेत? कोणी आसाराम बापू, अनिरुद्ध बापू किंवा धर्ममार्तंड नाहीत. जर बापू सांगतो त्या स्तोत्राच्या फ़ोलपणावर आमचे पत्रकार माध्यमे व विद्वान हिरीरीने तुटून पडले, तर त्यापैकी कोणालाच कायद्याच्या भीषण अंधश्रद्धेकडे डोळसपणे का बघता आलेले नाही? दाभोळचे अंधश्रद्धा निर्मूलन नरेंद्रबापू त्याच पीठाचे शंकराचार्य आहेत ना? इतके शेकडो कायदे निकामी होऊन पडले असताना त्यांना आणखी एक कायदा पाहिजे आहे. त्यांना कायदेबापूच्या तावडीतून कोणी सोडवायचे?    ( क्रमश:)
 भाग   ( ६१)    २०/१/१३

शुक्रवार, १८ जानेवारी, २०१३

सामाजिक शेतीमधले एकात्मिक कीडनियंत्रण


   सजीव सृष्टीमध्ये काही जीव स्वयंजीवी असतात, तर काही परोपजीवी असतात. म्हणजे स्वयंजीवी असतात, ते आपले अन्न शोधून, निर्माण करून व बनवून त्यावर उपजीविका करत असतात. तर काही जीव हे परोपजीवी म्हणजे दुसर्‍याने निर्माण केलेल्या अन्नरसावर झडप घालून गुजराण करीत असतात. जसे झाडावर वृक्षावर बांडगुळ असते किंवा आपल्या घरात अन्यत्र डास वा मच्छरांचा वावर असतो. ते जीव आपल्या रक्तावर पोसले जात असतात. म्हणजेच दुसर्‍याच्या जगण्यावर त्यांचे अस्तित्व अवलंबून असते. अगदी तसेच मानवी सामुहिक जीवनात ज्याला आपण सामाजिक व्यवहारी जीवन समजतो, त्यात काही माणसे परोपजीवी जगत असतात. त्यांचे जगणे अन्य कुणाच्या तरी जगण्यावर अवलंबून असते. दुसर्‍या कुणाच्या तरी साधनसंपत्ती निर्माण करण्यावर अवलंबून असते. अशी सर्जनशील वा स्वयंजिवी माणसे असतात म्हणून परोपजिवींची उपजिविका चालू शकते. त्यात मग भुरटे, भामटे, दरोडेखोर, चोर गुन्हेगार असतात, तसेच समाजाच्या दुखण्यावर जगणारेही असतात. पुन्हा तेवढ्यावर भागत नाही. काही जीव व लोक असे असतात, की त्यांचे जगणे परोपजिवींच्या अस्तित्वावर अवलंबून असते. हे समजून घ्यायचे तर शेतीमध्ये जसे एकात्मिक किटक नियंत्रण म्हणुन चालते, ते बघायल हवे. पिकावर येणार्‍या किड किटकांचे दुसर्‍या तशाच कि्डकिटकांकडून होणारे नियंत्रण. म्हणजे असे असते, की अमूक एक किड असेल तर तिच्यावरच पोसले जाणारे काही किटक वा किडे असतात. मग शेतकरी चलाखी अशी करतो, की त्याच्या मुळ पिकावर जी किड मोठ्या प्रमाणावर येऊन नासाडी करण्याचा धोका असतो; त्या किडीवर पोसले जाणारे किटक वा किडी यांचाही वावर आपल्या पिकात व्हावा, अशी मुद्दाम योजना करतो. मग होते काय हे दुसरे परोपजीवी असतात, ते पहिल्या परोपजीवींचा फ़डशा पाडत रहातात, त्यामुळे मुळ पिकाची नासाडी करणार्‍या किडीचे नियंत्रण आपोआप होते. आणि त्याला खाणारे किटक वा किड मुळ पिकावर पोसली जाणारी नसल्याने पिकाला त्यापासून धोका नसतो. साध्या भाषेत आपण त्याला काट्याने काटा काढणे म्हणतो, त्यातला प्रकार आहे. असो, सांगायचा मुद्दा इतकाच, की नुसतेच परोपजीवी जीव नसतात, तर त्यांनाही आपली उपजीविका बनवून जगणारेही जीव असतात आणि त्याचेच भाईबंद आपल्याला मानवी समाजात व सामुहिक जीवनातही दिसतील.

