मंगळवार, ८ जानेवारी, २०१३

विवेकशून्य शहाण्यांपेक्षा व्यवहारी अडाणी बरा


   कुठल्याशा गावातील गोष्ट आहे. तिथले तीन तरूण वयात येण्याच्या सुमारास गाव सोडून उच्च शिक्षणासाठी गुरूच्या शोधात जातात. मजल दरमजल करीत मोठ्या आचार्यांच्या आश्रमात पोहोचतात आणि काही वर्षे गुरूची सेवा करताना विद्याभ्यास करून प्रचंड ज्ञानप्राप्ती करतात. आता ते शहाणे झाले, बुद्धीमान झाले म्हणत गुरू त्यांना निरोप देतात. इतके विद्याविभूषित ते तरूण मग माघारी आपल्या गावी येतात, तेव्हा त्यांचा मोठेच आदरातिथ्य होते. अवघ्या गावाला त्यांचा अभिमान वाटतो. त्यांनी गावाचे वा नगराचे जे काही असेल त्याचे नाव काढले असेच, अवघ्या वस्तीला कौतुक वाटते. काही दिवस तिथले आदरातिथ्य घेऊन हे महान पंडीत नशीब अजमावायला पुन्हा घर सोडून मुलूखगिरी करायला निघतात. कुठल्या तरी राजाला सम्राटला भेटून आपल्या "दिव्य"(मराठी) ज्ञानाने भारावून आयुष्यभराच्या सुखवस्तू जीवनाची सोय करायचा त्यांचा मानस असतो. गाव त्यांना निरोप देण्याची तयारी करत असताना, त्यांचा बालपणीचा एक गावंढळ अडाणी राहिलेला मित्र, त्यालाही सोबत घेऊन जाण्यासाठी या पंडीतांच्या विनवण्या करतो. बालपणी तोही याच पंडीतांशी आट्यापाट्या, सूरपारंब्या किंवा लगोर्‍या वगैरे खेळलेला असतो. पण त्याला सोबत घेऊन काय उपयोग असतो? तो तर निव्वळ अडाणी अक्षरशत्रू असतो. काय कामाचा? तर हा अडाणी म्हणतो, तुमची मनोभावे सेवा करीन. तुमचे कपडे धुविन, स्वैपाक करून तुम्हाला जेऊखाऊ घालीन, तुमचा घरगडी असल्यासारखा राहिन. पण तुम्हा बुद्धीमंतांचा सहवास माझ्या नशीबी आला, तरी माझ्या आयुष्याचे सोने झाले असेच मानेन. मोठे औदार्य दाखवित तिन्ही महापंडित त्या अडाणी मित्राला सोबत घेऊन जायचे मान्य करतात. मग त्यांना गाव निरोप देतो.

   पुढले काही दिवस नुसतीच पायपीट चालू असते. किती गाव, वस्त्या व जंगले मागे पडतात. पण या पंडीतांना मनासारखा राजा व राज्य सापडत नसते. मग जिथे कुठे मुक्काम पडायचा, तिथे हा अडाणी मनोभावे त्यांची सेवा करायचा. त्यांच्या सर्व सामानाचे ओझे घेऊन चालायचा. मुक्काम पडला मग काट्याकुट्या गोळा करून चुल पेटवायचा, स्वैपाक करायचा. त्यांना खाऊपिऊ घालायचा. दरम्यान त्या पंडितांच्या मोठमोठ्या गहन विषयावर चर्चा, वाद व्हायचे. त्यातले या अडाण्याला फ़ारसे काही कळत नव्हते. पण काहीतरी महान ज्ञानविज्ञान, शास्त्र आपल्याला ऐकायला मिळते; हेच त्याला पुण्यकर्म वाटत असे. तो स्वत:ला धन्य मानत होता. त्यांनी सोबत घेतले म्हणून मनोमन त्यांचे उपकार मानायचा. एके रात्री असाच एका जंगलात त्यांचा मुक्काम पडला होता आणि अडाणी चुल पेटवून स्वैपाक करताना पंडितांची चर्चा व उहापोह ‘आजचा सवाल’ ऐकावा तसा लक्ष देऊन ऐकत होता. इतक्यात त्यापैकी एका पंडिताचे पलिकडे लक्ष जाते. चुलीच्या उजेडात तिथे पडलेली काही हाडे त्याच्या नजरेत भरतात. ती कोणाची असतील असा विषय सुरू होतो. सगळे उठून तिकडे जातात आणि ती हाडे उजेडात आणून त्यावर वाद घालू लागतात. ती कोणाची म्हणजे कुठल्या प्राण्याची असतील; यावर त्यांची खडाजंगी होते. द्विपाद की चतुष्पाद, रानटी श्वापद की पाळीव जनावर, वगैरे सुक्ष्म चर्चा रंगते. तेव्हा त्यातला एकजण छातीठोकपणे तो चतुष्पादच असल्याचे सांगतो आणि उठून त्या हाडांची रचना करून ती चार पायांच्याच प्राण्याची हाडे असल्याचे दोघांना मान्य करायला लावतो. पण तो जंगली प्राणी की पाळिव असा वाद कायम रहातो, तेव्हा आधीच्या अस्थी विशारदाला बाजूला सारून दुसरा मज्जाशास्त्री पंडित पुढे सरसावतो आणि त्या सांगाड्यावर मांस स्नायू इत्यादि बरोबर त्वचाही रचून तो सिंह असल्याचे सिद्धच करून दाखवतो.

