मंगळवार, ३१ जुलै, २०१२

असमर्थांच्या ‘बाळ’बोधावर ‘प्रकाश’झोत


   नशा ही चमत्कारिक बाब असते. जेव्हा आरंभी माणुस नशा करतो तेव्हा नशा करणे त्याच्या आवाक्यातली गोष्ट असते. पण जसजसा माणुस नशेच्या आहारी जातो, तसतशी नशाच त्याच्यावर आधिपत्य गाजवू लागते. नशेतून बाहेर पडणेच त्याला अशक्य होऊन जाते. कारण अशा अतिरेकी नशा करणार्‍यासाठी नशेत रहाणेच एक सामान्य बाब बनून जाते. नशा उतरली मग त्याचा जीव घाबराघुबरा होऊ लागतो. त्याला अस्वस्थ वाटू लागते. दारूची नशा करणार्‍याची अशी स्थिती झाली, मग त्याला अल्कोहोलिक म्हणतात. म्हणजे त्याने नशा केली आहे, की नाही तेच तुम्ही समजू शकत नाही. त्याचे कारण मोठेच विचित्र आहे. जेव्हा असा माणुस खरेच नशेत असतो; तेव्हा त्याने नशा केली आहे ते तुमच्या लक्षातही येऊ शकत नाही, इतका तो शहाण्यासारखा वागत असतो. पण त्याच्या तोंडाला तर दारुचा वास येत असतो. मग तुम्हाला आश्चर्य वाटते की याच्या तोंडाला तर वास येतोय. मग हा शुद्धीत कसा? कारण भरपुर नशा केल्याशिवाय तो जगूच शकत नाही. कायम नशेत रहाणे हेच त्याच्यासाठी सामान्य जीवन होऊन जाते. नशा उतरली मग त्याचे हातपाय थरथरू लागतात, त्याचा तोल जाऊ लागतो. कारण दारूमुळे नशा होण्याच्या तो पलिकडे गेलेला असतो. नशेत असणे हीच त्याच्यासाठी शुद्धीत असण्यासारखी सामान्य स्थिती असते. आणि अशी स्थिती दारू किंवा अन्य कुठल्या नशेच्या आहारी गेलेल्यांची अवस्था असते असेही समजण्याचे कारण नाही. अगदी शहाणी वा विचारी माणसे देखिल अशी "असामान्य" असू शकतात. त्यांना कुठली नशा असेल व कुठल्या नशेच्या आहारी ती माणसे गेली आहेत, त्यावर परिणाम अवलंबून असतात. ज्येष्ठ पत्रकार किंवा जाणकार म्हणुन आपण टिव्ही वाहिन्यांवर बघतो, त्यातही अशी अनेक माणसे मी सांगू शकेन. किंबहूना व्यसनाधीनता या विषयावर लिहित असताना विरंगुळा म्हणुन संध्याकाळचा टिव्ही बघताना, मला त्याची प्रथमच जाणीव झाली म्हणायला हरकत नाही.

   मागल्या आठवड्यात मी व्यसनावर सलग लेखन करत होतो, तेव्हाच अण्णा टिमचे नवे आंदोलन दिल्लीत जंतरमंतर येथे चालू झाले. त्यावर मग वाहिन्यांवर चर्चा होणे अपरिहार्यच होते. त्यात मग नेहमीचेच विशेष पाहुणे आणणेही भागच होते. त्याप्रमाणे आजचा सवालमध्ये एक आपल्याच वैचारिक नशेत वावरणारे गृहस्थ मला बघावे लागले. त्यांचे नाव प्रकाश बाळ. समोरचा माणुस नशेत असला मग आपण नेहमी त्याच्याशी सावध बोलतो किंवा वागतो, तशीच गलका चुपकर त्या दिवशी स्वत:च चुप होती. न जाणो नशेत बाळाने तिथेच कॅमेरासमोर फ़टकावले तर?

   विषय होता अण्णांच्या आंदोलनाला कॉग्रेसकडुन मिळणारी वागणूक. पण तिथेही कॉग्रेस कॉग्रेस कशाला म्हणता असाच प्रतिप्रश्न प्रकाश बाळ एन्कर असलेल्या गलका चुपकर यांना पुन्हा पुन्हा विचारत होते. पण नेहमी अन्य पाहुण्य़ांचा गलका गप्प किंवा चुप्प करणार्‍या धुपकर त्या दिवशी मात्र बाळासमोर स्वत:च चुप होताना दिसल्या. विषयच जर कॉग्रेसने अण्णांच्या उपोषणाला दिलेली वागणूक असेल, तर चर्चेत कॉग्रेसबद्दलच बोलले जाणार ना? पण कायम भाजपा व संघपरिवाराला शिव्याशाप देण्याच्या नशेत रममाण होणार्‍या बाळाला ते कळावे कसे? ते आपल्याच नशेत तिथे भाजपा व संघाच्या नावाने शिव्यांची लाखोली वहात होते. पण गलका चुपकर भयभीत होऊन त्यांना चुप करू शकत नव्हत्या. मला त्या दिवशी प्रथमच तिचे नाव अलका धुपकर आहे याची ग्वाही मिळाली. त्याबद्दल मी मनोमन प्रकाश बाळ यांचे आभार मानले. ‘अण्णांचं आंदोलन हाताळण्यात काँग्रेस पुन्हा चूक करतंय का ?’ हा चर्चेचा विषय असेल तर त्यात कॉग्रेस किंवा भाजपाच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा कसा येऊ शकतो? आणि समजा कॉग्रेसवर अन्याय होतच असेल त्या चर्चेत तर त्याचा बचाव मांडायला त्याच चर्चेत त्या पक्षाचे प्रवक्ते अनंत गाडगीळ हजर होते. पण त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ पत्रकार म्हणून हजेरी लावणारे प्रकाश बाळ चर्चा भाजपाच्या अंगावर ढकलायला उतावळे झालेले होते. सवाल भ्रष्टाचाराचा नव्हता किंवा कुठल्याही पक्षाशी संबंधित नव्हता. अण्णांच्या आंदोलनाची सरकार चालवणार्‍या कॉग्रेसकडून कशी हाताळणी होते आहे, असा विषय होता. त्यात भाजपाला आणायचे वा ओढायचे काहीच कारण नव्हते. अगदी कॉग्रेस प्रवक्ते असून अनंत गाडगीळसुद्धा भाजपावर बोलत नव्हते. पण बाळ यांना कसली शुद्ध नव्हती ना? त्यांच्यासारख्यांना भाजपा किंवा संघ परिवाराच्या द्वेषाची इतकी नशा चढलेली असते, की कुठल्याही विषयात ते भाजपा-संघाला ओढून आणणारच. आणि त्यांना तुम्ही थांबवायचा प्रयत्न केला तर अट्टल दारुड्याप्रमाणे ते तुमच्यावर हल्ला सुद्धा करू शकतात. कारण ती त्यांची नशा असते आणि नशाबाज माणसाला अडवले, की तो चवताळतो. त्यामुळेच असेल, त्यांनी अलका धुपकर या एन्करलाच दमदाटी केली, तरी ती बिचारी गप्प राहिली.

   नुसती गप्प राहिली नाही तर बाळ काय बोलतात वा सांगतात, त्याकडे शहाण्यासारखे  दुर्लक्ष करून तिने चर्चा पुढे ढकलण्याचे प्रसंगावधान राखले. ज्यांना अजून त्याची खातरजमा करायची असेल, त्यांनी कायबीइन लोकमतच्या वेबसाईटवर जाऊन तो कार्यक्रम प्रत्यक्ष बघायला व ऐकायला हरकत नाही. छान मनोरंजन होऊ शकेल. व्यसनाधीनता व नशाबाजी यातून मी थेट अशा बौद्धिक चर्चेमध्ये कुठे घुसलो; असे कोणाला वाटू शकेल. तर नशा ही अनेक प्रकारची असते. नशा ही माणसाला वेडगळ वागायला व बोलायलाही भाग पाडत असते. आणि विशेष म्हणजे जेव्हा माणूस नशेत धूंद व मग्न असतो तेव्हा, त्याला आपणच जगातले एकमेव शहाणे आहोत असे भास होत असतात. ते व्हायला हरकत नाही. पण ते भास तो स्वत:पुरते ठेवील तर काहीच बिघडत नसते. पण तसे कधीच होत नाही. नशा चढलेली माणसे आपल्या मुर्खपणाला शहाणपण सिद्ध करण्यासाठी खुप आसुसलेली असतात. मग ते मोठ्या तावातावाने आपला मुर्खपणा टाहो फ़ोडून जगाला सांगू पहातात. प्रकाश बाळ त्यापैकीच एक वैचारिक नशाबाज आहेत. मग कायबीइन लोकमतवर थेट प्रक्षेपण चालू असतांनाची संधी ते कशाला सोडतील? मला तेव्हा बिचार्‍या अलका धुपकरची दया आली. आपला पाहुणा बेताल व बेभान होतोय याची जाणिव झाल्याने तिने आधी बाळकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयास केला. मग त्यांना कमीतकमी बोलण्याची संधी दिली. पण बाळ तर पुर्ण धुंदीत होते. त्यांनी धुमशान घालण्याचा चंगच बांधला होता. म्हणुनच त्यांनी थेट अण्णांवरच तोफ़ डागली. अण्णांचा अनुभव कसला? एका गावापुरते त्यांचे काम आहे, देशाचे प्रश्न त्यांना कधी समजलेलेच नाहीत. वगैरे वगैरे मुक्ताफ़ळे ते उधळत राहिले.

   अण्णांचा अनुभव व काम एका गावापुरतेच आहे, यात शंकाच नाही. पण ते गाव याच पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे, तिथे घडलेले बदल आपण डोळ्य़ांनी बघू शकतो, त्याचे अनुकरण अनेक गावांनी, संस्थांनी केलेसुद्धा आहे आणि तसेच परिणाम दिसून आले आहेत. पण असमर्थ प्रकाश बाळ यांचे काय? देशाच्या व्यापक समस्या. प्रश्नावर ते अनेक वर्षे भाष्य करत आहेत, उपाय सुचवत आहेत. त्यांच्या प्रत्येक उत्तर व उपायाचा बोजवारा उडालेला जग बघते आहे. कारण प्रकाश बाळ किंव त्यांच्यासारखे समाजवादी, सेक्युलॅरिझमचे नशाबाज जे उपाय, उत्तरे सांगत असतात, ते केवळ त्यांना नशेत झालेले भास आहेत. संपुर्ण पृथ्वीतलावर ते उपाय वा उत्तरे यशस्वी झाल्याचे एकही उदाहरण नाही. अण्णा जे बोलतात ते त्यांनी एका गावात तरी करून दाखवले आहे. प्रकाश बाळ वा त्यांच्यासारखेच जे धुंदीत पांडीत्य झाडणारे वाहिन्यांवर आमंत्रित केले जातात, त्यांनी त्यांच्या विद्वत्तेचा एकतरी प्रत्यक्ष प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे काय? आज आंदोलनात अण्णांचा अनुभव कमी असेल किंवा अण्णा त्यात नवे असतील. पण जे काही करत आहेत ते त्यांच्या स्वत:च्या बुद्धीने व अनुभवाने करीत आहेत. त्यांना कुठल्या पुस्तकातून वा ग्रंथातून बुद्धीची उसनवारी करावी लागलेली नाही. जे काही अण्णांचे सामर्थ्य आहे ते त्यांचे स्वत:चे आहे. म्हणूनच त्यांचा दासबोध हा त्यांची स्वत:ची कमाई आहे. प्रकाश बाळ यांचा बाळबोध हा त्यांच्या बौद्धिक व बोलघेवड्या असमर्थतेतून आलेला आहे. जेव्हा त्यांची समाजवादी चळवळ त्यांच्यासारख्या पोपटपंची करणार्‍या कर्तृत्वशून्य लोकांनी संपवली, तेव्हा त्यातले अनेकजण कॉग्रेस वा अन्य पक्षांमध्ये जाऊन बांडगुळाप्रमाणे जगत आहेत. नशाबाज जसा आपल्याला चढलेली नाही असे विचारले नसताना सांगतो, तसेच मग प्रकाश बाळ व त्यांचे जुने सहकारी बौद्धिक आव आणून बोलत असतात.    ( क्रमश:)
भाग  ( ३४२ )  ३१/७/१२

सोमवार, ३० जुलै, २०१२

नशा जरूर असावी पण कशी असावी?


    खरे सांगायचे तर गुटखाबंदीच्या निमित्ताने व्यसन या विषयावर मी इतके लेख सलग लिहू शकेन की नाही; याची मला शंका होती. कारण तो विषय सुद्धा माझ्या डोक्यात नव्हता. पण गुटखाबंदीची घोषणा झाली आणि ‘पुण्यनगरी’चे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचा मला फ़ोन आला. त्यांनी आग्रहच धरला, की मी व्यसनासंबंधाने लिहावे. मी आधी त्यांचा आग्रह फ़ेटाळून लावला होता. कारण मलाच त्या विषयाचे फ़ारसे आकर्षण नव्हते. मी त्याबद्दल मुद्दाम असा विचार केला नव्हता, की त्याचा अगत्याने अभ्यासही केला नव्हता. पण मुरलीशेठ हा भयंकर हट्टी माणुस आहे. त्यांच्या डोक्यात एक विषय घुसला, मग ते त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळेच त्यांनी व्यसन विषयासाठी माझीही पाठ सोडली नाही. शेवटी मी दोनतीन लेख लिहायचे मान्य केले. पण त्याचा इतका विस्तार होईल व तेही लेख वाचकांना इतके आवडतील याची मी तरी अपेक्षा अजिबात केली नव्हती. पण पहिल्या लेखानंतरच जे फ़ोन आले तेव्हा मीही थक्क झालो. मला मुरलीधर शिंगोटे या प्राण्याचे खरेच कौतुक वाटले. स्वत: लेख किंवा बातमी लिहू न शकणार्‍या या माणसाला वाचकाची भूक कशी कळते, हे गेल्या अठरा वर्षात मला न उलगडलेले कोडेच आहे. कारण त्यांच्या वृत्तपत्र व्यवसायाची सुरूवात झाली, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. आम्ही सोबतच तो प्रयोग सुरू केला होता.

   १९९४ सालात मुरलीशेठ हा फ़क्त वृत्तपत्र विक्रेता होता. त्यापुर्वी त्यांनी तीन दशके वृत्तपत्र विक्रीत घालवली होती. ‘नवाकाळ’ लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय जेवढे निळूभाऊ खाडीलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीला आहे, तेवढेच मुरलीशेठ शिंगोटे या वाचकभक्त विक्रेत्याला सुद्धा आहे. कारण नवाकाळचे दिवस वाईट होते तेव्हापासून शिंगोटे यांनी त्याच्या विक्रीची जबाबदारी पत्करली होती. जेवढा निळूभाऊंचा आपल्या लेखणीवर विश्वास होता, तेवढाच मुरली शिंगोटे यांचा आपल्या विक्री-वितरण क्षमतेवर विश्वास होता. त्यातूनच नवाकाळ लाखाच्या आकड्यात जाऊन पोहोचला. नुसता लाखच नव्हेतर पाचसात लाखाचा पल्लाही ओलांडू शकला. मात्र त्या्मागची शिंगोटे यांची तपस्या वृत्तपत्र विक्रेते व व्यावसायिक; यांच्यापलिकडे कोणालाच फ़ारशी कल्पना नव्हती. मग एके दिवशी कालनिर्णय पंचांगकर्ते जयंतराव साळगावकर यांनी मराठी दैनिक काढण्याचा निर्णय घेतला. त्याच्याही वितरणाचे काम शिंगोटे यांनी मित्राच्या मदतीने स्विकारले. पण ते निळूभाऊंना पचले नाही. त्यांनी अचानक शिंगोटे यांच्याकडून नवाकाळच्या वितरणाचे काम काढून घेतले. त्यामुळे शिंगोटे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्याकडे दरम्यान वितरणाचे काम करणारी सव्वा दोनशे कामगाराची फ़ौज तयार झाली होती. एकेदिवशी अचानक त्या सर्वांसाठी काम उरले नाही. मग करायचे काय? त्यांना कामावरून काढून टाकायचे काय? मुरलीशेठ शिंगोटे यांना ते पटत नव्हते. पण करायचे काय? एका दिवसात तेवढ्या मोठ्या वितरणाचे काम अन्यत्र मिळणार नव्हते. तर या माणसाने चक्क स्वत:च नवे वृत्तपत्र काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याला स्वत:ला लिहिता येत नव्हते, की विश्वासातला कोणी सहकारी नव्हता. पण आपल्याला ज्यांनी वितरणाचा बादशहा बनवले त्या सव्वा दोनशे कामगारांना वार्‍यावर सोडून द्यायची त्याची तयारी नव्हती. म्हणुन त्यांनी स्वत:च नवे वृत्तपत्र काढून ते लाखाच्या संख्येने चालविण्याचा धाडसी निर्णय घेतला. व्यवहारी भाषेत सांगायचे तर तो शुद्ध मुर्खपणा होता. कारण असे नवे वृत्तपत्र काढून कित्येक लाख व को्टी रुपये बु्डवणारे अनेक दिवाळखोर लोकांनी बघितले होते. पण या माणसाला समजावणार कोण?

    १ मे १९९४ रोजी नवाकाळचे वितरण हातून गेले आणि त्याच दिवसापासून शिंगोटे यांनी ‘मुंबई चौफ़ेर’ नावाचे छोटेखानी सांजदैनिक मुंबईत सुरू केले. तेव्हा त्या माणसाच्या मुर्खपणाला हसणार्‍यात मीसुद्धा एक होतो. तसा त्यांचा आणि माझा परिचय नव्हता. पण आमचा एक समान मित्र होता अशोक शिंदे. त्यानेच मला आग्रह केला, की मुरलीला मदत कर. मीही गंमत म्हणुन त्यांच्या मदतीला गेलो. मात्र नवाकाळशी टक्कर घेण्याची किंवा लाखात वृत्तपत्र खपवण्याची शिंगोटे यांची स्वप्ने, मलाही पोरकट वाटत होती. कारण वृत्तपत्र म्हणजे लाखो रुपयाचा चुराडा करणारा जुगार असेच त्याचे अर्थशास्त्र आहे व होते. पण विक्रीवर अगाध श्रद्धा आणि वृत्तपत्र विक्रीची झिंग चढलेल्या मुरलीशेठला कोणी समजावू शकत नव्हता. त्यातून पैसे किती मिळणार किंवा कमाई किती होणार, यापेक्षा पेपर खपला पाहिजे आणि विकला गेला पाहिजे; याचीच या माणसाला भयंकर नशा होती. आणि आरंभीच्या काळात मुंबई चौफ़ेर खपू सुद्धा लागला. पण वृत्तपत्र हा असा धंदा आहे ,की खप वाढतो तसा तोटा वाढत जातो. उत्पादन खर्च आणि विक्रीतुन मिळणारा पैसा यांचे गणित न जमणारे असते. त्यातली दरी जाहिरातीच्या कमाईतून भरून काढावी लागते. पण तेव्हा तरी शिंगोटे नामक नशाबाजाला त्याची फ़िकीर नव्हती. आपणही लाखो खपाचे दैनिक काढले व चालवले. हे दाखवण्याची झिंग त्यांना चढलेली होती. मुंबई चौफ़ेरच्या यशाने ती नशा थोडी कमी होईल, अशी माझी अपेक्षा होती. पण हा माणूस कुठे थांबायला तयार होता? त्यांनी अवघ्या सहा महिन्यात सकाळचे मोठे चार पानी दैनिक काढायचा पवित्रा घेतला. त्याच वर्षी म्हणजे १९९४ च्या विजयादशमीपासून ‘आपला वार्ताहर’ नावाचे दैनिक त्यांनी सुरू केले.

   वृत्तपत्र काढणे हे आजवर भांडवलदार किंवा तत्पुर्वी यशस्वी लेखक संपादकांनी केलेले धाडस होते. पण एका विक्रेत्याने वृत्तपत्र काढून यशस्वी करणे, हा खरेच चमत्कार होता. आज त्या माणसाने कुठलीही भांडवली ताकद पाठीशी नसताना सहा दैनिकांचा पसारा उभा केलेला आहे. मराठीप्रमाणेच हिंदी व तामी्ळ व कानडी भाषेतील दैनिकेही त्यांच्या ताफ़्यात आहेत. हे सर्व त्यांनी का करावे? पैसा मिळवण्यासाठी, पैसा कमावून चैन-ऐष करण्यासाठी, असे मी तरी नक्कीच म्हणू शकत नाही. कारण मी त्या माणसाला अठरा वर्षे ओळखतो. जेवढा पैसा मिळवला तो पुन्हा त्याच वृत्तपत्राच्या व्यवसायात त्याने गुंतवला आणि त्याच व्यवसायाचा व्याप वाढवत नेला आहे. पण त्या माणसाची नशा काही आटोक्यात येताना दिसत नाही. मी त्याला भूक म्हणत नाही. ती शिंगोटे नामक मा्णसाची नशाच आहे. जसा नशाबाज माणुस कितीही नशा झाली म्हणुन समाधानी होत नाही, तर पुढले पल्ले गाठायला आसुसलेला असतो, तसाच हा मुरलीशेठ शिंगोटे नामक माणूस वृत्तपत्र नावाच्या व्यसनाने पछाडलेला आहे. कोणाला माझ्या या भाषेचे वा उपमेचे आश्चर्य वाटेल. व्यवसाय किंवा धंद्याला व्यसन का म्हणावे? तर शिंगोटे तसाच झिंग चढलेला माणुस आहे. पण त्याच्या या नशेने किती चांगले काम केले आहे बघा. त्याच्या या नशेने किमान तीनचार हजार लोकांना थेट रोजगार मिळवून दिला आहे. त्याशिवाय त्याच्याशी संबंधीत आणखी काही लोकांना उदरनिर्वाहाचे साधन दिले आहे. या माणसाला अशी नशा नसती किंवा वृत्तपत्र विकण्याची इतकी उत्कट झिंग नसती, तर या लोकांचे कल्याण झाले असते काय?

   गेल्या वर्षभरात हे दैनंदिन सदर लिहितांना मला ज्यांचे फ़ोन आले व ज्यांनी माझ्या सडेतोड लिखाणाबद्दल माझे कौतुक केले, त्यांना मी स्पष्टच सांगत आलो, की कौतुक करायचे तर मुरलीशेठ शिंगोटे यांचे करा. कारण मी आयुष्यभर असेच लिहित आलो. पण जेवढे लेखन स्वातंत्र्य किंवा अविष्कार स्वातंत्र्य मी शिंगोटे यांच्या वृत्तपत्रातून उपभोगू शकलो, तेवढे क्वचितच अन्यत्र मला मिळू शकले असेल. आज एकूणच माध्यमांवर भांडवलदारी विळखा घट्ट झाला असताना खर्‍या अर्थाने स्वतंत्र वृत्तीने स्वयंभू पत्रकारिता चालवण्याचे श्रेय एकट्या शिंगोटे यांना द्यावे लागेल. कारण आज स्वयंभू वृत्तपत्रे संपली आहेत आणि खरेच वाचक वा जनतेच्या हिताची जपणूक करणारी पत्रकारिता लयास चालली आहे. अशावेळी भांडवलदारीला शरण न गेलेले माध्यम म्हणुन शिंगोटे हा बुरूज बनून ठामपणे उभा राहिला आहे. त्याचे कारण वृत्तपत्र खपवायची त्याची नशा हेच आहे. या माणसाला वृत्तपत्र खपवण्याची नशा नसती तर आज एवढेही स्व्यंभू वृत्तपत्र शिल्लक राहिले नसते. म्हणुनच मी त्याच्या या नशेचे स्वागत करतो. नशा असावी तर अशी. झिंग जरूर असावी, पण अशी. ज्या नशेने किंवा झिंग असण्याने लोकांचे नुकसान होत नाही तर भलेच होते. शेवटी नशा किंवा झिंग म्हणजे तरी काय असते? जगापेक्षा वेगळे काही करून दाखवण्याची अनिवार इच्छा हीच नशा असते. ज्यातून आपले वेगळेपण दिसेल, असे काही करण्याची ओढ म्हणजे झिंग असते. कर्तृत्व, पुरूषार्थ म्हणुन जगाचे लक्ष वेधले जाण्याची इच्छा म्हणजेच नशा असते. मित्रांनो नशा जरूर करा, पण कर्तृत्व गाजवण्याची नशा असावी, नशा शिंगो्टेसारखी असावी. जी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा चमत्कार घडवून दाखवते.   ( क्रमश:)
भाग  ( ३४१ )  ३०/७/१२

रविवार, २९ जुलै, २०१२

कल्याणकारी सरका्र, की दारूचा गुत्तेवाला


   सत्यमेव जयते या आपल्या मालिकेत आमिरखान याने मद्यपानाचाही विषय घेतला होता. त्यातले अनेक गंभीर मुद्दे त्याने मांडले नसले तरी निदान त्याने ह्या विषयाला हात घातला हेसुद्धा कमी नाही. त्यात त्याने अनेकांना त्यांचे अनुभव कथन करायला बोलावले होते. त्यामध्ये प्रसिद्ध पटकथाकार व कवि जावेद अख्तर यांचाही समावेश होता. त्यांनी आपले अनुभव सांगताना व्यसनासंबंधी जे चिंतन व्यक्त केले ते खरेच कौतुकास्पद होते. स्वत: जावेद अख्तर अनेक वर्षे स्वत: नशाबाज होते. आज त्यांनी त्या व्यसनापासून मुक्ती मिळवली आहे. पण त्यापासून मुक्त होणे एक गोष्ट आहे आणि त्याबद्दल चिंतन करणे वेगळा विषय आहे. आपण केवढे पाप करत होतो असे त्यांनी भाबडेपणाने सांगितलेले नाही. केवळ पश्चात्ताप झाला म्हणून त्यांनी दारू सोडली असे नाही. माणुस त्यात कसा ओढला जातो आणि त्यासाठी विविध भ्रम कसे कारणीभूत होतात, त्याचेही अख्तर यांनी आपल्या त्या अल्पशा मुलाखतीमध्ये छानपैकी विवेचनही केले. आपल्या व्यसनाधीनतेचा कुठलाही बचाव न मांडता त्यांनी जणू गुन्ह्याचा कबुलीजबाबच प्रेक्षकांसमोर सादर केला. ज्या सहजतेने त्यांनी विषय मांडला आणि नशेविषयीच्य भ्रमाचा भोपळा फ़ोडला, ते काम कौतुकास्पदच होते. लोकांना नशेपासून परावृत्त करू बघणार्‍या कुठल्याही समाजसुधारकापेक्षा जावेद अख्तर यांचे ते आत्मकथन अधिक प्रभावी होते.

   आज जावेद अख्तर मोठा अमणुस आहे. यशस्वी कथाकार व गीतलेखक आहे. सामाजिक घडामोडीमध्ये सहभागी होणारा संवेदनशील कार्यकर्ताही आहे. त्यांना प्रतिभावान कवि लेखक म्हणूनही ओळखले जाते. बुद्धीमंत म्हणुनही त्यांची ओळख आहे. पण आपल्या त्याच प्रतिष्ठेची टिंगल करत जावेद अख्तर म्हणाले, खरेच का मी इतका बुद्धीमान व हुशार आहे? असतो तर दारू भयंकर वाईट असते, ही साधी बाब मला समजायला तब्बल सत्ताविस वर्षे का लागावीत? माणुस हुशार असेल तर त्याला लगेच अशा गोष्टी कळायला हव्यात. हे हसत हसत सांगताना त्यांनी व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या माणसाची बुद्धी कशी काम करेनाशी होते, त्याचाच साक्षात्कार लोकांना घडवला. कळत असते, समजत असते, पटतही असते. पण बुद्धी व्यसनापुढे शरणागत होते. व्यसनाधीन झालेला माणुस आपले माणूसपणही विसरून जातो. अशा व्यसनाकडे नव्याने माणुस कसा आकर्षित होतो, तेही त्यांच्याकडुनच समजून घेण्यासारखे आहे. चित्रपटातला नायक हिरो कुठल्याही निराशेतून बाहेर पडण्यासाठी नशेच्या आहारी जाताना दाखवलेला असतो. मग तो त्या नशेत मोठे अर्थपुर्ण डायलॉग बोलतो. पण वास्तवात नशापान केलेला माणुस कधीच तसा छान छान संवाद व शब्द बोलत नाही. दारूडा नेहमी अत्यंत घाणेरडी भाषा बोलतो, अत्यंत गलिच्छ वर्तन करतो. जे कधी चित्रपट वा कथेमध्ये दाखवले जात नसते. त्यामुळे त्या नशेचा आणि वास्तवाचा काडीमात्र संबंध नसतो. दारू माणसाला पशू बनवते, त्याच्यातले माणूसपण हिरावून घेते. हा अख्तर यांचा अनुभव महत्वाचा आहे.

   नशा माणुस करतोच कशाला? कोणी म्हणतात, शिणवटा, थकवा घालवण्यासाठी वा मजेसाठी माणूस नशा करतो. पण खरेच त्यातून थकवा जातो का? अंगात आलेली मरगळ नशा केल्याने कमी होत नाही, की संपत नाही. पण नशेची झिंग आली, मग त्या थकव्याचा विसर पडत असतो. मग नशा अंगात उसने अवसान आणत असते. त्यामुळे शरीरात त्राण नसले तरी माणुस त्या अवसानामुळे शरीराला न पेलवणारे काहीबाही करत असतो. म्हणजेच थकवा संपणे राहिले बाजूला, उलट थकलेल्या शरीराला आधिक कष्टात लोटून दिले जात असते. अनेकजण नशापान म्हणजे बॅटरी रिचार्ज करतो असे म्हणतात व समजतात. पण वास्तवात ते संपत आलेल्या बॅटरीची अधिकच नासाडी करत असतात. ही नशापानाची एक बाजू झाली. दुसरी बाजू आहे ती मजा किंवा ऐष म्हणुन होणारे नशापान. ज्यांच्या अंगात हिंमत किंवा क्षमता नसते, असे न्युनगंडाने पछाडलेले लोक अंगात नसलेला आवेश दाखवण्यासाठी नशेचा आधार घेत असतात. जे बोलायही हिंमत नसते, करायचे धाडस नसते, ते करायचे तर त्यांना नशा करावी लागते. म्हणजेच आपण जे आहोत त्यापेक्षा वेगळेच कोणी आहोत, असे दाखवण्यासाठीही नशेचा आश्रय घेतला जात असतो. मात्र त्यामुळे येणारा आवेश किंवा धाडस दिखावू किंवा तात्पुरते असते. नशा उतरली, मग ते शौर्य कुठल्या कुठे गायब होते आणि आपण जे काही केले ते दारूच्या नशेत केले अशा गयावया तोच नशाबाज करू लागतो. त्यामुळे मग त्याच्यात कायमचा न्युनगंड घर करून रहातो.

   कुठल्याही कारणाने माणुस नशा करू लागला मग त्याचे व्यसन होते. कारण तुम्ही कोणत्या कारणाने नशा करता त्याच्याशी तुमच्या शरीरातील पेशींना कर्तव्य नसते. त्यांना जी रसायने किंवा द्रव्ये सेवनासाठी पुरवली जातात, त्याची त्यांना सवय लागत असते. आणि त्यांना त्याची सवय लागली, मग दारू किंवा नशा पचवण्याची कुवत नसली, तरी ती नशा करावीच लागत असते. तिथे तुमची बुद्धी वा कारणमिमांसा काम करत नाही. त्या नशाबाज पेशींची हुकूमत तुमच्या मनावर आणि पर्यायाने तुमच्या बुद्धीवर चालू होते. अन्य वेळी लोकांशी शांतपणे समजूतदारपणे बोलणारा व्यसनी माणूस त्याच्या नशेची वे्ळ झाली मग तर्कहीन बोलू लागतो, आक्रमक होतो. अगदी वेडसर वागू लागतो. मग अशा नशा किंवा व्यसनाची माणसाला गरजच काय. शेकडो अशी माणसे आपण आपल्या आसपास बघू शकतो, की त्यांना कुठलेही व्यसन नसते. म्हणजेच संपुर्ण आयुष्य त्यांनी निर्व्यसनी म्हणुन निरोगी जगलेले असते. मग इतरांना व्यसनाची गरजच काय असते? तर अकारण कुठ्ल्यातरी मोहात सापडून वा कुणाच्या आग्रहाला बळी पडून अथवा गंमत म्हणुन केलेल्या धाडसातून व्यसनाच्या सापळ्य़ात माणुस गुरफ़टत जात असतो. आणि गुरफ़टत जातो, तसतसा त्याच्यातले माणुसपण गमावत असतो. अशा मस्तीची एक मजेशीर गोष्ट जावेद अख्तर यांनी कथन केली. इतर बाबतीत ज्याला पोरकट म्हणता येईल अशा गोष्टी नशाबाज फ़ुशारकी मारताना आपला पुरूषार्थ म्हणुन अभिमानाने सांगत असतो.

   नुकताच नशापान करू लागलेला एखादा प्याला दारू पित असेल तर चारपाच वर्षांनी भेटल्यावर संपुर्ण बाटली दारू पचवतो असे अभिमानाने सांगतो. पण त्याचा हा दावा किती हास्यास्पद असतो? आज दुध प्यायला लागलेला कोणी चार वर्षांनी भेटला तर दहा वीस प्याले दुध पितो असे सांगणार नाही, मग दारूच्याच बाबतीत असे का व्हावे? एका मर्यादेपर्यंत मद्यप्राशन झाले, मग त्याची अधिक नशा होत नाही. पण तरीही पिणारा अधिकच पीत रहातो. कारण त्याला काय करतो त्याची शुद्धच राहत नाही. तो मुर्ख व वेडगळपणाने वागू लागतो. आपण जगासमोर वेडगळ ठरावे किंवा गलिच्छ ठरावे, असे त्यालाही वाटत नसते. पण तसे होणार हे माहित असूनही तो स्वत:ला आवरू शकत नाही. माणसाने स्वत:ला असे पशू का बनवून घ्यावे? खरे पहिल्यास नशेमागचा हेतू आपले खोटे मोठेपण दाखवण्याचा असतो. पण होते नेहमी उलटेच. फ़ुशारकी बाजूला पदते आणि लोकांसमोर तो नशाबाज हास्यास्पद ठरतो. त्याची गरज काय? त्यात कसली प्रतिष्ठा असते? आपण असे पशू का बनतो? तर आपण व्यसनाच्या आहारी गेलेलो असतो. नशेचे गुलाम बनत असतो. आणि मग पर्यायाने आपण मानवी समाजात वागायला व जगायलाही नालायक बनून जातो. स्वत:ला त्रास करून घेतच असतो, पण त्याचवेळी इतरांनाही त्रास देऊ लागतो. अवतिभोवतीच्या लोकांसाठी आपण एक त्रास किंवा समस्या बनून जातो.

   म्हणूनच मद्यपान किंवा दारू ही समाजातील एक विकृती आहे. सरकारने सुसंस्कृत व सुदृढ समाज निर्माण करताना अशा विकृतीला पायबंद घालण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पण त्याऐवजी तेच सरकार त्याच विषाच्या उत्पादन व विक्रीतून मि्ळणार्‍या उत्पन्नाकडे आशाळभूतपणे बघत असेल तर त्याला समाज कल्याणकारी सरकार म्हणता येईल काय? गुटख्याचे उत्पादक धारिवाल जसे ‘माझा धंदा आहे’ म्हणुन व्यसनाधीनतेकडे पाठ फ़िरवतात, त्याच्यापेक्षा आजचे सरकार दारूच्या बाबतीत वेगळे काही करते आहे काय? लोक मरतात मरू देत, लोकांचे आरोग्य बिघडते तर बिघडू देत, लोकांचे संसार उध्वस्त होतात, तर होऊ देत. आम्हाला तिजोरीत जमणार्‍या पैशाशी कर्तव्य आहे, असे कुठले कल्याणकारी सरकार म्हणू शकते का? आणि म्हणत असेल तर त्याला कल्याणकारी सरकार म्हणता येईल काय? गुटखाबंदीचे ढोल वाजवणार्‍या सरकारची नियत खरी व चांगली नाही, हेच मला सांगायचे आहे. तेवढ्य़ासाठीच हा व्यसनमुक्तीचा विषय थोडा तपशीलाने मांडावा लागला. माणुस रोगी होऊ नये म्हणत गुटखाबंदी करणार्‍या सरकारला माणसाचा पशू करणार्‍या नशेवर बंदी घालायची इच्छा होत नाही, मग दारूचा गुत्तेवाला, हातभट्टी विकणारा आणि मंत्रालयात बसून मद्यातून मिळणारे उत्पन्न मोजणारा यात कुठला फ़रक उरला?     ( क्रमश:)
भाग  ( ३४० )     २९/७/१२

वसंत ढोबळेना बदनाम करणारे सभ्य होते काय?


   मध्यंतरी मुंबईत वसंत ढोबळे नामक पोलिस अधिकार्‍याच्या विरोधात वृत्तवाहिन्यांवर एक मोहिमच उघडली गेली होती. हा माणूस कुठल्याही पब किंवा बारमध्ये घुसतो आणि पोलिस असूनही एखाद्या गुंडासारखा घुमाकुळ घालतो, असे चित्र रंगवण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे झाला होता. नशीब म्हणायचे, की मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनाईक मात्र ढोबळे यांच्यामागे ठामपणे उभे राहिले. त्यांनी नुसते ढोबळे यांच्या आक्रमक पवित्र्याचे समर्थनच केले नाही, तर त्यांनी आयुक्तांच्याच मार्गदर्शनानुसार ही कार्यवाही होत असल्याचा निर्वाळाही दिला. तर असे हे ढोबळे काय धुमाकुळ घालत होते? जिथे चोरट्या मार्गाने नशेबाजांचे अड्डे चालतात, तिथे ढोबळे जाऊन धाडी घालत होते. तिथे सापडतील त्यांची वरात काढली जात होती. मग तिथे ज्या बड्या प्रतिष्ठीतांची हजेरी लागत होती, त्यांनीच वाहिन्यांना ढोबळे यांच्या बदनामीची सुपारी दिली होती काय? नसेल तर वाहिन्यांना व्यसनाधीन धनवंतांच्या स्वातंत्र्याची इतकी फ़िकीर कशाला वाटत होती? जर अशा कारवाया ढोबळे गुंडाप्रमाणे करत होते, तर त्यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेण्याइतके हे धनवंत सबळ व सक्षम जरूर आहेत. पण त्यापैकी कोणीही न्यायालयात जाण्याचा विचारही केला नाही. साधी पोलिसांकडे त्यांच्याच एका गुंडगिरी करणार्‍या अधिकार्‍याच्या विरोधात तक्रारही नोंदवली नाही. त्यापेक्षा त्यांनी वाहिन्यांकडे जाणे पसंत केले. हा चमत्कार नाही काय? त्याचे कारणही समजून घेण्याची गरज आहे. तक्रार करायला त्यांना तोंड नव्हते. कारण आपण गुन्हा करत असताना, पोलिस घुसखोरी करून पकडतात, असे कुठल्या तोंडाने कोर्टाला सांगणार? त्यापेक्षा त्यांनी वाहिन्यांकडून पोलिस कारवाईचा बागुलबुवा करण्याची पळवाट शोधली.

   इथे माध्यमांच्या हेतूची शंका घ्यावी लागते. ढोबळे यांनी पोलिस म्हणुन गुन्हा पकडताना कुठल्या सभ्यतेची अपेक्षा माध्यमे त्यांच्याकडून करतात? जे असे प्रतिष्ठीत व वरपर्यंत हात पोहोचलेले लोक असतात, त्यांच्याशी नरमाईने वागले, मग ते थेट वर फ़ोन लावून गुन्ह्याची नोंदही होऊ देत नाहीत. म्हणुन त्यांच्या मुसक्या बांधून आधी त्यांच्यावर गुन्हा नोंदवणे अगत्याचे असते. एकदा गुन्ह्याची नोंद झाली, मग त्यात हेराफ़ेरी करणे अवघड असते. ढोबळे यांना त्यासाठीच आक्रमक पवित्रा घेणे भाग होते. आणि त्यांनी तसे करून दाखवले. मग अशाप्रकारे जिथे जिथे धाडी पडल्या, तिथे ताब्यात घेतलेल्या प्रतिष्ठीतांच्या खर्‍या चेहर्‍यावरचा मुखवटा गळुन पाडायची वेळ आली. कारण नुसते त्यांच्या विरोधात गुन्हेच नोंदवण्यात आले नव्हते, तर त्यांच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले होते. अशा रेव्ह पार्ट्यामध्ये मौजमजा करणार्‍यांच्या रक्तामध्ये अंमली पदार्थाचे अवशेष सापडले. म्हणजेच ज्यांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता, तेच खरे ठरले. पण त्यासाठी एकातरी वाहिनीने ढोबळे किंवा तत्सम पोलिस अधिकार्‍यांच्या विरोधात केलेल्या बदनामीबद्दल माफ़ी मागितली आहे काय? मग अशा वाहिन्या व त्यांच्या बातम्या कोणत्या हेतूने दिल्या जातात, असा प्रश्न निर्माण होतो. त्यांना अशा बातमा कोण द्यायला भाग पाडतो वा त्यातून काय साध्य करायचे असते, असाही प्रश्न आहे. पण त्याची उत्तरे कधीच मिळत नसतात.

   मुद्दा वाहिन्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचा नसून अशा बातम्यातून केल्या जाणार्‍या व्यसनाधीनतेच्या समर्थन व उदात्तीकरणाचा आहे. सभ्य लोकांवर पोलिसांनी अन्याय केला, असाच त्या सर्व बातम्यांचा सुर होता. जणू ढोबळे किंवा त्यांच्यासारखे पोलिस अधिकारी कुठे मंगळागौरीच्या फ़ुगड्यांचा समारंभ चालू होता आणि त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात बाधा आणायला तिथे पोहोचले; असाच त्या बातम्यांचा सुर नव्हता काय? आणि अशा बातम्यांमध्ये हल्ली एक मोठा सोज्वळ शब्दप्रयोग अगत्याने केला जात असतो. कल्चरल पोलिसिंग म्हणजे संस्कृती रक्षणाचा आव पोलिस आणतात, अशी हेटाळणी या बातम्यातुन केली जात असते. पैसे उडवण्यासाठी कुठल्या खाजगी जागेत किंवा आलिशान हॉटेलमध्ये नशापान करणे सभ्य आहे काय? अशा जागी कोणी संघटनेने हल्ले केले तर त्यांना तो अधिकार कोणी दिला, असा सवाल केला जातो. पण पोलिसच कायद्याचे अंमलदार असतील तर त्यांनी कायदा हाती घेतला असे म्हणता येत नाही, तेव्हा त्यांच्यावर संस्कृतीरक्षणाचा आरोप करायचा. संस्कृती ही एवढी मागासलेली विकृत रोगट गोष्ट आहे काय? जे लोक नशापान करायला जमतात, ते संस्कृती जपत असतात काय? स्वातंत्र्य म्हणजे नशापान करायचा, स्वैराचाराचा विशेष हक्क असतो काय? अशा नशापानानंतर जे परिणाम संभवतात, त्याची जबाबदारी कोणाची असते? अशाच रेव्ह पार्ट्या किंवा नशापानाच्या सोहळ्यानंतर आपल्या अलिशान गाड्या बेफ़ाम हाकणार्‍यांनी किती निरपराधांचे बळी आजवर घेतले आहेत? त्यांच्या नशापानाच्या अधिकाराचे समर्थन करणार्‍यांना अशा निरपराधांच्या जगण्याच्या अधिकाराची आठवण तरी असते का?

   एकीकडे अशा नशापानाला हल्ली प्रतिष्ठा मिळत चालली आहे. त्याला हे वाहिन्यांवरचे नवस्वातंत्र्यवादी खतपाणी घालत असतात. त्याचा एक धोका त्या नशाबाजांच्या बेफ़ाम गाड्या हाकण्यातून सामान्य पादचार्‍यांचा बळी जाणे हा असतोच. पण त्यातला दुसरा धोका मोठा व शक्यतो लक्षात न येणारा असतो. श्रीमंती व चैन म्हणुन मध्यमवर्गिय वा गरीब कुटुंबातले तरूण त्याकडे आदर्श जीवनशैली म्हणुन बघत असतात. त्याच श्रीमंत प्रतिष्ठीतांचे अनुकरण करू बघत असतात. "यार जीना हो तो ऐसा" असे ही व्यसनाधीनता खालच्या वर्गातील मुलांना खुणावत असते. मग गटारी, थर्टीफ़र्स्ट डिसेंबर किंवा तत्सम सोहळे अशा नशापानाचे मुहूर्त बनू लागले आहेत. रेव्ह पार्ट्या किंवा तत्सम प्रकारात पकडली जाणारी मुले, कुठल्या वयात कुठल्या मार्गाला लागत आहेत, याची कुणाला फ़िकीर आहे काय? व्यसन करण्याचे स्वातंत्र्य ही कल्पनाच चमत्कारिक नाही काय? आणि पुन्हा त्यावर कायद्याचा बडगा उगारला, तर हे वाहिन्यांवरचे दिवटे विचारणार पोलिस संस्कृतीरक्षक झालेत काय? एकप्रकारे ही प्रतिष्ठीत वा सुसंस्कृत म्हणुन मिरवणारी मंडळीच समाजात व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देत नाहीत काय? मग अशी जीवनाची ऐष करण्यासाठी काही भरकटलेली मुले कुठल्याही गुन्ह्याला प्रवृत्त होत असतात. कारण अशा मौजमजेच्या गोष्टी त्यांना खुणावत असतात. खेड्यापाड्यापर्यंत आता बार संस्कृती पोहोचली आहे. कुठल्याही तालुका गावातली तरूण मुले मद्यप्राशन म्हणजे पुढारलेपणा समजू लागली आहेत. त्याला हे वाहिन्यांचे उदात्तीकरण जबाबदार आहे. तसे नसते तर त्यांनी वसंत ढोबळे यांच्या विरोधात अशी सुपारी घेतल्यासारखी मोहिम कशाला चालवली असती?

दिल्लीतल्या बीएमडब्ल्यू किंवा जेसिका खुन प्रकरणाची पार्श्वभूमी काय होती? इथे जशा पार्ट्या चालतात, तशाच पार्ट्यामधून बाहेर पडलेल्यांनी त्या हत्या केलेल्या नव्हत्या काय? व्यसनधीनतेचे जे उदात्तीकरण वाहिन्यांच्या बातम्या किंवा चर्चेतून चालते, त्याचाच हा दुष्परिणाम आहे. कारण वयात येणार्‍या निरागस मुलांमध्ये जी बंडाची उर्मी असते, तिला अशा बातम्या व चर्चा चुचकारत असतात. प्रोत्साहन देत असतात. हिंमत देत असतात. व्यसनाची सुरूवात अशी अगदी नकळत कुतुहल किंवा उत्सुकतेपोटी होत असते. त्या उर्मी व इच्छेला निकामी करण्याची गरज आहे. व्यसन हे पाप आहे. गैरलागू आहे, अनावश्यक आहे, घातक आहे आणि त्याचवेळी त्यामुळे पोलिसांच्या तावडीत सापडण्याचा धोका आहे; अशी धारणा कोवळ्या तरूण वयात निर्माण झाली तर मुलांना व्यसनाधीन होण्यापासून रोखणे सोपे होऊ शकेल. लोकहिताचा विषय म्हणुन माध्यमांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे. त्याऐवजी माध्यमेच व्यसनी मार्गावर निघालेल्यांच्या स्वातंत्र्याचे गुणगान करू लागली किंवा त्याविरोधात कंबर कसलेल्या पोलिसांना नामोहरम करू लागली; तर पुढल्या पिढीच्या आयुष्याला किड लागणे सोपेच नाही काय? मग त्याचे दुष्परिणाम सामान्य माणसाला भोगावे लागत असतात. कधी असे बहकलेले नशाबाज रस्त्यातून मुलींना उचलून त्यांच्यावर अत्याचार करतात, तर कधी त्याच बार वा पार्टीत हजर असलेल्या मुलींच्या वाट्याला तो अत्याचार येत असतो. मुंबईच्या पश्चिम उपनगरात एका तरूणीची छेड काढल्याचा जाब विचारणार्‍या तिच्या मित्राची नशाबाजांनी भर रस्त्यात हत्या करण्याचा प्रकार अशाच संस्कृतीचा बळी होता ना? ढोबळेसारखा अधिकारी त्याच मुलीचे वा त्यांच्या मित्रांना व्यसनाधीनतेच्या हल्ल्यापासून वाचवू बघतो, हे आमच्या वाहिन्यांना कधी कळणार आहे?    ( क्रमश:)
भाग  ( ३३९ )     २८/७/१२

काळच बदलला, की व्यसन प्रतिष्ठीत झाले


   सहासात वर्षापुर्वीची गोष्ट असेल, माझ्या मित्राचा इंजिनीयर मुलगा, एक अशी गोष्ट आमच्यासमोर बोलला की मी त्याच्याकडे अचंबित होऊन बघतच राहिलो. असेच दिवस होते. श्रावण महिना अजून सुरू झाला नव्हता. तो कुठल्या तरी नामांकित माहिती तंत्रज्ञानाच्या कंपनीत नोकरी करत होता. पंचविशीत बापाच्या तुलनेत मोठा पगार मिळवत होता. बापाने तीस वर्षाच्या नोकरीनंतर जेवढा मासिक पगार मिळवला नव्हता, तेवढी मोठी रक्कम या मुलाला मिळत होती. मी त्याला लहान असतानापासून ओळखत होतो. तसा हुशार व गुणी मुलगा तो. पण त्या दिवशी त्याचे एक विधान मला खुपच धक्कादायक वाटले. आम्ही बापलोक बसलो होतो आणि घरातून निघताना त्याने सहज आपल्या पित्याला संध्याकाळी उशीर होणार असल्याची सूचना दिली. उशीर होणार होता, कारण तो आपल्या मित्रांसह गटारीला जाणार होता. गटारी म्हणजे आषाढातला शेवटचा दिवस. उद्यापासून श्रावण सुरू होणार आणि त्या महिन्यात किंवा पुढल्या चातुर्मासात मांसाहार काही लोक करत नाहीत. त्यासाठी ते तत्पुर्वी मनसोक्त मांसाहार करून घेतात अशी अमावास्या असते. मुंबईत त्याला गटारी म्हणतात. कारण मुंबईतले अस्सल दारूडे त्या दिवशी मनसोक्त दारू पिवून घेतात अशी जुनी परंपराच आहे. जणू पुढल्या महिन्याभराची किंवा चार महिन्यांची दारू एकदम पिवून घेतात म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच मुंबईत त्या आषाढी अमावास्येला गटारी हे उपनाव लागले आहे. 

   माझे बालपण मुंबईच्या गिरणगावात गेले. तिथे तर त्या काळात गटारी साजरी करणे म्हणजे अती दारू पिणारे शुद्ध हरपून चक्क गटारात पडायचे. त्यातून त्या अमावास्येला गटारी अमावास्या नाव पडल्याचे ऐकलेले आठवते. पण गिरगाव दादरसारख्या सभ्य उच्चभ्रू भागात, त्या शब्दाची हेटाळणी होत असे. कारण असे दारू पिवून झिंगणे किंवा बेफ़ाम होऊन गटारात पडणे असभ्य मानले जात होते. किंबहूना दारू पिणे हीच हलकी वा असभ्य गोष्ट मानली जात होती. चार दशकात जग इतके पुढारले की अत्यंत सुशिक्षित उच्चभ्रू वर्गात गटारी साजरी होऊ लागली. तेवढेच नाही तर सुशिक्षित मुलगा आपल्या बापाला गटारी आहे म्हणून उशीर होईल, असे बेधडक सांगत होता. त्याच्या तोंडून तो गटारी एन्जॉय करण्याचा विष्य ऐकला आणि म्हणून मी थक्क झालो होतो. मजा म्हणजे मुलाचे ते उद्गार पित्याला चकीत करू शकले नाहीत. आणि मी जेव्हा मुलगा गेल्यावर मित्राला त्या विषयावर छेडले; तेव्हा त्याने माझीच टवाळी केली. कुठल्या जमान्यात जगतो आहेस, म्हणत मलाच जुनाट वृत्तीचे ठरवले. जेव्हा बालपणी मी लालबाग परळच्या गिरणगावात जगलो, तेव्हाही कुणा मुलाला किंवा पत्नीला आपल्या घरचा प्रमुख दारू पिवून पडतो; याचा अभिमान वाटत नव्हता किंवा दारू पिण्यात कसला मोठेपणा वाटत नव्हता. दारुड्य़ाच्या कुटुंबियांनाही ते पापच वाटत होते. दारू पिणारा बाप वा भाऊ घरातल्यांची मान खाली घालण्याचे कारण होता. अगदी कष्टकरी कामगार वर्गातही ती बाब कमीपणचीच मानली जात होती. आणि आज सुशिक्षित घरातला मध्यमवर्गिय मुलगा बापाला गटारी एन्जॉय करणार म्हणून बेधडक सांगतो आहे.

   हा बदल आहे, की उलथापालथ आहे? नंतर मी एकदा त्या मुलाशी त्याबद्दल बोललो सुद्धा. तो थोडा गोंधळला. त्याला त्याच्या तशा वागण्य़ात गैर काय होते, तेच लक्षात येत नव्हते. आपण व्यसन करत नाही तर एन्जॉय करतो असा त्याचा दावा होता. आणि त्या एन्जॉयमेन्टच्या पुराव्यासाठी त्याने मला जे सांगितले ते आणखी धक्कादायक होते. त्याच्या त्या गटारीमध्ये ऑफ़िसच्या अनेक मुलीही सहभागी झाल्या होत्या म्हणे. ज्या गोष्टी आता तरूण मुलीसुद्धा सहज करतात, त्याचा इतका बागुलबुवा कशाला, असा प्रतिप्रश्न त्यानेच मला केला. मी अवाक झालो. आता तो मुलगा विवाहित आहे व एक मुलाचा बापही आहे. आता एन्जॉयमेन्ट संपली आहे आणि रोज तो रिलॅक्स होण्यासाठी घरातच एखादा पेग घेत असतो. काय करणार, कामाचा थकवा शिणवटा असतो ना? असे त्याचीच तरुण पत्नी म्हणते. अधिक मुर्ख ठरू नये म्हणून त्यांना त्याबद्दल काहीव विचारत नाही. पण जो मुलगा बापाला दाद देत नाही, तोच अशावेळी मी त्याच्या घरी असलो तर अपराधी भावनेने मला असले खुलासे देतो किंवा त्याची पत्नी त्याच्या समर्थनार्थ असली कारणे देते. मी विचारण्याची गरजच नसते. ती एन्जॉयमेन्ट त्याला इथपर्यंत घेऊन आली आहे. म्हणून तो दारूडा झालेला नाही. कोणी त्याला दारूडा म्हणू शकणार नाही. कारण त्याची शुद्ध हरपत नाही, की तो बेफ़ाम होत नाही. मात्र आता त्याला गटारीची प्रतिक्षा करावी लागत नाही. गटारी त्याच्या अंगवळणी पडली आहे. मीच मुर्ख आहे कारण मी अस्वस्थ होतो. त्याच्या पत्नीप्रमाणे आईबापांनाही त्यात काही गैर वाटत नाही.

   अशा स्थितीतून एन्जॉय करताना आयुष्य़ भटकलेले अनेकजण मी बघितले आहेत. माझे नशीब इतकेच, की मुलाच्या टाईमपासमध्ये माझा मित्र अजून सहभागी झालेला नाही. कदाचीत त्याचा नातू ती उंची गाठू शकेल. कारण आता नशापान ही एन्जॉयमेन्ट झाली आहे, पाप उरलेले नाही. माझ्यासारखा एखादा आजच्या पत्रकार मित्रांच्या बैठ्कीत गेला तर त्यांना छान शिजलेल्या भातात खडा दाताखाली यावा तसा खटकतो. आता दारू ही प्रतिष्ठेची बाब बनली आहे. जे यापासून अलिप्त असतात किंवा हट्टाने तसे अलिप्त रहातात, ते मुर्ख मानले जातात. सकाळी वा दुपारी गांधीवादाचे किर्तन करणारे कितीजण दिवस अंधारताच घसा खुप कोरडा झाला म्हणुन ओला करायला बसतात, ते मी पाहिले आहे. त्यापैकी काहीजणांन तुम्ही वाहिन्यांवर अण्णांना गांधीवाद शिकवताना ऐकता. त्यातले कितीजण गांधींच्या विचारांचा शिणवटा उतरवण्यासाठी एन्जॉय करायला बसतात, ते बघितले मग गांधी ही सुद्धा एक अंधश्रद्धा आहे व तिचे निर्मूलन करण्यासाठी हे लोक पेय हाती घेऊन बसलेत काय अशी मला शंका येते.  मुद्दा त्यांच्या व्यसनाचा नाही. मुद्दा आहे तो दारू नावाच्या व्यसनाला मिळालेल्या आधुनिक प्रतिष्ठेचा आहे. ज्यांना असे प्रतिष्ठाप्राप्त व्हायचे आहे, त्यांची गोष्ट महत्वाची नाही. त्यांच्या त्या प्रतिष्ठेमुळे जे भारावून जातात, त्यांची मला चिंता वाटते. कारण कनिष्ठ मध्यमवर्गात मग अशा प्रतिष्ठांचे अनुकरण सुरू होते. शहरांच्या गल्लीबोळात आणि अगदी लहानश्या गावातही आता बार उभे राहिले आहेत. त्यातून आयुष्य़ एन्जॉय केले जाते, की आयुष्याची माती केली जात असते? रस्त्यावर अशा नशेत बेफ़ाम गाड्या चालवून लोकांच्या पादचार्‍यांच्या जीवाशी खेळण्याची तुफ़ानी एन्जॉयमेन्ट आता नवी राहिलेली नाही. कारण आता दारूप्राशन हे व्यक्तीगत मजेचा विषय राहिलेले नाही तर इतरांच्या आयुष्याशी खेळायचा गेम बनला आहे. पण सरकारला त्याची कुठे पर्वा आहे? हजारो कोटी रुपये त्यातून उत्पाद शुल्क मिळते ना? सरकार खुश आहे, आपण खुश आहोत, कारण शेकडो जनकल्याण योजनांसाठी त्यातून कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीत येत असतात ना?

   किती सहजगत्या माणुस दारूच्या नशेत ओढला जातो, त्याचे हे मी स्वत: अनुभवलेले उदाहरण आहे. माझ्या बालपणी आम्हाला जे पाप वाटे; लोकांना अपमानास्पद वाटत असे. तेच आता एन्जॉयमेन्टचा विषय बनले आहे. पण किती लोकसंख्या अशा व्यसनाच्या विळख्यात सापडली आहे, त्याची सरकारला फ़िकीर तरी आहे काय? गुटख्याचे व्यसन जिवावरचे आहे म्हणणार्‍या सरकारला, दारूचे व्यसन व्यक्तीच्या नव्हेतर एकूणच कुटुंबाच्या आरोग्यावरचे संकट आहे, हे कळतच नसेल काय? दोन दशकांपुर्वी पुन्हा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांच्यावर राज्यात अधिक दारूची दुकाने उघडू दिल्याचा आरोप झाला होता. तर आपण कुठल्याही वाईनशॉपला नवा परवाना दिल्याचे पवारांनी नाकारले होते. आणि पवार चक्क खरेच बोलले होते. त्यांनी दुकानांना नवे परवाने दिले नव्हते. पण बार थाटण्याच्या अटी इतक्या शिथील केल्या, की जवळपास निम्म्याहून अधिक उडूपी हॉटेलचे रुपांतर दोनतीन वर्षात बारमध्ये झाले. मुद्दा किती बार झाले हा नाही, तर सरकारी वा सत्ताधारी मानसिकतेचा आहे. आणि तीच मानसिकता असेल तर गुटखाबंदीमध्ये मोठा उदात्त हेतू असल्याचा आव आणण्य़ाचे कारणच काय? समाजाच्या आरोग्याचे हवाले देण्याचे ढोंग कशाला? कारण गुटख्यापेक्षा दारुच्या व्यसनाने अधिक लोकसंख्या व माणसे रोगट होत चालली आहेत. हे विष मोठ्या लोकसंख्येच्या रक्तात भिनत चालले आहे. ते विष अधिकधिक लोकांना आपल्या सापळ्यात ओढून पशू वा जनावर बनवत आहे. कधी ते व्यसन साक्षात यमदूत बनून एखाद्या वस्ती्त अवतरते आहे, तर कधी व्यसनाधीन माणसालाच यमदूत बनवून इतरांच्या आयुष्य़ाचा घास घेते आहे. पण त्याबद्दल सरकार एक शब्द तरी बोलते आहे काय?     ( क्रमश:)
भाग  ( ३३८ )     २७/७/१२

बुधवार, २५ जुलै, २०१२

आज काही तुफ़ानी करू या


   व्यसन मुळात लागतेच कसे हे पहाणे योग्य ठरेल. ती माणसाची कुठूनही गरज नसते. तंबाखू असो की दारू असो, ती मानवी जीवनातील गरज नाही. पण तरीही माणसे नशेच्या जाळ्यात फ़सत असतात. अनेकदा अनावधानाने माणूस त्यात ओढला जातो आणि लक्षात येण्यापुर्वीच नशेचा गु्लाम होऊन जातो. इतरांचे सोडून द्या मी माझ्याच एका मित्राची गोष्ट इथे सांगतो. कालपरवा मरण पावलेला राजेश खन्ना सुपरस्टार म्हणून जग ओळखत होते. जेव्हा तो सुपरस्टार झालेला नव्हता तेव्हा म्हणजे पडद्यावर तो झळकला नव्हता, तेव्हापासून मी त्याला ओळखत होतो म्हणायला हरकत नाही. 

   तेव्हा म्हणजे १९६५ सालात मी स्वत: आर्किटेक्चरचा विद्यार्थी होतो. बांद्रा येथील स्कुल ऑफ़ आर्टमध्ये प्रथम वर्षासाठी मी प्रवेश घेतला होता. वय होते अवघे अठरा वर्षे. नुकतीच शाळा संपलेली. फ़ुल पॅन्ट पहिल्यांदाच अंगावर चढली होती. तिथे आम्ही सगळे असेच शाळेतून आलेले नवशिके होतो. जे लगेच मित्र झाले त्यात दिलीप नावाचा एक आमच्यातला वयाने थोरला होता. आम्ही मधल्या सुट्टीत चहा वडा वगैरे खायला थोड्या अंतरावरच्या एका हॉटेलमध्ये जायचो. मग येताना दिलीप सिगरेट ओढायचा. आम्ही बाकीचे त्याला मोठा शुरवीर समजत असू. कारण व्यसन वाईट असते हे मनावर पक्के कोरलेले होते. घरी कळले तर अशी भितीसुद्धा होती. अर्थात तशी भिती दिलीपलाही होती. तोही घरच्यांना चोरूनच व्यसन करत होता. पण पकडले जाण्याचे भय त्याला वाटत नसे म्हणून तो आमच्यापेक्षा शुरवीर होता. अशा त्या सुट्टीच्या वेळात परत कॉलेजमध्ये येताना एका इमारतीपाशी एक तरूण आम्हाला दिसत असे. कधीकधी दिलीप त्याच्याकडे जाऊन सिगरेट शिलगावून घ्यायचा. त्यामुळे त्या तरूणाची माहिती आम्हाला कळली होती. त्याचे नाव जतीन खन्ना असे होते. दिल्लीहून मुंबईत सिनेमाचा हिरो व्हायला आलेला तोही एक वेडा होता. जिथे कुंपणाच्या भिंतीला टेकून तो सिगरेट ओढत असे. त्याच इमारतीमध्ये तो पेईंग गेस्ट म्हणुन रहात होता. सिगरेटमुळे दिलीपचा त्याचा परिचय झाला. पुढे काही महिन्यांनी तो दिसेनासा झाला. त्या काळात आम्हाला शुकवारी पहिल्याच दिवशी नवा चित्रपट बघायचा छंद होता. दुसर्‍या वर्षाला असताना ‘राज’ नावाचा चित्रपट बघायला गेलो होतो. त्याची सुरूवात झाल्यावर थोड्याच वेळात दिलीप किंचाळलाच, तोरश्या हा तर आपला जतीन. त्याने पडद्याकडे बोट दाखवले होते. तेव्हा बारकाईने पहाता राजेश खन्ना म्हणून झळकलेला तो नवा हिरो आमच्या नाक्यावरचा सिगरेट फ़ुंकणारा जतीन असल्याचे मलाही लक्षात आले.

   मुद्दा राजेश खन्नाचा नाही. त्याच्यापेक्षा आमच्या टोळक्यात दिलीप हाच हिरो होता. कारण एकूण त्या नव्या वर्गात तोच एक धाडसी सिगरेट ओढणारा होता. आमच्या इतरांच्या मनात त्याच्याबद्दल चमत्कारिक आदर होता. सिगरेट ओढतो म्हणून. असे आमच्या मनात यावेच कशाला? तो जे काही करत होता, ती त्याच्या पालकांची फ़सवणूक होती. अधिक त्याच्याच आरोग्याला ते व्यसन घातक होते. मग आम्हाला त्याच्याबद्दल घृणा वाटण्यापेक्षा आदर का वाटावा? तेव्हा असा प्रश्न कधीच मनात आला नव्हता. पण पुढल्या वर्गातली मुले दिसू लागली आणि त्यातले अनेकजण सिगरेटी फ़ुंकताना दिसायचे. मग त्यांचे चुकूनमाकून आमच्याही वर्गाकडून अनुकरण सुरू झाले. बरे आम्हाला शिकवणारे जे प्राध्यापक होते किंवा वर्ग घेणारे होते, त्यापैकी कोणी पोरांना सिगरेटी फ़ुंकताना पाहिले, तर दमदाटी वगैरे केल्याचे आठवत नाही. मला त्याचेही आश्चर्य वाटले होते. कदाचीत अन्य मुलांना कॉलेजमध्ये आलो म्हणजे सिगरेट फ़ुंकणे हा अधिकार वाटला असेल. पुढल्या काळात कधीतरी त्या जुन्या आठवणी चाळवल्या, मग त्याचा अर्थ लावायचा मनातल्या मनात प्रयत्नही झाला होता. ज्याला आपण वाईट गोष्ट समजत होतो, जे पाप असल्याची धारणा मनात होती, तीच गोष्ट म्हणजे व्यसन दिलीप करत होता आणि आपण तर त्याला चांगला मित्र का मानत होतो? त्याचा आपल्याला तिटकारा का आला नव्हता? उलट त्याच्याबद्दल आदर का वाटावा?

   दिलीप वा त्याच्यासारखे जे अन्य विद्यार्थी सिगरेटचे व्यसन करत होते, त्यांच्याबद्दल आम्हा इतरांच्या मनात वेगळेच अनाकलनीय कुतूहल होते. आम्हाला ते लोक धाडसी वाटत होते. म्हणजे मर्द वा्टत होते. अशी जी काही चमत्कारिक धारणा अनावधानाने मनात घुसू्न बसते, तीच खरी समस्या असते. सिनेमातले हिरो किंवा रुबाबदार दिसणारी माणसे जे करतात त्याचे आकर्षण त्याला कारणीभूत असते. तेव्हाच्या चित्रपटातला स्टायलिश धुर सोडणारा खलनायक प्राण किंवा शम्मीकपूर; नव्या जाणीवा होणार्‍या तरुणाला भुरळ घालणारा होता. आज त्यांची जागा पब किंवा बारमध्ये जाणार्‍या अभिनेत्यांनी घेतली आहे. इथे भुरळ शब्दाचा नेमका अर्थ समजून घेतला पाहिजे. जे यशस्वी असतात किंवा समाजात प्रतिष्ठा प्राप्त केलेले असतात, त्यांचे अनुकरण इतर सामान्यजन करत असतात. हे अनुकरण जसेच्या तसे नसते. ज्याचे अनुकरण सामान्य माणसे करत असतात, त्याच्या कृतीमधील सोप्या वाटतील तेवढ्याच गोष्टींचे अनुकरण होत असते. सलमानखान कुठल्या तरूणीला गुंडांच्या तावडीतून जीवावर उदार होऊन सोडवतो, तसाच इतर कुणा मुलीची गंमत म्हणुन छेडही काढत असतो. त्यात छेड काढणे सोपे असते. त्याचे अधिक अनुकरण होते. पण जीव धोक्यात घालून कुणाला वाचवण्याचे अनुकरण मात्र क्वचीतच होते. मग ज्या दिखावू गोष्टी असतात त्या अनुकरणासाठी सोप्या असतात. त्या सोप्या सहजसाध्य अनुकरणाला प्रवृत्त होण्याला मी भुरळ म्हणतो. शाहरुखच्या कपडे, शैली वा केशभूषेची नक्कल सोपी असते. त्याच्याप्रमाणे सिगरेट फ़ुंकणे सोपे असते. त्याच अनुकरणातून अशी व्यसने कधी जडतात, त्याचा पत्ताच लागत नाही. दिलीप किंवा अन्य अनेकजण त्याचेच बळी होते व असतात. पण अशा अनुकरणकर्त्याच्या गोतावळ्यातील अन्य लोकही वहावत जातात.

   हे सिनेमाच्य हिरोमुळेच होते असे मानायचे कारण नाही. वयात येत असतानाच्या कालखंडात जुन्या समजुती मागे पडत असतात आणि नव्या जाणीवा जागृत होत असतात. तेव्हा पालकांच्या छत्रछायेखाली काढलेल्या आयुष्यापासून मुक्त होण्याची आकांक्षा प्रभावी असते. परावलंबी जिवनातून मुक्त होण्याच्या त्या उत्कंठेतुन पालकांच्या अधिकाराला झुगारण्याची उबळ प्रभावी होत असते. अशा अनेक घटकांचा परिणाम किशोरावस्थेतून तरूणाईकडे वाटचाल करताना होत असतो. व्यसनांची घुसखोरी तिथेच सुरू होत असते. गरज नसलेल्या गोष्टी किंवा सवयी त्याच काळात लागत असतात. घरच्यांना, पालकांना चोरून मुले अशा गोष्टी करू लागतात. त्याचे आणखी एक कारण असते. ज्या गोष्टी वर्ज्य किंवा वाईट म्हणुन पालक सांगत असतात, पण स्वत: पालक मात्र करत असतात, तेव्हा त्या गोष्टी पाप किंवा गैर नव्हेत, तर मोठेपणातला अधिकार आहेत अशीही एक चुकीची समजूत कोवळ्य़ा वयापासून मनात घर करत असते. त्यामुळे मग मोठे होण्याच्या वयात, "मोठे होणे" म्हणजे अशा गैरलागू गोष्टी करण्याचे वय अशीही समजूत कार्यरत होत असते. व्यसनाच्या सापळ्यात सापडण्याचे तेही एक कारण आहे. अशा उनाड वा उडाणटप्पू बेपर्वा जीवनाचे वेगळे आकर्षण त्या वयात असतेच. त्यालाच तर वयात येणे म्हणतात ना? जाणीवांचे एक तुफ़ान अनुभवास येत असते, जे जुन्या समजुती व धाक-वचक उध्वस्त करायला पुरेसे असते.

   "आज काही तुफ़ानी करू या" अशी एक जाहीरात सध्या वाहिन्यांवरून झळकत असते. त्या जाहीरातीचे आवाहन कुणासाठी आहे ते लक्षात घेतले तर माणूस अकारण व्यसनाच्या तावडीत कसा ओढला जातो, त्याचा थोडा अंदाज येऊ शकेल. कशाला काही तुफ़ानी करायचे आहे? त्याची गरज काय आहे? तुफ़ानी म्हणजे काय? तर जे सर्वसाधारण नाही, जे काहीतरी लोकांना चकीत करणारे वा तोंडात बोट घालायला भाग पाड्णारे असेल, असेच काहीतरी. पण असे लोकांना चकीत वा थक्क कशाला करायचे आहे? त्यात कुठला धोका आहे काय? मुद्दा साधा आहे. आपण इतरांसारखे सामान्य नाही तर काही विशेष आहोत, असे दाखवण्य़ाची उर्मी त्यामागे असते. आणि मग त्यासाठी जी उत्सुकता असते, अनिवार उत्कंठा असते, ती त्या वयात बेभान व बेफ़ाम करणारी असते, समोरचे दिसणारेही न बघता पुढे झोकून देण्याची मस्ती अंगात व मनात संचारलेली असते. त्याच मस्तीला अशा तुफ़ानी जाहिराती भुरळ घालत असतात, खुणावत असतात. कधी जाहिराती नाही तर प्रसंग वा अनुभव भुरळ घालत असतात. त्याचे रुपांतर व्यसनात कधी होऊन जाते, ते कळण्यापुर्वी माणुस व्यसनाधीन झालेला असतो.    ( क्रमश:)
भाग  ( ३३७ )     २६/७/१२

रक्तापर्यंत पोहोचणारी नशा आणि व्यसन


   काही लोकांना शंका येऊ शकते की मी व्यसनमुक्तीचा आग्रह धरताना गुटखाबंदीचा विरोध करतो आहे का? की त्याचा आडोसा घेऊन मी गुटख्याचे समर्थन करतो आहे? शंका येणे किंवा शंका घेणे मला स्वत:ला आवडते. कारण त्याचा अर्थ माणूस डोळे झाकून वा विचार न करता कुठलीही गोष्ट स्विकारायला तयार नाही असाच त्याचा अर्थ होतो. म्हणूनच मला ते चांगले लक्षण वाटते. न्यूयॉर्कचा दिर्घकाळ डिटेक्टिव्ह असलेल्या एका निवृत्त चतुर पोलिस अधिकार्‍याचे चरित्र मी वाचलेले आठवते. तो म्हणतो, रस्त्यात कुत्रा दिसला तरी "तो" कुत्रा आहे की "ती" कुत्री आहे ते तपासून पाहिल तोच पोलिस होऊ शकतो. समोर दिसते त्यावर डोळे झाकून दिसते ते मान्य होत नाही असा चौकस माणूसच गुन्ह्याचा शोध लावू शकतो. मला ते पटते. कारण सत्य सहजासहजी हाती लागत नसते. ते शोधून काढावे लागत असते. म्हणूनच गुटखाबंदीच्या अपयश व धोरणावर मी जी टिका करतो आहे, त्याकडे शंकेने बघणार्‍यांचे मी स्वागत करतो. जरी तसे फ़ारसे मला फ़ोन आलेले नाहीत तरी काहींच्या मनात तशी शंका असणार, याची मला खात्री आहे. त्याशिवाय दुसरी बाजू सुद्धा आहे. जर अमुक एक चुक आहे असे कोणी म्हणत असेल, तर त्याने योग्य काय तेही सांगायला हवे, सुचवायला हवे. कारण चुक आहे म्हणून काहीच न करण्यापेक्षा भले जे चुकीचे आहे तेही करायला हरकत नाही. म्हणजे निदान कुठे चुकते त्याचा अंदाज येतो आणि त्यात सुधारणा करून पुढे जाता येत असते. म्हणूनच टिकाकाराने नुसत्या चुका दाखवून भागत नाही. तर योग्य काय तेही सुचवले पाहिजे. आजवरच्या प्रत्येक गोष्टीवरच्या बंदी अपयशी ठरल्या असतील, म्हणून गुटखाबंदी अयोग्य आहे असाही दावा योग्य नाही. कारण गुटखा हे आरोग्याला अपायकारक व्यसन आहे आणि त्यापासून समाजाला मुक्ती मिळायला हवीच आहे. मग बंदी नसेल तर अन्य उपाय कुठला आहे? 

   आधीच्या एका लेखात मी अण्णा हजारे यांनी त्यांच्या गावात सुधारणा घडवताना योजलेला सामुहिक धाकाचा व सक्तीचा एक मार्ग सांगितलेला आहेच. पण तो मार्ग सरकारला राबवता येणारा नाही. फ़ार तर सरकार अशा स्वरूपात काम करणार्‍या स्थानिक संस्था व संघटनांना कायदेशीर व प्रशासकीय मदत करू शकते. पण तेवढाच एक मार्ग नाही. आणखी एक मार्ग सरकारसाठी उपलब्ध आहे. त्याचे दोन भाग पडतील. एक भाग आहे तो आधीच व्यसनात अडकले आहेत, त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठीचे प्रयास आणि दुसरा मार्ग आहे तो नव्या लोकांना, विशेषत: नव्या तरूण पिढीला त्यापासून दुर ठेवण्याचा. परंतु त्यासाठी सरकारच्या अधिकाराची जेवढी गरज आहे, तेवढी पोलिसी वा कायद्याच्या दंडूक्याची अजिबात गरज नाही. त्यापैकी पहिला मार्ग म्हणजे व्यसनाधीन झालेत त्यांना त्यापासून बाहेर काढून मुक्त करण्याचा. ते काम सोपे नसले तरी अशक्य नाही. आणि तेच सरकारच्या धोरणकर्त्यांना का सुचू नये याचे मला आश्चर्य वाटते. बंदीपेक्षा तोच उपाय खुप सोपा आहे. गुटख्यामध्ये जी नैसर्गिक व रासायनिक द्रव्ये मिसळली जातात, त्याचे प्रमाण ठरलेले असते. त्यातली अनेक द्रव्ये कमीअधिक विषारी किंवा अपायकारक मानली जातात. मॅग्नेशियम कार्बोनेट किंवा निकोटीन  अशी ती द्रव्ये आहेत. पण त्यांचे प्रमाण किती असावे याचे दंडक आहेत. झिंग आणणा्र्‍या वा नशा निर्माण करणार्‍या त्याच द्रव्यामुळ गुटख्याला मागणी असते आणि जितकी नशा अधिक तेवढी त्याची किंमत व मागणी अधिक असते. याच नशाबाज पदार्थांचे मिश्रण ही गुटखा उत्पादकांची किमया असते. थेट अपाय होणार नाही अशा प्रमाणात अशा द्रव्यांचे मिश्रण केले जात असते. सहाजिकच सरकारी यंत्रणेला त्या उत्पादनात हस्तक्षेप करायचा कायदेशीर अधिकार मिळालेला आहे. त्याचा कसा वापर करायचा ते सरकारच ठरवू शकते.

   सार्वजनिक आरोग्याची जपणूक ही सरकारची जबाबदारी आहे, त्यामुळेच अशा कुठल्याही खाद्य व पेयपदार्थ उत्पादनात सरकार हस्तक्षेप करू शकते. कारण ज्याचा लोकांच्या आरोग्यावर चांगलावाईट परिणाम होतो, त्याच्याशी सरकारचा संबंध येतो. त्याच अधिकाराचा वापर इथे चातुर्याने केला तर लोकांना गुटख्यापासून दुर ठेवण्यासाठी बडगा उगारावा लागणार नाही. पानमसाला किंवा गुटखा यात जे नशा आणणारे रसायन वा द्रव्य वापरले जात असते, त्याचे प्रमाण सरकार नियंत्रित करू शकते. मग त्याचे प्रमाण घटवत नेणे सरकारला अशक्य आहे काय? जसजसे त्या द्रव्याचे प्रमाण कमी होत जाते, तसतसे गुटखा खाणार्‍य़ावर त्या नशेचा अंमल कमी होत जाऊ शकतो. कारण गुटखा असो, की कुठलेही अंमली पदार्थाचे व्यसन असो, त्याच्या सेवनाची सवय खाणार्‍याला लागली असे आपण म्हणतो; तेव्हा प्रत्यक्षात त्याची चटक त्या माणसाच्या रक्तातील पेशींनाच लागत असते. त्यामुळेच नशेची तल्लफ़ आली मग त्या रक्तपेशी त्याला काही सुचू देत नाहीत, अशा नशाबाज द्रव्याचे रक्तातील प्रमाण कमी झाले, मग त्याच पेशी अस्वस्थ होऊन माणसाला नशा करायला भाग पाडत असतात. म्हणजेच खरा कळीचा मुद्दा त्या नशाबाज द्रव्ये व रसायनाचा आहे. जसजसे त्याचे त्या नशाबाज द्रव्याचे रक्तातील प्रमाण वाढवत जाते तसतशी रक्तपेशीत्या नशेच्या आहारी जातात. मग तेवढी त्या माणसाची नशेची मागणी वाढत जाते. म्हणूनच ते प्रमाण घटवत जाणे हा सहजसोपा उपाय असू शकतो. अगदी नशा करणार्‍याच्या नकळतही त्याची नशा कमी केली जाऊ शकते. म्हणूनच उत्पादकांवर नशाबाज पदार्थांच्या मिश्रणाचे प्रमाण कमी करण्याच्या सक्तीचे पाऊल उचलले; तर गुटखा खाणार्‍याच्या नशेचे प्रमाण कमी होत जाईल. तसतसा त्यांचा प्रभाव खाणार्‍यांवर म्हणजे त्याच्या रक्तपेशींवर होऊ शकतो. त्याच्या रक्तातील असा द्रव्या्चा पुरवठा कमी होत जाईल, तसतसे त्याला गुटख्यावर अगतिकपणे अवलंबून राहिल्यासारखे वाटणे कमी होऊ शकते. नशेची अशा व्यक्तीवरची हुकूमत कमी होत जाईल.

   समाज नशामुक्त किंवा व्यसनमुक्त करण्याचा हा एक कायदेशीर तेवढाच फ़ायदेशीर मार्ग असू शकतो. ज्यात गुटखा उत्पादकांना खलनायक बनवण्यापेक्षा त्यांच्याच धंद्याचा व्यसनमुक्तीसाठी उपयोग करून घेता येईल. पण याची दुसरी बाजू अशी, की भेसळयुक्त वा चोरट्या मार्गाने गुटखा विकला जाण्याचा धोका टाळला जाऊ शकतो. व्यसन ही चांगली बाब नसली तरी ती सवय असते आणि माणूस नेहमी सवयीचा गुलाम असतो. एका रात्रीत कागदावरचा कायदा बनवणे शक्य असले, तरी लोकांना व्यसनातून सोडवणे शक्य नसते. म्हणुनच काहीसा कुर्मगतीचा वाटणारा पण असा सहजसाध्य मार्ग सरकारने शोधला पाहिजे. त्यात गुटख्यातील नशाद्रव्य कमी करत जाणे हा उत्तम मार्ग असू शकतो. पण इतक्या वर्षात त्याचा विचारही झालेला नाही. कल्याणकारी राज्यात सामान्य जनतेवर कायद्याचा बडगा उगारणे महत्वाचे नसते, तर जनतेचा विश्वास संपादन करून त्याच नागरिकाला जनकल्याणात सहभागी करून घ्यायचे असते. इथे सामान्य व्यसनी माणुस असो किंवा त्याचे परिचित आप्तस्वकीय असोत, त्यांना या उदात्त कामात सहभागी करून घेण्यात सरकारला कुठली अडचण आहे? आपली हुकूमत वा सत्तेची मस्ती दाखवणे महत्वाचे आहे, की लोकांना एका घाणेरड्या व्यसनापासून मुक्त करणे अगत्याचे आहे? पुढले निर्णय वा उपाय त्यानुसार ठरत असतात. दुर्दैवाने आजच्या सत्ताधीशांचा मार्ग उपाय व परिणाम यापेक्षा आपला रूबाब दाखवण्याचाच आहे. म्हणुनच समस्या सोडवणे बाजूला राहून, नव्या समस्या पुढे येतात. बंदीमुळे व्यसनमुक्ती बाजूला पडून भेसळयुक्त गुटखा वा तंबाखूचे पदार्थ लोकांचा बळी घेण्याची शक्यता मात्र निर्माण होते.

   हे लिहित असताना गुटखाबंदी होऊन तीन दिवस उलटले आहेत आणि राष्ट्रपती निवडणुकीचे निकाल टीव्हीवर बघत असताना मला "पानविलास" नामक जाहिरात अनेकदा बघावी लागली. ती काय साध्य करणार आहे? ज्या पदार्थावर बंदी आहे तोच माल खरेदी करून खाण्यासाठी खुणावणार्‍या अशा जाहीराती का चालू असतात? त्या जाहिराती सरकारच्या कायदेशीर हेतूबद्दलच शंका निर्माण करत नाहीत काय? ज्या बंदीची सक्ती करणे अशक्य आहे, ज्यातून परिणाम मिळण्याची शक्यता नाही आणि ज्यातून आणखी एक भ्रष्टाचाराचा मार्ग खुला होणार आहे, असा उपाय सरकारने योजावाच कशाला? आजची बंदी यशस्वी होण्याचाही मुद्दा बाजूला ठेवा. नव्या पिढीला अशा अपायकारक व्यसनापासून दुर ठेवण्यासाठी तरी त्याचा कोणता उपयोग होणार आहे, असा प्रश्न आहे. कारण त्या नव्या पिढीला ‘पानविलास’ खुणावते आहे.     ( क्रमश:)
भाग  ( ३३६ )     २५/७/

अण्णांची व्यसनमुक्ती तालिबानी ठरवणारे कुठे आहेत?


   काही महिन्यांपुर्वीची गोष्ट असेल. अण्णा हजारे यांचा खुप गाजावाजा चालू होता. जवळपास सर्वच वाहिन्यांच्या थेट प्रक्षेपण करणार्‍या गाड्या राळेगण सिद्धीमध्ये कायम उभ्या केलेल्या असायच्या. अण्णा काय जेवले किंवा कोणाला भेटले किंवा त्यांना कोण भेटायला आले; अशा लहानसहान गोष्टींची चर्चा वाहिन्यांवर अखंड चालू होती. मग एखाद्या दिवशी अण्णा काही बोललेच नाहीत, तर त्यांच्या जुन्या गोष्टींना फ़ोडणी देऊन ऊत आणला जायचा. तेव्हा अण्णांच्या राळेगण सिद्धीमधील जुन्या कामाचा अनुभव किंवा आठवणींची चर्चा होत असे. त्यांच्यावरील पुस्तकाचाही उहापोह व्हायचा. त्यातून एकाने मोठा शोध लावला, की अण्णांनी आपल्या गावात व्यसनमुक्ती केली ती गांधीवादी मार्गाने केली नव्हती तर तालिबानी पद्धतीने सैतानी काम केले. कोणी अण्णांच्या पुस्तकातले हवाले दिले तर कोणी मुद्दाम अण्णांना त्या काळातील आठवणी विचारून त्यांच्याकडून ते वदवून घेतले. अण्णांनी आपल्या गावातले अनुभव सांगितले आहेत. सैन्यातून निवृत्त होऊन अण्णा गावात परतले, तेव्हा तिथे दुष्काळ व व्यसनाधिनता माजलेली होती. दारूच्या भट्ट्या होत्या आणि सर्वांनाच दारूने गिळलेले होते. त्यातून गावाला मुक्त करण्याचा चंग अण्णांनी बांधला आणि कामाला सुरूवात केली. तेव्हा अण्णांकडे कुठली सत्ता नव्हती की अधिकार नव्हते. त्यामुळेच दारूच्या व्यसनातून लोकांना बाहेर काढण्याचे काम त्यांनी कसे करावे? 

   अर्थात आधी त्यांनी त्या व्यसनाचे बळी होते त्यांना एकत्र केले. म्हणजे महिलांची फ़ळी बांधली आणि त्यांच्या मदतीने गावातली दारू निर्मिती व विक्री बंद केली. म्हणजे काय केले? त्यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण सहज समजेल त्याला व्यसनी म्हणत नाहीत. साम दाम दंड भेद अशाच मार्गाने अण्णा व त्यांचे सहकारी गेले. ज्याला जशी भाषा समजते त्याला तशा भाषेत समजावून त्यांनी राळेगण सिद्धीमधून दारू व व्यसनांना हद्दपार केले. त्यातही ज्यांनी दाद दिली नाही त्यांना चौदावे रत्न म्हणजे फ़टके हाणले. म्हणजे झाडाला बांधून ठेवणे, फ़टके मारणे अशी दहशत घातली. व्यसन करण्याविषयी भिती लोकांच्या निर्माण केली. आणि आपले हे काम अण्णांनी लपवून ठेवलेले नाही. पण त्याच उतार्‍यांचे दाखले देऊन मग वाहिन्यांवरच्या बुद्धीभेदी शहाण्यांनी अण्णा कसे तालीबानी दहशत माजवणारे आहेत, त्याची वर्णने सांगितली होती. व्यसनी माणसाला स्वत:वर ताबा ठेवता येत नाही, तेव्हा त्याला नियंत्रणाखाली आणावे लागते. विशेषत: जो दारूसारख्या नशेच्या आहारी गेलेला असतो, त्याला शुद्धच उरत नाही, त्याला समजावण्याची भाषा कुठली असू शकते? जेव्हा दारूची वा व्यसनाची तल्लफ़ येते तेव्हा माणूस जनावर होत असतो, त्याला बोलून रोखणे अवघड असते. तो हिंसक होत असतो. जेवढा तो हिंसक होतो तेवढा त्याला रोखणाचा उपाय आक्रमक असावा लागतो. अण्णांनी तसे उपाय योजायला मागेपुढे पाहिले नाही. पण अंतिमत: त्यांनी आपले गाव व्यसनमुक्त केले. त्याला आमचे वाहिन्यांवरचे दिडशहाणे तालिबानी मार्ग म्हणतात.

   तालिबानांनीही व्यसनापासून मुक्त होण्यासाठी असेच सक्तीचे उपाय योजल्याचे त्यांनी ऐकले आहे. पण जिथे मर्यादा ओलांडल्या जातात, तिथे तालिबान गोळ्या घालून व्यक्तीला ठार मारून टाकतात. मग ठार मारणे आणी व्यसनी माणसात संचारलेला सैतान शांत होईपर्यंत त्याला झाडाला किंवा खांबाला बांधून ठेवणे, यात काही फ़रक आहे की नाही? झिंग उतरली मग त्याच्यातला माणुस पुन्हा जागा होईल, असे वागणे हिंसक नसते तर त्याच्याच हिताचे असते. हे ज्यांना कळत नाही त्यांची बुद्धी शेण खायला गेलेली असते. म्हणूनच त्यांनी अण्णांच्या राळेगणमधील व्यसनमुक्तीची तुलना तालिबानांशी केली होती. तालीबान आपल्या आदेशाचे पालन न करणार्‍यांना गोळ्या घालत होते. अण्णांनी व्यसनाधीन लोकांसाठी सक्तीचा मार्ग अवलंबला होता. पण त्याचे शेवटी आलेले परिणाम चांगले होते. चांगले आणि वाईट ठरवण्यासाठी नुसती कुशाग्र बुद्धी असून भागत नाही तर विवेकबुद्धी जागृत असावी लागते. दुर्दैवाने आपल्या वाहिन्यांवरील शहाण्यांची विवेकबुद्धिच गहाण पडलेली आहे. त्यामुळे त्यांना नुसत्या कुशाग्रबुद्धीचाच वापर करता येतो आणि मग अर्थाचे अनर्थ होत असतात. त्यामुळेच ज्या अण्णांनी हाताशी कुठली सत्ता नसताना आणि अधिकार नसतात, आपल्या गावात व्यसनमुक्ती करून दाखवली, त्यातले सत्य समजून घेण्यापेक्षा त्यातले तालिबान या लोकांनी शोधले. पण मग आज सरकार तरी काय करते आहे? सरकारच्या हाती अधिकार व सत्ता आहे. तिचाच वापर करून संपुर्ण महाराष्ट्रावर गुटखाबंदीची सक्ती सरकार करत नाही काय? फ़रक अगदी किरकोळ आहे. सरकारला राज्यघटनेने अधिकार दिलेला आहे. अण्णा हजारेंना तो नव्हता. पण परिणामातला फ़रकही मोठा आहे. अण्णांची व्यसनमुक्ती यशस्वी झाली आणि टिकून राहिली आहे. सरकारची एकही बंदी परिणाम करताना दिसत नाही. त्याचे कारण अण्णा हजारे यांच्या प्रयत्नांमागे शुद्ध हेतू होता. त्यांना आपली दादागिरी सिद्ध करायची नव्हती तर गाव व्यसनमुक्त करायचा होता.

   तसे पाहिल्यास त्यांच्या कृती कायद्याच्या कक्षेत बसणार्‍या नव्हत्या. त्यामुळेच गावातला कोणीही त्यांच्या असल्या कारवायांबद्दल पोलिसात जाऊन तक्रार करू शकला असता. पण कोणाची तक्रार आली नाही, की कोणी अण्णांच्या विरोधात साक्ष द्यायला उभाही राहिला नाही. अगदी व्यसनी गावकरी किंवा त्याचे आपतस्वकीय सुद्धा अण्णांच्या त्या "दादागिरी"विरुद्ध उभे राहिले नाहीत. कारण जे चालले आहे ते आपल्या भल्यासाठी आहे अशी फ़क्त गावाचीच धारणा नव्हती, तर ज्याला कठोर शिक्षा व्हायची त्याच्या कुटुंबीयांना्ही तसाच विश्वास वाटत होता. याचा अर्थ इतकाच, की गावासाठी आणि गावातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी व्यसन अपाय आहे आणि म्हणूनच आपल्या गावात कोणीच व्यसनी असू नये, असा आत्मविश्वास अण्णा गावात निर्माण करू शकले होते. याचाच दुसरा अर्थ असा की व्यसनी गावकरी व त्याच आप्तस्वकीय यांनाही व्यसन हे पाप आहे; असेच वाटण्याची पाळी अण्णांच्या प्रयत्नांनी निर्माण झाली होती. तीच त्यांच्या व्यसनमुक्तीच्या मोहिमेची ताकद नव्हती. म्हणूनच राज्यघटनेने दिलेले अधिकार व सत्ता हाती असून सरकार जे करू शकले नाही, तेच एका छोट्या गावात अण्णा व त्यांचे कटीबद्ध सहकारी हाती कसलाही अधिकार नसताना करू शकले. जिथे अण्णांचे व राळेगण सिद्धीचे यश सामावले आहे, तिथेच सरकारचे अपयश दडलेले आहे. अण्णांनी लोकांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून लोकभावना जागवली आणि व्यसनमुक्तीसाठी अवघ्या गावालाच सिद्ध करून घेतले. त्यांना कायदा किंवा पोलिसांची मदतही घ्यावी अलागली नाही. कारण कायद्यापेक्षाही मोठी प्रभावी ताकद त्यांच्या मागे उभी होती. जिला सामान्य जनता असे नाव आहे. त्याचे उलटे टोक सरकार आहे. त्याचा सामान्य जनतेच्या चांगुलपणावर अजिबात विश्वासच नाही. पोलिस हेच सरकारला आपले बळ वाटते. तिथेच सर्व सरकारी धोरणे व योजना फ़सता असतात.

   लोकांचे हित आपल्यालाच कळले आहे आणि आपण करू ते हिताचेच आहे, असे निमुटपणे जनतेने मान्य करावे, अशी जी सरकारी अरेरावीची भावना किंवा भूमिका आहे, तिथेच सरकारचे अपयश सुरू होते. जे जनकल्याणाचे आहे त्यात कायदे बनवून त्याचा पोलिसांकरवी अंमल करण्याआधी सामान्य जनतेला त्यासाठी विश्वासात घेतले तर काम खुप सोपे होत असते. सर्वच जनता तुमच्या बाजूने कधी उभी रहात नाही. पण जेव्हा बहुसंख्य लोक तुमच्या बाजूने उभे असतात, तेब्हा मुठभर विरोधकांना त्याच बहुसंख्य लोकांच्या भावनांपुढे शरणागती पत्करावी लागत असते. जेव्हा बहुसंख्य लोक एखादी गोष्ट पाप किंवा अपराध मानू लागतात, तेव्हा ती गोष्ट करणार्‍यावर पोलिसांना लक्ष ठेवावे लागत नाही. सामान्य जनताच पहारेकरी होत असते आणि तिची नजर चुकवून कायदा मोडणे कुणाही माणसासाठी सोपे काम रहात नाही. असा सामान्य जनतेचा पाठींबा व शुभेच्छा ज्या योजना, कायदा किंवा धोरणामागे असतात, त्यांचे यश अपरिहार्य असते. त्यासाठी बडगा किंवा पोलिसाचा दंडूका उगारावा लागत नाही. ते काम सामान्य जनतेची उग्र नजरच करत असते. त्या जनतेच्या नजरेचा धाकच कायद्याची पतिष्ठा, दबदबा व वचक निर्माण करत असतो. राळेगण सिद्धीमध्ये तोच अलिखित कायदा यशस्वी झाला आणि व्यसनमुक्ती यशस्वी झाली. त्याच बळाचा अभाव आजच्या गुटखाबंदीमध्ये आहे. म्हणुच तिचे यश शंकास्पद आहे. किंबहुना त्य बंदीच्या अपयशाचीच खात्री देता येते.     ( क्रमश:)
 भाग  ( ३३५ )     २४/७/१२

सोमवार, २३ जुलै, २०१२

सौ चुहे खाके बिल्ली हाज चली


   गुटखाबंदी शुक्रवारी लागू झाली आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून वाचकांचे मला फ़ोन आले. त्याचे कारण त्यांना माझ्या लिखाणाचा प्रत्यय आला होता. प्रत्येक ठीकाणी बंदी लागू झाली म्हणजे काय तर गुटख्याची पाकिटे जी वरती लटकत असायची ती दिसेनाशी झाली. पण जिथे आपली ओळख आहे तिथे तीच पाकिटे सहज उपलब्ध होती. काही ठीकाणी किंमत अधिक मोजावी लागत होती. एका गुटखा विक्री करणार्‍या टपरीवाल्याने तर सांगितले, की एका पोलिसानेच येऊन त्याला पाकिटे दिसणार नाहीत अशी ठेवायच्या सुचना दिल्या. यातून एकूण गुटखाबंदीचे भवितव्य आपल्याला कळू शकते. एक गोष्ट मजेशीर आहे आणि तीसुद्धा इथे सांगितली पाहिजे. फ़ोन करणार्‍यात काही गुटखा नियमित खाणारे सुद्धा होते. त्यांनी आपल्या व्यसनाचे समर्थन केले नाही. पण दुसरीकडे बंदीमुळे किंमत कशी वाढणार त्याची चिंता व्यक्त केली. थोडक्यात कोणीही गुटखा खाण्याचे समर्थन करत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. पण म्हणून बंदीने व्यसने थांबू शकत नाहीत. कारण गुटखा खाणे, तंबाखू सेवन किंवा नशापान हे पाप आहे अशी धारणा अजुन पुरेशी प्रभावी नाही. जे कुठलेतरी व्यसन करतात त्यांना व्यसन पाप वाटले पाहिजे, त्याशिवाय त्यापासून मुक्त होण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाहीत. कायद्याचा दंडूका उगारून तर अजिबात शक्यता नाही. म्हणूनच मी हेतूला प्राधान्य देतो. सरकारचा हेतु व्यसनमुक्तीचा असायला हवा असा माझा आग्रह तेवढ्य़ासाठीच आहे. पण दुर्दैव असे की आपल्याकडे सरकार चालवणार्‍यांना सत्ता म्हणजे जादूची कांडी वाटत असते. कायद्याचा बडगा उगारला मग सगळे सुरळीत होणार, अशी भ्रामक धारणा त्यामागे आहे. सत्ता दंडूक्यावर चालत नसते तर लोकांच्या विश्वासावर सत्तेची ताकद असते. 

   जे सरकार दारुबाबत गप्प बसते आणि गुटखा किंवा तंबाखूच्या विषयावर मोठा व्यसनमुक्तीचा आव आणते त्यावर म्हणुनच लोकांचा विश्वास बसत नाही. या विषयाची घोषणा झाली या दिवशी एका वाहिनीवर गुटखा उत्पादन करणारे उद्योगपती धारिवाल चर्चेत सहभागी झालेले होते. त्यांनी आपला हा धंदा आहे असे सांगताना त्या उद्योगात किती लोकांचा रोजगार गुंतला आहे त्याचे आकडे सांगायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अनेकांना तो धारीवाल यांचा उद्दामपणा वाटला. पण तंबाखूची शेती करणार्‍यांपासून त्याचे विविध उत्पादनात रुपांतर करणार्‍या कर्मचार्‍यांपर्यंत अनेकांचा रोजगार व उदरनिर्वाह अवलंबून आहे. हा बचाव लोकांना आवडणारा नाही. पण त्यापेक्षा सरकारचा युक्तीवाद तरी किती वेगळा आहे? जे सरकार गुटखा प्रकरणात व्यसनमुक्ती व आरोग्याची पोपटपंची करत असते, तेच सरकार दारूच्या बाबतीत धारीवालाच्या पंगतीला जाऊन बसते त्याचे काय? जरा आधी सरकारचे धोरण तपासुन बघू या. जे सरकार मोठे उदार होऊन गुटख्यावरच्या शंभर कोटी रुपये महसुलावर पाणी सोडल्याचा आव आणते त्याचे दारूच्या उद्योगापासूनचे उत्पन्न किती आहे? २००४ सालचे राज्याचे दारूपासून मि्ळणारे महसुली उत्पन्न २२५० कोटी रुपयांचे होते. आजच्या दरवाढ व महागाईची मोजपट्टी लावल्यास ते किमान पाचसहा हजार कोटींच्या घरात जाईल. त्यातून कोणते सार्वजनिक आरोग्य जपले जात असते? आधीच जे दारूचे उत्पादन महाराष्ट्रात चालते त्यातून इतके कर उप्तन्न सरकार मिळवते. त्यात वाढ व्हावी असे सरकारचे खास प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी आणखी कुठल्या पदार्थापासून दारू बनवता येईल त्याचाही शोध सरकार घेत असते व त्याला प्रोत्साहन देत असते.

   मागल्या वर्षी त्यावर बराच गदारोळ उठला होता. ज्वारी व बाजरीपासून मद्यनिर्मितीचा विषय तेव्हा गाजत होता. पण कोणी दारूच्या विषारी परिणामांबद्दल बोलत नव्हता, तर कोण ती दारू बनवणार यावरच कल्लोळ चालु होता. दुसरी बाब होती ज्वारीबाजरीची दारू बनवली तर लोकांच्या तोंडचा घास काढून घेतला जाईल अशी तक्रार होती. त्यावर छान दिशाभूल करण्यात आली. चांगली ज्वारीबाजरी दारूसाठी वापरली जाणार नाही, तर सडलेले व कुजलेले धान्यच वापरले जाईल असे सांगून त्यावर पांघरूण घालण्यात आले होते. पण कशापासून दारू बनते त्यापेक्षा दारूचे परिणाम काय होतात याला महत्व होते आणि आहे. पण चर्चा भलतीकडे वळवून दारूच्या विषारी परिणामांकडे पाठ फ़िरवण्यात आली होती. सडलेले कुजलेले धान्यच दारू उत्पादनासाठी वापरले जाणार हे ठीक आहे. पण कुठल्याही पदार्थापासून तयार होणारी दारू शरीराला अपायच करणारी असते ना? मग तिच्या परिणामांबद्दल बोलायचे सोडून पदार्थावर चर्चा कशाला हवी होती? पण ती झाली व तेवढ्यापुरतीच मर्यादित ठेवली गेली. त्याचे कारण अशा दारू उत्पादनासाठीचे परवाने कोणाला मिळाले, त्याचे ते राजकारण होते. अशा धान्यापासून दारु बनवण्याचे बहुतांश परवाने आज राजकारणात आघाडीवर असलेल्या नेत्यांनीच मिळवले होते. त्यावरून सगळा कल्लोळ चालू होता. जणु त्या नेत्यांनी दारू बनवली म्हणजे ती आरोग्यास अपायकारक असेल असाच चर्चेचा सुर होता. किंवा राजकीय नेत्यांनी तसे परवाने घेतले नसते तर तो विषय चर्चेलाच आला नसता. हीच आपल्याकडची बौद्धिक दिवाळखोरी आहे.

   आजसुद्धा सगळे गुटखाबंदीच्या कौतुकात रमलेले आहेत. पण व्यसनमुक्तीची भाषा कोणीच बोलत नाही. कारण व्यसनमुक्तीचा विषय आला तर दारूचा विषय लपवता येणार नाही. आणि दारूच्या महसुलातून शेकडो लोककल्याणाच्या योजना राबवल्या जात असतात असा सरकारचा दावा आहे. त्याचा अर्थ काय होतो? काही लाख लोकांनी दारुचे व्यसन केल्याने उर्वरित लाखो लोकांच्या कल्याणाचे कार्यक्रम व योजना राबवता येत असतात ना? म्हणुन सरकारला दारूवरचे उत्पन्न हवे आहे. सरकार करोडो लाखो लोकांच्या कल्याणासाठी करोडो लोकांच्या आरोग्याला दारूमुळे अपाय होतो, त्याकडे डोळेझाक करते त्याला पवित्र कार्य म्हणायचे? मग धारिवाल यांच्यासारखे गुटखा उत्पादक तरी काय वेगळे सांगतात? त्यांच्या या उद्योगातून लाखो टपरीवाल्यांना रोजगारच मिळत असतो ना? ते त्यांचे कल्याण नाही काय? जे गुटख्याच्या कारखान्यात नोकर्‍या करतात, त्यांच्यासाठीसुद्धा हा उद्योग कल्याणकारीच नाही काय? सरकार दारूच्या उत्पन्नातून लोककल्याण करते आणि गुटखा उत्पादक आपल्या उत्पादनातून लाखो लोकांचे कल्याणच करत असतात. दोघे सारखेच नाहीत काय? काही लोकांच्या आरोग्याशी खेळ करून काही लोकांचे कल्याण करणे, हेच धोरण असेल तर गुटखा व दारू दोन्हीतले पाप सारखे नि पुण्यही सारखेच ना? मग एक लोककल्याणकारी राजा आणि दुसरा लोकांच्या आरोग्याशी खेळणारा सैतान, असे भासवण्याचे कारणच काय? दुर्योधनाने रावणाला पापी ठरवून आपल्या पापावर पांघरूण घालण्य़ाचाच हा उद्योग नाही काय? यात निदान उत्पदक काही काम तरी करतो. कर म्हणून नुसती खंडणी वसूल करणार्‍या सरकारचे काय? ते काहीच करत नाही. नुसते कागदावरचे परवाने देण्यासाठी कित्येक पटीने पैसा उकळत असते ना? यालाच हिंदीत म्हणतात, सौ चुहे खाके बिल्ली हाज चली.

   दारूमुळे किती संसार उध्वस्त होतात आणि किती लोकांच्या आरोग्याची माती होते, ते सांगण्याची गरज आहे काय? गुटखा खाणार्‍याचा निदान इतरांना त्रास होत नाही. पण दारू पिणारा संपुर्ण कुटुंबाचेच जीवन उध्वस्त करत असतो. आसपासच्या लोकांना त्रास देता असतो. शेजारीपाजारीही त्याच्या नशापानाने हैराण होतात. पण त्याची सरकारला पर्वा आहे काय? सरकार आपल्या तिजोरीत जमणार्‍या महसूलाकडे बघून खुश आहे. म्हणुनच दारूच्या उत्पादन विक्रीबद्दल सरकार अवाक्षर बोलत नाही. गुटखा सरकारच्या महसूलात नगण्य आहे म्हणूनच सरकारने औदार्य दाखवले आहे. पाचसहा हजार कोटी रुपये खिशात टाकणार्‍या दारूबाबत सरकार गप्प आहे आणि नगण्य शंभर कोटी रुपयांचा त्याग केल्याचा आव आणते आहे. आणि हे आपल्या महाराष्ट्रातच होते आहे असे नाही संपुर्ण देशातच हे नाटक चालू आहे. प्रत्येक राज्याची स्थिती तशीच आहे. महाराष्ट्रात दहा टक्के महसुली उत्पन्न दारूपासून येते तर पंजाबसारख्या राज्यात सरकारी तिजोरीचे वीसपंचवीस टक्के उत्पन्न दारूच्या उत्पादनातून येत असते. त्याला कोणी हात लावायची भाषा बोलत नाही. मग त्या पापावर पांघरुण घालण्यासाठी गुटखाबंदीचे झकास नाटक रंगवले जात असते. व्यसनमुक्तीचा देखावा निर्माण केला जातो. पण खर्‍या समस्येला हातही घातला जात नाही. याला एकटे सरकारच जबाबदार आहे असे नाही, आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचाही त्यात मोठा हिस्सा आहेच.    ( क्रमश:)
भाग  ( ३३४ ) २३/७/१२

व्यसनमुक्ती हवी आहे की नुसतीच गुटखाबंदी?


   आज एका अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये किमान साडेचार ते पाच लाख गुटखा विक्रेते आहेत. त्यातले सगळेच गुटखा विक्री बेकायदा आहे म्हणून ते काम थांबवतील अशी सरकारची अपेक्षा आहे काय? नसेल तर बंदी कशी यशस्वी होणार आहे? साधारण पाच विक्रेत्यांवर नजर ठेवायला एक पोलिस धरला तरी नऊ लाख पोलिस तेवढ्याच कामासाठी आवश्यक आहेत. दहा विक्रेत्यांच्या मागे एक पोलिस धरला तरी साडेचार लाख पोलिस लागतील. राज्यातल्या पोलिसांची एकूण संख्या तेवढीच आहे. जर हे सगळे पोलिस गुटखाबंदीच्या मागे जुंपले तर अन्य कामासाठी पोलिस मिळणारच नाहीत. अगदी शंभर विक्रेत्यांवर एका पोलिसाने पहारा द्यायचा म्हटला तरी निदान पन्नास हजार पोलिस याच एका गुटखाबंदीच्या कामासाठी जुंपावे लागतील. म्हणजेच या बंदीच्या अंमलबजावणीसाठी राज्याकडे पोलिसांचा ताफ़ा सुद्धा हवा तेवढा नाही. मग काय होईल? जे नेहमी होते तेच. जो पकडला जाईल तोच गुन्हेगार ठरेल. जो पकडला जात नाही तो गुन्हेगार असत नाही. परिणामी बंदी फ़क्त कागदावर रहाणार आहे. मात्र त्यामुळे एका नव्या भ्रष्टाचार व लाचखोरीचा मार्ग खुला होणार आहे. त्याचा भुर्दंड सामान्य गुटखा ग्राहकावर होणार आहे. सरकारचा हेतू त्यापेक्षा वेगळा दिसत नाही. कारण या सरकारने आज गुटखाबंदी करताना त्याच्या एकूण दुरगामी परिणामांचा अजिबात विचार केलेला नाही. शिवाय व्यसनमुक्ती हासुद्धा त्याचा हेतू नाही. आणि माझा तोच तर आक्षेप आहे. ज्याला समाज व्यसनमुक्त करायचा असतो त्याने असा सर्वांगिण विचार केला पाहिजे. तो गुटखा किंवा पानमसाला अशा मर्यादेत राहून होऊ शकत नाही.  

   ज्यांच्यावर अशी बंदी लादली जाणार आहे व ज्यांनी लादायची आहे, त्यांचा तरी त्यावर विश्वास असायला हवा ना? पोलिसांपासून विक्रेत्यांपर्यंत आणि गुटखा उत्पादकांपासून गुटखा खाणार्‍यांपर्यंत कुणालाही सरकारने या बाबतीत विश्वासात घेतलेले दिसत नाही. मग ही बंदी यशस्वी होणार कशी? मग लहान मुले चोर शिपाई खेळतात तसाच मामला होणार ना? सर्व गोष्टी कागदावर दाखवल्या जातील, ज्या व्यवहारात कुठेही दिसणार नाहीत. म्हणजेच गुटखाबंदी ही शुद्ध दिशाभूल ठरेल. जिथे ग्राहक असतो तिथे दुकानदार येतोच. त्याला कायदा रोखू शकत नाही. मग नव्या बंदीमध्ये कठोर शिक्षा व दंडाचे प्रावधान ठेवलेले आहे. ही आणखी एक दिशाभूल असते. कठोर शिक्षा हे मनातले मांडे असतात. जर मनातलेच मांडे खायचे असतील तर ते उगाच कोरडे कशाला खायचे? चांगले साजुक तुप लावून खरपुस भाजून खावेत की. तशीच ही कठोर शिक्षा व दंड असतो. कारण ती शिक्षा व तो दंड कागदावरच असतो. कधी कोणाला त्यानुसार शिक्षा झाल्याचे वा दंड भरावा लागल्याचे आपण ऐकत नाही. त्या अफ़जल गुरूला फ़ाशीची शिक्षा होऊन अकरा वर्षाचा कालावधी उलटला आहे. पण त्याच्या गळ्यात फ़ास अडकला आहे काय? त्याच्या फ़ाशीबद्दल विचार करायला राष्ट्रपतींनी गेली दहा वर्षे सवडच झालेली नाही. दोन राष्ट्रपती आपली मुदत संपून निवृत्त झाले. आता तिसरे राष्ट्रपती निवडून येतील. त्यांना तरी गुरूच्या फ़ाशीबद्दल विचार करायला सवड मिळेल की नाही याची शंकाच आहे. अशा स्थितीत कुठल्याही कठोर शिक्षेला घाबरणार कोण? म्हणजेच कायद्यात कठोर शिक्षा असुन उपयोग नसतो. कारण जी शिक्षा देतांना शासनाचेच पाय डगमगतात, त्याला घाबरणार कोण आणि बंदीनुसार गुटखा विकायचा थांबणार कसा?

   ही झाली एक बाजू. म्हणजे ज्यांना विक्री करताना पकडले जाईल व ज्यांच्यावर खटले भरले जातील व ते खटले चालून जे शिक्षापात्र ठरतील, त्यांची बाजू. अशा लोकांची संख्या एकूणात एक टक्का एवढीही नसते. शंभर लोक कायदा मोडतात, तेव्हा त्यातल्या एकावरच प्रत्यक्ष कायद्याचा बडगा उगारला जातो, अशी सर्वसाधारण स्थिती आहे. या एकाला शिक्षा होताना दिसली तर इतरांना कायद्याचा धाक बसत असतो. पण इथे शंभर लोक गुन्हे करणार तेव्हा त्यातला एक पकडला जाणार आणि अशा पकडून गुन्हा दाखल झालेल्यांपैकी किती लोकांना खरेच शिक्षा होते? गुन्हेगारी खटले वा तक्रारींची आकडेवारी पाहिल्यास आपल्या देशात शंभर गुन्ह्यात ( म्हणजे ज्यांच्यावर खटले भरले जातात, त्यापैकी चारपाच टक्केच) फ़ार तर पाच लोक दोषी ठरवले जातात. अगदी खुन बलात्कार दरोडे अशा गंभीर गुन्ह्यांची ही आकडेवारी आहे. बाकी सामान्य गुन्ह्यात ही आकडेवारी अगदी एक टक्क्यापेक्षाही कमीच आहे. कारण अशा गुन्ह्यात दोन्ही बाजू संगनमताने मांडवली करत असतात. म्हणजेच गुटख्यासारख्या गुन्ह्यात पंधारा वीस हजारात एकालाही शिक्षा होण्याची शक्यता नाही. मग पोलिस त्या भानगडीत पडण्यापेक्षा अशा गुन्ह्यांना अभय देण्यातच धन्यता मानणार ना? म्हणजे पुरावे साक्षी गोळा करा, कोर्टात फ़ेर्‍या मारा, असली दगदग संपते आणि खिशात मोठी लाच पडते. तर पोलिस बंदीकडे कसे बघतील?

   स्वातंत्र्यपुर्व काळात देशात ब्रिटीशांचे राज्य होते. तेव्हाही महात्मा गांधींनी दारूबंदीची मागणी केली होती. पण सरकारने तिला प्रतिसाद दिला नव्हता. पण गांधीजींनी कॉग्रेस कार्यकर्त्यांना त्यासाठी प्रवृत्त केले होते. दारूचे व्यसन आरोग्याला अपायकारक आहे, हे त्यांनी आपल्या पाठीराख्यांना पटवून दिले होते. त्यामुळे निदान ते कार्यकर्ते तरी दारूपासून दूर रहात होते. ज्यांच्यात अधिक उत्साह होता अशा पाठीराख्यांसाठी गांधीजींनी निदर्शनांचा कार्यक्रम योजला होता. जिथे दारूची विक्री होते, दारूचे गुत्ते चालतात तिथे असे दारूबंदीचे समर्थक जाऊन घोषणा द्यायचे, आवाज उठवायचे, जनजागृती करायचे. त्याने काय साध्य झाले? संपुर्ण भारतीय समाज दारूच्य व्यसनातून मुक्त झाला असे कोणी म्हणू शकणार नाही. पण निदान गांधी व त्यांच समर्थक तरी त्या व्यसनापासून दुर राहिले. त्याच्या वागण्या व प्रचारातून तरूण मुले व समाजाच्या मनात दारू प्राशन हे पाप असल्याची एक धारणा मोठ्या प्रमाणात नक्कीच निर्माण झाली. मद्यप्राशन हे प्रतिष्ठे्चे लक्षण नाही असे तरी मानले जात होते. पुढे स्वातंत्र्यप्राप्ती झाल्यावर स्वदेशी सरकारने दारूवर बंदी घातली. त्यातून जेवढ्य़ा लोकांना व्यसनमुक्त करता आले नाही, त्यापेक्षा अधिक लोकांना गांधीजींच्या त्या प्रचार व निदर्शनामुळे दारूपासून दुर नक्कीच ठेवता आले. ब्रॅन्डीची बाटली या चित्रपटात आचार्य अत्रे यांनी त्या गांचीवादाची यथेच्छ टवा्ळी केली आहे. अनेकांनी केली होती. पण एक गोष्ट नाकारता येणार नाही. त्या गांधींच्या प्रेरणेने मोठ्या प्रमाणात जनमानसात नशापानाबद्दल एक अपराधी भावना निर्माण केली. त्यामुळेच दारूच्या व्यसनाला बेलगाम व्हायला वेसण घातली गेली. कुठलीही सत्ता हाती नसताना आणि पोलिसाचा दंडूका न उगारता, गांधीजींनी मोठ्या लोकसंख्येला व्यसनमुक्त ठेवण्यात यश मिळवले. कारण त्यांचा हेतू शुद्ध होता. त्यांना कायद्याची मस्ती दाखवायची नव्हती तर समाज किंवा अधिकाधिक लोक व्यसनमुक्त रहावेत अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती. आजच्या गुटखाबंदीमध्ये नेमक्या त्याच भूमिकेचा अभाव दिसतो आहे.

   कारण आजच्या सत्ताधिशांना आपली हुकूमत दाखवण्यात स्वारस्य आहे. त्यांना गुटखा किंवा तंबाखू सेवनापासून अधिक लोकसंख्येला दुर ठेवून सामाजिक आरोग्याला बळकटी आणायचा विचारही सुचलेला नाही. तसे असते तर सरसकट बंदी घालतानाच त्याच्या संभाव्य परिणामांचा आधी विचार झाला असता आणि त्यानुसार कायद्याच्या व बंदीच्या अंमलाचे धोरण आखण्यात आले असते. पण त्याचा इथे संपुर्ण अभावच दिसतो आहे. आणि हे फ़क्त याच बाबतीत आहे असे मानण्याचे कारण नाही. प्रत्येक बाबतीत अनिच्छेचाच साक्षात्कार घडत असतो. मुंबईत बॉम्बस्फ़ोट झाले मग कडेकोट सुरक्षेच्या गर्जना केल्या जातात. पण चारपाच दिवसातच सर्वकाही विसरून जुनाच गाफ़ीलपणा अनुभवास येत असतो. कसाबच्या टोळीने मुंबईत येऊन इतके भीषण हत्याकांड केल्यावर सागरी सुरक्षेसाठी खरेदी करायच्या नौकांच्या व्यवहारातही भ्रष्टाचाराचे प्रकार का घडतात? गिरणी कामगाराला त्याच्या हक्काचे घर देण्याच्या फ़ायली पुढे सरकायला दहा वर्षे उलटून जातात, पण बेकायदा आदर्शची फ़ाईल वेगाने का पुढे सरकते? राळेगण सिद्धी गावात पाणलोटाचे काम यशस्वी होते तर राज्यभर सरकारी यंत्रणेकडून झालेली कामे का फ़सतात? सगळीकडे एकच कारण दिसेल. जिथे हेतू शुद्ध आहे तिथे अपुर्‍या साधनांनीही यश मिळवले आहे आणि जिथे हेतूच फ़सवा आहे तिथे प्रचंड साधनांची व पैशाची लूटमार होऊनही काडीमात्र यश मिळू शकलेले नाही. गुटखाबंदी मग यशस्वी कशी होऊ शकेल? कारण तिच्या मागे कुठलाही शुद्ध व प्रामाणिक हेतूच नाही ना?   ( क्रमश:)
भाग  ( ३३३ ) २२/७/१२

शनिवार, २१ जुलै, २०१२

प्रत्येक बंदी अपयशीच का होत असते?


   पुन्हा पुन्हा तीच तीच गोष्ट करीत रहाणे आणि काही वेगळे घडेल अशी अपेक्षा बाळगणे हा मुर्खपणाचा कळस असतो. -अल्बर्ट आईनस्टाईन

   एक महान वैज्ञानिक विचारवंत असे का म्हणतो? ज्याने आयुष्यभर शेकडो प्रयोग केले आणि प्रत्येकवेळी नवा प्रयोग अपेशी होताना धीर सो्डला नाही, असा हा शास्त्रज्ञ आहे. म्हणजेच त्याने फ़सत चुकत अनेक नव्या वाटा शोधालेल्या आहेतच ना? मग त्याने असे का म्हणावे? त्यानेही एकमागून एक प्रयोग फ़सत असताना चिकाटी सोडली नाही. तर नवी उमेद बाळगून पुन्हा नवा प्रयोग केला. तोही फ़सला तर पुन्हा नवा प्रयोग केलाच होता ना? म्हणून तर त्याला निसर्गाची अनेक रहस्ये उलगडता आली. नवनवे सिद्धांत मांडता आले. मग तेच तेच करण्याबद्दल त्यानेच नाराजी का दाखवावी? तर त्यामागे हेतू महत्वाचा असतो. आपल्याला नुसता प्रयोग करायचा आहे, की त्यातून काही साध्य करायचे आहे? साध्य ठरलेले असेल तर प्रयोग फ़सला म्हणून बिघडत नाही. कारण जिथे प्रयोग फ़सतो तिथे त्यात कुठे चुकले त्याचा शोध घेतला जात असतो. आधीच्या प्रयोगात जी चुक झाली, त्याची पुनरावृत्ती नव्या प्रयोगात होणार नाही याची काळजी घेतली जात असते. त्यालाच प्रयोगशीलता म्हणतात. पण कुठे चुकले त्याकडे ढुंकूनही न बघता जर कोणी, तीच तीच चुक पुन्हा पुन्हा करत असेल तर त्याला प्रयोगशीलता म्हणत नाहीत. उलट त्यालाच मुर्खपणा म्हणतात. चुकणे हा अजिबात गुन्हा नसतो. पण तीच तीच चुक सातत्याने करतच रहाणे, हा मात्र अक्षम्य गुन्हा असतो. आणि असा गुन्हा माणूस केव्हा करतो? जेव्हा त्याला काहीही साध्य करायचे नसते, तर आपण काही करता आहोत असा देखावा निर्माण करायचा असतो. म्हणूनच परिणाम काय साधायचा याच्याबद्दल त्याला कर्तव्य नसते की फ़िकीर नसते. त्यामुळेच अशी माणसे परिणामांची पर्वा न करता चुकांही पुनरावृत्ती करीत असतात.

   गुटखाबंदी हा असाच एक मुर्खपणा आहे. त्यातून काहीही साध्य केले जाणार नाही कारण ज्यांनी ती बंदी लागू करण्याचा पवित्रा घेतलेला आहे, त्यांना ती बंदी यशस्वी व्हावी अशी इच्छाच नाही. तशी इच्छा असती तर त्यांना सुप्रिया सुळे यांनी एका समारंभात जाहिरपणे त्याची मागणी करण्यापर्यंत वाट बघितली नसती. तशी प्रामाणिक इच्छा असती तर त्यांनी गुटख्यातून किती महसूल जमा होतो, त्याचा हिशोब मांडून निर्णय घेतला नसता. पण इथे नेमके तेच घडलेले आहे. अशाच प्रकारे दहा वर्षापुर्वी गुटखाबंदीचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि तो न्यायकक्षेच्या खडकावर जाऊन फ़ुटला होता. त्यानंतर दहा वर्षाचा कालावधी नव्या बंदीसाठी का लागला? तेच सरकार आणि तेच म्होरके सत्तेत कायम आहेत. मग आधीची गुटखाबंदी का फ़सली त्याचे आत्मपरिक्षण त्यांनी केले होते काय? केले असते तर यापुर्वीच राज्यात गुटखाबंदी होऊन गेली असती. पण तसे होऊ शकले नाही. कोणीतरी आग्रह धरला म्हणुन त्याच्या समाधानासाठी तेव्हा बंदी घालण्यात आली आणि ती न्यायालयात टिकली नाही; तर पुन्हा सत्ताधार्‍यांनी त्याकडे वळूनही पाहिले नाही. पुन्हा सुप्रिया सुळे यांनी त्या्ची मागणी करीपर्यंत आपली आधीची गुटखाबंदी फ़सली याचेही सरकारला स्मरण नव्हते. कारण तसे काहीही करायची या सत्ताधार्‍यांना इच्छाच नव्हती आणि आजही तशी प्रामाणिक इच्छा आहे असे वाटत नाही.

   इच्छा असेल तर माणूस त्या हेतूने कार्यरत होत असतो. एक सोपे ज्वलंत उदाहरण घेऊ. महिन्याभरापुर्वी मुंबईत मंत्रालयाला आग लागली होती. त्या आगीत सापडलेले अनेकजण होते. त्यातून स्वत:चा जीव वाचवावा असे वाटणारे होते त्यांनी अग्नीशमन दलाच्या आगमनाची प्रतिक्षा केली नाही. कदाचीत मरण्याची शक्यता असूनही त्यांनी थेट पाचव्या सहाव्या मजल्याच्या खिडकीतून उड्या मारण्यासाठी तयारी केली होती. त्यासाठी ते खिडकीतून बाहेर पडून सज्जावर उभे राहिले होते. वेळीच शिड्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नसत्या तर त्यांचाही जीव गेलाच असता. पण ती वेळ आली नाही. त्यांची जगण्याची दुर्दम्य इच्छाच त्यांना जीवावरचा धोका पत्करायला भाग पाडून गेली होती ना? कदाचित त्यांनी शोधलेला मार्ग त्यांनाच धोक्यात घालून गेला असता. पण त्यांचा हेतू शुद्ध व प्रामाणिक होता. त्यांना आगीत घुसमटून मरायचे नव्हते. पण जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मेलो तरी बेहत्तर अशी तयारी त्यांनी ठेवली होती. त्याला हेतू म्हणतात. हेतू जगण्याचा पण उचललेले पाऊल मात्र जीवावरच बेतणारे होते. आयुष्यात आपण अनेक धाडसी निर्णय घेतो तेव्हा त्यातल्या प्रत्येक पावलात यशस्वी होऊ अशी कोणी खात्री देऊ शकत नाही. कुठलाही हेतू शंभर टक्के यशस्वी होईल याचीही हमी देता येत नसते. पण प्रयत्नामागचा हेतू शुद्ध व प्रामाणिक असला पाहिजे. गुटखाबंदीमागे कुठला शुद्ध हेतू आहे? कुठला हेतू असायला हवा असतो?

   गुटखाबंदी वा दारूबंदी अशा निर्णयामागे लोकांना व्यसनमुक्त करणे हाच एकमेव हेतू असू शकतो. आणि तो हेतू वगळता अन्य कुठलाही हेतू असूच शकत नाही. पण आजचे सत्ताधीश त्याच हेतूने या निर्णयाप्रत आलेले आहेत काय? असते तर त्यांनी अशा बंदीचे दुरगामी परिणाम काय होतील त्याचाही आधीच अंदाज केला असता. पण त्याचा मागमुसही दिसत नाही. बुधवारची बातमी आहे की तोपर्यंत सरकारकडून प्रशासनाला कुठलेही आदेश देण्यात आलेले नव्हते. पण प्रशासन मात्र आपल्यापरी्ने गुटखाबंदीच्या तयारीला लागले होते. कधीपासून बंदी होणार तेही प्रशासनाला ठाऊक नसावे काय? ज्यांनी एका दिवशी बंदी लागू होताच तिचा कडेकोट अंमल करायचा आहे, त्याच यंत्रणेला बंदी कधीपासून लागू होणार त्याचा थांगपत्ता नसावा, हे कशाचे लक्षण आहे? कंपन्यांनी बनवलेला गुटखा लोकांनी खाऊ नये एवढ्यापुरती ही बंदी असेल तर त्यामागे व्यसनमुक्तीचा हेतू नाही हे स्पष्टच होऊन जाते. कारण गुटखाबंदीचा सुगावा लागल्यापासून अनेक व्यसनी लोक ह्ळूहळू अन्य पर्यायांखडे वळू लागले आहेत. त्याप्रमाणे त्यांचे पुरवठेदार म्हणजे टपरीवाले, दुकानदारही अन्य पर्याय शोधू लागले आहेत. मग जी बंदी लागू होणार तिचा हेतू काय? तर कंपन्यांचे गुटखा उत्पादन बंद करणे एवढाच राहून जातो ना? बाकी लोकांनी गुटखा वा तत्सम अन्य व्यसने चालू ठेवली तरी सरकारला त्याबद्दल कर्तव्य नाही असेच दिसते. की कंपन्यांना गुटखा उत्पादनाचे व्यसन लागले आहे, त्यापासून त्यांना मुक्त करायचा हेतू अशा बंदीमागे आहे? बाकी लोकांनी व्यसन करून मरण्याला सरकारची मान्यता आहे काय?

   यालाच आईनस्टाईन मुर्खपणा म्हणतो. कारन आजवर कुठलीही बंदी कधीच यशस्वी झालेली नाही. आणि इथे आपल्या देशातच नव्हेतर जगाच्या पाठीवर कुठल्याही देशातली कुठलीही बंदी यशस्वी होऊ शकलेली नाही. पण स्वत:ला सरकार म्हणवून घेणारे बंदी लावतच असतात आणि तोच तोच मुर्खपणा करतच असतात. महाराष्ट्रात घातलेली गुटखाबंदी त्याच मुर्खपणाचा नवा अवतार आहे. कारण त्यातून काहीच साध्य होण्याची चिन्हे नाहीत आणि दुर्दैवाची बाब म्हणजे सरकारलाही काहीच साध्य करायची इच्छा दिसत नाही. या मुर्खपणाचे खरे कारण आहे, ते व्यसनमुक्ती विषयी असलेले अज्ञान हेच आहे. बंदी घालून माणसे व्यसनमुक्त होतात, असा जो भ्रम आहे त्याच्या आहारी गेले, मग असे मुर्खपणाचे निर्णय घेतले जात असतात. सत्ता हाती आहे मग आपण लोकांच्या गळ्यात काहीही बांधू शकतो, या भ्रमाचा तो दुष्परिणाम आहे. तंबाखू सेवनाचे एकूणच समाजाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम ही आजची खरी भेडसावणारी समस्या आहे. तिच्यावरचा उपाय म्हणुन लोकांना व्यसनमुक्त करणे अगत्याचे झाले आहे. त्यात कुणावर खटले भरणे, कुणाकडला बंदीयुक्त माल जप्त करणे, अशा मालाचे उत्पादन थांबवणे वा त्यांचे परवाने रद्दबातल करणे इत्यादी अत्यंत दुय्यम बाबी आहेत. त्यापैकी कुणालाही शिक्षा झाली नाही वा त्यांच्यावर खट्ले भरले गेले नाहीत म्हणुन बिघडत नाही. कारण तो अशा बंदीमागचा खरा शुद्ध हेतूच असू शकत नाही. खरा हेतू व उद्दीष्ट समाजाचे सार्वजनिक आरोग्य जपायचे आहे. तंबाखू सेवनाने जे कर्करोगाचे प्रमाण समाजात वाढत चालले आहे, त्याला पायबंद घालणे हेच अशा बंदीमागचे खरे उद्दीष्ट आहे. त्यामुळे माणसांपासून गुटखा दुर ठेवणे हा त्यातला एक उपाय आहे. पण त्याचा उपयोग अतिशय क्षुल्लक आहे. त्यापेक्षा सामान्य माणसाला गुटख्यापासून दुर ठेवण्याला प्राधान्य असायला हवे. कारण व्यसनमुक्त समाजाचे उद्दीष्ट त्याच मार्गाने अधिक यशस्वी होऊ शकेल. पण त्याचा विचारही अशा बंदी वा कायद्यामध्ये होताना दिसत नाही. हेच त्याच्या अपयशाचे खरे गमक आहे. म्हणूनच आईनस्टाईन त्याला मुर्खपणा म्हणतो.   ( क्रमश:)
भाग  ( ३३२ )    २१/७/१२

गुटखाबंदीतले अनेक कळीचे मुद्दे


   गुटखा बंदीतुन काय साध्य होणार आहे? अकरा कोटीपेक्षा अधिक महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. त्यामध्ये निदान अर्धे तरी लोक तंबाखूच्या सेवनात गुंतले असतील तर पाच कोटीच्यापेक्षा अधिक लोक तंबाखूच्या व्यसनात गुंतलेले असू शकतात. त्यातूनही महिला व लहान मुले बाजूला काढून अर्धे लोक म्हटले तरी किमान चार कोटी लोकसंख्या यात येते. ते सर्वच गुटखा खाणारे असतील असे मानायचे कारण नाही. त्यातलेही निम्मेच गुटखा खाणारे म्हटले तर दोन कोटी ग्राहक होतात. ही संख्या थोडीथोडकी नाही. एका अंदाजानुसार महाराष्ट्रात पाच लाखाच्या आसपास गुटखा विक्रेते आहेत. याचा अर्थ सगळेच फ़क्त तंबाखू पदार्थ विकणारे नाहीत. पण लहानसहान खेड्यात गावात गेल्यास किराणा दुकान किंवा चहाभज्याची टपरीवालाही गुटखा विकत असतो. हे सगळे केवळ गुटखा विक्रीवरच गुजराण करतात असे अजिबात नाही. म्हणूनच विक्री व्यवसायात गुंतलेल्यांचे काय असा प्रश्न मी विचारत नाही. पण जे गुटखा विकतात, त्यांच्या एकू्ण उत्पन्नाचा दहापंधरा टक्के हिस्सा गुटख्याच्या विक्रीतून येतो हे नाकारता येणार नाही. त्यामुळेच अशा विक्रेत्यांच्या मासिक उत्पन्नात हजार रुपयांपेक्षा जास्त तुट नक्कीच येणार आहे. त्यांनी ती तुट कुठून भरून काढावी अशी सरकारची अपेक्षा आहे? त्यांच्या उत्पन्नासाठी लोकांनी व्यसन करून मरावे काय, असे विचारले जाउ शकते, तो विषय वेगळा आहे. त्याचे उत्तर मी नंतरच्या लेखातून देणार आहे. आणि इथे विक्रेत्यांच्या उत्पन्नाचा मुद्दा मांडून मी गुटखा खाण्याचे, विक्रीचे समर्थ करीत नाही. मी या एका बंदीचा घाईगर्दीने निर्णय घेण्यातुन किती नवे प्रश्न निर्माण होत आहेत, त्याकडे लक्ष वेधू इच्छित आहे. तेव्हा गावोगावी पसरलेले गुटखा विक्रेते व त्यांच्या उत्पन्नातील घट हा या बंदीचा एक मुद्दा आहे.

   आता दुसरा मुद्दा बघू. इतक्या गावामध्ये गुटखा विकला जाण्यावरची बंदी यशस्वीपणे कशी राबवली जाणार आहे? कारण तिथेपर्यंत पोहोचणारी कुठलीही यंत्रणा सरकारपाशी नाही. अन्न व औषध प्रशासन यांच्या ऐवजी ते काम पोलिसांना करावे लागणार आहे. आणि एखाद्या कायद्याचा अंमलबजावणी करताना मुडदा कसा पाडावा, यात पोलिस खाते सर्वात कुशल आहे. तेव्हा मुद्दा इतकाच, की खेड्यापाड्यापर्यंत जाऊन पोहोचलेल्या गुटख्याच्या वितरणावर निर्बंध कसे आणले जाणार? चोरट्या मार्गाने पुरवठा व विक्री होत असेल तर ती रोखण्यासाठी कुठली यंत्रणा सरकारपाशी नाही. म्हणजेच मोठ्या प्रमाणात त्याचा काळाबाजार होऊ शकतो. बंदीचा दिवस लागू होण्याआधीच प्रचंड प्रमाणात गुटख्याचे साठे केले जातील व नंतर सवडीने त्याचे चोरटे वितरण होत राहिल. त्याच्या शिवाय गोवा, गुजरात वा आंध्रप्रदेशातून चोरट्या मार्गाने त्याची आयात होऊ शकते. म्हणजेच चोरटी आयात व वितरण ही नवी समस्या निर्माण होणार आहे. ज्यांच्याकडे उत्पादनाचे परवाने आहेत, असे लोक अधिकृतपणे गुटखा उत्पादन करू शकणार नाहीत. पण त्यांचे उत्पादन बंद झाले म्हणुन ग्राहक संपलेला नाही, की माल पुरवठा बंद होण्याची शक्यता नाही. यासाठी कुठले उपाय सरकारने योजले आहेत? गुटखा बंदी करताना त्याच्या परीणामांचा विचार सरकारने केलाच नसेल तर त्याचा बंदी घालण्यामागचा हेतू शंकास्पद होऊन जातो. समाजाला व्यसनापासून मुक्त करण्याचा हेतू असेल तर नुसते बंदीचे पाऊल उचलून भागत नाही तर त्याच्या संभाव्य परिणामांचाही विचार आधीच करावा लागतो. त्याची चाहुलही ताज्या बंदी निर्णयात दिसत नाही. तिथेच त्याच्या अपयशाची खात्री सामावली आहे. कारण त्याच निष्काळजीपणात बंदीतल्या त्रुटी सहभागी आहेत.

   गुटखा खाणार्‍यांमध्ये खुप लोक व्यसनी आहेत आणि व्यसन कायद्याचा बडगा उगारला म्हणून संपत नाही, हे वैज्ञानिक सत्य आहे. मग असे व्यसनी लोक गुटखा उघडपणे मिळत नसेल तर अन्य मार्गाने आपल्या व्यसनाची पुर्तता करून घेऊ पहातात. त्यातून अवैध धंदे उदयास येतात. चार दशकांपुर्वी पानमसाला सुरू करणार्‍या पहिल्या व्यावसायिकाची कथा वाचल्याचे आठवते. गुजरातहुन उत्तरप्रदेशात गेलेल्या व स्थायिक झालेल्या त्या व्यक्तीला सिगरेटचे व्यसन होते. तिथे सिगरेट खरेदी करताना त्याला एक साक्षात्कार झाला. पानपट्टी बनवावी लागते. ती बनवण्यात जो विलंब होतो, त्यामुळे तल्लफ़ आलेले पानखाऊ वैतागतात. त्याने वैतागलेल्या व्यसनी लोकांसाठी झटपट पानपट्टीचा पर्याय म्हणून त्याचे पानमसाला नावाचा पदार्थ शोधून काढला. त्याचे आरंभी छोटे डबे विकले जायचे. पण ज्यांना डब्याची मोठी किंमत एकदम भरता येत नाही, अशा सामान्य ग्राहकाला जोडण्यासाठी त्याने छोट्या पुड्या म्हणजे पाऊच स्वरूपात पानमसाला विकायची कल्पना पुढे आणली. त्यातूनच गुटखा वा पानमसाल्याची आजची प्रचंड बाजारपेठ उभी केली आहे. पन्नास वर्षे मागे गेलात तर गुटखा वा पानमसाला हे उत्पादन बाजारात नव्हते. साधारण १९७० च्या सुमारास त्याचा उदय झाला. आणि तंबाखूची पुडी खरेदी करणार्‍यांपर्यंत त्याचे लोण जाहिरातबाजीने पोहोचवले. पुढेपुढे तर नामवंत अभिनेते व कलावंत वापरून गुटखा पानमसाला सेवनाला प्रतिष्ठा देण्यात आली. वितरण व विक्री व्यवस्था सोपी सुटसुटीत करण्यात आली. अशा उत्पादकांचे संबंध थेट दाऊदपर्यंत जाऊन पोहोचल्याच्या बातम्याही सरकार विसरले असले, तरी चोखंदळ वाचक विसरला नसेल. एका ख्यातनाम गुटखा उत्पादाकाने दाऊदसाठी दुबईमध्ये चोरट्या मार्गाने गुटखा उत्पादन यंत्रे पाठवल्याचेही प्रकरण काही वर्षापुर्वी बाहेर आले होते.

   अशी सगळी गुंतागुंतीची भानगड गुटख्याच्या मागे आहे. ती भानगड एक कायद्याचा छापील कागद आणुन संपवता येईल असे सरकारला वाटते काय? गुटख्याची सुरूवात व्यसनी माणसाच्या उतावळेपणातून झालेली आहे. म्हणजेच छापाचे वा नावाचे गुटखे बंद केल्याने लोकांना व्यसनमुक्त करता येणार आहे काय? तयार पुडी नसेल पण तयार करून देणारी दुकाने तर आहेतच ना? जिथे पानपट्टी मिळते तिथे मावा नावाचा पदार्थ मिळतो, त्याला गोवा किंवा चकदे, सिमला अशी नावे नाहीत. पण त्यातला अंमली पदार्थ वा त्याचे परिणाम वेगळे आहेत काय? मावा किंवा खारा असे स्थानिक गुटखे नव्या बंदीच्या कायद्याने कसे संपणार आहेत? ज्यांच्याकडे लाखो, करोडो पाकिटे गुटखा उत्पादनाचे परवाने आहेत, त्यांच्याकडुन उत्पादन थांबवणे शक्य असेल. पण त्यामुळे व्यसनमुक्ती होणार कशी? सवाल व्यसनमुक्तीचा आहे, की नुसत्या कारखान्यातील गुटखा उत्पादनावरील बंदीचा आहे? पाकिटबंद गुटखा लोकांनी खाल्ला नाही मग आरोग्याला अपाय नाही, अशी सरकारची समजूत आहे काय? इतक्या झटपट एखादा कायदा करताना त्याचा हेतू काय? लोकांच्या डोळ्यात धुलफ़ेक करणे, की खरेच व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याच्या दिशेने पुढले पाऊल टाकणे? पहिला उद्देशच असेल तर त्यात सरकार यशस्वी झाले असेच म्हणावे लागेल. कारण आधीच निकामी निरुपयोगी ठरलेल्या अनेक कायद्यांच्या अडगळीत आणखी एक कायद्याची भर पडली आहे. पण दुसरा हेतू असेल, म्हणजे व्यसनमुक्त समाज घडवण्याचा हेतू असेल तर आणखी एक पाऊल मागे पडले, असेच म्हणावे लागेल. कारण या बंदीने घरोघरी व वस्तीवस्तीमध्ये गुटख्याचे नवे कुटीरोद्योग आता निर्माण होणार आहेत. कारण जे व्यसनी आहेत त्यांना पानपट्टी विकणार्‍यांनी तिथल्या तिथे गुटखा किंवा मावा बनवून देण्याचा मार्ग मोकळाच आहे. मग अशा माव्याच्या् पुड्या बनवून तयार ठेवणारा नवा उद्योग उदयास येईल. त्यात भेसळ झाली तर त्यावर नियंत्रण कोणी ठेवायचे? कारण अशा उत्पादनाला कुठला परवाना लागत नसतो. म्हणजेच व्यसनमुकी राहिली बाजूला आणि विषारी दारूचे बळी जातात तसे विषारी गुटखा, मावा किंवा भेसळीचे बळी सुरू होतील. अशा शक्यतांचा सरकारने या बंदीपुर्वी विचार तरी केला आहे काय?

   तंबाखू सेवन आरोग्याला अपायकारक आहेच. पण तो विषप्रयोग संथगतीने होणारा आहे. भेसळीचा विषप्रयोग अत्यंत वेगाने काम करत असतो. देशाच्या विविध भागात आणि महाराष्ट्राच्याही विविध जिल्ह्यात अशा भेसळीच्या दारूचे बळी अधूनमधून जातच असतात. कुठलेही कायदे व बंदीहुकूम त्यांना वाचवू शकलेले नाहीत, त्यात भेसळीचा गुटखा किंवा तंबाखू पदार्थ हा आणखी एक धोका सरकारने निर्माण केला नाही काय? उशिरा संथगतीने व्यसनामुळे मरतील, त्यांना झटपट मृत्यूच्या जबड्यात पाठवण्याला व्यसनमुक्ती म्हणायचे काय? बंदी घातली व त्यासाठी कायदा केला मग आपली जबाबदारी संपली अशी जी पलायनवादी भूमिका आहे; त्यातून अशा समस्या निर्माण होत असतात. एक समस्या सोडवताना आणखी अनेक समस्या जन्माला घातल्या जात असतात. गुटखाबंदी त्याचीच साक्ष आहे. सरकारने आपले उत्पन्न किती बुडणार एवढाच विचार करून ही बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामागे व्यसनमुक्तीचा प्रामाणिक हेतूच नाही, हेच खरे दुखणे आहे. म्हणुनच ती बंदी अपेशी ठरणार आहे. हेतूचे महत्व काय, त्याची चर्चा उद्या तपासू या. ( क्रमश:)
भाग  ( ३३१ )    २०/७/१२

गुरुवार, १९ जुलै, २०१२

निकामी कायदेच गुन्हेगारांची पैदास करतात


   जे कायदे राबवले जाऊ शकत नाहीत असे कायदे सरकार बनवतेच कशाला? ज्या योजना अंमलात आणता येत नाहीत किंवा आणल्या जात नाहीत, अशा योजना आखल्याच कशाला जातात? तुमची आमची गोष्ट सोडून द्या. आपल्याला तर आजच्या सरकारने कसाब किंवा कोणाही जिहादी घातपात्याला शिकार-शिकार म्हणून खेळायचे असते त्यात मारले जाणारे सावज म्हणून वार्‍यावर सोडून दिले आहे. पण जे सत्ता उपभोगतात व सुरक्षित जगू इच्छितात त्या मंत्र्यांचे काय? त्यांच्याच सुरक्षिततेसाठी बनवलेल्या अग्नीशमन कायद्याचा अंमल मंत्रालयात झाला नव्हता ना? झाला असता तर मंत्रालयाला लागलेली आग अशी पसरत गेली नसती की अर्धे मंत्रालय त्यात असे भस्मसात झाले नसते. पण तसेच झाले. कारण कायदे फ़क्त कागदावर छापण्यासाठी बनवायचे असतात, अशीच आजच्या सत्ताधार्‍यांची धारणा आहे. म्हणूनच नवनवे कायदे सतत बनवले जात असतात. कधी बंदी घालणारे, कसली तरी सक्ती करणारे, तर कधी कुठली बंदी उठवणारे कायदे होतच असतात. त्याने सामान्य जनतेच्या जीवनात कुठलाही फ़रक पडत नसतो. कारण तसा फ़रक पडावा अशी अपेक्षाच नसते, की तसा हेतूही नसतो. कुठून तरी मागणी होते आणि एक नवा कायदा बनवला जातो. मग ज्यांची मागणी असते ते खुश होतात आणि दुसरे समोर येऊन त्या मागणीला विरोध करू लागतात. तेव्हा सरकार म्हणते हरकत नाही. दुसर्‍यांनाही खुश करायला हवे. म्हणून सरकार आधी केलेल्या कायद्याला कागदातच गुंडाळून ठेवते. एकूण काय कुठलाही कायदा हेतूशुन्य असतो व म्हणूनच परिणामशुन्य ठरतो. पण मग सरकार कायदा बनवतेच कशाला? जगप्रसिद्ध लेखिका व विचारवंत आयन रॅन्ड यांच्या "एटलास श्रग्ड" नामक इंग्रजी कादंबरीत त्याचे योग्य उत्तर आलेले आहे. जणू पन्नास वर्षापुर्वी त्यांनी एकविसाव्या शतकात भारतात कसे सरकार असेल, त्याचे भविष्यच लिहून ठेवले म्हणावे असेच ते उत्तर आहे. ते विश्लेषण अत्यंत गंभीर तसेच मोजक्या शब्दातले आहे, ते काळजीपुर्वक समजून घेण्याची गरज आहे. त्या लिहीतात,

"कुठल्याही सरकारकडे एकच अधिकार असतो आणि तो गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्याचा अधिकार असतो. पण सरकार म्हणुन काम करणार्‍याना पुरेसे काम देण्याइतके गुन्हेगार नसतील तर सरकारच गुन्हेगार निर्माण करते. मग सरकार इतक्या गोष्टींना गुन्हा म्हणून घोषित करते, की कायदा मोडल्याशिवाय जगणेच सामान्य माणसाला अशक्य होऊन जाते. कायदा पाळणार्‍या नागरिकांचे राष्ट्र कोणाला हवे आहे? त्यात कोणासाठी काय असते? मग असे कायदे संमत करून घ्या, जे पाळले जाणार नाहीत, लादले जाऊ शकत नाहीत किंवा परिणामकारकरित्या त्यांचा अर्थही लावला जाऊ शकत नाही. त्यातून तुम्ही कायदा मोडणार्‍यांचे राष्ट्र निर्मा्ण करता आणि त्यांच्या मनातल्या अपराधी भावनेवर कायम सत्ता गाजवू शकत असता."

एका गुटखा बंदीच्या कायद्याचा इथे संबंध नाही, तर कायद्याच्या राज्याचा जो अखंड पोरकटपणा चालू आहे, त्याच्यावर वरील उतार्‍यात भाष्य केलेले आहे. सरकार कशासाठी असते व सरकारच्या अधिकाराच्या मर्यादा काय आहेत? तर समाजात जे मुठभर गुन्हेगारी वृत्तीचे लोक असतात, त्यांच्या मुसक्या बांधणे. पण असे गुन्हेगार समाजात किती असतात. हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही गुन्हेगार नसतात. मग वर्षभर महिनोन महिने सरकारने करायचे काय? त्याला कामच उरणार नाही. म्हणजेच सरकार म्हणून काम करायचे असेल व कायद्याचे राज्य राबवायचे असेल, तर कायदा मुकाटपणे पाळणारे असून भागत नाही. कारण सगळेच कायदेभिरू असले तर कायदा व्यवस्था यंत्रणेला कामच उरत नाही. आणि अशा यंत्रणेचा म्हणजे सरकार, प्रशासन वा सत्ताधार्‍यांचा रोजगार चालू रहायचा असेल, तर समाजात अधिकाधिक लोक गुन्हेगार असायला हवेत. कायदा पाळणारे नव्हेत तर कायदा मोडणारेच सरकारला हवे असतात. त्यांचा तुटवडा पडला तर सराकारचे दिवस भरलेच म्हणून समजा. मग आपली गरज म्हणून अधिकाधिक गुन्हेगार सरकारलाच निर्मांण करावे लागतात. ते कारखान्यातून निर्माण करता येत नाहीत तर कायद्याच्या घोषणेतून निर्माण करता येतात. त्यासाठीची प्रक्रिया अत्यंत सोपी असते. कालपर्यंत योग्य असलेली कृती वा गोष्ट आजपासून बेकायदा ठरवली जाते. मग एका रात्रीत एका फ़टक्यात शेकडो नव्हे, तर लाखो गुन्हेगार निर्माण होत असतात. कुणाला हा विनोद वाटेल. पण ही बाब अगदी चमत्कारिक नसून तेच सुर्यप्रकाशाइतके सत्य आहे. खरे नाही वाटत?

   आता नव्या गुटखा बंदीचाच ताजा निर्णय घ्या. या विषयावर लिहायला लागल्यापासून मला जे सव्वाशे दिडशे फ़ोन तीन दिवसात आले, त्यात पन्नासहून अधिक एकच प्रश्न विचारणारे होते. कधीपासून बंदी येणार आहे. या प्रश्नाचा अर्थ कळतो आपल्याला? कधी अशा प्रश्नाकडे आपण गंभीरपणे बघितले आहे काय? अमुक एका दिवसापर्यंत जे काम वा कृत्य अगदी कायदेशीर आहे, ते त्या ठरलेल्या दिवसानंतर गुन्हा कसे होते? आज जे कायदेशीर आहे, तेच बंदीचा कायदा अंमलात आल्यानंतर गुन्हा कसे होऊ शकते? का त्याला गुन्हा म्हणायचे? तर सरकारने तसे ठरवले म्हणून. सरकारने जी तारीख ठरवली त्या दिवसापर्यंत तेच काम कायदेशीर आहे आणि तो दिवस उलटला मग गुन्हा आहे. इथे "का" हा एकाक्षरी प्रश्न विचारला तर उत्तर काय मिळते? सरकार म्हणते म्हणून, सरकारने तसा कायदा केला म्हणून. म्हणजेच सरकारने तसा कायदा केला नसता तर तेच कृत्य गुन्हा ठरत नाही. पण जे काही कृत्य आहे ते अनैतिक वा गुन्हेगारी ठरवायचा कुठलाही तर्कशुद्ध आधार नाही. आम्ही सरकार आहोत व आम्ही म्हणतो म्हणून. ही निव्वळ दादागिरी गुंडगिरी नाही काय? दाऊद किंवा शकील, छोटा राजन वगैरे असेच दादागिरी करता असतात ना? कुठल्या मालमत्तेमध्ये घुसखोरी करून मनमानी करणार्‍या गुंडांमध्ये व सरकार नावाच्या यंत्रणेमध्ये काय फ़रक राहिला? दोघेही आम्ही म्हणतो म्हणून, एवढाच आपल्या सक्तीचा तर्क देतात ना? सगळी गडबड तिथेच तर होते. म्हणुनच कायद्याचा सन्मान व पावित्र्य संपुष्टात आले आहे. लोक कायदा जुमानण्यापेक्षा कायदा मोडायला उत्सुक असतात. अशा कायद्याच्या राज्यातून अधिकाधिक नागरिक व लोक कायदा मोडणारे होत जातात, मग त्यांना गुन्हेगार ठरवून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शासन यंत्रणेचा पसारा वाढत जातो. त्यावर होणारा खर्च हाताबाहेर जातो. एकीकडे कायदा राबवण्याचा आव आणला जात असतो आणि दुसरीकडे सर्वच कायदे सातत्याने मोडले जात असतात. पण दोन्हीकडून नुकसान सोसत सरकार नावाचे बांडगुळ सामान्य जनतेला पोसावे लागता असते.

   आयन रॅन्ड यांच्या उपरोक्त उतार्‍याची प्रचिती आपल्याला रोजच्या रोज येत असते. कायद्याचे पावित्र्य सांगणारे किती लोक कायद्याचे पालन स्वत: करीत असतात? खुद्द कायद्याची अंमलबजावणी करणारेचा कायदा मोडताना दिसतात. आदर्श घोटाळा काय आहे? स्पेक्ट्रम घोटाळा काय आहे? मंत्रालयाची आग काय प्रकरण आहे? जे कायदे इतरांना लावताना कठोर होण्याचा आव आणला जातो, तेच कायदे स्वत: सरकारच मोडत नसते काय? मंत्रालयाच्या आवारात मोकळी जागा सोडली आहे. तिथे बेकायदा वाहने उभी करणे गुन्हाच असतो. पण ती तशीच उभी असतात. म्हणुनच आग लागली तेव्हा अग्नीशमन दलाच्या बंबांना आत प्रवेश करता आला नव्हता. त्यामुळेच आग झपाट्याने पसरत गेली. मग आजवर मंत्रालयाच्या पटांगणात बेकायदा व नियमबाह्य गाड्य़ा उभ्या करणार्‍यांवर का कारवाई होऊ शकली नव्हती? अजून का झालेली नाही? तर कायदा कुणालाच नको असतो. ज्याच्या हाती अंमलबजावणीचे अधिकार असतात, त्याचा कायदा असतो. तो हवा तसा कायदा वाकवू शकतो, वळवू शकतो. कारण सार्वजनिक व सामुहिक जीवन सुटसुटीत करणे, सुरळीत चालवणे हा आता कायद्याचा हेतूच राहिलेला नाही. तर सरकार चालवणार्‍यांना समाजमनात गुन्हेगारी अपराधी भावना निर्माण करून त्यांच्यावर हुकूमत गाजवण्यासाठी कायद्याचे राज्य चालवायचे असते. त्यासाठीच मग कुठली बंदी, कुठला निर्बंध घालणारे सरसकट कायदे बनवले जातात व राबवले जातात. त्यांचा हेतू लोकशाहीच्या नावावर सताधार्‍यांची सरंजामशाही पोसणे एवढाच असतो. लोकहित, लोकजीवनात सुधारणा असा अजिबात नसतो. म्हणुनच कायदे मोडले जातात. कायदे निरुपयोगी ठरतात, कायदे निष्फ़ळ ठरतात, कायदे निकामी त्रासदायक अपायकारक होऊन जातात. अनेकदा तर समस्या संपवण्यापेक्षा नवीच भीषण समस्या कायदाच निर्माण करून ठेवतो.    ( क्रमश:)
भाग  ( ३३० )    १९/७/१२

मंगळवार, १७ जुलै, २०१२

गुटखाबंदीचा हेतू प्रामाणिक आहे काय?


साधनांचा नेमकेपणा परंतु उद्दीष्टाविषयीचा सावळागोंधळ, हीच खरी मोठी समस्या असते - अल्बर्ट आईनस्टाईन

  महाराष्ट्रात तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन कधी कोणी गुन्हा मानलेले नाही. मुंबईसारख्या महानगरात किंवा कुठल्याही दुर्गम खेड्यात गेलात तरी अर्धीअधिक लोकसंख्या तंबाखूचे वेगवेगळ्या स्वरूपात सेवन करताना दिसतील. कोणी नुसताच चुना तंबाखू चोळून तोंडात टाकतांना दिसेल, तर कोणी त्याचा सुपारी पानासह वापर करतांना दिसेल. सभ्य उचभ्रू घरात ज्याला मुखशुद्धी म्हणतात, त्याला बाजारू भाषेत पानपट्टी म्हणतात. त्याचे शरीर व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कोणी नाका्रत नाही. पण त्याचे सेवन म्हणजे कुठला तरी गुन्हा आहे, अशी भावना कोणाच्याही मनात आढळून येणार नाही. अगदी त्याचे सेवन न करणारे निर्व्यसनी लोकसुद्धा सेवन करणार्‍याला गुन्हेगार मानणार नाहीत. ज्याला असे व्यसन आहे त्याने त्यातून मुक्त व्हावे, असे जरूर म्हणतील. पण कोणी अशा व्यक्तीला गुन्हेगार ठरवणार नाहीत. कारण तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन इथली सार्वत्रिक प्रथा व परंपरा आहे. उत्तरेत तर हुक्कापानी हा सामाजिक संबंधातला प्रतिष्ठेचा विषय आहे. अशा समाजात एका कायद्याच्या कागदाने चमत्कार घडवून आणता येईल काय? कालपर्यंत जी गोष्ट गुन्हा नव्हती तीच आज अचानक कागदावरचा कायदा संमत केला, म्हणून गुन्हा कसा होऊ शकेल? कालपर्यंत जी बाब अनैतिक नव्हती तिला आजचा नवा कायदा अनैतिक म्हणू लागला, तर ते सहजासहजी कसे मान्य व्हावे? जेव्हा असे होते, तेव्हा लोक त्या कायद्याकडे संशयाने पाहू लागतात किंवा विरोधात उभे राहू लागतात. कारण अशा निर्बंध वा बंदीला कायदा मंजुरी देत असला, तरी समाजमन त्याला गुन्हा मानत नसते. जो कोणी त्यापैकी काही करतो त्याला त्यात गुन्हा आहे असे वाटत नाही.

   इथे एक उदाहरण देता येईल. कायदा ज्याला गुन्हा म्हणतो अशा अनेक गोष्टी व कृती आहेत. ज्या करताना लोकांना गुन्हा नव्हे तर पवित्र कार्य वा कर्तव्य वाटत असतात. खाप पंचायती किंवा घराण्याची प्रतिष्ठा यांना कायदा आडवा येत असेल तर किती लोक कायद्याची महत्ता मानतात? एकाच गावातील मुलाने व मुलीने प्रेमविवाह केल्यास त्याला आक्षेप घेऊन त्यांना गावाबाहेर हाकलून लावले जाते, बहिष्कार घातला जातो किंवा काही प्रसंगी तर त्यांचे मुडदे पाडले जातात. ह्या प्रत्येक कृती आजच्या कायद्यानुसार गंभीर गुन्हे आहेत. पण जेव्हा ते गुन्हे घडतात, तेव्हा त्यासंबंधाने कायदेशीर कारवाई करताना किती अडथळे येतात? का येतात? कारण ज्यांच्याकडुन ते गुन्हे घडतात, त्यांना जे करत आहोत तो गुन्हाच वाटत नसतो. उलट तो गुन्हा करताना त्यांना आपण कुठले तरी पवित्र कार्य करीत आहोत, अशीच समजूत असते. ती भले आधुनिक विचारांनी चुकीची व विकृत असेल. पण ज्यांच्याकडून असे कृत्य होत असते, त्यांच्याखेरीज सभोवतालच्या लोकांनासुद्धा तो गुन्हा वाटत नसतो. म्हणुनच कायदा तोकडा पडतो. याच आठवड्यात उत्तरप्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील बुलंदशहर परिसरातील एका मोठ्या गावातल्या खाप पंचायतीने मुलींना व चाळीशीपर्यंतच्या महिलांना बाजारात जाण्यास व घराबाहेर पडण्यास प्रतिबंध घातला आहे. असे का होते? त्या भागातील प्रभावी राजकीय पक्ष असलेल्या व सेक्युलर विचारधारा मानणार्‍या राष्ट्रीय लोकदल पक्षानेही त्या निर्णयाचे समर्थन केले आहे. केंद्रीय हवाई वाहतुकमंत्री अजितसिंगच त्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. म्हणजे जो माणूस सरकारमध्ये राहून कायद्याचे राज्य चालवतो आहे, त्याच्याच पक्षाने कायदा पायदळी तुडवण्याचे समर्थन केले आहे. याला विरोधाभास म्हणायचे काय?

   जरा डोळसपणे अशा विषयांकडे बघण्याची गरज आहे. कारण ज्यांच्यावर कायदे लादले जात असतात, त्यांना कायदा आपल्यावर अन्याय करतो किंवा अत्याचार करतो, असे वाटले तर तो कायदा यशस्वी होऊ शकत नाही. उलट तो झुगारण्यातच लोक शन्यता मानतात. मग त्या कायद्यामागचा हेतू कितीही शुद्ध वा पवित्र असला तरी उपयोग नसतो. ही बाब फ़क्त खाप पुरतीच नाही. कोलकात्याच्या एका मुस्लिम तरुणाशी जैन मुलीने प्रेमविवाह केल्यावर मुलीच्या कुटुंबाच्या बाजूने मोठे पोलिस अधिकारी उभे राहिले, तेव्हा त्यांनीही कायद्याला झुगारलेले होते. त्याचे कारण फ़क्त त्यांना लाच मिळाली एवढेच नव्हते. अनेकदा मानसिकताच त्याचे खरे कारण असते. यातून दिसून येईल, की ज्यांच्यावर तो कायदा लादला जातो, तेच नव्हे तर लादणारे सुद्धा कायद्याच्या बाजूचे नसतात. मग तो कायदा प्रत्यक्षात अनाथ किंवा बेवारस असतो. त्यातून अराजकाची परिस्थिती निर्माण होत असते. गुटखाबंदीचा कायदा किंवा निर्बंध तसाच लोकांच्या पचनी पडणारा नाही. त्याचा हेतू कितीही पवित्र असला तरी लोकांना तो अन्याय वाटत असेल, तर त्याचे उल्लंघन करण्यात लोकांना अजिबात अपराधी भावना वाटणार नाही. तिथेच या गुटखाबंदीचे अपयश सामावलेले आहे. एका बाजूला लोकांना त्याचे पावित्र्य वाटणार नाही तर दुसरीकडे त्याची अंमलबजावणी करणारी समर्थ यंत्रणा सरकारपाशी नाही. सगळी गडबड तिथेच होणार आहे.

   जेव्हा तो कायदा मोडताना लोकांनाच पाप वाटणार नाही, तेव्हा त्या पापात सहभागी व्हायला अनेकजण व्यापारी वृत्तीने समोर येणार आहेत. लोकांना गुटखा खायचा असेल आणि तो उघडपणे मिळणार नसेल, तर चोरट्या मार्गाने जो आणून देईल त्याच्याकडून लोक अधिक किंमत मोजून वस्तू मिळवणार आहेत. दुसरी बाब म्हणजे असे कृत्य बेकायदा असणार आहे म्हणजे त्यावर पोलिसांनी अंकुश ठेवायचा आहे, तेच त्यात सहभागी होणार आहेत. जे बेकायदा करायचे त्याला पोलिसांचा आशीर्वाद आवश्यक असतो. अन्यथा कुठलीही बेकायदा कृती आपल्या देशात होऊ शकत नाही. त्यामुळेच कुठल्याही गोष्टीवर बंदी घातली गेली मग पोलिस खुश असतात. कारण त्यांना पैसे कमावण्याचा आणखी एक मार्ग उपलब्ध होत असतो. तेव्हा गुटखाबंदी पोलिसांना आणखी एक उत्पन्नाचे साधन मिळवून देणार आहे. गेल्या वर्षी याच काळात सातारा जिल्ह्यात प्रसन्ना नावाचे नवे एसपी रुजू झाले. आल्याआल्या त्यांनी जिल्ह्यातील बेकायदा प्रवासी वाहतूक बंद करण्याचा पवित्रा घेतला. आणि चक्क तो निर्णय यशस्वी झाला. संपुर्ण जिल्ह्यात खाजगी वाहतुक करणार्‍या गाड्या एका दिवसात गायब झाल्या. पण तो कायद्याचा दबदबा नव्हता किंवा यश नव्हते. प्रसन्ना यांनी थेट आपल्या पोलिस यंत्रणेवरच अंकुश उगारला होता. ज्या पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत बेकायदा वाहतुक पकडली जाईल, तिथल्या ठाणेप्रमुखाला जबाबदार धरण्याचे धोरण त्यांनी जाहिर केले होते. मग काय, थेट पोलिसांनीच खाजगी वाहतुक करणार्‍यांना वहाने बंद ठेवायला भाग पाडले होते. काही महिन्यातच पुन्हा ही वाहतुक सुरू झालेली आहे. मग आधी घडला तो चमत्कार काय सांगतो? गुन्हा करायला पोलिसांची परवानगी म्हणजे अभय वा आशीर्वाद लागतो. तेच गुटखा प्रकरणात होणार ना? आणि पोलिस कुठली सर्व्हीस फ़ुकट कशाला देतील? त्याची आवश्यक ती किंमत मोजणार्‍यालाच पोलिसांचा आशिर्वाद मिळणार ना?

त्यामुळे होणार काय तर गुटखाबंदी राज्यात चालू असेल, पण ज्यांना हवा असेल त्यांना अधिक किंमत मोजून गुटखा सहजगत्या मिळू शकेल. अशा गुटख्याची विक्री तुम्हीआम्ही उघड्या डोळ्यांनी बघू शकणार आहोत. फ़क्त ती पोलिस वा शासनाच्या डोळ्यांना दिसणार नाही. आणि त्यांना दिसणार नाही म्हणूनच गुटखाबंदी यशस्वी झाल्याबद्दल शासनकर्ते स्वत:ची पाठ थोपटून घेउ शकतील. आजवरच्या प्रत्येक कायदा व निर्बंधाच्या बाबतीत हेच घडत आलेले आहे. त्यात नवे काहीच नाही. याचा अर्थ गुटख्याचे व्यसन किंवा तंबाखूचे सेवन समर्थनिय होऊ शकत नाही. त्याचे दुष्परिणाम नाकारता येणार नाहीत. पण त्यानाच आळा घालण्याचे उपाय मात्र यशस्वी होणार नाहीत. कारण त्याचे लाभ ज्यांना मिळावेत अशी त्या निर्बंधाची अपेक्षा आहे, त्यांनाच ते लाभ ठाऊक नाहीत किंवा जे त्यांच्या भल्यासाठी आहे, तोच त्यांना त्यांच्यावरील अन्याय वाटतो आहे. कारण त्यांना विश्वासात न घेताच असे निर्णय लादले जातात तेव्हा ते कितीही लाभाचे असले तरी अन्याय्य वाटत असतात. तिथेच चांगल्या निर्णयांचे अपयश ठरलेले असते. मग अशा चांगल्या निर्णयाचे उपाय होताना दिसण्य़ाऐवजी अपाय मात्र होताना दिसतात. आणि इथे तर शासनकर्त्यांचा हेतूही प्रामाणिक नाही. त्यांना व्यसनमुक्तीसाठी धाडसी निर्णय घेतल्याचे श्रेय हवे आहे. पण व्यसनमुक्ती हा त्यामागचा हेतूच नाही. परिपुर्ण कायद्यापेक्षा सरकारच्या हेतूमागचा सावळागोंधळ गुटखाबंदीच्या यशातली खरी मोठी समस्या आहे ना?   ( क्रमश:)
भाग  ( ३२९ )    १८/७/१२