   आता इथे एक गंमत लक्षात घेतली पाहिजे, की अशा ज्या दुसर्‍या जातीच्या किडी वा किटक सजीव असतात, त्यांचे अस्तित्व त्या पहिल्या परोपजीवी किडी किटकावर अवलंबून असते. त्या पहिल्याच किडीचा पुरता नायनाट झाला, मग या दुसर्‍या गटातील परोपजीवींचेही जगणे धोक्यात असते. हे बिचार्‍या किटक किडींना समजत नाही. पण अशा प्रवृत्तीची माणसे समाजात असतात, त्यांना मात्र आपल्या अस्तित्वाचा घोर कायम लागलेला असतो. त्यामुळे ते सतत आपले खाद्य म्हणजे भक्ष्य शोधत असतात. त्याचे पीक, पैदास व्हा्वी म्हणून कार्यरत असतात. आपल्याला नित्यजीवनात भेडसावणारे कित्येक व्यवहारी प्रश्न व समस्या आहेत. त्या साध्यासरळ मार्गाने व प्रयत्नाने सुटत नाहीत. त्यासाठी बर्‍याच अवैध उचापती कराव्या लागत असतात. कोणी त्याला भ्रष्टाचार लाच वगैरे म्हणतात. पण तो उपाय ज्या गरीबाला शक्य नसतो, त्याला त्यापेक्षा स्वस्तातला उपाय व मार्ग शोधावा लागत असतो. असा मार्ग म्हणजे आपल्यावर होणारा अन्याय सोसण्याचे मनोधैर्य व मनोबल निर्माण करणे होय. हे मनोबल अंगात असेल तर मग अन्यायाची चीड येत नाही किंवा अन्याय सोसण्याची क्षमता निर्माण होत असते. अडचणीवर अशी सुद्धा मात करता येत असते. मग ती सुविधा देणारे स्वस्तातले व्यापारी निर्माण होतात. व्यापारात अडकलेला पैसा, असाध्य आजार व त्यावरच्या उपचारासाठी गाठीशी पैसा नसणे, कोणी व्यवहारात फ़सवणूक करणे अशा अनेक समस्या प्रश्नांनी आजकालचा माणूस गांजलेला असतो. खरे तर समता, न्याय, कायदा यांचे राज्य असल्याने अशा स्वरूपाचे प्रश्नच निर्माण होता कामा नयेत. नियम व कायद्याने जनतेला जे अधिकार मिळालेले आहेत; त्याचे लाभ त्याला मिळाले तर तो नागरिक अगतिक, हतबल होणार नाही. मग त्याला तो अन्याय वा अडचण सोसायची गरज भासणार नाही. तीच भासली नाही तर त्याला त्यासाठीची सहनशक्ती वा मनोबल आत्मसात करायची गरज उरणार नाही. आपोआपच असे काही पुरवणार्‍याच्या दुकानात त्याला जावे लागणार नाही. याचा साधासरळ अर्थ इतकाच, की कायद्याचे प्रामाणीक राज्य असेल तर माणुस हतबल निराश होणार नाही व चमत्कार घडून यातून सुटावे; असा विचारही त्याच्या मनाला शिवणार नाही. मग तो त्या दिशेने जाण्याचा धोका तरी असेल काय? .

   पण अशा रितीने समाज चमत्काराच्या आहारी जाण्याची परिस्थिती निर्माण होत असते. आता तशी परिस्थिती निर्माण होते; कारण समस्या सोडवण्यासाठी माणसाची बुद्धीच काम करीनाशी होते. म्हणजे असे, की कायद्यात समोरचा माणुस गुन्हा करतो आहे आणि आपण तर कायद्यानुसार वागतो आहोत. पण सत्ता त्याच्या हाती असल्याने तो कायद्यानेच आपल्यावर अन्याय करत असतो आणि सांगितले जात असते, की कायदा न्यायासाठी व अन्यायाचे निर्मूलन करण्यासाठी आहे. आपण ऐकत एक असतो आणि अनुभवास वाटेल ते भलतेच येत असते. मग त्या कायद्यापेक्षा लोक चमत्काराच्या मार्गाने तर्कबुद्धीच्या पलिकडे जाऊन मार्ग शोधू लागतात. असे करू शकणारे कोणी बुवा, भगत, महाराज वा बापू असतात. त्यांच्याकडे जाण्याखेरीज लोकांपुढे पर्यायच शिल्लक उरत नाही. मग शेतकरी जसा एक किडीचे नियंत्रण करण्यासाठी दुसर्‍या किटक किडीची मदत घ्यायला जातो, तसे गांजलेले लोक चमत्कार नावाच्या दुसर्‍या परोपजीवी किटक किडीकडे जातात. उपाय म्हणून जातात हे विसरता कामा नये. शेतकरी मुद्दाम किड किटक आपल्या पिकावर यायची व्यवस्था करीत नसतो. त्याच पीक निरोगी होणार याची खात्री असेल, तर असे उपाय तो करणार नाही. गांजलेला माणुसही अकारण कुठल्या चमत्काराची अपेक्षा अजिबात करणार नाही. त्याला काही अपवाद असतील. पण तो नियम नाही. त्याच्या नित्य जीवनात कायदे व नियमाने सर्व गोष्टी सुरळीत होऊ शकल्या, तर चमत्काराच्या मागे जायची त्याला गरजच उरणार नाही. पण आज तरी सार्वजनिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये केवळ चमत्कारच काही सिद्ध करू शकेल, अशी लोकांना आशा वाटते. अण्णा हजारे भ्रष्टाचार संपवू शकतील व एक लोकपाल कायदा त्यातून मुक्तता करील; ही सुद्धा तशीच चमत्कार घडण्याची अपेक्षा असते. त्यासाठीच लोक त्यांच्या मागे धावले.

   असो. मुद्दा इतकाच, की आपल्या समाजात दोनतीन दशकांपुर्वी जेवढे चमत्कारी बाबा, बुवा, बापू नव्हते, त्याच्या अनेकपटीने आज अशा चमत्कारी बाबांची पैदास झाली आहे. त्याचे पहिले कारण म्हणजे जीवनातील अन्याय, अत्याचार, अडचणी यावर मात करण्याचे विवेकी मार्ग व उपाय सुचवणार्‍या व समजावू शकणार्‍या विवेकी समंजस बुद्धीमंताचा अभाव हे आहे. तीनचार दशकांपुर्वी आजच्यापेक्षा गरीबी व हलाखीमध्ये लोक जीवन कंठत होते, पण चमत्काराने वा आयते काही मिळेल वा मिळावे अशी आपेक्षा बाळगणारे खुपच कमी लोक होते. कारण चमत्काराने जीवनात बदल होत नाही, तर आपल्या कष्टातून, श्रमातून व मेहनतीमधून जीवन साकारत असते, अशी लोकांना विवेकी शिकवण देणारे सानेगुरूजी, आचार्य अत्रे इत्यादी बुद्धीमंत होते आणि लोकांची विवेक बुद्धी जागवण्यात पुढाकार घेत होते. लोकांना समजावण्यात आघाडीवर होते. लोकांना समजणार्‍या भाषेत बोलणारे, लिहिणारे होते. अलिकडे त्याचाच दुष्काळ पडला आणि साक्षरांची लोकसंख्या वाढली असताना सुशिक्षितांचे प्रमाण घटले आहे. मग साक्षर अशिक्षितांनी बुद्धीचा विवेकी वापर करावा अशी अपेक्षा कशी करता येईल? त्यांना कायद्याच्या राज्याने पोसलेले परोपजीवी इतके लुटत, लुबाडत असताना व कायदा त्यांचे नियंत्रण करण्यात अपेशी ठरत असताना; त्याच कायद्याच्या राज्याचे गुणगान करणारे बुद्धीमंत त्या गांजलेल्या लोकांसमोर असतील, तर त्यांना चमत्काराचीच अपेक्षा करावी लागणर ना? त्यामुळे मग आता तिसर्‍या स्तरावरचे परोपजीवी उदयास आलेले आहेत. म्हणजे होते असे, की भ्रष्टाचार, अन्याय अनागोंदीने गांजलेले लोक बुवा बापूंकडे चमत्कारासाठी जाऊन त्यांना पोसतात आणि मग त्याच बापू, भगतांना भक्ष्य बनवून उपजिविका करणारे अंधश्रद्धा निर्मुलनवाले तिसरे परोपजिवी तयार झाले आहेत. मग ते मूळात कायद्याच्या राज्यात सामुहिक बलत्कार धावत्या बसमध्ये झाला; याबद्दल बोलत नाहीत. तर त्यावरचा बापूने सांगितलेला उपाय कसा खोटा व भंपक आहे, त्यावर तोडसुख घेतात. आहे ना सामाजिक एकात्मिक कीडनियंत्रण? म्हणूनच बापू, बुवा, महाराज व अंधशद्धा निर्मूलन चळवळ यांचा परस्पर संबंध जरा तपशीलात समजून घेण्याची गरज आहे.    ( क्रमश:)
 भाग   ( ६०)    १९/१/१३