   पलिकडे चुल फ़ुंकणरा अडाणी मित्र अचंबित होऊन आपल्या पंडित मित्रांची किमया बघत असतो. आपण गावाचा, घराचा मोह सोडून या तिघा बालमित्रांसोबत निघून आलो म्हणजे किती योग्य निर्णय घेतला याची त्याला पुन्हा एकदा धन्यता वाटत असते. कारण असा चमत्कार त्यानेच कशाला त्याच्या घराण्यात वा गावातही कोणी कधी बघितलेला नसतो. जणू अफ़ाट बुद्धीचा साक्षात्कारच. मानवी बुद्धी किती अगाध आहे, त्याचा तो साक्षात चमत्कार बघून आपले आयुष्य सार्थकी लागले; अशीच त्याची भावना झालेली असते. आपण शिकलो नाही, म्हणजे आपले आयुष्य मातीत गेले, याचे त्याला प्रथमच वैषम्य वाटते. पण ह्या सर्व धुंदीतून एका क्षणात बाहेर पडायची वेळ त्याच्यावर लगेच येते. कारण इतका वेळ जे बौद्धिक पांडीत्य चक्रावून सोडत असते, तेच आता भयकारी वळण घेते. अस्थी विशारद व मज्जाशास्त्राच्या पंडीतांनी पडलेल्या हाडांपासून जो सिंह तयार केलेला असतो, त्यावर आता तिसरा पंडित आपल्या विद्येचा प्रयोग करायला सिद्ध झालेला असतो. तेव्हा मात्र हा अडाणी हस्तक्षेप करून त्यांना थांबवू पहातो. कारण तो तिसरा पंडित संजिवनी विद्येचा विशारद असतो आणि त्या निर्जीव सिंहामध्ये प्राण फ़ुंकून त्याला जिवंत करायला सिद्ध झालेला असतो. त्याची विद्या किती खरी त्याच्याशी या अडाण्याला कर्तव्य नसते. परंतू, ती खरीच असेल, तर त्यातून जिवंत होणारा सिंह चौघांचेही हाडूक शिल्लक ठेवणार नाही, याच्या भितीने तो अडाणी भेदरलेला असतो. म्हणूनच तो आपल्या अडाणी व्यवहार ज्ञानाच्या हवाल्याने; त्या महान पंडितांना वास्तवाची जाणिव करून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असतो. पण त्याचे ऐकणार कोण? आपल्या बुद्धीची झिंग चढलेल्या त्या पंडितांना थांबवणे अशक्य होते. कारण त्यांना आपल्या बुद्धीची नशा चढलेली होतीच. पण त्यापेक्षाही आपल्या या गावंढळ मित्राच्या अज्ञानाची किंव येत होती. त्याच्या ज्ञानाच्या ‘सांस्कृतिक दारिदयाची’ दिव्य मराठीच्या संपादकाप्रमाणे दया येत होती. त्यांनी अडाणी मित्राला बाजूला ढकलून आपल्या विद्येचा प्रयोग हाती घेतला, तेव्हा त्याने काही क्षण सवड द्यायची गयावया केली. फ़िदीफ़िदी हसत त्यांनी काही वेळ प्रयोग लांबवला. तेवढ्यात तो अडाणी जवळच्या एका उंच झाडावर चढून बसला. मग काय व्हायचे ते झाले.

   तिसर्‍या पंडिताने आपल्या संजिवनी विद्येचा प्रयोग यशस्वीरित्या त्या निर्जीव सिंहाच्या सांगाड्यावर केला आणि तो खरेच जिवंत झाला. ते पाहून अडाण्याला घाम फ़ुटला. स्वत: झाडावर सुरक्षित असतानाही, ओरडून त्याने आपल्या बुद्धीमान मित्रांना पळायला विनवण्या केल्या. पण ते आपला प्रयोग व ज्ञान किती महान आहे, त्याचीच आत्मस्तुती करीत तिथेच थांबले होते, भानावर येणार्‍या सिंहाचे निरिक्षण करत होते. संजिवनीने नवे जीवन प्राप्त झालेला तो वनराज झोपेतून उठल्यासारखा आळोखेपिळोखे देत उठला. त्याने मस्त एक जांभई दिली. घसा साफ़ करण्यासाठी गर्जनाही केली. मग त्याचे लक्ष समोरच्या त्या तिघा पंडीतांकडे गेले. बर्‍याच दिवसांचा तो भुकेला वनराज मग त्यांच्यावर चाल करून गेला. आपणच त्याला घडवला व जीवदान दिले आहे, असला बौद्धिक युक्तीवाद त्याच्या समोर करत; ते त्याच्या क्षुधाशांतीचे भोजन बनून गेले. बिचारा अडाणी मित्र झाडावर सुरक्षित जागी बसून त्या बुद्धीमान विद्वान मित्रांची ती बौद्धिक शोकांतिका निमूट बघत होता. आपण त्यांना वाचवू शकलो नाही, याचे त्याला खुप वैषम्य वाटले. पण त्याच्या हाती होतेच काय? पुढला दिवस उजाडून मावळला तरी तो झाडावरून उतरला नाही. तिसर्‍या दिवशी माणसांच्या बोलण्याची चाहुल लागली, तेव्हा तो सावधपणे झाडावरून उतरला. जंगलाच्या त्याच बाजूने एक आचार्य चालले होते. ते तिथेच थबकले आणि तिथे पडलेली ताजी हाडे पाहून, निरिक्षण करून त्या अडाण्याला म्हणाले, हे तीन महापंडित होते कारे? ज्यांची शिकार एका मेलेल्या सिंहाने केली? ज्याला त्यांनीच साध्या हाडांपासून घडवला होता? आता त्या अडाण्य़ाला चक्कर आल्यासारखे वाटले. गुरूदेव तुम्हाला कसे ठाऊक? त्याने विचारले, तर गुरूदेव म्हणाले, मीच त्या पंडितांना विद्यादान करून पस्तावलो, म्हणुनच ज्ञानार्जन पुर्ण झाल्यावर त्यांना निरोप दिल्यावर त्यांचे भविष्य बघून ठेवले होते. शेवटी तेच खरे ठरले. कमावलेली बुद्धी व ज्ञान कुठे वापरावे व वापरू नये, या्चा विवेक सुटलेले ज्ञानी अधिक मुर्ख असतात. समाजाला अधिक धोकादायक असतात. तेवढा गुरूंचा उपदेश घेऊन माघारी गावी परतलेल्या त्या अडाण्याची गावकर्‍यांनी विचारपूस केली. मग तो प्रत्येकाला शिकण्यातले व ज्ञानार्जनातले धोके सांगायचा. ही घटना सांगायचा आणि बजावायचा, की शिकलो असतो, विद्वान झालो असतो, तर त्या सिंहाकडून संपलो असतो. अडाणी राहिलो बरे झाले बुवा. आज आपल्या समाजात व देशात बुद्धीमान म्हणून मिरवणार्‍या बहूतांश शहाण्यांना तरी कोण्त्या आगीशी वा श्वापदाशी आपण संजीवनीचा प्रयोग खेळतोय, याचे भान उरले आहे काय? त्यांना देशातील व्यवहारी जनता अडाणीच वाटते ना? त्याबद्दलचा उहापोह उद्याच्या अंकात करू या.     ( क्रमश:)
भाग   ( ५१)    ९/१/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा