शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

जनतेपासून नाळ तुटलेले राजकारण

ध्येय अमुचे हे ठरले
कार्य दुसरे ना उरले
  (लेखांक  चौथा)


 पुरोगामी र्‍हासामागची मूळ संकल्पना लक्षात घ्यायला हवी. १९८० नंतरच्या काळात कॉग्रेस विरोधी राजकारणाला जनता पक्षातील काही मुठभर समाजवाद्यांनी संघविरोधाचा नवा कंगोरा निर्माण करून दिला. मात्र त्यापासून डावे पक्ष व कॉग्रेस अलिप्त होती. पण समाजवाद्यांच्या या विघातक राजकीय दिवाळखोरीचा कॉग्रेसला लाभ होणार असल्याने कॉग्रेसी नेते राजकारणी त्याला खतपाणी घालत राहिले. १९७७ च्या निवडणूकीत सेन्सॉरशीप उठल्याने माध्यमे मोकाट झाली होती. त्याचा मोठा लाभ जनता पक्ष मिळवू शकला. पण त्याचवेळी माध्यम हे राजकारणातले मोठे प्रभावी हत्यार असल्याचा शोध चौथा खांब म्हणून मिरवणार्‍यांना लागला होता. तिथून मग राजकारणात थेट ढवळाढवळ करण्याची पत्रकारांनी सुरूवात केली. काही पत्रकार उघड राजकारणात हस्तक्षेप करू लागले, तर काहीजण नेत्यांची वा पक्षांची सुपारीबाजी करू लागले होते. याखेरीज काही प्रमाणात तटस्थ पत्रकारितेला शह देवून संपादक व पत्रकार खुलेआम आपला राजकीय अजेंडा म्हणून माध्यमांनाच राजकीय हत्यार म्हणून वापरू लागले होते. अशावेळी पुन्हा सत्तेत आलेल्या कॉग्रेसने पत्रकारांना आपल्या राजकारणाचे दलाल व भागिदार बनवण्याचे पाऊल टाकले. सभा संमेलने वा मोर्चे-धरणे यातून जी मजल मारता येत नाही, त्याहून अधिक मोठी झेप प्रभावी माध्यम हाती असेल तर नुसत्या निवेदन वा लक्ष्यवेधी वाक्याने मारता येते, असे लक्षात येऊ लागले होते. सहाजिकच नामवंत संपादक व पत्रकारांचे स्तंभ राजकारणाची हत्यारे होऊ लागली. जनता पक्षाच्या सत्ताकाळात बिहारच्या बेलची गावात दलितांची वस्ती जाळली गेली. तर तिथे भेट देण्याच्या निमीत्ताने इंदिराजींनी वापरलेले माध्यम कुठल्याही भेदक हत्यारापेक्षा परिणामकारक होते. इंदिराजी तिथे गेल्या व नदीला पुर आल्याने पलिकडे जाणे शक्य नव्हते. तर त्यांनी हत्ती मागवला आणि इतक्या भीषण पुरातही दलित उध्वस्त गावाला भेट दिली. तेव्हा कॅमेरे नव्हते की थेट प्रक्षेपणाची सुविधाही नव्हती. तर निव्वळ तिथल्या स्थानिक बातमीदाराकडून आरंभीच्या बातम्या आल्या. मग तिकडे प्रमुख वर्तमानपत्रे व साप्ताहिकाच्या प्रतिनिधींनी धाव घेतली. परिणामी बेलची गावचा प्रचंड गाजावाजा सुरू झाला. मोरारजी सरकार व बिहार सरकारची तारांबळ उडाली. पण त्या एक घटनेचा इतका चतुराईने इंदिराजींनी वापर केला, की तिथून त्यांच्या पुनरागमनाला चालना मिळाली. 

इंदिराजींचा दौरा म्हणजे सनसनाटी बातमी हे गृहीत होऊन पत्रकार बातमीदार त्यांच्या मागे धावू लागले. त्याही अशा जागा व प्रसंग शोधायच्या, की त्याची सनसनाटी व्हायला हवी आणि प्रत्येक बाबतीत मोरारजींच्या जनता पक्षाला खुलासे देत बसायला लागावे. माजी पंतप्रधान व नेहरूंची कन्या इतक्या कुठल्याही खबदाडीत पोहोचते, ही बातमी होऊ लागली. पर्यायाने आणिबाणीच्या अन्याय अत्याचाराच्या बातम्या शिळ्या होऊन जनता सरकारच्या व पक्षाच्या चुकांकडे लक्ष वेधले जाऊ लागले. सतत आणिबाणीवर केंद्रित झालेला माध्यमाचा रोख मग जनता पक्षाकडे वळला आणि माध्यमातल्या जुन्या इंदिरा नेहरूनिष्ठांनी त्यात पुढाकार घेतला. त्याला अर्थातच शह देणारे इंदिरा विरोधकही माध्यमात होते. पण दरम्यान इंदिरा विरोधक व जनता समर्थकात जनसंघीय व समाजवादी असा बेबनाव माध्यमातही सुरू झाला होता त्याचाही लाभ इंदिरानिष्ठांनी उठवला. जनता पक्षात फ़ुट पडून पुन्हा इंदिराजी सत्तेत आल्या, त्या थेट घराणेशाही घेऊनच! आपल्या सोबत त्यांनी संजय गांधींना निवडून आणलेच. पण त्यांना सत्तेच्या बाहेर ठेवूनही मोठे अधिकार दिलेले होते. दुर्दैवाने संजयचे अपघाती निधन झाले आणि त्यांची जागा राजीव गांधींनी घेतली. पुढे इंदिरा हत्या झाली आणि तिच्या सहानुभूतीच्या लाटेत सर्वच पुरोगामी प्रतिगामी वाहून गेले. म्हणजेच १९७० ची स्थिती पुन्हा आली. कारण राजीवना इतके अफ़ाट बहुमत मिळाले होते, की आता पुरोगामी डावपेच खेळायची कॉग्रेसला गरज उरली नव्हती. मग त्यातून सावरण्यासाठी पुन्हा तथाकथित पुरोगाम्यांना त्याच भाजपाला सोबत घ्यावे लागले. राजीव गांधी यांना रोखण्याची कुवत पुरोगामी म्हणून मिरवणार्‍यांमध्ये उरली नव्हती. सहाजिकच प्रतिगामी भाजपाला सोबत घ्यावे लागले. राजीव यांचा उजवा हात असलेल्या विश्वनाथ प्रताप सिंग यांनी बोफ़ोर्सची तोफ़ डागली असतानाही पुरोगाम्यांना स्वबळावर उभे रहाण्याचे धाडस नव्हते. म्हणून भाजपाशी आघाडी नाही तरी जागावाटपाचा सौदा करावा लागला. आज जे कोणी मोदींना रोखायला कॉग्रेसच्या गळ्यात गळे घालत पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवत असतात, त्यांनाच तेव्हा २५ वर्षापुर्वी कॉग्रेसला रोखण्यासाठी प्रतिगामी भाजपाची साथ हवी होती. ही पुरोगामी म्हणवणार्‍यांची शोकांतिका आहे. ज्या प्रतिगामी भाजपाला वा संघनिष्ठांना संपवण्यासाठी त्यांनी दहा वर्षे आधी कॉग्रेसला नवे जीवदान दिले, त्यांनीच नंतर आपले अस्तित्व टिकवण्यासाठी त्याच प्रतिगाम्यांची कुबडी घेतली. 


या सर्व काळात पुरोगाम्यांना कॉग्रेस पुरोगामी असल्याचा थांगपत्ता लागला नव्हता. म्हणुन ते कॉग्रेसचा पाडाव करण्यासाठी प्रतिगाम्यांना सोबत घ्यायचे आणि कॉग्रेस पराभूत झाली, मग पुन्हा कॉग्रेसला नवे जीवदान द्यायचे. मात्र अशा प्रदिर्घ पाच दशकात कॉग्रेसला पर्याय व्हायचा कुठलाही प्रयास या लोकांनी केला नाही. मतदाराला प्रतिगामी-पुरोगामी यात स्वारस्य नव्हते. त्याला कॉग्रेससाठी पर्याय हवा होता आणि त्याचा झेंडा कुठला वा धर्म कुठला, याच्याशी लोकांना कर्तव्य नव्हते. पुरोगामी वा पुर्वाश्रमीच्या समाजवाद्यांनी त्या लोकभावनेशी नेहमीच खेळ केला. पण तीच लोकभावना ओळखून भाजपाने पावले उचलली होती. त्यांनी १९८९ सालात जनता दलाशी जागावाटप केले आणि पुढे सत्तेतही जनता दलाला बाहेरून पाठींबा दिला. म्हणजेच आपण कॉग्रेस विरोधातले असल्याची लोकभावना जोपासण्य़ाची रणनिती भाजपाने राबवली होती. तिला हळुहळू यश मिळत होते. म्हणून १९९८ सालात एनडीए सरकार होऊ शकले आणि त्यात बिगर कॉग्रेस पक्ष सहभागी झाले. तेव्हा मग कॉग्रेसला स्वबळावर पुन्हा सत्ता मिळवण्याची शाश्वती वाटेनाशी झाली होती. तिथून मग कॉग्रेसने माध्यमातील स्वयंसेवी पुरोगामी सिद्धांत स्विकारला. भाजपा विरोधी डावपेच घेऊन सोनियांनी तमाम बिगरभाजपा पक्षांची मोट बांधण्याचा खेळ केला. त्याची परिणती महाराष्ट्रात झाली तशीच दिल्लीत झाली. पारंपारिक बिगर कॉग्रेसी मतांवर पोसलेले पुरोगामी पक्ष आपली उरलीसुरली विश्वासार्हता गमावून बसले. कॉग्रेसची मस्ती व भ्रष्टाचार यांना कंटाळलेला मतदार पर्याय बघत असताना, त्याच्यापुढे पुन्हा कॉग्रेसच पेश करण्याचा पुरोगामी पर्याय पुस्तकी होता. त्यात फ़सून लालू, मुलायम, मायवती, जनता दलाचे बहुतेक गट व डावी आघाडी आपले वेगळेपण हरवून बसले आहेत. या पक्षांना आपली अशी काही ओळखच उरलेली नाही. पुरोगामी शकती वा सेक्युलर फ़ोर्सेस असे एक सरसकट नावाने त्यांचा उल्लेख होत असतो. सुदैवाने त्यापासून बाजूला राहिले, त्यांना आपले अस्तित्व टिकवता आले किंवा त्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाला शिरकाव करता आलेला नाही. याचे उदाहरण म्हणून आपण ओडिशाकडे बघू शकतो. भाजपाशी पटले नाहीतर बाजूला झालेल्या नविन पटनाईक यांनी आपले वेगळेपण जपताना कॉग्रेसच्या दावणीला बांधून घ्यायचे नाकारले, तर मोदी लाटेचा त्यांना कुठला फ़टका बसला नाही. त्यापासून अलिप्त राहून ममतांनी आपली ओळख जपली, तर बंगालमध्ये त्यांना भाजपा दणका देऊ शकला नाही. उलट बंगालच्या भूमीत मार्क्सवाद्यांची जागा भाजपा घेऊ लागला आहे. महाराष्ट्रात वा अन्य प्रांतात जिथे भाजपा विस्तारला तिथे तिथे पुरोगामी पक्षांनी कॉग्रेस सोबत जाऊन आपणच आत्महत्या केल्याचे लक्षात येऊ शकेल. त्यासाठी भाजपाला गुन्हेगार कशाला मानता येईल? 


पुरोगामी चळवळ किंवा राजकारणाच्या या र्‍हासाला हेच भ्रामक राजकारण बाधले आहे. माध्यमातील उपटसुंभ पुरोगामी, राजकारणबाह्य पुरोगामी विचारवंत, स्वयंसेवी नावाचा कार्यकर्ता नष्ट करणारा भस्मासूर; यांनी क्रमाक्रमाने पुरोगामी राजकारणाचा पाया उखडून टाकला आहे. चळवळ व जनआंदोलन हा पुरोगामीत्वाचा पाया होता व असलाही पाहिजे. ज्याची प्रेरणा लोकांमधून येते आणि लोकांच्या संख्याशक्तीतून ज्याचा राजकीय प्रभाव पडतो, त्यापासूनच पुरोगामी संस्था संघटनांना तोडण्याचे डाव ज्यांनी यशस्वी केले, त्यांनी पुरोगामी चळवळ मारली आहे. चळवळीचा देखावा व बातम्या बनवून जनतेला अन्यत्र जायला भाग पाडणारे हेच लोक, खर्‍या पुरोगामीत्वाचे मारेकरी आहेत. कारण त्यांनी विचार, तत्वज्ञान व भूमिकेला तिलांजली देऊन पुरोगामी राजकारणाचा पुरता खेळखंडोबा करून टाकला. कारण त्यांचा खर्‍या चळवळीशी वा पुरोगामीत्वाशी कुठलाही संबंध नव्हता व नाही. त्यांच्यासाठी पुस्तकी पांडित्य खरे असते आणि वास्तवातील चळवळ त्यानुसार चालायला हवी. नसेल तर चळवळ मेली तरी बेहत्तर! दुर्दैव असे, की आता पुरोगामी पक्ष व संघटनाही इतक्या पांगळ्या झाल्या आहेत. त्या स्वत: विचार करून उपाय शोधू शकत नाहीत. त्यांचे दुखणे वा समस्या माध्यमे ठरवतात आणि तिथे शोधले जाणारे उपाय योजताना पुरोगामी चळवळ आणखी खच्ची होत गेली आहे. मागल्या विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्र वा अनेक राज्यातून पुरोगामी पक्ष नामशेष झालेत. मात्र त्याचा अर्थ पुरोगामीत्व संपलेले नाही. ज्या संस्था संघटना वा पक्ष देखाव्यापुरते पुरोगामी आहेत, वास्तवात त्यांच्यामध्ये कुठलेही पुरोगामीत्व उरलेले नाही, त्यांना मतदाराने झिडकारले आहे. विचार तत्वज्ञान लोक नाकारत नसतात. पण कोणी त्याचे थोतांड करून दिशाभूल करणार असेल, तर लोक त्याच्याकडे पाठ फ़िरवतात. इथेही वेगळे काही झालेले नाही. पुरोगामी लेबल लावून जो बोगस माल मतदाराच्या गळी मारण्याच्या अट्टाहास झाला, त्याला लोकांनी झिडकारले आहे. त्यातून सामान्य जनता व मतदार एक संदेश देतो आहे, तो प्रामाणिकपणे समजून घेतला तर पुन्हा पुरोगामी राजकारणाचे उत्थान व्हायला अडचण असणार नाही. भाजपा किंवा संघाचा कोणत्याही बाबतीत मुर्खासारखा विरोध म्हणजे पुरोगामीत्व नाही, की सेक्युलॅरीझम नाही. पुरोगामी किंवा समाजवादी म्हणून एक विचार आहे, तत्वज्ञान आहे, त्याला अनुसरून भूमिका घेणाला पुरोगामीत्व म्हणतात. ती कॉग्रेस घेत नाही किंवा अन्य कोणी पुरोगामी म्हणून मिरवणारा पक्ष घेत नाही. त्याला लोक कंटाळले आहेत. त्यावरचा पर्याय म्हणून सुटसुटीत कारभार करणारा वा निदान लोकमताचा आदर करून सरकार चालवणारा पक्ष ही भाजपाची पुंजी आहे. त्याला हिंदूत्व किंवा जातियवादाचा विजय ठरवून मतदाराला अपमानित करण्याने लोक आणखी दुखावतात, दुरावतात. 


यातूनही नव्याने पुरोगामीत्व किंवा वैचारिक सेक्युलर चळवळ उभी रहाणे शक्य आहे. पण त्यासाठी त्यातली तोतयेगिरी निपटून बाजूला करावी लागेल. निभेळ विचारांवर आधारीत राजकारण व भूमिका घ्याव्या लागतील. कुठल्या तरी निधीसाठी आंदोलने करणार्‍यांना हाताशी धरून पुरोगामीत्व पुढे जाऊ शकणार नाही. तर खर्‍याखुर्‍या लोकांच्या समस्या वा प्रश्नांना हात घालावा लागेल. लोकांमध्ये जावे लागेल. तिथे जाऊन समस्या समजून घ्याव्या लागतील. सर्व्हे घेऊन वा कुठल्या तरी अभ्यासातून समस्या शोधायची आणि मग ती लोकांच्या गळी उतरवायची, हा पुरोगामी बाणा नव्हे. जोगेश्वरी ते दहिसर हा परिसर मुंबई महापालिका क्षेत्रात आणला गेला, तेव्हा तिथे प्रथमच निवडणूक लढवणार्‍या मृणालताईंसाठी डॉ. राममनोहर लोहिया प्रचाराला आलेले होते. सभा रात्री उशिरा उरकून ते निघाले असताना इतक्या अवेळी एका भागात हंड्यांची लांबच लांब रांग व जागत बसलेल्या महिलांचा जमाव त्यांना दिसला. त्याबद्दल चौकशी केल्यावर पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याचे लक्षात आले. लोहियांनी मृणालताईंना गोरेगावमध्ये पाण्याचे आंदोलन आरंभण्याचा सल्ला दिला होता. तोच मग तिथला पक्षाचा कार्यक्रम झाला आणि दोन दशकांनंतर मृणालताई यांना पाणीवाली बाई म्हणून जग ओळखू लागले. अशी पुरोगामी चळवळ गोरेगाव मालाड परिसरात उभी राहिली. कारण पाण्याची समस्या कुणाच्या प्रबंधातून शोधलेली नव्हती. खरी वास्तविक समस्या होती. तिची तीव्रता लोकांना भेडसावत होती आणि तिला हात घातला तर लोक आपोआप चळवळीचा भाग होतील ही दृष्टी डॉ. लोहियांकडे होती. आजच्या कुठल्या पुरोगामी म्हणून मिरवणार्‍या नेते कार्यकर्त्यांमध्ये हा द्रष्टेपणा दिसतो काय? तिथेच लक्षात येते, की आज ज्यांना पुरोगामी म्हणतात ते लोक वास्तवात तोतया सेक्युलर वा बोगस पुरोगामी आहेत. त्यांनी पुरोगामीत्व बदनाम करून टाकले आहे. त्यात खर्‍याखुर्‍या पुरोगामीत्वाचा लवलेश उरलेला नाही. म्हणूनच मोदींनी पुरोगामी सेक्युलर राजकारणाला पराभूत केलेले नाही, की देशातली जनता प्रतिगामी वगैरे झालेली नाही. पुरोगामीत्वाचा नावावर जो पोरकटपणा चालतो, त्याला लोकांनी झिडकारले आहे. 


नेताजींच्या निमीत्ताने पुरोगामीत्वाची निरर्थकता नुकतीच समोर आलेली आहे. पुरोगामीत्व म्हणजे आता नेहरूंच्या चुका वा गफ़लतीचेही समर्थन करण्यापर्यंत घसरगुंडी झालेली आहे. राहुल गांधींचा पोरकटपणा वा सोनिया गांधींच्या मनमानीचे समर्थन इतके पुरोगामीत्व संकुचित होऊन गेले आहे. हिंदूंच्या विरोधात बोलणे वा त्यांच्या धर्मभावना दुखावणे, म्हणजे पुरोगामीत्व इतका थिल्ल्ररपणा आणला गेल्यावर लोकांनी पुरोगामीत्वाकडे पाठ फ़िरवली आहे. तो तोतयेगिरीचा पराभव आहे. माध्यमातल्या अर्धवटांनी त्याला चालना दिली आणि त्यातून पुरोगामी म्हणवणारे पक्ष रसातळाला गेले. त्यांचा पाया उखडला गेला. आता त्यांच्या संगतीने कॉग्रेसलाही त्याचीच बाधा झालेली आहे. आजकाल राहुल गांधींची भाषा तशीच असते. आपण कुठे वा कशाला पराभूत झालो, त्याचे आत्मपरिक्षण करण्याची इच्छाही कोणाला उरलेली नाही. कारण संघटना व त्यासाठी लोकांमध्ये जाऊन मेहनत घेण्याची इच्छाच (तोतयेगिरीला सवकलेले) पुरोगामी गमावून बसले आहेत. मग आपल्या नाकर्तेपणाचे वा अपयशाचे खापर अन्य कोणाच्या डोक्यावर फ़ोडून पळवाटा शोधल्या जातात. खर्‍याखुर्‍या कार्यकर्त्यांनी अपार कष्टातून जी पुरोगामी चळवळ भारतीय समाजात रुजवली व विस्तारली, तिलाच स्वयंसेवी भडभुंजे व माध्यमातील उपटसुंभांनी सुरूंग लावला. पुरोगामी विचारवंत म्हणून जे तोतये दिर्घकाळ मिरवले आहेत, हेच खरे पुरोगामी चळवळीचे खरे मारेकरी झाले आहेत. कुठल्या तरी काळ्यापैशाच्या बळावर चालणारी माध्यमे पुरोगामी अजेंडा रंगवण्यासाठी वापरली आहेत आणि किंवा अशाच पैशाच्या देणग्यांवर स्वयंसेवी तमाशे नाचवले आहेत. हे बुद्धीमंतांना कबुल करणे अवघड असले तरी सामान्य माणसाला ते दिसते, बघता येते आणि अति झाल्यावर झिडकारण्याचे धाडस त्याच सामान्य माणसात असते. मोदींना त्याचाच लाभ मिळाला. तो तोतया पुरोगाम्यांनी खर्‍या पुरोगामीत्वाचा केलेला दारूण पराभव आहे.   


१९५० च्या दशकात नव्याने स्थापन झालेल्या जनसंघ (ज्याला आज भाजपा म्हणून ओळखले जाते) त्याचा मतांच्या टक्केवारीतला हिस्सा तेव्हा एक दिड टक्का होता. तिथून २०१४ मध्ये तो ३१ टक्क्यापर्यंत गेला. त्याच आरंभ काळात आज पुरोगामी म्हणवणार्‍या पक्षांचा एकत्रित मतांचा हिस्सा दहा टक्क्यांच्या आसपास होता. तो आज सहा दशकानंतर त्याच्याही खाली घसरला आहे. याचे एकमेव कारण कॉग्रेसची घसरण होत जाईल तो अवकाश व्यापण्याचे १९८० पर्यंतचे पुरोगाम्यांचे प्रयास त्यात घुसलेल्या तोतया पुरोगाम्यांनी हाणुन पाडले व चळवळ कागदी व दिखावू बनवत नेली. नुसते शब्दांचे बुडबुडे उडवायचे आणि कामाच्या नावाने शून्य, अशी स्थिती आणली. पुरोगामीत्वाचे पोवाडे सतत गाण्यामध्ये पुर्वाश्रमीचे राष्ट्र सेवा दलीय आघाडीवर असतात. त्याच सेवा दलाच्या एका सुंदर गीताच्या शब्दात त्याचे वर्णन करता येईल. कारण त्यातच आजच्या पुरोगामी र्‍हासाचे सार सामावले आहे.


ध्येय आमचे हे ठरले, कार्य दुसरे ना उरले!

(समाप्त)


पुरोगामी चळवळीचे स्वयंसेवी अपहरण

ध्येय अमुचे हे ठरले
कार्य दुसरे ना उरले

 

(लेखांक तिसरा)

१९८० च्या जनता पक्षाच्या पराभवानंतर पुर्वाश्रमीच्या जनसंघीयात चुळबुळ सुरू झाली होती. तशीच कुठल्याही राजकीय ‘वंशातून’ न आलेल्या जनता पक्षातील तरूणांमध्येही अस्वस्थता होती. ते बिगर कॉग्रेसी राजकारणासाठी जनता पक्षाकडे ओढले गेले होते. त्यांना सोबत घेऊन जनता पक्षाचा वारसा पुढे न्यायचा चंग पुर्वाश्रमीच्या जनसंघीयांनी बांधला. त्यातून मग भारतीय जनता पक्ष स्थापन झाला. त्याचे नेतृत्व पुर्वाश्रमीच्या जनसंघीयांकडे असले तरी त्यात नवे रक्त भरपूर आलेले होते. दिल्लीचे सिकंदर बख्त पुर्वीचे कॉग्रेसजन होते, तर सुषमा स्वराज जुन्या समाजवादी! अशा लोकांना बिगर कॉग्रेसी राजकारणात स्वारस्य होते आणि त्यांना सोबत घेण्याचे भान जुन्या समाजवाद्यांना उरले नाही. त्याचा लाभ भाजपाने उठवला. त्यासाठीच त्यांनी गांधीवादी समाजवाद स्विकारला होता. पण इंदिरा हत्या व राजीव लाटेने राजकारणच उलटले आणि पहिल्या प्रयत्नात भाजपा १९८४ सालात भूईसपाट झाला. तिथून मग संघाने नव्याने राजकीय उभारणीचा पवित्रा घेतला आणि त्यात बंदिस्त संघटनात्मक पक्ष मोडून लोकांचा पक्ष व्हायचे ठरवले. शेठजी भटजींचा चेहरा सोडून सर्वसामान्य तळागाळातल्या समाजघटकांचा पक्ष व्हायचे प्रयत्न सुरू केले. आजवर असा पिछडा वर्ग ही पुरोगाम्यांची मक्तेदारी होती. योगायोग असा, की आपला हा मतदारसंघ वा प्रभावक्षेत्र जपण्यापेक्षा पुरोगाम्यांनी त्याच वर्गाकडे याच काळात पाठ फ़िरवली होती. किंबहूना १९८० पर्यंतचे राजकारण बघितले तर पुरोगामी पक्षातले दुय्यम नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचा भरणा तळागाळातून आलेला दिसेल. पण पुढल्या काळात डाव्या पक्ष चळवळी व संघटना, यात सुशिक्षित व सुखवस्तू घटकातून आलेल्यांचा भरणा दिसतो. उलट संघाने पद्धतशीरपणे आपल्या विविध संघटनातून मागास व पिछडे नेतृत्व पुढे आणायचा वसा घेतला. गोपिनाथ मुंडे, प्रमोद महाजन, सुर्यभान वहाडणे असे नवे नेतृत्व याच काळात उभे करण्यात आले. उलट पुरोगाम्यांकडे तसे लोकांना जाऊन भिडणारे नेतृत्व संपत होते आणि नवे सुखवस्तु पुस्तकी नेतृत्व सुत्रे हाती घेत चालले होते. प्रामुख्याने याच काळात लोकांची आंदोलने, चळवळी वा लढे याकडे पुरोगामी पाठ फ़िरवत गेले. खरे लढे उभारण्याचे कष्ट उपसण्यापेक्षा माध्यमातून अफ़ाट प्रसिद्दी मिळवून लढ्याचा देखावा उभा करण्याकडे पुरोगाम्यांचा कल झुकलेला दिसेल. परिणामी झुंजार लढाऊ तरूण पुरोगामी चळवळीपासून दुरावत गेला आणि त्याच दरम्यान झुंजण्याची संधी देणार्‍या आक्रमक होऊ लागलेल्या (शिवसेना व) भाजपाने ती संधी तरूणांना उपलब्ध करून दिली. १९८०-९० हा काळ बघितला, तर त्यात आज नावाजलेले अनेक पुरोगामी चेहरे उदयास येताना दिसतील. परिवर्तनाच्या चळवळी म्हणून त्यांचा प्रचंड बोलबाला माध्यमातून होत राहिला. पण प्रत्यक्षात जनतेच्या समस्या, प्रश्न व त्याचे उपाय यांना जाऊन भिडणारे लढे किंवा त्यातील सामान्य लोकांचा सहभाग संपत चाललेला दिसेल. मागल्या दोन दशकात तर पुरोगामी चळवळ ही निव्वळ माध्यमांच्या लेख, बातम्या व चर्चेत शिल्लक उरलेली दिसेल. बाकी प्रत्यक्ष जमिनीवर पुरोगामी नामोनिशाण उरलेले नाही. 

शरद पवार हे १९७८ नंतर पुरोगामी राजकारणाचे महाराष्ट्रातील एकमुखी नेतृत्व झाले होते आणि त्यांच्यामागून धावणार्‍या बाकीच्या पक्षांचे वेगळे अस्तित्व असले तरी त्यांची ओळखच संपत चालली होती. मात्र त्याच काळात एकामागून एक माध्यमे ही पुरोगामी चळवळीचे आखाडे बनत गेली. १९८० नंतरच्या काळात पुरोगामी विचारांच्या काही लोकांनी मोहिम उघडल्याप्रमाणे माध्यमात शिरकाव करून घेतला आणि तो पुरोगामी राजकारणाचा आखडा बनवून टाकला. दुसरीकडे एका पुरोगामी गटाने राजकीय संघटना व लढ्यांकडे पाठ फ़िरवून एनजीओ म्हणजे स्वयंसेवी संघटनाचा मार्ग चोखाळला आणि देश-परदेशातून मिळणार्‍या निधीवर लोक आंदोलनाचे नवे दालन उघडले. मग त्यांची एक संयुक्त आघाडी पुरोगामी लढा पुढे नेऊ लागली. म्हणजे पुरोगामी स्वयंसेवी संघटनेने आंदोलन उभे करायचे आणि त्याचा पसारा माध्यमातल्या पुरोगाम्यांनी भ्रामक स्वरूपात उभा करायचा. नर्मदा बचाव किंवा निर्भय बनो, अशा आंदोलनाचे स्वरूप तपासून बघितले, तर त्याची प्रचिती येऊ शकेल. परदेशी निधी मिळवणे व त्यासाठी पोषक अशा विषयांपुरते पुरोगामी आंदोलन संकुचित होत गेले. कम्युनिस्ट वा समाजवाद्यांची १९५० नंतरची आंदोलने बघितली तर ती लोकांच्या जीवनातील थेट समस्येला भिडणारी होती. त्याचा पसाराही प्रचंड होता. पण त्यांना जितकी प्रसिद्दी मिळाली नसेल, तितकी निर्भय बनो किंवा नर्मदा बचाव आंदोलनाला मिळाली. पण फ़लित काय आहे? म्होरके होते त्यांच्या नावाचा गाजावाजा होण्यापेक्षा त्यातून पुरोगामी विचार वा आंदोलन किती पुढे सरकू शकले? कामगार, कष्टकरी वा शेतकरी अशा समाज घटकांपासून पुरोगाम्यांची याच काळात नाळ तुटत गेली. दुसरीकडे भाजपा वा संघाच्या मंडळींनी अत्यंत कष्टप्रद मार्गाने अशा नवनव्या समाजघटकात आपले बस्तान बसवण्याचे प्रयत्न केले. विखूरलेले समाज घटक गोळा करून त्यांच्या आर्थिक व सामाजिक न्यायाची लढाई त्याच भाजपाच्या नव्या नेतृत्वाने हाती घेण्याचा सपाटा लावला होता. थोडक्यात पुरोगामी मंडळी आपला पारंपारिक परिसर सोडत चालली होती आणि भाजपा तीच पोकळी भरून काढणारे संघटन करण्यासाठी कष्ट उपसत होता. पण कोणाला पर्वा होती? माध्यमातून भाजपाशी वा तथाकथित प्रतिगामी राजकारणाची लढाई तुंबळ चाललेली होती. भाजपाने हिंदूत्व किंवा आणखी कुठलाही विषय घेवो, त्याच्या विरोधात जबरदस्त आघाडी माध्यमे लढवत होती. पण जमिनीवर पुरोगामी राजकारणाचे नामोनिशाण पुसले जात होते आणि त्याची कोणाला फ़िकीर नव्हती. कुठलेही मोठे वर्तमानपत्र वा आजच्या जमान्यात वृत्तवाहिनी घ्या, त्याच्याकडे पुरोगामी प्रवक्तेपण असल्याचा भास होईल. 

गुजरात दंगलीनंतर अन्य काय झाले वा मोदी पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले हा विषय बाजूला ठेवला, तर आणखी काय त्यातून साध्य झाले? तीस्ता सेटलवाड नावाची एक महिला मुस्लिमांना न्याय देणारी म्हणून जगापुढे आली. करोडो रुपये तिला जगातून मिळवता आले. त्यात अफ़रातफ़र केली म्हणून आता तिच्यामागे ससेमिरा लागला आहे. पण त्यातले सत्यही तपासण्याची तसदी कुठल्या माध्यमाने पत्रकाराने घेतलेली नाही. अटकेच्या भयाने कोर्टाच्या पायर्‍या झिजवणार्‍या तीस्ताला सवाल कोणी विचारायचे? जिने केलेला कुठलाही आरोप विनापुरावा पत्रकार छापत होते व प्रक्षेपित करत होते, तिच्या विरोधातले पुरावे समोर आले असताना, एकाही माध्यमात त्याची साधी चर्चा होऊ शकत नाही, ही आजच्या पुरोगामी चळवळीची शोकांतिका आहे. कोणीही गुन्हे करावेत, लूटमार करावी. त्याच्या छातीवर पुरोगामीत्वाचा बिल्ला असला, मग त्याच्याविषयी माध्यमे चिडीचूप होऊन जातात. कारण आता माध्यमेच पुरोगामी झालीत आणि पुरोगामी म्हणवून घेणार्‍याने काहीही गुन्हा केला तरी त्या पापावर पांघरूण घालणे, हेच पुरोगामी कार्य शिल्लक उरले आहे. अर्थात तो विषय भिन्न आहे. मुद्दा असा, की तीस्ता वा मेधा पाटकर यांनी पुरोगामी म्हणून मिरवताना त्या चळवळीला काय योगदान दिले? पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या रुपाने जी एनजीओ नावाची चळवळ उभी राहिली, तिने पुरोगामी चळवळीतला कार्यकर्ताच संपवून टाकला. आता पुरोगामी म्हणून मिरवणार्‍या संघटना या मुळात कुठल्या तरी परदेशी वा देशी निधीच्या आश्रयाने चालणारी दुकाने होऊन बसली आहेत. तिथे काम करणारा कार्यकर्ता स्वयंसेवक म्हटला जातो. पण व्यवहारात तो संस्थेचा वा संघटनेचा पगारी सेवक झालेला आहे. वैचारिक पोपटपंची कार्यकर्त्यासारखी करणारा हा पगारी सेवक विचारांनी भारावून आंदोलनात आलेला नाही किंवा त्यासाठी पदरमोड करणारा राहिलेला नाही. अशा शेकडो एनजीओ मागल्या दोनतीन दशकात पुढे आल्या व त्यांनी अवघी पुरोगामी चळवळ पोखरून टाकली आहे. नोकरी करून, घरचे खाऊन संघटनेसाठी राबणारा ध्येयवादी कार्यकर्ता, ही पुरोगामी चळवळीची खरीखुरी शक्ती होती. तीच आता नष्टप्राय झाली आहे. तिचा जीवनरस अशा स्वयंसेवी संघटनांनी शोषून घेतला आहे. हे घडत असतानाच्याच काळात प्रासंगिक राजकारण आणि जनतेशी पुरोगामी संघटनांचा असलेला संबंध क्षीण होत गेला. अर्थात पुरोगामी हाताशी नसले म्हणून लोकांना आपल्या समस्या दुर्लक्षित करता येत नाहीत. सोडवणारा कुठल्या पक्ष विचारसरणीचा आहे, याच्याशी सामान्य माणसाला कर्तव्य नसते. त्याला भेडसावणार्‍या प्रश्नाची उकल हवी असते. ती करू शकणार्‍याचे स्वागत सामान्य जनता करीत असते. इथे तेच झाले, पुरोगामी चळवळी व संघटनांनी वार्‍यावर सोडलेल्या सामान्य जनतेला व तिच्या समस्यांना भाजपा वा शिवसेना अशांनी साथ दिली. पुरोगाम्यांनी मोकळी केलेली जागा असे तथाकथित ‘प्रतिगामी’ व्यापत गेले.

थोडक्यात वा स्पष्टच शब्दात सांगायचे तर तळागाळातून आलेल्या कार्यकर्त्यांतून उभ्या राहिलेल्या पुरोगामी चळवळीला उच्चभ्रू व सुखवस्तु वर्गातून आलेल्यांनी व्यापले आणि तिचे कुपोषण करत संपवून टाकले, असे म्हणता येईल. कारण पुरोगामी आंदोलन व चळवळ अथवा त्यांच्या संघटना हे खर्‍याखुर्‍या जीवनात भेडसावणार्‍या समस्या व प्रश्नातून उभ्या राहिलेल्या होत्या. गिरणी कामगार वा कष्टकरी विभागातून या संघटनांचा उदय होत गेला आणि तिथेच त्यांचा पाया विस्तारत गेला. पण १९८० नंतरच्या काळात तिथले मुळचे निष्ठावान कार्यकर्ते विचारांची बांधिलकी म्हणून वरून येणार्‍या आदेशाचे पालन करत होते. पण जे काही करायचे त्याचा त्यांच्याच परिसराशी अजिबात संबंध राहिला नव्हता. नर्मदा आंदोलन हे त्या परिसरातील होते, पण त्याला तिथलाच मतदार साथ देत नव्हता. त्याची परिक्षाही घ्यायचा विचार कोणी केला नाही. चाचपणीही झाली नाही. कारण आंदोलनाच्या म्होरक्यांना ठाऊक होते, की आपले आंदोलन जनतेतून आलेले नाही, तर माध्यमकेंद्री आहे. तसेच निर्भय बनो आंदोलनाचे म्हणता येईल. काल्पनिक विषय व प्रश्न घेऊन पुरोगामी चळवळ त्यात इतकी गुरफ़टत गेली, की तिला चेहराच उरला नाही. मात्र दुष्काळ, पाणीप्रश्न, नागरी प्रश्न, सामाजिक विषमता असले खरे भेडसावणारे प्रश्न प्रतिगामी म्हटले जाणारे भाजपा शिवसेना उचलून धरत होते. पर्यायाने त्यांचा लोकसंपर्क वाढत विस्तारत होता. दुसरीकडे लोकजीवनापासून दुरावत चाललेली पुरोगामी चळवळ आपलाच अवकाश संकुचित करून घेत होती. त्याला कोण जबाबदार होता? भाजपा वा अन्य कुणावर तुमच्या नालायकीचे खापर फ़ोडता येणार नाही. दुसरीकडे तीस्ता सेटलवाड यांच्या उचापती बघता येतील. त्यांना वारेमाप प्रसिद्धी मिळाली व त्यांनीही आपल्या नाटकासाठी पुरोगामी म्हणवणार्‍यांना ओलिस ठेवले होते. पण त्यांच्या प्रत्येक उचापतीतून अधिकाधिक हिंदू लोकसंख्या दुखावत दुरावत चालली होती. दोन समाजातले वितुष्ट संपवण्यात आणि सौहार्द निर्माण करण्यात पुरोगाम्यांनी पुढाकार घ्यायला हवा होता. पण पदोपदी असे दिसेल, की हिंदू मुस्लिमातील तेढ वाढेल व त्यातून हिंदू समाजात पुरोगाम्यांविषयी तिरस्काराची भावना प्रबळ होईल, असेच तीस्ताचे डावपेच चालू होते. यामागून पुरोगामी म्हणवून घेणारे फ़रफ़टत होते. जणू त्यांचा अजेंडा असे स्वयंसेवी म्हणून काम करणारेच ठरवित होते. कम्युनिस्ट सोशलीस्ट वा तत्सम पक्षांचा आपला असा काही अजेंडाच उरला नव्हता. त्याचेच प्रतिबिंब मग राजकीय बलाबलात पडत गेले. क्रमाक्रमाने पुरोगामी म्हणवणार्‍या पक्षांचे नामोनिशाण राजकीय अवकाशातून पुसट होत गेले. या स्वयंसेवी म्हणवणार्‍या संघटना वा पुरोगामी पत्रकारांनी राजकीय पक्ष व गटांवर आपला अजेंडा लादून आत्मघात करायला भाग पाडत नेले. 

१९९९ सालात महाराष्ट्रात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली. तेव्हा कॉग्रेस व राष्ट्रवादी यांच्यातून विस्तव जात नव्हता. त्यांना एकत्र आणून त्याच्या भरीला पुरोगामी पक्षांना बसवण्याचे काम इथल्या पत्रकारांनी केले नाही काय? युतीला लोकांनी बहुमत दिलेले नसेल, पण एकत्रित लढलेल्या शिवसेना भाजपाला सर्वाधिक जागा मिळालेल्या होत्या आणि त्यांनाच सत्तेपासून वंचित ठेवताना सेक्युलर मते अधिक व जागाही अधिक, असा अजब सिद्धांत पत्रकार संपादकांनी आणला. त्यामध्ये परस्पर विरोधात लढलेल्या पक्षांना सत्तेसाठी एकत्र बसवायचे काम याच राजकारणबाह्य पुरोगाम्यांनी केले आणि तिथून मग पुरोगामी पक्षच नष्टप्राय होत गेले. तेव्हा कॉग्रेस राष्ट्रवादी यांना पुरोगामी पक्ष ठरवून त्यांना जीवदान पुरोगामी पक्षांच्या मोजक्या आमदारांमुळे मिळाले. पण त्याला दुष्परिणाम पुढल्या पाच वर्षांनी दिसला, राज्याच्या कुठल्या तरी कोपर्‍यात बिगर कॉग्रेसी राजकारणाचा झेंडा घेऊन टिकलेले हेच पुरोगामी पक्ष पुरते नामोहरम होऊन गेले. जनता दल, रिपब्लिकन, कम्युनिस्ट वा शेकाप यांचे आज काय शिल्लक उरले आहे? मुळात तेच बिगरकॉग्रेसी राजकारणाचे अध्वर्यु होते. ती जागा त्यांनी सोडली वा त्यांना माध्यमातले पुरोगामी व स्वयंसेवी लोकांनी सोडायला भाग पाडले आणि कॉग्रेसच्या दावणीला आणुन बांधले. मग स्थानिक पातळीवर त्यांची मतदाराला गरज उरली नाही. तिथे खरा कॉग्रेस विरोधक म्हणून भाजपा शिवसेना जागा व्यापत गेले. तर कित्येक वर्षे तिथे पुरोगामी झेंडा घेऊन पाय रोवून उभे असलेले पुरोगामी कार्यकर्ते उध्वस्त होऊन गेले. पर्यायाने त्यांचे पक्ष व राजकारण उध्वस्त होऊन गेले. त्याचे खापर भाजपावर फ़ोडता येणार नाही, तर उच्चभ्रू व पुस्तकी पुरोगाम्यांवर फ़ोडावे लागेल. ज्यांनी आपल्या पोथीनिष्ठेसाठी खर्‍या पुरोगामी कार्यकर्ता व संघटनांचा हकनाक बळी दिला. त्यांचा खरा लोकाभिमुख अजेंडा हिरवून घेतला आणि आपला काल्पनिक भ्रामक सेक्युलर अजेंडा त्यांच्या माथी मारून स्थानिक पातळीवर पुरोगामी संघटनांचे निर्दालन करून टाकले. माध्यमातील पुरोगामी व बाहेरचे विचारवंत पुरोगामी यांनी आखाड्यातले व मैदानातले खरे पुरोगामी कार्यकर्ते यांना असे निकामी करून टाकले, की पुरोगामी शब्दाकडे सामान्य जनता चमत्कारीक नजरेने बघू लागली. 


थोडक्यात १९८० नंतरच्या काळात स्वयंसेवी संस्था-संघटना व माध्यमातले छुपे पुरोगामी यांनी एकूणच पुरोगामी राजकारणाचे अपहरण केले म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मग कॉग्रेस वा अन्य कोणी माध्यमाचा वा स्वयंसेवी संघटनांचा छुपा वापर करून पुरोगाम्यांना कळसुत्री बाहुल्यांप्रमाणे खेळवू लागले. प्रदिर्घकाळ ठामपणे कॉग्रेस विरोधात आपले अस्तित्व टिकवून असलेल्या मार्क्सवादी व त्यांच्या डाव्या आघाडीला २००४ सालात अशाच पद्धतीने राजकारणबाह्य पुरोगाम्यांनी कॉग्रेसच्या दावणीला आणुन बांधले. त्यातून नामशेष होऊ घातलेल्या कॉग्रेसला नव्याने जीवदान मिळाले. पण तीच डावी आघाडी बंगालचा आपला बालेकिल्ला गमावून बसली. १९६७ पासून बंगालमध्ये डाव्यांनी आपले पक्के बस्तान बसवले. त्याला २००९ व पुढे २०१४ मध्ये इतका मोठा हादरा कशामुळे बसला? ममताचा करिष्मा हे सोपे उत्तर आहे. भाजपा विरोधासाठी काहीही करणे म्हणजे पुरोगामी हा निरर्थक सिद्धांत डाव्यांच्या पराभवाचे खरे कारण आहे. यातली शोकांतिकाही समजून घ्यावी लागेल. २००४ सालात डावी आघाडी ज्या मनमोहन सरकारच्या समर्थनाला उभी राहिली, त्यात तस्लिमुद्दीन नावाचा एक मंत्री लालुंच्या राष्ट्रीय जनता दलाचा होता आणि त्याच्यावर मार्क्सवादी नेत्याच्या खुनाचा आरोप होता. पण तरीही पुरोगामी सरकार म्हणून त्याच्या पाठीशी डाव्यांनी उभे रहाणे हा किती हास्यास्पद पकार असेल? तिथल्या स्थानिक डाव्या कार्यकर्त्यांना आपल्या परिसरात तोंड दाखवायला जागा राहिल काय? यातूनच मग बिहारमध्ये कम्युनिस्ट पक्ष पुरता नामशेष होऊन गेला. ज्यांची मू्ळ ओळख कॉग्रेसचे विरोधक अशी होती व बिगरकॉग्रेसी मतदार त्यांच्या पाठीशी होता, त्याला अन्य पर्याय शोधायला अशा राजकारणाने भाग पाडले आणि तीच जागा व्यापत व तीच मते बळकावत भाजपा विस्तारत गेला. त्याला प्रामुख्याने जबाबदार असेल तर पुरोगामी पक्ष व संघटनांमधील पुस्तकी नेतृत्व, संघटनाबाह्य हस्तक्षेप व माध्यमातल्या तोतया पुरोगाम्यांनी मोडून काढलेले आंदोलनात्मक डाव्या पुरोगामी चळवळीचे स्वरूप!  (अपुर्ण)

पुरोगामी चळवळीचा र्‍हासारंभ

ध्येय अमुचे हे ठरले
कार्य दुसरे ना उरले

 (लेखांक दुसरा)

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात बहुतेक राजकीय प्रवाह कॉग्रेस या छत्राखाली काम करत होते. पण पुढल्या काळात म्हणजे जसजसे स्वातंत्र्य दृष्टीपथात येत गेले, तसतसे हे प्रवाह बाजूला स्वतंत्र राजकीय संघटना वा पक्ष म्हणून समोर येत गेले. त्यातला हिंदूसभा हाच एक वेगळा मतप्रवाह होता. स्वातंत्र्यपूर्व काळात राजकारणापासून अलिप्त असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही मग जनसंघ नावाची आपली राजकीय आघाडी उभी केली. पण हा पक्ष कोणाच्या खिजगणतीत नव्हता. सहाजिकच कॉग्रेस म्हणून उरलेली संघटना हाच देशातला प्रमुख मध्यवर्ति पक्ष ठरला आणि बाजूला झालेल्या विविध राजकीय गटांना आपले बस्तान बसवताना वेळ लागत गेला. पण ती संधीही कॉग्रेसच्या नेतृत्वाने दिली नाही. वेळोवेळी अन्य पक्षातले पुरोगामीत्व मानणारे नेते फ़ोडून वा त्यातले हुशार गुणी नेते आपल्याकडे ओढून कॉग्रेस आपले अस्तित्व टिकवीत राहिली. हिंदूसभा संपत होती आणि तिची जागा जनसंघ घेत होता. कारण त्याच्या पाठीशी संघाचे संघटित पाठबळ होते. त्याच्याही पलिकडे माजी संस्थानिक व उद्योगपतींचा मानला जाणारा एक पक्ष स्वातंत्र्योत्तर काळात उदयास आलेला होता. स्वतंत्र पक्ष असे त्याचे नाव होते आणि तो उजवा पक्ष मानला जात असे. कारण तो समाजवाद वा साम्यवादाचा कडवा विरोधक होता. मात्र १९६७ पर्यंत त्याचे लोकसभेतील स्थान लक्षणिय होते. कारण माजी संस्थानिकांना आपापल्या जुन्या संस्थानातील रयतेची मते मिळवणे सहजशक्य होते. पुढे इंदिरा गांधी यांनी घटनादुरूस्ती करून प्रत्येक राजकीय पक्षाला सेक्युलर व समाजवादी असण्याची सक्ती केली, तेव्हा स्वतंत्र पक्षाने आपला गाशा गुंडाळला. त्याचे बरेचसे नेते व पाठीराखे नंतर जनसंघाच्या गोटात येत गेले. पण या सर्व काळात भारतीय विरोधी राजकारण पुरोगामी व सेक्युलर पक्षांच्या भोवती घोटाळत राहिले होते. कम्युनिस्ट, सोशलिस्ट वा तत्सम राजकीय विचारसरणीच्या पक्षांचा बोलबाला होता. लोकसभेतही त्याचे प्रतिबिंब पडलेले दिसायचे. देशातील राजकारण उजवा कॉग्रेस पक्ष व डावे राजकीय गट अशी झुंज होती. आज जसे विविध पक्ष भाजपाला वा मोदींना संपवायला एकत्र येतात, तसेच तेव्हा कॉग्रेस विरोधात एकत्र यायचे राजकारण चालू होते. सेक्युलर विरुद्ध जातियवादी वा पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असे त्याचे स्वरूप नव्हते. कारण तेव्हा भाजपा किंवा जनसंघ यांची राजकीय शक्ती तितकी मोठी नव्हती. हळुहळू आपले बस्तान बसवण्यातच जनसंघाची दमछाक व्हायची. 

१९५७ सालात देशात पहिली निवडणूक व्यापक आघाडी करून लढवली गेली, ती महाराष्ट्रात! मराठी राज्याच्या मागणीसाठी कॉग्रेसला धडा शिकवायला तेव्हा जनसंघच नव्हेतर हिंदू महासभेलाही सोबत घेऊन समाजवादी व कम्युनिस्टांनी एकदिलाने लढत दिली होती. त्यात कुठे पुरोगामी वा प्रतिगामी असा संघर्ष उदभवला नव्हता. ज्यांचा आज देशाला वा राष्ट्रीय एकात्मतेला धोका असल्याचे सांगत प्रत्येक पुरोगामी घसा कोरडा करीत असतो, तेच समाजवादी कम्युनिस्ट संघप्रणित जनसंघाच्या मांडीला मांडी लावून बसत उठत होते. मजेची गोष्ट म्हणजे आज जे लोक पुरोगामी म्हणून एकत्र एकाच भाषेत बोलतात, त्यांचे तेच राजकीय गट तेव्हा एकमेकांवर खुनाचे हिंसेचे आरोप सर्रास करीत होते. संयुक्त महाराष्ट्र समितीत पहिला वाद उफ़ाळला तो कम्युनिस्ट व सोशलिस्ट यांच्यात! त्याचे कारण इथले नव्हते तर दूरच्या युरोपातील होते. तिथे सोवियत गटात असलेल्या हंगेरीचा पंतप्रधान इंम्रे नाझ याने लोकशाही आणायची ठरवली तर वार्सा करारानुसार सोवियत कम्युनिस्ट सेनांनी त्या देशात घुसून नाझ याला नुसते सत्ताभ्रष्ट केले नाही तर ठार मारले. त्याच्या निषेधाचा प्रस्ताव सोशलिस्ट पक्षाने मुद्दाम मुंबई महापालिकेत आणला आणि कम्युनिस्ट पक्षाला डिवचण्याचा उद्योग केला होता. त्यातून समितीमध्ये वादंग उसळून आला. त्यावेळी समाजवाद्यांचे सौम्य स्वभावाचे नेते बॅ. नाथ पै म्हणालेले वाक्य किती बोचरे असावे? ‘आम्ही यशवंतरावांचा केरेन्स्की होऊ देणार नाही’ असे नाथ पै म्हणाले. त्याचा अर्थ असा, की सोवियत कम्युनिस्ट पक्षाचाच हा नेता स्टालिनच्या विरोधात गेल्यावर त्याला संपवण्यासाठी प्राणघातक कारवाया झालेल्या होत्या. थोडक्यात आज जितक्या आवेशात आपण दाभोळकर पानसरे यांच्या हत्येसंबंधी हिंदूत्व मानणार्‍यांवर आरोप होताना ऐकतो, तशीच भाषा तेव्हाचे समाजवादी इथल्या कम्युनिस्टांच्या बाबतीत वापरत होते. आज मात्र दोघेही एकाच सुरात तीच भाषा हिंदूत्ववाद्यांच्या बाबतीत वापरतात. विचारांची लढाई विचारांनीच होते बंदूकीच्या गोळीने नाही, ही भाषा कम्युनिस्टांना कधी उमजली? सोवियत युनियन कोसळल्यानंतरचा हा साक्षात्कार आहे काय? असो, पण त्याचेही भान वा ज्ञान नसलेले डॉ. कुमार सप्तर्षी लेख लिहून विचारतात, कुठल्या पुरोगाम्याने कधी कुठल्या प्रतिगाम्याची हत्या केली आहे? प्रतिगाम्याची नसेल, पण पुरोगाम्यानेच पुरोगाम्याची हत्या विचार संपवण्यासाठी केल्याचा पुरोगामी इतिहास जागतिक आहे ना? त्याचे काय करायचे? त्याचे तीळमात्र ज्ञान नसलेले विचारवंत आजकाल पुरोगामी जाणते म्हणून उदयास आलेले आहेत आणि त्याचा आरंभ १९७० च्या दशकात झाला. 

आज ज्याला भारतीय जनता पक्ष म्हणून आपण ओळखतो, त्याचा जन्म जनता पक्ष फ़ुटण्यातून झाला. तो जनता पक्ष कुठल्या एका विचारसरणीचा पक्ष नव्हता. तर इंदिरा गांधींनी तमाम विरोधकांना आपल्या विरोधात एकत्र आल्यामुळे आणिबाणी लादून गजाआड फ़ेकले, त्याच्या परिणामी एक राजकीय आघा्डी अशा स्वरुपात ज्याचा जन्म झाला, त्याला जनता पक्ष म्हणून ओळखले गेले. त्यात मुळचे समाजवादी होते तसेच इंदिरालाटेने बाजूला फ़ेकले गेलेल्या जुन्या कॉग्रेसजनांची संघटना कॉग्रेस होती. अधिक आणिबाणी उठल्यावर त्यातले भागिदार असलेल्या जगजीवनराम यांच्या नेतृत्वाखाली वेगळे झाले्ल्या काही कॉग्रेसजनांचा सीएफ़डी नामक गटही होता. त्याखेरीज खुप आधीच कॉग्रेस सोडून शेतकरी जाटांचा पक्ष चालवलेले व पुढे समाजवादी राजनारायण यांना सोबत घेऊन भालोद नावाचा पक्ष चालविलेले चौधरी चरणसिंग होते. कमीअधिक प्रमाणात त्यांच्यात वैचारिक साम्य साधर्म्य तरी होते. त्यात विचित्र वाटणारा एकच गट होता तो संघाशी संबंधित अशा जनसंघाचा! जनता पक्ष एकजीव असावा यासाठी सर्वांनी एकदिलाने जयप्रकाशांचा शब्द मानून आपापले पक्ष विसर्जित केले आणि जनता पक्ष ऐन निवडणूकीच्या तोंडावर स्थापन केला. त्याची रितसर पक्ष म्हणून नोंदणीही होऊ शकलेली नव्हती. मग तात्कालीन व्यवस्था म्हणून सर्व उमेदवार भालोदच्या चिन्हावर लढले आणि जनता पक्ष सत्तेवर आला. त्यात मार्क्सवादी सहभागी झाले नाहीत तरी त्यांनी जनता पक्षाशी दोस्ती केली व जागावाटपही केलेले होते. तर दुसरा कम्युनिस्ट पक्ष तेव्हा कॉग्रेसचा समर्थक म्हणून अगदी आणिबाणीतही इंदिरा गांधींच्या पाठीशी उभा राहिला होता. अशा जनता पक्षाला सत्ता मिळाली व खुद्द इंदिराजीही रायबरेलीत पराभूत झाल्याने कॉग्रेसचा विषय बाजूला पडला आणि जनता पक्षातच बेबनाव सुरू झाला. कॉग्रेसमध्येही दुफ़ळी माजली होतीच. संजय गांधी व इंदिराजींच्या विरोधातल्या चौकशीचे बालंट पक्षावर नको म्हणून यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी इंदिराजींचा बाजुला काढले होते. मग इंदिरानिष्ठांनी वेगळी चुल मांडली होती. थोडक्यात कॉग्रेस नामोहरम झाली अशा समजूतीमध्ये जनता पक्षातील मुळचा समाजवादी गट पुन्हा गोंधळ घालू लागला. त्यातले मुळचे समाजवादी राजनारायण यांनी चौधरी चरणसिंग यांना घोड्यावर बसवले आणि संघविरोधी कारवाया सुरू केल्या. म्हणजे असे, की जनता पक्षात असलेल्यांनी कुठल्याही प्रकारचे संबंध संघाशी ठेवू नयेत असा आग्रह सुरू केला. सघाशी संबंध म्हणजे दुहेरी निष्ठा असा सिद्धांत राजनारायण यांनी मांडला आणि पक्षात कुरबुरी सुरू केल्या. 

दिल्लीत हे नाटक चालू असताना इथे मुंबईत रावसाहेब कसबे या दलित विचारवंताने लिहीलेले ‘झोत’ नावाचे छोटे पुस्तक राष्ट्र सेवा दल विरुद्ध रा. स्व, संघ यांच्या जनता पक्षीय विवादाचे एक मोठे कारण झाले. त्या पुस्तिकेच्या प्रकाशन व परिसंवादाचे कारण होऊन गोरेगावच्या केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉलमध्ये धुमश्चक्री उडालेली होती. तिथून मग दिवसेदिवस इथल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या समाजवादी व जनसंघियात हाणामारीचे प्रसंग येऊ लागले. जनता पक्ष म्हणुन त्यांचे नेते एकत्र वावरत होते आणि कार्यकर्ते परस्परांना पाण्यात बघू लागले होते. दिल्लीचे सरकार त्यातून लयाला गेले. औपचारिकता म्हणून विरोधी नेते यशवंतराव चव्हाण यांनी लोकसभेत अविश्वासाचा प्रस्ताव आणला होता, त्याचे निमीत्त करून जनता पक्षातले दोन गट हमरातुमरीवर आले. त्यातले जुने संसोपा व प्रसोपाचे गटही परस्परांशी पटवून घेत नव्हते. जुने संसोपावाले राजनारायण सोबत चरणसिंगाच्या गोटात गेले, तर प्रसोपावाले मोरारजींच्या गटात राहिले. पण तो ठराव संमत व्हायची पाळी आली आणि मोरारजींनी राजिनामा टाकला. मग कोणापाशी बहुमत नव्हते म्हणून राष्ट्रपतींचीच चाचपणी केली आणि चरणसिंग यांचे नवे संयुक्त सरकार सत्तेत आले. त्याला इंदिराजींनी बाहेरून पाठींबा दिलेला होता. यशवंतराव चव्हाण त्यात उपपंतप्रधान झाले. कसे छानपैकी पुरोगामी सरकार स्थापन झाले होते. जुने जनसंघिय व जुने प्रसोपावाले जगजीवनराम यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षात बसले होते. मात्र त्या सरकारला सहा महिन्यात विश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याची वेळ आली आणि इंदिराजींनी अजब पवित्रा घेतला. आपण सरकार बनवायला पाठींबा दिला होता, पण चालवायला पाठींबा दिलेला नाही, असे वक्तव्य इंदिराजींनी केले आणि चरणसिंग यांना राजिनामा देण्याखेरीज पर्याय उरला नाही. मग अन्य पर्याय नसल्याने लोकसभा बरखास्त झाली आणि मध्यावधी निवडणूका घेतल्या गेल्या. त्यात जनता पक्षाचा धुव्वा उडवित इंदिराजी पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्या आणि आणिबाणी लादणार्‍या इंदिराजींना देशाने पुन्हा स्विकारले. त्याचे श्रेय खरे म्हणजे नसलेला प्रतिगामी-पुरोगामी वाद उकरून काढणार्‍या व जनभावनेची पायमल्ली करणार्‍या राजनारायण व तत्सम समाजवाद्यांनाच द्यावे लागेल. पण तिथून मग संघ हा पुरोगामी राजकारणातला एक महत्वाचा शब्द बनत गेला. पुर्वाश्रमीचे समाजवादी व संघनिष्ठ जनसंघवाले यांच्यात संघ हा वितुष्टाचा विषय होऊन गेला. एकवेळ आणिबाणी लादून गजाआड फ़ेकणार्‍या इंदिराजी चालतील, पण संघाशी संबंधित कोणाशी सलगी नाही, हे तत्व पुर्वाश्रमीच्या समाजवाद्यांनी आपली विचारसरणी बनवली म्हणायला हरकत नाही. त्याचे परिणाम मग लौकरच दिसून आले. 

समाजवाद्यांचा एक गट जनता पक्षातून बाजुला झालाच होता. तरी १९८० च्या लोकसभेत उर्वरीत जनता पक्ष एकदिलाने लढला आणि पराभूत झाला. पण त्यात कायम रहाण्याने काहीही साधणार नव्हते, म्हणुन पुर्वाश्रमीच्या जनसंघीयांनी वेगळी चुल मांडण्याचा पवित्रा घेतला. डिसेंबर १९८० मध्ये त्यांनी मुंबईतच अधिवेशन भरवून भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. त्यालाच आज आपण भाजपा म्हणून ओळखतो. उरलेला जनता पक्ष क्रमाक्रमाने विस्मृतीत गेला, त्याचे पुन्हा विश्वनाथ प्रताप सिंग याच्या नेतृत्वाखाली जनता दलात रुपांतर झाले व आणखी तुकडे पडत गेले. पण नंतरच्या साडेतीन दशकात प्रयत्नपुर्वक पुर्वीच्या जनसंघीय वा नंतरच्या भाजपावाल्या नेत्या कार्यकर्त्यांनी १९७७ सालचा बिगर कॉग्रसी राजकारणाचा ‘जनता’ वारसा बळाकावण्याचा प्रयास केला. त्यांच्या पाठीशी अर्थातच संघाची भक्कम संघटना उभी असल्याने त्यात यश मिळत गेले. पण दरम्यान ज्या पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी राजकारणाचा आरंभ १९७८ सालात झाला, त्यात पुर्वाश्रमीच्या समाजवाद्यांखेरीज अन्य पक्ष सहभागी होत गेले. त्यांना आज आपण पुरोगामी म्हणून ओळखतो. या पुरोगाम्यांची नेमकी ओळख काय? अर्थात विविध विचारवंत नवनव्या व्याख्या देत असतात. पण अत्यंत सोपी व्याख्या कुठली असेल, तर जो कोणी हिदूत्व किंवा संघाच्या विरोधात कडाडून बोलेल, त्याला आज पुरोगामी म्हणून ओळखले जाते. त्यांचा कार्यक्रम कोणता? याही प्रश्नाचे उत्तर त्यांना देता येणार नाही. जे काही संघ वा त्याच्याशी संबंधित ठरवतील, त्याच्या विरोधात दंड थोपटून उभे रहाणे, हा आता पुरोगाम्यांसाठी एक कलमी कार्यक्रम होऊन गेला आहे. त्याचा पाठपुरावा करताना हे पक्ष व विविध पुरोगामी गट क्रमाक्रमाने लयास गेलेले आपल्याला दिसतील. आपली विचारसरणी, आपला अजेंडा याच्याशी त्यापैकी कोणाला कसले कर्तव्य नाही. आपल्या विचारांची संघटना असावी, त्याची शक्ती व प्रभाव जनमानसावर पडावा, यासाठी पुरोगामी म्हणवणार्‍या नेते गटांनी मागल्या दोनतीन दशकात नेमके काय केले, ते भिंग घेऊन शोधले तरी सापडणार नाही. त्यापेक्षा भाजपा किंवा संघाने काहीही करायचे म्हटले, की त्याला अपशकून करण्याला सतत प्राधान्य देण्यात आलेले दिसेल. नेमके त्याच्या उलट त्याच दोनतीन दशकात संघाने व भाजपाच्या नेत्यांनी कॉग्रेसी राजकारणाला पर्याय म्हणून जनमानसात आपली प्रतिमा उभी करण्याचा पद्धतशीर प्रयास केलेला दिसेल.

संघ वा भाजपाच्या आजच्या यशाला जसे त्यांचे दिर्घकालीन प्रयास कारणीभूत आहेत, तसेच पुरोगाम्यांच्या आजच्या केविलवाण्या अपयशाला त्यांचा नाकर्तेपणा कारण झाला आहे. खरे तर वेगळा झालेल्या भाजपालाही आपला खरा संघीय चेहरा घेऊन पुढे येण्याची हिंमत नव्हती. वेगळा झालेल्या भाजपाचाही अजेंडा गांधीवाद आणि समाजवाद असाच होता. त्यात कुठे हिंदूत्वाचा लवलेश नव्हता. कारण आपला पुरोगामी चेहरा दाखवूनच आपण कॉग्रेसी राजकारणाला पर्याय होऊ शकतो, अशी भाजपा नेत्यांचीही धारणा होती. बर्‍याच प्रमाणात संघापेक्षा वेगळा अजेंडा घेऊन भाजपा चालतही होता. १९८७ सालात मुंबईच्या उपनगरात पार्ल्याची पोटनिवडणूक झाली. त्यात शिवसेना खुले हिंदूत्वाचे आवाहन करीत उतरली होती. तर तेव्हा भाजपाने आपला उमेदवार मागे घेऊन जनता पक्षीय प्राणलाल व्होरा या उमेदवाराचे समर्थन व सेनेच्या हिंदूत्वाला विरोध केला होता. पण गंमत म्हणजे त्याच निवडणुकीत संघाने मात्र सेनेच्या बाजूने उतरून भाजपाची भूमिका फ़ेटाळली होती. पण याचा अर्थ असा होतो की भाजपा वा पुर्वाश्रमीच्या जनसंघीयात न्युनगंड जोपासून त्यांना पुरोगामी बनवण्यात पुरोगामी मंडळी मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेली होती. किंबहूना संघापासून भाजपाला वेगळे काढण्यात पुरोगामी यशस्वी झाले, अशी १९८७ पर्यंतची अवस्था होती. त्याचेही कारण होते, १९८४ च्या निवडणूकीत भाजपाचा उडालेला धुव्वा होय. इंदिराजींची खलिस्तानी अतिरेक्यांनी हत्या केली आणि त्यातून उठलेल्या सहानुभूतीच्या अगडबंब लाटेत सर्वच पक्ष वाहून गेले. भाजपाला पहिली निवडणूक स्वबळावर लढताना अवघ्या दोन जागा लो्कसभेत जिंकता आलेल्या होत्या. त्याचे वैफ़ल्य मोठे होते. कारण वाजपेयी यांच्यासारखे दिग्गजही पराभूत झाले होते. बालेकिल्ले म्हणावे अशाही जागा गमावल्या होत्या. फ़क्त भाजपाच संपला नव्हता, तर अन्य पक्षही विस्कटून गेले होते. पण मग तिथून नव्याने पक्षाची व नेतृत्वाची उभारणी भाजपाने वा संघाने सुरू केली, असे म्हणायला हरकत नाही. पुरोगाम्यांची दिवाळखोरी आणि संघ व भाजपातील नव्या उभारणीचा काळ एकच असावा याला निव्वळ योगायोग म्हणता येईल. आज दिसतात ते त्याचेच परिणाम होत. कारण याच कालखंडात भाजपाने नवे समाज घटक आपल्यात आणायचा व नवनेतृत्व उभे करण्याचा चंग बांधला होता, तर पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पक्षात, चळवळीत व संघटनात खरे हाडाचे कार्यकर्ते बाजूला पडत चालले होते आणि त्यांची जागा बोलघेवडे, कागदी घोडे घेऊ लागले होते. संघटनात्मक काम लयास जाऊन माध्यमे व प्रसिद्धीच्या बळावर पुरोगामी चळवळ चालवण्याचे नवे तंत्र विकसित होऊ लागले होते. त्याचा एकत्रित परिणाम आज आपल्याला दिसतो आहे. (अपुर्ण)

पुरोगामी चळवळीचे मारेकरी

ध्येय अमुचे हे ठरले
कार्य दुसरे ना उरले

(लेखांक पहिला)

लोकसभा निवडणूका संपून आता दिड वर्षाचा कालावधी उलटला आहे आणि त्यात नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे नेतृत्व करताना कॉग्रेसचा ऐतिहासिक पराभव घडवून आणला. नुसता त्या पक्षाचा तो पराभव नव्हता तर स्वातंत्र्य चळवळ व स्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय क्षितीजावर तळपत असलेल्या नेहरू-गांधी प्रणित तथाकथित सेक्युलर वा पुरोगामी विचारसरणीचा तो दारूण पराभव होता. मात्र इतके होऊनही अजून कोणी त्याचा गंभीरपणे अभ्यास केलेला नाही. किंबहूना त्या निकालांची गंभीर दखल सुद्धा घेतली गेलेली नाही. उलट जुनेपाने संदर्भ देवून अशा पराभवातून कॉग्रेस अनेकदा कशी सावरली आहे, त्याचे दाखले देण्याची पळवाट शोधण्यात जाणत्यांनी धन्यता मानलेली आहे. इथे जाणते म्हणजे फ़क्त कॉग्रेस पक्षातले जाणते व अभ्यासू नेते असेच म्हणायचे नाही. तर स्वत:ला राजकीय विश्लेषक वा पुरोगामी विचारांचे समर्थक मानल्या जाणार्‍या पत्रकार-संपादक व लेखकांचाही त्यामध्ये समावेश आहेच. पण त्याच्याही पलिकडे जे अन्य पुरोगामी पक्ष वा संघटनेशी संबंधित आहेत, त्यांचाही याच जाणत्यांमध्ये समावेश होतो. अशा तथाकथित तमाम पुरोगाम्यांनी मोदींचा विजय केवळ निवडणूकीतला विजय मानून त्याकडे केलेला काणाडोळा त्यांच्या बेफ़िकीरीचे लक्षण नाही, तर बौद्धिक दिवाळखोरीची साक्ष आहे. याचे पहिले कारण म्हणजे लौकिकार्थाने वा निवडणूकीच्या मैदानात मोदींनी कॉग्रेस व अन्य पुरोगाम्यांचा पराभव केला आहेच. पण त्याच्यापलिकडे तो पुरोगामी म्हणून मिरवणार्‍या प्रत्येकाचा पराभव आहे. मात्र त्याचे सर्वच श्रेय मोदींना देता येणार नाही. कारण पुरोगाम्यांच्या सहकार्याशिवाय कोणीही त्यांचा इतका दारूण पराभव घडवू शकला नसता. मग त्यातून सावरायचे असेल आणि नव्याने पुन्हा पुरोगामी विचारसरणीला उभारी आणायची असेल, तर मुळात कुठे व काय चुका झाल्या, त्याचा आढावा घ्यावा लागेल. झाल्या त्या चुकांची पुनरावृत्ती टाळावी लागेल आणि मोदींना आपल्या कुठल्या वागण्याचा सर्वाधिक लाभ झाला, त्याची अत्यंत डोळसपणे कारणमिमांसा करावी लागेल. पण दिड वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी त्या दिशेने एकही पाऊल पडताना दिसलेले नाही. उलट ज्या चुका झाल्या व मोदींना लाभदायक ठरल्या, त्याच अधिक आक्रमकरित्या करण्याकडेच पुरोगाम्यांचा आजही कल आहे. म्हणून पुरोगाम्यांचा पराभव किंवा दिवाळखोरी हा तपशीलवार अभ्यास करून मांडणे अगत्याचे झाले आहे. 

लोकसभा निवडणूका ऐन रंगात आल्या असताना नरेंद्र मोदी यांच्याविषयीचे लोकांचे आकर्षण इतके शिगेला पोहोचले होते, की देशाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात मोदींची सभा असेल तर त्याचे थेट प्रक्षेपण वाहिन्या करू लागल्या होत्या. आणि त्याचा खरोखरच अतिरेक झालेला होता. कुठल्याही वाहिनीवर गेलात, तर मोदीच दिसत असायचे. त्याच काळात विविध मतचाचण्या घेऊन त्याचे विश्लेषणही चालू होते. अशाच एका विश्लेषणाच्या कार्यक्रमात व्यासंगी संपादक कुमार केतकर यांनी केलेली एक टिप्पणी लक्षात राहिली. ते म्हणाले होते, की प्रचाराचा अतिरेक मोदींना बहुधा त्रासदायक होईल. इंग्रजीमध्ये त्यांनी ‘ओव्हर किल’ असा शब्दप्रयोग केला होता. मराठीत आपण अति तिथे माती असे शब्द वापरतो. त्यात तथ्य होते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला, मग लोकांना तिचा वीट येतो आणि लोक त्याकडे पाठ फ़िरवतात. मोदींना आपल्या वाहिनीवर दाखवून त्यांच्या लोकप्रिय छबीचा वापर अधिक प्रेक्षक मिळवण्यासाठी वाहिन्या करीत होत्या. आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणे अपरिहार्य होते. पण आपली छबी दाखवण्याची मोदींनी कुठल्या वाहिनीवर सक्ती केलेली नव्हती. ते लोकांनाही कळत होते. म्हणूनच लोकांनी त्या वाहिन्यांकडे पाठ फ़िरवून अन्य वाहिन्यांवरचे कार्यक्रम बघणे पसंत केले. म्हणून लोक मोदींकडे पाठ फ़िरवतील असा निष्कर्ष काढणे ही चुक होती. पण त्यानिमीत्ताने केतकरांनी मांडलेला निष्कर्ष वा निकष चुकीचा म्हणता येणार नाही. मोदी हा विषय किंबहूना ‘ओव्हर किल’ याच निकषावर समजून घेण्याची गरज आहे. कारण कुठल्या तरी अतिरेकानेच मोदींना इतके देशव्यापी नेतृत्व म्हणून पुढे आणले. माध्यमांनी व पुरोगामी अतिरेकाने देशाला मोदी नावाचा पर्याय दिला. म्हणूनच केतकरांचा ओव्हर किल सिद्धांत मोदींच्या संदर्भात समजून घेतला, तर पुरोगामी विचारांचा ऐतिहासिक पराभवाचे विश्लेषण करणे सोपे होऊ शकेल. 

मोदी हे २००१ नंतर निवडणूकीच्या राजकारणात आले. संघाचा प्रचारक म्हणून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरूवात करणार्‍या या कार्यकर्त्याने संघटनात्मक कामात स्वत:ला इतके मग्न करून ठेवले होते, की कधी कुठल्या सत्तापदाची अभिलाषा धरली नव्हती. म्हणून भाजपातही दोन दशके कार्यरत असताना त्यांनी कुठली निवडणूक लढवली नाही, की सत्तापद उपभोगले नाही. पण अकस्मात गुजरातच्या राजकारणात निर्माण झालेल्या पोकळीने त्यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरावे लागले आणि थेट मुख्यमंत्री पदावर आरुढ व्हावे लागले. तसा आपल्याही राज्यात लोकप्रिय वा जनमत जिंकण्याची प्रतिमा नसलेला हा नेता एका दशकात थेट देशाचा लोकप्रिय नेता म्हणून पुढे येऊ शकला, हाच चमत्कार आहे. मात्र त्यासाठी त्याने प्रयत्न केले, असेही म्हणता येणार नाही. पण आलेल्या संधी सोडण्याचा मुर्खपणाही केला नाही. मोदी हे देशातल्या अतिरेकी पुरोगामी षडयंत्राची अशी शिकार झाले, की त्यातून सुटण्याच्या धडपडीने त्यांना थेट देशाचा अपुर्व नेता म्हणून राजकीय क्षितीजावर आणुन उभे केले. तेव्हा देशात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार होते आणि त्यांना आव्हान निर्माण करण्यात कॉग्रेस अपेशी झाली होती. अन्य पुरोगामी पक्षही विस्कटलेले होते. अशा वेळी गुजरातमध्ये भाजपा पक्षांतर्गत वादाने आपली भूमी गमावत होता. त्यातून पक्ष संघटना सावरण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून मोदींना मुख्यमंत्रीपदी आणले गेले. पण योगायोगाने त्याच दरम्यान गोध्रा येथे कारसेवकांचा रेल्वेडबा मुस्लिम जमावाने जाळला आणि गुजरातमध्ये आगडोंब उसळला. अशावेळी नवखा मुख्यमंत्री कितीही प्रामाणिक असला तरी परिस्थिती आवरू शकणार नव्हता. मोदींना तर सत्तेत येऊन सहा महिनेही मिळाले नव्हते आणि त्यांच्यापाशी प्रशासन राबवण्याचा अनुभवही जवळपास नव्हता. सहाजिकच दंगल हाताबाहेर गेली आणि त्याचे खापर मोदींच्या डोक्यावर फ़ोडण्याची जणू पुरोगामी स्पर्धाच सुरू झाली. आजवर देशात शंभरावर मोठ्या हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या आहेत आणि प्रत्येकवेळी अधिक मुस्लिमच त्याचे बळी झाले आहेत. पण त्याचे भानही न ठेवता मुख्यमंत्र्यालाच या दंगलीचा सुत्रधार ठरवण्यापर्यंत अतिरेक झाला आणि तो मागली लोकसभा संपेपर्यंत बिलकुल थांबला नाही. कुमार केतकर ज्याला अतिरेक वा ओव्हर किल म्हणतात, तो हाच प्रकार होता. 

महाराष्ट्रात व मुंबईत १९९२ व ९३ अशा दोन मोठ्या दंगली पेटल्या आणि त्यातही शेकडो लोकांचा बळी गेला. पण तेव्हाचे मुखयमंत्री सुधाकरराव नाईक यांना कोणी दंगलीचा सुत्रधार मानले नाही. खुद्द गुजरातमध्ये दर दीडदोन वर्षांनी हिंदू-मुस्लिम दंगलीचा इतिहास आहे. पण तेव्हाच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यावर दंगलीचा सुत्रधार म्हणायची कोणी हिंमत केली नाही. नाकर्तेपणाचा आरोप झाला असेल, पण दंगलीचा सुत्रधार आणि सरकारच मुस्लिमांचे मारेकरी, इतक्या टोकाची भाषा कधीच कुठेही झालेली नव्हती. तिथून या पुरोगामी अतिरेकाला सुरूवात झाली. भाजपाचे कोणी श्रेष्ठी वा दिल्लीतील बडे नेते त्याला समर्थपणे उत्तर देवू शकले नाहीत. तर आपल्या उदात्त प्रतिमेच्या चिंतेत असलेले वाजपेयी सुद्धा आपल्या या दुय्यम नेत्याच्या पाठीशी समर्थपणे उभे राहिले नाहीत. म्हणजेच मोदींना आपला बचाव स्वत:च उभा करावा लागला. पण त्यांचे कोण ऐकून घेत होता? इंग्रजी वृत्तपत्रे व वाहिन्यांनी जो मोदी विरोधाचा सपाटा लावला, त्याची अन्य भाषात नुसती पुनरावृत्ती होत राहिली. सोनिया गांधी नव्याने राजकारणात आलेल्या होत्या आणि त्यांना वाजपेयींशी टक्कर देणे शक्य नव्हते. सहाजिकच वाजपेयी विरोधात छडी प्रमाणे गुजरात दंगल व मोदी विरोधाचा वापर सरसकट होऊ लागला. आरंभी मोदींनी त्याला उत्तरे दिली व खुलासेही करून बघितले. पण त्याचा उपयोग नव्हता. त्यांच्या प्रत्येक बोलणे विधानाचा विपर्यास करून बातम्या झळकत होत्या. मात्र त्यातून गुजरातच्या बहुसंख्य अशा हिंदू समाजालाही दुखावले जाते आहे, याचे भान यापैकी कोणाही पुरोगाम्याला राहिलेले नव्हते. दुखावणारा प्रत्येक हिंदू आपोआप मोदी समर्थक होत चालला होता. कारण गोध्रा जळित कांडानंतर जी संतप्त प्रतिक्रिया उमटली, ती तर्काला धरून होती. म्हणूनच त्यात हिंदू समाजाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे, म्हणजे त्याला मोदी समर्थक बनवणे होते. देशभरातील पुरोगामी नेते, पक्ष, संघटना, त्यांचे समाजसेवक अधिक माध्यमे तीच कामगिरी बजावत होत्या. त्याचा गुजराती जनमानसावर होणारा परिणाम मोदींसारखा लोकांमध्ये अखंड वावरलेला माणूस सहज ओळखू शकत होता. मग त्यांनी माध्यमात आपली जितकी हिंदूत्ववादी कडवी प्रतिमा उभी केली जाईल, त्याला सहकार्य देण्याचाच पवित्रा घेतला. एका बाजूला हिंदू व दुसर्‍या बाजूला गुजराती, अशा दोन अस्मिता मोदींनी हाताशी धरून आपली नवी प्रतिमा गुजरातमध्ये उभी करणे त्यातून सोपे होऊन गेले. २००२ पासून २०१२ पर्यंतच्या दहा वर्षात गुजरातचा एकमेव अनभिषिक्त नेता अशी मोदींची प्रतिमा पुरोगाम्यांनी उभी केली आणि त्याला लागणारे साहित्य व माल मोदी मोठ्या अगत्याने पुरवत गेले.  
मोदींना कोपर्‍यात घेण्याची ही पुरोगामी चाल त्या कार्यकर्त्याला झुंजायला उर्जा देणारी ठरली. कारण उभा गुजरात किंवा तिथला बहुसंख्य हिंदू आपल्या पाठिशी एकदिलाने उभा असल्याची खात्री मोदींना झालेली होती. हिंदु-मुस्लिम असे धृवीकरण एकतर्फ़ी अपप्रचाराने पुरोगाम्यांनी घडवून आणले होते आणि त्याचा राजकीय लाभ उठवणे इतकेच काम मोदींना करायचे होते. किंबहूना त्याचा भरपूर लाभ होणार याची मोदींना खात्री होती. म्हणूनच त्यांनी राजिनामा देण्याचा प्रस्ताव पक्षापुढे मांडला आणि तो फ़ेटाळला जाईल अशीही चाल खेळली. मग विधानसभा बरखास्त करून पुरोगाम्यांना अधिकाधिक खेळवण्यात मोदी गर्क झाले. माध्यमातले पुरोगामी शहाणे व राजकारणातले अर्धवट पुरोगामी मोदींच्या खेळीत स्वेच्छेने सहभागी होत गेले. त्याचाच परिपाक मग पुढल्या दहा वर्षांनी समोर आला. मोदींना थेट पंतप्रधान पदाचे उमेदवार बनवण्यापर्यंत हा मुर्खपणा अविरत चालू राहिला. अर्थात मोदी व गुजरात दंगलीचा लाभ पुरोगामी वा कॉग्रेसला मिळाला हे नाकारता येत नाही. दोनच वर्षात लोकसभेच्या निवडणूका आल्या आणि त्यात दंगलीचा देशव्यापी वापर झाला. भाजपाला त्याचा फ़टका बसला. शिवाय पक्षाचा मोठेपणा गुंडाळून सोनियांनी अन्य पुरोगामी पक्षांना सोबत घेण्याची चलाखी केली आणि सत्ताही मिळवली. पण तिथेच गुजरात व मोदी विषय निकालात काढून पुरोगाम्यांनी आपापले सकारात्मक कामकाज सुरू केले असते, तर मोदी हे पुरोगाम्यांसाठी देशव्यापी आव्हान होऊ शकले नसते. पण सत्तालोलूप कॉग्रेसने पुरोगामी खुळेपणाचा धुर्तपणे वापर करून घेताना सर्वच पुरोगाम्यांची पत धुळीस मिळवली. गुजरात, मोदी व हिंदूत्व यांचे भय घालून जो सावळागोंधळ पुढल्या दहा वर्षात चालू राहिला, त्याने कॉग्रेस आणि पुरोगामीत्व यांच्यातला भेद पुसट होत गेला. किंबहूना मोदी वा भाजपा सोडून सर्वकाही पुरोगामी अशी एक व्याख्या तयार होत गेली. मात्र त्याला आव्हान देण्याची कुवत दिल्लीच्या कुणा भाजपा नेत्यामध्ये नव्हती. म्हणूनच २००९ च्या निवडणूकात भाजपाची अवस्था आणखी दारूण झाली. पण त्याचवेळी कॉग्रेस़चे पुनरुज्जीवन होताना आजवरच्या प्रस्थापित पुरोगामी डाव्या मानल्या जाणार्‍या पक्षाचे पावित्र्य संपुष्टात आले होते. बंगालमध्ये डावे, उत्तर प्रदेशात मुलायम, बिहारमध्ये लालू यांना स्वत:ची ओळखही वेगळी ठेवता आलेली नव्हती. 

एकूण मागल्या दहा वर्षात अशी स्थिती आलेली होती, की देशात पुरोगामी सरकार व राजकारण हवे असेल, तर कॉग्रेस वा तत्सम लोकांचा भ्रष्टाचार अनागोंदी निमूट सहन करावी लागेल. दुर्दैव असे, की हे पुरोगामीत्व नव्हे आणि भ्रष्टाचाराला पुरोगामी राजकारणात स्थान नाही, हे सांगायला तेव्हा विचारवंत वा पत्रकार संपादकांनी पुढे यायला हवे होते. निदान जे स्वत:ला पुरोगामी मानतात वा बांधिल मानतात, त्यांनी कॉग्रेस वा त्यांच्या मित्रपक्षांना जाब विचारण्यात पुढाकार घ्यायला हवा होता. पण मजेची गोष्ट अशी, की समाजातील पुरोगामी विचारवंत व संपादक पत्रकारांनी तसा जाब विचारू बघणार्‍या भाजपा वा इतरांची मुस्कटदाबी करण्यात धन्यता मानली. पर्यायाने माध्यमातील पुरोगामी लोकांची विश्वासार्हता जनमानसात घसरत गेली. नेमक्या त्याच काळात भाजपामध्ये मोदींची उंची वाढत होती आणि नव्याने वापरात आलेल्या सोशल माध्यमांचा मोदींनी अतिशय धुर्तपणे वापर सुरू केला होता. त्यातून मग भाजपापेक्षा देशभर नरेंद्र मोदी यांचे चहाते तयार होऊ लागले आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांना या नव्या माध्यमातून आव्हान उभे रहात गेले. मोदींची नकारात्मक प्रतिमा सातत्याने रंगवलेल्या माध्यमांना एका दिवसात माघार घेऊन मोदींचा नवा चेहरा उभा करणे अशक्य होते. पण सोशल माध्यमातून मोदींची जी फ़ौज त्यांच्याविषयी नवनवी माहिती जगभर पाठवू लागली होती, तिच्याशी सामना करण्यात भारतातील पुरोगामी माध्यमे लंगडी पडू लागली. किंबहूना माध्यमातील नामवंत सेक्युलर वा पुरोगामी म्हणून बदनाम होत गेले. ते सत्य सांगणार नाहीत आणि मोदी विषयक असत्यच सांगतील, असे चित्र उभे करण्यात मोदी यशस्वी झाले. त्यातून मग माध्यमातील मोडकळीस आलेल्या पुरोगामी नामवंतांना संपवण्याची अखेरची निर्णायक लढाई मोदींनी खेळणे तेवढे बाकी होते. आपल्याच कर्तबगारीने आपली आपलीच विश्वासार्हता धुळीस मिळवलेल्यांना शेवटचा धक्का देण्यापेक्षा मोदींना कुठलेच मोठे काम उरलेले नव्हते. तो धक्का त्यांनी लोकसभा प्रचाराच्या रणधुमाळीतून दिला. मतदानाचा अखेरचा महिना येऊन ठेपला, तरी हा देशातला सर्वाधिक लोकप्रिय माणूस कुठल्याही वाहिनीला मुलाखतही देत नव्हता. पण त्याच्या सभांचे थेट प्रक्षेपण करून त्यावर चर्चा करण्याची अगतिक भूमिका माध्यमांना पार पाडावी लागत होती. त्या अखेरच्या दिवसात मोदींनी एका एका नगण्य वाहिन्यांना प्राधान्याने मुलाखती देवून नावाजलेल्या वाहिन्या व पत्रकार संपादकांना खड्यासारखे बाजूला ठेवले. शेवटी दिवस संपत आले आता तरी ‘मोठ्या जाणत्या पत्रकारांना मुलाखती द्याना’, अशी केविलवाणी विनंती सागरिका घोष नामक पत्रकार विदूषीला करावी लागली. राजदीप सरदेसाईची ही पत्नी असल्याचे लक्षात घेतले, तर एकूण माध्यमातील पुरोगाम्यांना मोदींनी कसे नामोहरम करून टाकले त्याचा अंदाज येईल. पुढे निकाल लागले त्यात कॉग्रेससह तमाम पुरोगामी पक्षही धाराशाही झाले. त्याला मोदींचे कर्तृत्व उपयुक्त ठरण्यापेक्षा आधीच्या बारा वर्षातल्या ‘ओव्हर किल’ म्हणजे मोदी विरोधी अपप्रचाराच्या अतिरेकाचा तो परिपाक होता. मात्र इतक्याने देशातील पुरोगामी राजकारण वा चळवळी उध्वस्त झाल्या वा मोडकळीस आल्या असे म्हणता येणार नाही. त्याची सुरूवात खुप आधी म्हणजे साडेतीन दशकापुर्वी झालेली होती.   (अपुर्ण)

रविवार, १३ सप्टेंबर, २०१५

‘भाकड’ पुराणकथा आणि सत्यकथापन्नाससाठ वर्षापुर्वी कॉलेजला जाईपर्यंत अगदी मुंबईसारख्या महानगरातील शाळकरी मुलांनाही चित्रपट बघायला मिळत नसायचे. मात्र आपल्यापेक्षा थोराड वा कॉलेजात जाणार्‍याने कुठला सिनेमा बघितला तर त्यात काय होते, त्याचा तपशील अशा ‘वडीलधार्‍या’कडून ऐकून थक्क होणे, एवढाच शाळकरी वयातला थरार होता. अशा वयात  इंग्रजी चित्रपट तर दूरची गोष्ट होती. पण आमच्या टोळीला एकाकडून तेव्हा खुप गाजलेल्या ‘सायको’ नामक परदेशी चित्रपटाची कहाणी ऐकायला मिळाली होती. म्हणूनच संधी मिळेल तेव्हा हिचकॉकचा तो चित्रपट बघायचाच, अशी एक महत्वाकांक्षा त्या कोवळ्या वयात बाळगली होती. पुढे जेव्हा संधी मिळाली आणि ‘सायको’ बघितला, त्याचा प्रभाव अजूनही मनावर आहे. इतक्या मोठ्या त्या पटगृहाच्या पडद्यावर एक तरूणी पाठमोरी उभी आहे आणि एकूणच शंकास्पद वातावरण आहे. अशावेळी एकदम संपुर्ण पडदा व्यापणारा हात तिला झाकत पुढे सरकतो आणि तिच्या मानेकडे जातो. तत्क्षणी अंगावर शहारे यायचे आणि पटगृहात सुस्कारे सुटायचे. कितीदा तरी तो चित्रपट पुढल्या काळात बघितला. पण प्रत्येकवेळी त्याचा तोच प्रभाव राहिला. हिचकॉक या दिग्दर्शकाची तीच खासियत होती. प्रेक्षकाच्या मनातल्या भितीचा तो थेट ताबा घ्यायचा आणि मग तुमच्या मनाशी खेळ करायचा. तुम्हाला तो खेळ आवडायचाही. त्या थक्क चकीत होण्यात वा शहारण्यात एक अजब अनुभव असायचा. आजच्या पिढीला त्याचा किती आनंद लूटता येईल याची शंका आहे. कारण आता आपले नित्यजीवनच सतत थरारक होऊन गेले आहे. घराघरात येऊन पोहोचलेल्या वाहिन्या व उथळ नाट्यमय बातमीदारीने थराराची इतकी सवय अंगवळणी पडली आहे, की जे अनुभवले ते विसरून पुढल्या थराराला कायम सज्ज रहावे लागते. गेल्या आठवड्यात तुर्कस्थानच्या समुद्र किनार्‍यावर पडलेल्या एका कोवळ्या बालकाचे उपडे शव बघून त्याचा नवा अनुभव आला. हिचकॉक आठवला. कारण ते चित्र टिपणार्‍या व प्रदर्शित करणार्‍याचा हेतू हिचकॉकपेक्षा किंचितही वेगळा नव्हता. त्यातून प्रेक्षकाच्या मनात भय व सहानुभुती अशा संमिश्र भावना एकाचवेळी जाग्या करायचाच हेतू त्यामागे होता. हे आता नेहमीचेच झालेले नाही काय?

त्यात हे बालक हकनाक मृत्यूमुखी पडले वा अन्य कुणाच्या राजकीय वा भलत्या महत्वाकांक्षेने त्याचा बळी घेतला, याची कुठलीही वेदना यातना ते चित्र पेश करणार्‍या पत्रकार वा वाहिनीकडे नव्हती. त्यातून एक ठराविक राजकीय परिणाम साधण्यासाठीच हे प्रदर्शन योजनापुर्वक करण्यात आलेले होते, त्यातून सिरिया-इराक येथून युरोप खंडातील पुढारलेल्या देशात घुसू बघणार्‍या तथाकथित निर्वासितांविषयी जगभर सहानुभूती निर्माण करणे आणि पर्यायाने त्यात अडसर झालेल्या युरोपियन देशातल्या राज्यकर्त्यांबद्दल चीड निर्माण करणे, इतकाच उद्देश त्यामागे होता. तसे झाले मग सुखवस्तु युरोपियन नागरिकांमध्ये आपल्या सुखवस्तु जगण्याविषयी अपराधगंड निर्माण झाला पाहिजे आणि त्याखाली त्यांचे राज्यकर्ते दबले पाहिजेत. यासाठीच हे सर्व नाटक होते. त्यातली माणुसकी वा भावना खरी असती, तर मागली दोनतीन वर्षे याच प्रदेशात जे काही मृत्यूचे अमानुष तांडव चालू आहे आणि जिवंतपणे हजारो मुले महिला नरकवास भोगत आहेत, त्याविषयी चीड निर्माण करणार्‍या कथानकाचा समावेश झाला असता. तशा डझनावारी हृदयद्रावक कहाण्या त्याच परिसरात घडत आहेत आणि त्याविषयी फ़ारसा कुठे गाजावाजा होऊ दिला जात नाही. किंबहूना होत असेल तर त्यावर पांघरूण घालणार्‍या इतर काही गोष्टींचा गवगवा केला जातो. त्यातून मग त्या खर्‍या सहानुभूतीला पात्र असलेल्या बातम्या व कहाण्या दडपल्या जात असतात. दाखवले असे जाते आहे, की सिरीया-इराक येथे जे युद्ध व यादवी चालू आहे, त्याच्या परिणामी लक्षावधी लोकांना घरदार सोडून देशोधडीला लागायची पाळी आली आहे आणि माणुसकी म्हणून त्यांना युरोपियन राष्ट्रे आश्रयही देताना हात आखडता घेत आहेत. पण म्हणून वस्तुस्थिती तशीच आहे काय? बारकाईने त्या निर्वासित म्हटल्या जाणार्‍या लोकांकडे बघितले तर त्यातला कोणी कुपोषित वा उध्वस्त जीवनाचे चटके सोसलेला दिसत नाही. चांगले स्वच्छ कपडे परिधान केलेले हे जमाव कुठल्याही कागदपत्राशिवाय तुर्कस्थान वा ग्रीसच्या सीमेवर येऊन थडकले आहेत. हा प्रकार आजचा वा तिथल्या यादवीचा परिणाम आहे काय?

मागल्या काही वर्षात मध्य आशियातील मुस्लिम अरब देशातून शेकड्यांनी लोक असेच अवैध मार्गाने युरोपियन देशांमध्ये घुसखोरी करीत राहिले आहेत. कधी नौकेत बसून तर कधी कुठल्या कंटेनर ट्रेलरच्या बंदिस्त खोक्यातून, त्यांनी या देशात घुसण्याचे सतत प्रयत्न केलेले आहेत. इकडे युरोपापासून तिकडे दक्षिण गोलार्धातील ऑस्ट्रेलियापर्यंत हजारोच्या संख्येने मुस्लिम अरबी लोकांनी घुसखोरी केलेली आहे. अर्थात पकडले जाण्याचे भय त्यांना अजिबात नाही. पकडले गेलो तरी बेहत्तर! तिथे आपली खाण्यापिण्याची सोय संबंधित पुढारलेल्या देशाला करावी लागेल, अशी त्यांना पुर्ण खात्री आहे. म्हणजेच कुठलाही कायदा मोडल्याचा गुन्हा केला तरी जीवावर बेतणार नाही, याची हमीच त्यांना तसे करायला प्रोत्साहित करते आहे. आता दुसरी बाजू बघा. जिथून हे हजारो लोक जीव मूठीत धरून पळत असल्याचा गवगवा केला जातो, तिथून अशी माणसे सर्वात प्रथम युद्धक्षेत्र नसलेल्या जवळच्या प्रदेशात जाण्याचा प्रयत्न करतील ना? म्हणजे सौदी अरेबिया, कुवेत, ओमान वा दुबई, कतार अशा अरबी व ओळखीच्या प्रदेशात कुठेही युद्धाची सावली नाही आणि परिचयाचा प्रदेश आहे. संस्कृती व धर्मानेही जवळीक सांगता येणारे हे देश हाकेच्या अंतरावर म्हणावेत असे आहेत. पण या लक्षावधी मुस्लिम अरबांची नजरही तिकडे नाही. त्यांना हजारो मैल दूर असलेल्या युरोपातच जायचे आहे. कारण संस्कृती व धर्माच्याही नात्याने जवळचे असलेले तितकेच श्रीमंत अरबी देश त्यांना दारातही उभे करणार नाहीत, याची पुरेपुर खात्री आहे. शिवाय नुसतेच पकडून हाकलून देतील असे नाही. कायदा मोडला वा बिना कागदपत्रे तिथे घुसण्याचा प्रयत्न केला तरी जीवाशी गाठ आहे. हातपाय तोडले जातील वा थेट गोळ्या घालूनही मारले जाण्याची शक्यता आहे. थोडक्यात कायदा मोडण्याची मुभा नसलेले श्रीमंत देश जवळ असले तरी नको आहेत आणि जिथे कायदा धाब्यावर बसवून धुमाकुळ घालायची मोकळीक असेल, तिथेच यांना आश्रीत व निर्वासित म्हणून जायचे आहे.

अर्थात हा नुसता संशय मानायचे कारण नाही. त्याची अनुभूती कायम येते आणि आताही येत आहे. तुर्कस्थानच्या किनार्‍यावर त्या बालकाचे शव दाखवले गेल्यावर युरोपियन देश दबावाखाली आले आणि त्यांच्या सीमेवर रोखून धरलेल्या या निर्वासितांनी पोलिस बंदुकांना झुगारून घुसखोरी सुरू केली. शेकडो व हजारोच्या संख्येने घुसणार्‍यांना पोलिस वा बंदुका रोखूही शकल्या नाहीत. पण अशा रितीने जर्मनीच्या एका निर्वासित छावणीत काय घडले? तिथे इराकी सिरीयन व अफ़गाण निर्वासित आहेत. त्यातल्या कुणा एकाने पवित्र ग्रंथ कुराणाची पाने फ़ाडली व शौचालयात फ़ेकली. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने मग त्याचा पाठलाग केला. छावणीचे पोलिस त्याला वाचवायला गेल्यावर दगड व सळयांनी पोलिसांवरच निर्वासित जमावाने हल्ला केला. छावणीतले मदतकार्य संभाळणारे कार्यालयच फ़ोडून टाकले. ह्यांना निर्वासित ठरवले जात आहे. ज्यांच्या अंगात इतकी खुमखुमी आहे, की खाण्यापिण्याची सोय नसताना धर्मग्रंथाचा अपमान झाला म्हणून परक्या देशातही दंगल केली जाते. खरेच इतकी खुमखुमी होती, तर त्यांनी मूळ देशातील घरदार सोडून येण्य़ाचे कारणच काय? धर्मग्रंथाच्या नुसत्या अवमानाने ज्यांच्यात इतकी विरश्री संचारते, त्यांना मुळच्या देशातल्या अतिरेक्यांशी दोन हात करताना भिती कसली वाटत असते? युरोपियन देशातील पोलिस वा त्यांच्या हातातल्या बंदुका ज्यांना घाबरवू शकत नाहीत, त्यांनाच इसिस वा अन्य कुणा घातपात्याच्या हातातली हत्यारे भयभीत करू शकतात काय? कोण कोणाच्या डोळ्यात धुळफ़ेक करतो आहे? हा सगळा मामला काय आहे? जी मस्ती निर्वासित छावणीत दाखवली जाते, तिथे मानवाधिकार नावाच्या वेसणीने पोलिसांच्या मुसक्या बांधलेल्या आहेत. म्हणून त्याच्यावर हल्ला करण्यापर्यंत परागंदा झालेल्यांमध्ये विरश्री संचारते. पण त्यांच्याच मायदेशी इसिसचे लढवय्ये किंवा शेजारच्या अरबी श्रीमंत देशात कुठल्याही मानवी अधिकारांना स्थान नाही. तिथे याच धर्मप्रेमी निर्वासितांची विरश्री गर्भगळित होते.

कुठल्या धर्माच्या व त्यातील कुठल्या पवित्र गोष्टीच्या विटंबनेसाठी हे निर्वासित इतका धुमाकुळ घालू शकतात? ज्या धर्माच्या नावाने इसिस नावाची संघटना त्यांच्याच मायदेशात राजरोस बलात्कार करते आहे, त्याचेच पावित्र्य जपण्यासाठी जर्मनीत दंगल? एका बाजूला यांना आपल्या पवित्र ग्रंथाची पानेही फ़ाडली तर सहन होत नाही. पण दुसरीकडे त्यांच्याच मायभूमीत यझदी वा अन्यधर्मिय मुली महिलांना गुलाम बनवून धर्माच्या नावाने बलात्कार केले जात आहेत. एका बारा वर्षाच्या किशोरवयीन मुलीची भयंकर कहाणी याच दरम्यान उघड झाली आहे. एक जिहादी लढवय्या रोज तिच्याकडे येऊन धर्मकार्य व अल्लाशी जवळीक साधण्यासाठी तिच्यावर बलात्कार करायचा. तिचे हातपाय बांधून प्रार्थना करायचा आणि मग बलात्कार उरकून पुन्हा प्रार्थना करायचा. हा धर्माचा सन्मान आहे काय? ज्यांनी कोणी तिथे जर्मनीत धर्माच्या प्रतिष्ठेचे कारण दाखवून दंगल केली, त्यांना मायभूमीत फ़ैलावलेला इस्लाम धर्माचीच विटंबना असल्याचे तरी वाटते काय? असेल तर त्याविषयी त्यांना संताप कशाला येत नाही? जिथे बेछूट गोळ्या झाडल्या जातील याची खात्री आहे. तिथल्या धर्माच्या पावित्र्य वा विटंबनेची त्यांना फ़िकीर नाही. तिथला धर्म विटंबनेसाठी सोडून त्यांनी युरोपकडे धाव घेण्याचे कारणच काय? एक तर त्यांचे जीव मुठीत धरून युरोपकडे पळ काढणे हे निव्वळ नाटक आहे किंवा तिथे पोहोचल्यावर धर्माच्या पावित्र्यासाठी दंगलीची खुमखुमी दाखवणे तरी खोटे आहे. पण यातले काही दाखवले जाणार नाही, सांगितले वा समजावले जाणार नाही. दाखवले जाईल फ़क्त आयलान कुर्दी नामक त्या बालकाचे उपडे निपचित पडलेले शव! जेणे करून तुमच्या मनात अपराधगंड तयार व्हावा. याला रणनिती म्हणता येईल. एका बाजूला आपल्याच धर्मबांधवांनी इतरांवर अन्याय अत्याचार करावेत आणि अत्याचारितांच्या धर्मबांधवांनीच पुन्हा आपल्याला आश्रय देवून आपला बोजा उचलला पाहिजे. जुन्या किंवा कुराणाच्या भाषेत त्याचे उत्तर धिम्मीट्युड असे आहे. म्हणजे तुम्ही मुस्लिम नाही म्हणूनच सर्व बोजा तुमच्यावर! भारतीयांना समजण्यासाठी आपण त्याला जिझीया कर म्हणू.

जगातल्या लिबरल म्हणजे उदारमतवादी वा सेक्युलर असलेल्या बुद्धीमंतांचे युक्तीवाद कसे बघा. त्यांना इराकमध्ये यझदी लोकांची शेकड्यांनी कत्तल झाली किंवा त्यांच्या पळवलेल्या मुली महिलांना गुलाम म्हणून विकण्याचा प्रकार चालू आहे, त्याची अजिबात फ़िकीर नाही. एकाच वेळी शेकड्यांनी बिगर मुस्लिमांची इराक-सिरीया प्रदेशात कत्तल चाललेली आहे. त्यांचेही शेकड्यांनी निर्वासित कुठे ना कुठे मिळतील. त्यापैकी कोणी दंगल माजवली असे दिसले आहे काय? काश्मिरातून जीव मूठीत धरून पळून आलेले पंडित दिल्लीच्या रस्त्यावर निर्वासित म्हणून तीन दशके पडलेत. त्यांनी कधी दंगल केली आहे काय? अरबी मुस्लिम देशातून पळालेले बिगर मुस्लिम लाखोच्या संख्येने अन्यत्र निर्वासित म्हणुन पडलेत. त्यांच्या दंगलीची बातमी कुठे कानावर येत नाही. पण जे लोक काल जीव मुठीत धरून जर्मनीत आश्रय घ्यायला आलेत, ते दोन दिवसात तिथे धर्माच्या नावाने दंगल माजवतात. ही युरोपमध्ये येऊ घातलेल्या संकटाची नांदी आहे. ज्या युरोपच्या पुराणकथा वा ऐतिहासिक कथांमध्ये टोजन हॉर्सची गोष्ट कित्येक पिढ्या सांगितली गेली व जगभर ऐकवली गेली, त्याची पुनरावृत्ती होऊ घातली आहे काय? कुठल्या युरोपिय देशाच्या राज्यकर्त्या नेत्याला तरी ती कथा आठवते काय? अभेद्य किल्ला वा तटबंदीमुळे जे राज्य अजिंक्य होते, त्याला ट्रोजन हॉर्स नामक रणनितीने भुस्कटासारखे पराभूत करण्याची किमया घडवणारी ती गोष्ट आहे. इतिहास विसरलेल्यांची वा नाकारणार्‍यांमुळे इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते ना?

दिर्धकाळ अनिर्णित असलेल्या त्या युद्धात एके सकाळी किल्ल्याच्या भव्य दारात एक प्रचंड लाकडी घोडा उभा दिसतो. बाकी कोणी शत्रूसैन्य नसते. दिवसभर बुरूज व तटबंदीवरून त्या घोड्याचे निरिक्षण चालू असते आणि संध्याकाळ होताना दरवाजा उघडून तो निर्जीव घोडा किल्ल्यात ओढून पुन्हा दरवाजा कडेकोट बंद केला जातो. मग अपरात्री त्या लाकडी घोड्यात लपलेले शत्रूसैनिक बाहेर पडतात आणि किल्ल्याची दारे उघडून दडी मारून बसलेल्या आपल्या बाकीच्या सेनेला रस्ता मोकळा करून देतात. किल्ल्याच्या झोपलेल्या सैनिकांना गाफ़ील धरून मारले जाते आणि ते साम्राज्य धुळीला मिळवले जाते, अशी ती कहाणी आहे. इथे आज आपण बघतो आहोत त्यात काय वेगळे घडते आहे?

मागल्या दशकात युरोपच्या विविध लहानमोठ्या देशात दोन ते दहा टक्के असलेल्या मुस्लिम संख्येने तिथल्या कायदा व्यवस्थेला ओलिस ठेवले आहे. जर्मनी, फ़्रान्स वा स्वीडन, नॉर्वे अशा देशातही इस्लामची सत्ता हवी म्हणून धुमाकुळ घातला आहे. काही महिन्यापुर्वीच फ़्रान्सच्या ख्यातनाम शार्ली हेब्दो नामक नियतकालिकाच्या कार्यालयावर ‘अल्ला हो अकबर’ अशा घोषणा देत हल्ला झाला आणि संपादकासह अनेकाची राजरोस कत्तल झाली. पॅरीसमध्ये महिनाभर अल्जिरीयन आश्रीत मुस्लिमांनी मोटारींची जाळपोळ चालविली होती. नेदरलॅन्ड देशात ‘व्हेल’ म्हणजे बुरखा नावाचा चित्रपट काढला त्यात इस्लामवर टिका होती, म्हणून मोरक्कन आश्रित मुस्लिमाने त्या दिग्दर्शकाची हत्या केली. स्वित्झर्लंड येथे सर्वात उंच मशिदीचा मिनार उभा करण्यावरून सार्वमत घेण्याची पाळी आणली गेली. हा सगळा प्रकार आश्रित निर्वासित असल्याचा पुरावा असतो काय? पाच दहा टक्के लोकसंख्या असताना जर इतके भयंकर प्रकार होत असतील, तर त्यात दुपटीने भर पडली मग उद्या युरोपचा पश्चिम आशिया व्हायला कितीसा वेळ लागणार आहे? दुसर्‍या महायुद्धानंतर लेबानॉनच्या बहुसंख्य ख्रिश्चनांना मायदेश सोडून पळ काढावा लागला आणि आता तर इस्लामी देश अशीच त्याची ओळख राहिली आहे. इजिप्तमध्ये कॉप्टिक ख्रिश्चन नामशेष होत चालले आहेत. हा इतिहास आहे आणि त्याची पुनरावृत्ती लोकसंख्येच्या फ़ेरबदलाने युरोपातही होऊ शकते. हे स्पष्ट दिसत असताना बाहु पसरून युरोपियन राज्यकर्ते चाळीस लाख निर्वासित म्हणून सिरीयन इराकींना सामावून घेण्याची भाषा करणार असतील तर ते विनाशाला आमंत्रण देत आहेत असेच म्हणावे लागते.

मात्र त्यासाठी अरबी देशातल्या त्या इसिस वा अन्य कुठल्या जिहादी संघटनेला वा अरबी राज्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवता येणार नाही. कारण त्यापैकी कोणी युरोपला वा त्या खंडातील देशांना निर्वासित घेण्याची सक्ती केलेली नाही. तो मध्य पश्चिम आशियातील विविध मुस्लिम देशातील अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यात हस्तक्षेपच करायचा तर अमानुष वागणार्‍यांना क्रुरपणे संपवण्याची मदत पुढारलेले युरोपियन देश करू शकत होते. यातले कोणी आपल्या देशात आले, तरी हाच घिंगाणा करतील म्हणून सौदी, दुबई, कुवेत असा कोणीही निर्वासितांना आपल्याकडे घ्यायला तयार नाही, की त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारीही घ्यायला राजी नाही. ह्यात जिहादी घुसखोरी करून येतील असे कारण देवून त्यांना आश्रित म्हणूनही घ्यायला आखाती देशांनी साफ़ नकार दिला आहे. मग उदारमतवादाचे नाटक रंगवून युरोपने हे संकट आपल्या गळ्यात घेण्याचे कारणच काय? तर त्याचे कारण आपण इथे भारतातही शोधू शकतो. याकुब मेमनसाठी गळा काढणारे वा काश्मिरी लोकांच्या हक्कासाठी मातम करणारे आपल्याकडेही नाहीत काय? पण त्यांना काश्मिरी पंडितांचे हाल दिसत नाहीत. बघता येत नाहीत. त्यांचेच भाईबंद युरोपातही तेच उद्योग करत आहेत. ज्यांना सामुहिक जबाबदारी म्हणून ग्रीससारख्या छोट्या देशाची दिवाळखोरी भरून काढताना नाकीनऊ आलेत, त्यांनी चाळीस लाख अरबी निर्वासितांच्या पुनर्वसनाचा बोजा उचलण्याचा दावा करण्यात कितीसा अर्थ आहे? कारण हा लोंढा इथेच थांबणारा नाही, की जे येत आहेत त्यांना आवरणेही युरोपच्या कायदा व राज्यकर्त्यांच्या आवाक्यातली गोष्ट नाही. त्यांना लिबीयाचा हुकूमशहा कर्नल गडाफ़ीचे शाप भोवत आहेत म्हणावे काय?

चार वर्षापुर्वी ट्युनीशिया व तहरीर चौकतील इजिप्शियन क्रांतीनंतर तेच अरब क्रांतीचे लोण लिबीयात पोहोचले. तेव्हा गडाफ़ीने ते चिरडण्याचा पवित्रा घेतला होता. पण तेव्हा मानवतेच्या युरोपियन पुरस्कर्त्यांनी गडाफ़ीला शह देण्यासाठी बंडखोरांना मदत केली. गडाफ़ीचा महाल व सैनिकी तळावर नाटोने हल्ले चढवून गडाफ़ीला पुरता नामोहरम करण्याची रणनिती राबवली होती. तेव्हाच गडाफ़ीने इशारा दिला होता. मला संपवून युरोप पन्नास लाख निर्वासितांना आमंत्रण देत आहे. याचा अर्थ अगदी स्पष्ट होता. ज्यांच्यावर मी पाशवी हुकूमतीने राज्य करतो आहे, त्यांना तुमच्या सभ्य नागरी जीवनाची सवय नाही आणि माझी सद्दी संपली, तर हे लोक तुमच्याच उरावर बसतील. असेच गडाफ़ीला म्हणायचे होते. युरोपियन राज्यकर्ते उदारहस्ते निर्वासितांना दरवाजे मोकळे करून गडाफ़ीचे शब्द खरे करीत आहेत. मात्र त्याचे परिणाम इतक्यात दिसणारे नाहीत. कारण जेव्हा इतक्या सहजतेने घुसता येते असे दिसेल, तेव्हा निर्वासित म्हणून अरबी प्रदेशातून युरोपात त्सुनामीसारख्या लाटा येतच रहाणार आहेत आणि मग बंदुकीच्या गोळ्याही त्या लोंढ्याला रोखू शकणार नाहीत. कारण मग बंदुकधारी युरोपियन पोलिस व लष्कराला आतले घरभेदी आणि बाहेरचे घुसखोर अशा दोन्ही बाजूने लढावे लागणार आहे.

यापासून घ्यायचा धडा सोपा साधा आहे. साधू भिक्षेकर्‍याचे रूप घेऊन येणारा मायावी रावण किंवा श्रीरामाचा आवाज काढून लक्ष्मणाला हाका मारणारा मायावी मारीच नुसत्याच भाकड वा पुराणकथा नसतात. त्यात काही बोध सांगितलेला असतो. ज्यांना घ्यायचा त्यांनी घ्यावा. नाहीतर प्रभूचा अवतर असून रामचंद्रालाही त्याच्या परिणामांपासून सुटका नसते. आपण तर सामान्य माणसे आहोत ना?

पूर्वप्रसिद्धी:  तरूण भारत (नागपूर) रविवार, १३ सप्टेंबर २०१५

गुरुवार, १८ जून, २०१५

उपदव्यापी मुलगा

गीता सांगण्याची वेळ आली, तरी कृष्णलीला चालूच


मुख्यमंत्री ना. शरद पवार महाराष्ट्रातच मुख्यमंत्रीपदावर रहाणार आहेत! त्यांनी खसदारपदाचा राजिनामा दिला असून त्यामुळे संशयाला जागा नाही. ना. पवारांविषयी वारंवार लिहीण्याची आमच्यावर पाळी येते. एखादा मुलगा सारखा कुठेतरी उपदव्याप करीत असतो! कुठे डोक्याला खोक पाडून घेतो, कुठे स्कुटर चालू करून आपटतो. कुठे भाजून घेतो, किंवा काहीच नाही तर घरात क्रिकेट खेळताना सिक्सर मारून काच तरी फ़ोडतो! स्वत:च पंच बनुन सिक्सरचा सिग्नल देतो. ना. पवारांचाही नुसता उपदव्याप सुरू असतो. दिल्लीत केंद्रीय संरक्षणमंत्री होते तेव्हा सारखे महाराष्ट्रात यायचे आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आले तर सारखे दिल्लीला जातात, याला काय म्हणावे? ना. पवार दिल्लीत संरक्षणमंत्री होण्यासाठी जाताना म्हणाले होते की, मी महाराष्ट्रात यापुढे परतणार नाही आणि जरी परतलोच तरी कोणत्याही अधिकारपदावर येणार नाही! पण नंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर कॉग्रेसश्रेष्ठींच्या आज्ञेचे कारण सांगून आलेच! महाराष्ट्रात आल्यावर म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था ठाकठीक करून गॅंगस्टरीझम उखडून टाकून, पक्षसंघटना मजबूत बांधून व आगामी सार्वत्रिक निवडणूकीत महाराष्ट्रात कॉग्रेसला विजयी करून १९९५ साली दिल्लीला परत जाईन! पण यापैकी कोणतेही उद्दीष्ट साध्य न करताही स्वत:च पंच बनून ‘यशस्वी’ झाल्याचे जाहिर करून दिल्लीला निघाले होते. उगीच उपदव्याप कृष्णानेही केले, पण कृष्णाने बालपणी असल्या खोड्या केल्या, तर ना. पवार वयाच्या ५४ व्या वर्षीही ‘कृष्णलीला’च करीत आहेत! अलिकडे ते लोणावळ्यजवळ कार्ले येथे बालाजी तांबे यांच्या निसर्गोपचार केंद्रात मानसिक संतुलन साधण्यासाठी गेले. पण निसर्गोपचार केंद्रातही ५४ वर्षाचा ‘उपदव्यापी मुलगा’ स्वस्थ बसला नाही! त्यांनी तिथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्या भेटीत काय बोलणे झाले याबाबत आजतागायत उलटसुलट चर्चा चालू आहे. जेथे जाई तेथे, राजकारण सांगाती! सतत उलटसुलट चर्चेमुळे ना. पवारांची बातमी दिल्याशिवाय वृत्तपत्रंचा अंक काढणे अशक्य होऊन जाते, आणि त्यांच्याबद्दल न लिहीणेही अशक्य होऊन जाते! लोण्याचा गोळा चोरून व मटकावून बालकृष्ण जसा निष्पाप चेहर्‍याने यशोदेसमोर उभा रहायचा, तसे ना. पवारही निष्पाप निरागस हास्य करीत उभे ठाकतात. ना. पवार कार्ले येथे मानसिक संतुलनासाठी गेले, पण ‘मानसिक संतुलन’ त्यांना जन्मत:च प्राप्त झालेले आहे. बहुधा त्यांनीच बालाजी तांबे यांना मानसिक संतुलन शिकवले असावे.

संरक्षणमंत्र्यांचे विमान! त्याबद्दलही चर्चा!

कृष्णलीला कितीही संगितल्या तरी संपत नाहीत, असे म्हणतात. याबाबत आम्हाला ना. पवारांमुळे खात्री पटली आहे. ना. पवार केंद्रात संरक्षणमंत्री होते तेव्हा त्यांचे खास विमान वारंवार पुण्यनगरी पुण्यात अवतीर्ण होत असे. मध्यंतरी त्यांनी आम्हाला प्रदिर्घ मुलाखत दिली तेव्हा त्यांच्या याच विमानातून आम्ही ‘दिल्ली-पुणे’ प्रवास केला व त्या दीड तासात मुलाखत पुर्ण केली. आमचे नशीब थोर असल्यामुळे या विमानात दोन शर्मा नव्हते! सगळे पुण्याचेच ‘फ़ुकटे’ होते! आम्ही ‘फ़ुकटे’ म्हटल्याबद्दल आमच्यावर रागावण्याचे कारण नाही! ना. पवार तसे जाहिरपणे म्हणाले. तेव्हा त्याचीही चर्चा करतो. ना. पवारांचा प्रभाव असा की, या मुलाखतीमुळे ‘नवाकाळ’चा खप ५० हजारांनी वाढला! मुलाखतीबद्दल उदंड चर्चा झाली, यात काही नवल नाही. पण आम्ही ना. पवारांची प्रदिर्घ मुलाखत का घेतली? हाही चर्चेचा विषय होऊन संशय निर्माण केला गेला आणि पवारांसारखे ‘मानसिक संतुलन’ नसल्याने आम्ही व्यग्र झालो होतो.

राज्य कॉग्रेसचे आणि माहिती भाजपाला!

आजवर अनेक संरक्षणमंत्री होऊन गेले. कृष्ण मेननसारखे सर्वात वादग्रस्त संरक्षणमंत्री झाले. पण त्यांच्या ‘विमान प्रवासा’ची कधी चर्चा झाली नाही. ना. पवार संरक्षणमंत्री झाल्यावर मात्र चमत्कार झाला! ते वाराणसीहून पुण्याला त्यांच्या खास विमानाने आले, तेव्हा त्यांच्या विमानात दाऊद इब्राहिमच्या गॅंगस्टरांशी संबंधित दोन शर्मा होते, अशा गोपिनाथ मुंडे यांच्या आरोपाने प्रचंड खळबळ माजली. ना. पवारांनी खुलासा केला की, ‘माझ्या विमानात दोन शर्मा होते याची मला काहीच माहिती नाही!’ कॉग्रेसचे राज्य कसे चालते ते पहा. राज्य कॉग्रेसचे, पण ना. पवारांच्या विमानातून कोण येतात जातात याची माहिती भाजपाला! हे दोन शर्मा नुकतेच दिल्लीहून मुंबईला आले व पकडले गेले, तेव्हा ना. पवारांच्याच विमानातून आले नाहीत, हे नशीब म्हणायचे! महापौर आर. आर. सिंग आणि आमदार दुबे मुंबईतच होते, हे कदाचित कारण असावे! ना. पवारांच्या वारणसी-पुणे विमान प्रवासात दोन शर्मा कसे आले होते? महापौर आर. आर. सिंग यांनी त्यांना आणले होते! महापौरांची अब्रु गेली, पण नंतर शब्द फ़िरवून खुर्ची बचावली. आजही ना. पवारांना नक्की माहिती नाही, ते म्हणाले की, ‘माझ्या विमानातून अनेकजण येतात जातात (भाजपाचे) अण्णा जोशीही पुण्याला येतात जातात! नाहीतरी पुण्याच्या लोकांना फ़ुकटे म्हणतातच!’ म्हणजे ना. पवार थट्टेतच बोलले, तरी त्यातून प्रचंड चर्चा सुरू झाली! एखाद्या मुलाने मोठा दगड नदीत फ़ेकावा माशांची धावपळ व हवेचे बुडबुडे पहात बसावे, तशा ना. पवारांच्या लीला सुरू असतात.

शंकररावांबरोबर जुंपली

ना. शरद पवार मुख्यमंत्री झाल्यापासून दिल्लीत वारंवार जातात, पण गृहमंत्री ना. शंकरराव चव्हाण मात्र क्वचितच दिल्लीहून मुंबईला येतात. शंकरराव मुंबईत आले की, माजी मुख्यमंत्री सुधारकराव यांना भेटतातच. दोघे भेटले की वृत्तपत्रात चर्चा सुरू होते ती शरद पवारांची! ना. शंकरराव म्हणाले की. ‘केंद्र सरकार भक्कम आहे. कुणाही मुख्यमंत्र्याला सल्ल्यासाठी दिल्लीत बोलावण्याची गरज नाही. जर तसे कुणी भासवित असेल, तर ते खोटे आहे.’ यावर ना. पवारांनी तसेच सणसणीत उत्तर दिले. ते म्हणाले की, ‘पंतप्रधानांवरील अविश्वास ठराव व संसदीय पक्षाची बैठक या दोन्ही वेळी मला पंतप्रधानांनीच बोलावले होते! शिवाय दिल्लीत महाराष्ट्राची अनेक कामे असतात. मी यावेळी दिल्लीत दाभोळचा उर्जा प्रकल्प आणि कापूस एकाधिकार योजनेला मुदतवाढ यासाठी प्रयत्न केले. कापूस एकाधिकार योजनेसाठी आणखी एक वर्षाची मुदत वाढवली आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांची तड दिल्लीत लावावीच लागते. पक्षाचीही कामे असतात. फ़क्त मंत्रीपदाची कामे करण्याइतका भाग्यवान मी नाही!’ म्हणजे शंकरराव महाराष्ट्राचे व पक्षाचे काही काम करीत नाहीत आणि मी मात्र दिवसरात्र महाराष्ट्राचे आणि पक्षाचे काम करण्यासाठी आटापिटा करीत असतो असा उलटा तडाखा देवून ना. पवार मोकळे झाले.

ना. पवार दिल्लीला जाणार ही बातमी त्यांनीच पसरवली. आमदार पदाची शपथ नागपूर अधिवेशनात घेतली तरी चालेल असे अकारण सांगून ती बातमी त्यांनी टांगतीच ठेवली. खासदारपदाचा राजिनामा देवून आल्यावर ना. पवार म्हणाले की, आता मी दिल्लीत आलो तर महराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न निर्माण होईल. ही गोष्ट पक्षाला हितावह नाही, असे मला अनेक सहकार्‍यांनी सांगितले. तेव्हा महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करून दिल्लीत येण्याची मला इच्चा नाही.’ ना. पवारांनी नविन ते काय सांगितले? ‘नवाकाळ’ने यापुर्वीच बातमी दिली की, ना. पवारांना दिल्लीत यायचे असेल तर सुधाकररावांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करावे लागेल, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे व यामुळे ना. पवार दिल्लीला जाणार नाहीत! ‘नवाकाळ’ची बातमी तंतोतंत खरी ठरली इतकेच. पण आपण महाराष्ट्राच्या काळजीमुळे महाराष्ट्रात राहिलो असे सांगून ना. पवार नामानिराळे झाले.

कृष्णलीला संपवा! विकासाची गीता सांगा

त्यांनी फ़लोद्यानासाठी कितीही जमिन खरेदी करण्यास मुभा देण्याचे पाऊल टाकले आहे. फ़लोद्यानासाठी घेतलेल्या जमिनीला सिलींग कयदा लागू होणार नाही, असे नविन धोरण जाहिर केले आहे. त्यामुळे भांडवलदार, व्यापारी, स्मगलर आणि खुद्द सत्ताधारी यांना वाटेल तेवढी जमिन विकत घेता येईल. त्यानुसार मुंबईचे उद्योगपती राहुल बजाज व अजित गुलाबचंद आणि ना. पवारांचे अनुयायी सुरेश कलमाडी हे श्रीगोंदा तालुक्यात विक्रीला काढलेली १००० हजार हेक्टर जमीन खरेदी करण्यास निघाले. तथापि कोर्टाने मनाई हुकूम दिला आहे. एक शिष्टमंडळ ना. पवारांकडे गेले तेव्हा ना. पवारांनी खुलासा केला की, ‘१००० हजार हेक्टर जमीन विकण्यात येत आहे याची मला माहितीच नाही. तुम्ही रामराव आदिक किंवा विलासराव देशमुख यांना विचारा.’ त्यांनी आणखी एका सभेत सांगितले की, ही योजना लोकांना नको असेल तर रद्द करता येईल. कसेही टाकले तरी मांजराचे पिल्लू पायावरच उभे रहाते! एकंदरीत सगळे उपदव्याप सुरूच आहेत. महाराष्ट्राची बांधणी करण्याशी या उपदव्यापांचा काहीही संबंध नाही. ना. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रात फ़क्त दोनच वर्षे मुख्यमंत्री होते. पण त्यांनी महाराष्ट्राला असे धोरण दिले की, त्यांनी ‘महाराष्ट्र धर्म’च बहाल केला असे म्हटले जाते. त्यांनी तळागाळाच्या उद्धाराचा कार्यक्रम दिला. त्यांनी अवघा महाराष्ट्र जातीधर्मविरहित एकवटला. विकासाच्या जगन्नाथाचा रथ पुढे नेण्यासाठी सर्वांना आवाहन केले. तमाम मराठी माणसांना यशवंतरावांबद्दल आदर आहे. या उलट शरद पवारांकडे कल्याणकारी धोरण नाही व क्रांतीकारक कार्यक्रम नाही. प्रचंड काळापैसा असलेल्या मुठभर वर्गाचे हितसंबंध ते साधत आहेत. रोज नवी कोलांटी उडी मारत असल्याने त्यांच्या शब्दावर कुणाचाच विश्वास नाही. त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात टोकाची मते आहेत. त्यांचे नाव घेताच शिव्यांचा वर्षाव करणारे आहेत. कुणालाच आदर नाही. पण ‘दिल्लीच्या तख्तावर उद्या बसणारा महाराष्ट्राचा पहिला बहुजनसमाजाचा नेता’ असे दृष्य पहाणारेही आहेत. आणि ते ना. पवारांना सर्व गुन्हे माफ़ही करतात. महाराष्ट्राचे ना. पवार आणि फ़क्त तेच दिल्लीच्या तख्तावर बसतील ही मराठी माणसाच्या मनाची ग्वाही! त्यामुळे शरद पवारांना तोंडाने शिव्या देणार्‍याचा हातही मत त्यांनाच देऊन येतो आणि येईल. पण ना. पवार पंतप्रधान होतील आणि यावेळी त्यांचे पाय खेचता काम नये, असे म्हणणरा हदयाचा हुंकारही हरपणार आहे. ना पवारांनी आता अंत पाहू नये. ना. पवार काय करतील ते सांगता येत नाही. ते ‘अनप्रेडीक्टेबल’ आहेत. हे कौतुक आता शोभादायक नाही. कृष्णलीला पुरे झाल्या. आता समतेचा आणि सुबत्तेचा मार्ग सांगा! वैचारिक पायावर धोरणांची आणि निर्धाराच्या पायावर कार्यक्रमाची ‘गीता’ सांगण्याचे ना. पवारांचे वय आहे! ना. पवार आता व्रात्यपणा पुरे झाला! ती वेळ संपली! नाहीतर महाराष्ट्राची फ़ार मोठी हानी करालच. पण स्वत:ची त्याहून मोठी हानी होईल!


 (दै. ‘नवाकाळ’ संपादकीय, रविवार ५ सप्टेंबर १९९३)

सोमवार, २० एप्रिल, २०१५

आम आदमी पक्षातली यादवी


अलिकडेच आम आदमी पक्षात मोठे रणकंदन माजले. दिल्ली विधानसभेत या नव्या पक्षाने दुसर्‍या प्रयत्नात प्रचंड यश संपादन केले. पण उर्वरीत भारतात भाजपाला शह देवू शकेल असे राजकीय समिकरण उभे राहिल, अशी अपेक्षा बाळगणार्‍यांचा त्यामुळे मुखभंग झाला असल्यास नवल नाही. मात्र त्यासाठी इतर कोणाला जबाबदार धरता येणार नाही. एकूणच हल्ली जे उथळ व संदर्भहीन राजकीय विश्लेषण चालते, त्यामुळे असा मुखभंग अपरिहार्य असतो. ज्यांनी ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची सार्वजनिक जीवनातील वाटचाल काळजीपुर्वक अभ्यासली असेल, त्यांना अशा घटना घडामोडींचे अप्रुप वाटणार नाही. उलट असेच घडणार व घडत राहिल, याची त्याला खात्रीच होती. त्यासाठी ताजे उदाहरण द्यायचे, तर केजरीवाल यांच्या दुसर्‍या शपथविधीचे देता येईल. त्या शपथविधीच्या मंचावरून त्यांनी जमलेल्या गर्दीला एक संदेश दिला होता. इतका मोठा विजय मिळाल्यावर काही लोक अन्य राज्यात निवडणूका लढवून सत्ता संपादनाच्या वा विरोधकांना पाणी पाजण्याच्या गमजा करू लागलेत. हा अहंकाराचा नमूना आहे. हे चालणार नाही. आपल्याला पाच वर्षासाठी दिल्लीची सेवा करायची आहे. वास्तविक तसे कोणी हवेत बोलले नव्हते किंवा कोणी सामान्य नेता कार्यकर्ता बोललेला नव्हता. त्या पक्षाचे विचारक मानले जाणारे योगेंद्र यादव, यांनी तशी घोषणा केलेली होती. कारण आपण सत्ता मिळवायला नव्हेतर राजकारणात परिवर्तन घडवायला आलोत, ही आम आदमी पक्षाची स्थापनेपासूनची भूमिका होती. यादव त्याच भूमिकेला धरून बोलत होते. मग केजरीवाल यांनी त्यांना असे जाहिररित्या कशाला फ़टकारावे? तिथेच त्या दोन नेत्यांमध्ये संवाद संपला असल्याचा पहिला इशारा मिळालेला होता. मात्र केजरीवाल यांच्या भाषणातील तेवढ्याच महत्वाच्या विधानाकडे कोणी गंभीरपणे बघितले नाही. पण लौकरच त्याची प्रचिती आली. पुढे मागल्या दोन आठवड्यात झाले ते नाट्य ठरल्याप्रमाणेच झालेले आहे. 

आधी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हाकालपट्टी झाली आणि त्यासाठी अगदी हाणामारीपर्यंतचा प्रसंग आला. त्याही दोघांना त्याची कल्पना नव्हती असे अजिबात नाही. मागल्या तीनचार वर्षात केजरीवाल व त्यांचाच मुळचे निष्ठावंत असलेल्या जमावाने प्रत्येक आंदोलन व लढ्यात तेच केलेले होते. लोकसभेपुर्वी गुजरात दौर्‍यावर असलेले केजरीवाल यांच्या गाड्यांचा ताफ़ा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने गुजरात पोलिसांनी अडवला होता. तेव्हा कोणती प्रतिक्रीया दिल्लीत बघायला मिळालेली होती? फ़टाफ़ट निष्ठावंतांना फ़ोन गेले आणि अर्ध्या तासात भाजपाच्या मुख्यालयावर ‘आप’च्या जमावाने घोषणा देत दगडफ़ेक करण्यापर्यंत मजल मारली होती. त्याचे समर्थन प्रशांत भूषण यांनी केले नव्हते काय? मग एका कोर्टाच्या समन्सला दाद देत नाही म्हणून केजरीवाल यांच्यावर अटकेची वेळ आली. तर जामिनही घेणार नाही, अशा पोरकटपणाची पाठराखण कोणी केली होती? कायदेपंडित अशी ओळख असलेल्या भूषण यांनी त्यासाठी कोर्टात बुद्धी लढवली नव्हती काय? त्याचीच किंमत आता त्यांना मोजावी लागते आहे. आधी त्यांची राजकीय समितीतून हाकालपट्टी झाली आणि मग राष्ट्रीय कार्यकारिणीतून हाकलताना थेट हाणामारीचा प्रसंग आला. यापुर्वी तशी वेळ आली नाही, कारण पक्षात नको असलेल्यांनी गुंडगिरीच्या भयाने सभ्यपणाने राजिनामे दिले होते. तीच कार्यपद्धती उघडी पाडण्यासाठी यादव व भूषण यांनी सगळा तमाशा करायची पाळी केजरीवाल यांच्यावर आणली. अर्थात आता कार्यभाग उरकला असल्याने आणि अशा प्रतिवाद करणार्‍यांची गरज उरली नसल्याने, केजरीवाल यांनी त्या दोघांना ‘ढुंगणावर लाथ’ मारून हाकलून लावले आहे. पण तेही तितके महत्वाचे नाही. त्या निमीत्ताने कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात केजरीवाल यांनी आपली राजकीय परिवर्तनाची भूमिका अधिक स्पष्ट केली. पण पुन्हा ती साफ़ दुर्लक्षित राहिली आहे.

‘हम यहॉ चुनाव जीतने आये है, हारने नही’, असे केजरीवाल आपल्या अनुयायांना ठणकावून सांगतात. त्याचा अर्थ काय? निवडणूका जिंकून झालेल्या आहेत आणि पुढल्या कुठल्या अन्य राज्यातल्या निवडणूका लढवायच्याच नाहीत, असा केजरीवाल यांचा अट्टाहास आहे. यादव यांना तो मान्य नाही, म्हणून विवाद उदभवला आहे. यादव यांना निवडणूका जिंकण्याशी कर्तव्य नाही. एका परिवर्तनाच्या दिशेने काम करताना एक सामाजिक. राजकीय, आर्थिक भूमिका जनमानसात ठसण्याला महत्व आहे. ते करताना निवडणुका हे एक साधन असते. त्यात विजय किती मिळतो वा पराभव किती होतात, ते दुय्यम असते. ही आजवर समाजवादी पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या वर्गाची भूमिका राहिलेली आहे. यादव आणि त्यांच्यासोबत हाकलून लावलेले बहुतांश ‘आप’ सदस्य त्याच वर्गातले आहेत. १९७७ सालात जनता पक्षात मुळचे समाजवादी विचारधारेचे लोक पक्ष विसर्जित करून सहभागी झाले. आज ते अनेक पक्षात विखुरलेले आहेत. त्यापैकी ज्यांनी प्रचलीत राजकारणापासून अलिप्त रहाण्याचा पवित्रा घेतला होता, अशापैकी यादव किंवा मेधा पाटकर होत. त्यांनी नव्याने पुर्वीच्या समाजवादी राजकीय प्रवाहाचे उत्थान होईल, अशा अपेक्षेने केजरीवाल यांच्या पक्ष व लढ्यात उडी घेतली होती. त्यासाठी आपल्या बुद्धीला व विचारांशी जुळणार नाहीत, अशा अनेक पोरकटपणातही केजरीवाल यांचे बौद्धिक समर्थन केले होते. कारण वैचारिक सुत्रे आपल्या हाती आहेत आणि पक्ष व संघटनेने व्यापक स्वरूप घेतले, मग आपल्या भूमिकांच्या आधारे केजरीवाल यांना वेसण घालता येईल, असा आशावाद त्यांच्या मनात होता. मात्र त्यांना वाटले होते, तितके केजरीवाल कच्च्या गुरूचे चेले नाहीत व नव्हते. आजवरच्या वाटचालीत त्यांनी अतिशय धुर्तपणे प्रत्येकाचा वापर आपले हेतू साध्य करून घेण्य़ासाठी केला आणि प्रसंगी त्यांचा मोठ्या खुबीने बळीही द्यायला मागेपुढे बघितले नाही. पण जात्यातल्यांना सुपातल्यांनी हसावे, तसे यादव भूषण हे केजरीवालांची साथ देत बळी पडणार्‍यांची खिल्ली उडवत राहिले. आज त्याचेच बळी व्हायची वेळ आली. 

डिसेबर २०१३ म्हणजे दिल्लीत कॉग्रेस पुरस्कृत केजरीवाल सरकार स्थापन व्हायचे होते, तेव्हा त्याच पक्षाचे एक आमदार विनोदकुमार बिन्नी धुसफ़ुसत होते आणि त्यांनी नंतर केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नंतर लोकसभा लढवायची वेळ आली तेव्हा अश्चिनी उपाध्याय नावाचे संस्थापक सदस्य तोच आरोप करताना दिसले. लोकसभा संपल्यावर शाझिया इल्मी यांनी केलेले आरोप वेगळे नव्हते. पक्षाच्या स्थापनेपुर्वी स्वामी अग्निवेश यांच्यावर आलेले बालंट आठवा. प्रत्येकवेळी अण्णा वा इतरांना पुढे करून आपल्या विरोधकांचा काटा केजरीवाल यांनी सराईतपणे काढला होता. पक्षस्थापनेच्या बाबतीत वा नंतर सत्ताग्रहण केल्यावर केजरीवाल यांच्याबद्दल किरण बेदी काय वेगळे बोलत होत्या? प्रत्येकाने तुसडा स्वभाव, एकांगीपणा व आपले तेच खरे करणारा हुकूमशाही वृत्तीचा माणूस; अशीच केजरीवाल यांची संभावना केलेली नव्हती काय? त्या सर्व घटनांचे यादव-भूषण जवळून साक्षिदार होते. जे इतर नाराज बघू शकले व तेव्हाच बोलले, तेव्हा यादव कशाला गप्प बसले होते? तर उद्या सत्ता मिळाल्यावर आणि विचाराधिष्ठीत पक्ष चालवायचा तर केजरीवाल यांना हट्टीपणा सोडावा लागेल, ही खुळी आशाच त्यांना गप्प ठेवत होती. आज त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. पण कोणीही या दोघा नेत्यांवर सत्तालोभ वा मतलबाचे आरोप करू शकणार नाही. कारण तो त्यांचा स्वभावच नाही. तसे असते तर त्यांना नव्या पक्षात जाण्याची गरज नव्हती. केजरीवाल लोकांना माहित होण्याचय खुप आधीपासून यादव-भूषण यांना स्वत:ची ओळख मिळालेली आहे. कुठल्याही प्रस्थापित राजकीय पक्षात पायघड्या घालून त्यांच्यासारख्याचे स्वागत होऊ शकले असते. पण सत्तेचा मोह-लोभ नसल्यानेच एक वेगळा तत्वाधिष्ठीत राजकीय पक्ष उभा करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी ते दोघे केजरीवाल यांच्या पोरकटपणा व मुर्खपणालाही साथ देत राहिले होते. मात्र केजरीवाल यांच्या मनात कुठलाही गोंधळ नव्हता. म्हणून त्यांनी उपयुक्तता असेपर्यंत या दोघांना खेळवले आणि उपयोग संपताच पक्षाबाहेर हाकलून दिलेले आहे. 

परिवर्तन, स्वराज, जनलोकपाल, भ्रष्टाचार निर्मूलन या सर्व गोष्टी म्हणजे केजरीवाल यांच्यासाठी निव्वळ बोलाची कढी व बोलाचा भात होता. म्हणूनच आंदोलनापासून सत्तेपर्यंत निव्वळ नाट्यमय कृतीतून लोकांना खेळवण्याचा प्रयोग केजरीवाल यशस्वीरित्या खेळत गेले. आता पाच वर्षे त्यांना हुकमी बहुमत मिळाले आहे आणि त्यापेक्षा त्यांना कसलीही अपेक्षा नाही. सामान्य जनताच नव्हेतर यादव-भूषण यांच्यासारख्या बुद्धीमंतांनाही शब्दांनी खेळवता येते आणि काम संपले की फ़ेकून देता येते, हे व्यवहारी केजरीवाल पक्के ओळखून आहेत. बाबा रामदेव, अण्णा हजारे यांचा असाच वापर करून इथवर मजल मारलेल्या केजरीवालना यादव-भूषण यांना बाजूला करणे फ़ारसे अडचणीचे नव्हते. त्यांची एकच गल्लत झाली. हे दोघे सभ्यपणे बाजूला होतील आणि आरोपांना घाबरून पळतील, ही अपेक्षा त्या दोघांनी फ़ोल ठरवली. उलट केजरीवाल यांचा गुंडगिरीच्या आधारे हुकूमशाही गाजवणारा चेहरा जगापुढे आणायचा त्या दोघांचा डाव मात्र यशस्वी झाला. अर्थात त्याची केजरीवालना फ़ारशी फ़िकीर नाही. हेतू साध्य होण्याशी त्यांना मतलब होता आणि पाच वर्षे त्यांना सत्तेचे अढळपद मिळालेले आहे. मग त्या पक्षाचे राजकीय भवितव्य काय असेल? त्यापासून काही राजकीय परिवर्तनाची अपेक्षा करता येईल काय? प्रथमच मुख्यमंत्री झाल्यावर विधानसभेत केजरीवाल यांनी केलेले भाषण आणि कालपरवा पक्षाच्या कार्यकारिणीतले भाषण, यातला जमीन अस्मानाचा फ़रक त्यांचे चरित्र स्पष्ट करणारा आहे. 

तेव्हा केजरीवाल म्हणाले होते, ‘प्रस्थापित पक्षांनी लोकाना भ्रष्टाचारमुक्त व सुसह्य कारभार दिला असता, तर आम्हाला राजकारणात कशाला यावे लागले असते? आमची औकात (लायकीच) काय? आम्हाला सत्ता नको आहे की कुठले लाभ नको आहेत. जिंकणे हरण्याला वा सत्ता टिकण्याला कवडीचे महत्व नाही. परिवर्तन व्हायला हवे आहे. जनलोकपालसाठी अशी शंभर मुख्यमंत्रीपदे कुर्बान.’ असेच सातत्याने केजरीवाल बोलत होते ना? त्याचीच री ओढत प्रशांत भूषण व योगेंद्र यादव बोलत होते ना? मग वर्षभरात कुठे घसरगुंडी झाली? अवैध मार्गाने जनलोकपाल विधेयक विधानसभेत मांडायचा पोरकटपणा करून केजरीवाल यांनी राजिनाम्याचा कांगावा केलेला होता. जे विधेयक मांडताच येत नाही, ते भाजपा-कॉग्रेसने मिलीभगत करून हाणून पाडल्याचा खोटाच दावा त्यांनी चालविला होता. त्यातला खोटेपणा या दोघा शहाण्यां नेत्यांनी एकदा तरी थांबवण्याचा प्रयत्न केला काय? यावेळी तर त्याच जनलोकपाल शब्दाचाही निवडणुकीत उल्लेख झाला नाही. उलट कार्यकर्त्यांना केजरीवाल म्हणतात, ‘हम यहॉ जितने आये है, हारने नही’. पण जिंकायचे कशाला होते, त्याचे स्मरण तरी त्यांना उरले आहे काय? बाकीचेही राजकीय पक्ष वर्षानुवर्षे राजकारण कशासाठी करीत आहेत? हरण्यासाठी की जिंकण्यासाठी? मग त्यांच्यात आणि आम आदमी पक्षात फ़रक तो काय उरला? तोही एक अन्य पक्षांसारखा सत्तेचा भुकेलाच पक्ष नाही काय? ज्याला जिंकायचे आहे आणि सत्ताही हवी आहे. कुठल्याही मार्गाने व साधनांनी सत्ता संपादन करायची आहे. मग त्याचे भवितव्य काय असेल? इतरांचे जे भवितव्य आहे, तेच याही पक्षाचे भवितव्य असणार ना? अर्थात प्रत्येक पक्ष जसा उच्च उदार तात्विक भाषणबाजी करतो, तशीच हा नवा पक्षही करणार आहे. त्यात परिवर्तन, भ्रष्टाचार निर्मूलन, जनलोकपाल, स्वराज अशा अदभूतरम्य कहाण्या कथन केल्या जातील. पक्षांतर्गत लोकशाही, पारदर्शकता इत्याची शब्दांची जपमाळ ओढली जाईल. मात्र त्यापैकी कशाचीही अपेक्षा लोकांनी बाळगू नये. झुलवणारे आकर्षक शब्द, यापेक्षा त्यांना मोल नसेल. 

अर्थात असे देशात प्रथमच होते असेही मानायचे कारण नाही. केजरीवाल गुडघ्यावर रांगत होते, तेव्हा १९७४ सालात गुजरातमध्ये भ्रष्टाचार विरोधातले नवनिर्माण आंदोलन विद्यार्थ्यांनीच छेडलेले होते आणि पुढल्या काळात त्यातले नेते जनता पक्ष वा कॉग्रेस यांच्यात विलीन होऊन संपलेही. १९८० च्या काळात त्याचीच पुनरावृत्ती इशान्येला आसाम राज्यात झाली होती आणि त्याचे नेते नवा पक्ष काढून थेट सत्तेवर येऊन बसले. मग त्याच सत्तेने त्यांच्यात इतकी हमरातुमरी माजली, की दहाबारा वर्षातच त्यांचा पक्ष नामशेष झाला. आता तर त्या पक्षाचे नामोनिशाण शिल्लक उरलेले नाही. तेव्हा प्रफ़ुल्लकुमार महंता हे नाव आजच्या केजरीवाल याच्यासारखेच तळपत होते. तीन दशकांनी महंता, भृगू फ़ुकन अशी नावे विस्मृतीत गेली आहेत. याचे कारण स्पष्ट आहे. नवनिर्माण वा आसामची विद्यार्थी चळवळ यांच्यापाशी कुठले स्वत:चे राजकीय तत्वज्ञान वा विचारसरणी नव्हती. नुसताच उत्साह आणि उतावळा आक्रमकपणा होता. त्यामुळे सत्ता आली वा यश मिळाले, तरी राजकीय सामाजिक वा आर्थिक धोरणे यांचा कुठेही पत्ता नसतो. मग जेव्हा जनतेला भेसडसावणारे गहन प्रश्न सोडवायची वेळ येते, तेव्हा थातूरमातूर काहीबाही केले जाते आणि दुरगामी काही करता येत नाही. परिणामी क्रमाक्रमाने लोकांचा अशा नेतृत्वाविषयी, पक्षाविषयी भ्रमनिरास होत जातो. मोठ्या अपेक्षेने त्यात सहभागी झालेले तरूण वैफ़ल्यग्रस्त होतात आणि अलिप्त होऊन जातात वा अन्य पक्षात आश्रयाला जातात. नेत्यांमध्ये सत्तालंपटतेने हमरीतुमरी बोकाळत जाते आणि तडजोडीची शक्यता असेपर्यंत पक्ष व काम चालते. नेत्यांमधला संयम व सोशिकता जितका काळ टिकून असते, तोपर्यंतच अशा पक्षाला भवितव्य असते. केजरीवाल यांच्याकडे बघता, तितका काळ या पक्षाकडे नाही. हा माणूस कमालीचा आत्मकेंद्री आहे. आपला शब्द प्रत्येकाने प्रमाण मानावा असे त्याला वाटते आणि दुसरी बाजू वा प्रतिकुल मत ऐकून घेण्याचा संयम त्याच्यापाशी नाही. सहाजिकच यादव-भूषण यांचे बळी घेतल्यावर त्याची हुकूमतीची भुक अधिक वाढणार आहे. किंबहूना कुठलेही लोकोपयोगी काम करण्यापेक्षा आपली हुकूमत पक्की आहे किंवा नाही, याचीच परिक्षा घेण्यात केजरीवाल यांची शक्ती व वेळ खर्ची पडणार आहे. 

यादव-भूषण यांच्यासारखे थंड डोक्याचे व विचारी सहकारी गमावल्याने त्यांचे नुकसान किती ह्याला अर्थ नाही. त्यापेक्षा अधिक नुकसान पक्षाचे व केजरीवाल यांचे होणार आहे. कारण आता त्यांच्याभोवती शिल्लक उरलेत ते तोंड्पुजे व आपमतलबी बोलघेवडे लोक आहेत. त्यांच्यात नेतृत्वाची कुवत नाही की समस्येवर ठोस उपाय शांतपणे शोधणारी बुद्धी नाही. प्रश्नाचे नेमके उत्तर देण्यापेक्षा प्रत्यारोप करून प्रश्नच नाकारणारे बुद्धीमंत नसतात आणि केजरीवाल यांच्या भोवती सध्या असलेल्या आशुतोष आशिष खेतान, संजय सिंग, कुमार विश्वास अशांची तेवढीच कुवत आहे. केजरीवाल सत्तेतला हिस्सा देतील याच आशेवर त्यांनी भोवती घोळका केलेला आहे. त्यापैकी ज्यांच्या पदरी काही पडेल, ते खुश होऊन आणखी भाटगिरी करतील. पण ज्यांना तशी संधी हुकेल, ते ज्याला पद वा संधी मिळाली, त्याच्या विरोधात जाऊन पक्षाला खड्ड्यात पाडायला कमी करणार नाहीत. थोडक्यात अशा सत्तालंपट कर्तृत्वहीन गोतावळ्यात केजरीवाल आता बंदिस्त होत चालले आहेत. त्यांना एका गट वा सहकारी नेत्याला पाठीशी घालताना, दुसर्‍याचा बळी घेतच वाटचाल करावी लागणार आहे. त्यातून मग आम आदमी पक्षाचे अधिकाधिक वस्त्रहरण जनतेसमोर होणार आहे. मग यादव-भूषण बाजूला झालो, म्हणूनच खुश असतील. कारण त्या दोघांवर अन्य कुठलेही आरोप होऊ शकले तरी सत्तालंपटतेचा आरोप होऊ शकत नाही. आपल्या परीने ते वेगळी चुल मांडतील, त्यांनी मांडवी सुद्धा. त्यामुळे आज त्या पक्षात निव्वळ कामासाठी आलेल्या निष्ठावान कार्यकर्त्याला मार्ग सापडू शकेल. त्याचा मूळ पक्षात कोंडमारा होणार नाही. त्याला सत्तालंपट भंपक लोकांच्या मागे फ़रफ़टावे लागणार नाही. भले या नव्या प्रयत्नांना केजरीवाल झटपट मिळवू शकले तितके यश मिळाणार नाही. पण राजकारणात मुलभूत परिवर्तन करण्याची इच्छाशक्ती जगवण्याचे महत्वपुर्ण कार्य त्यातून साधले जाऊ शकेल. पुढल्या दोनतीन दशके देशाच्या विविध क्षेत्रात नेतृत्व करू शकतील, अशा तरूणांना त्यातून उदयास येणे शक्य होईल. कारण केजरीवाल यांच्या हाती गेलेल्या पक्षाकडून ती अपेक्षा संपलेली आहे. लालू, नितीश वा मुलायम, मायावती, जयललिता इत्यादींचे पक्ष आहेत, तसा आता आम आदमी पक्ष हा दिल्लीतला एक प्रादेशिक पक्ष झाला आहे. दिल्लीबाहेर त्याला खर्‍या उद्दीष्टांवर उभे करणे यादव यांना अशक्य नाही. म्हणूनच दिर्घकालीन भारतीय राजकारणात यादव गटाला भवितव्य नक्की आहे. 

लक्षात घ्या, केजरीवाल यांना दिल्लीत रहायचे आहे आणि तिथली मिळालेली सत्ता मोलाची आहे. परिवर्तन वगैरे त्यांच्यासाठी विरंगुळ्याच्या गप्पा आहेत. यादव-भूषण यांच्यासाठी ते उद्दीष्ट आहे, तसेच देशभर पसरलेल्या तिसर्‍या पर्यायाची आशा बाळगणार्‍यांचेही उद्दीष्ट आहे. मात्र त्यांचा प्रस्थापित तिसर्‍या डाव्या म्हणवणार्‍यांवर विश्वास उरलेला नाही. ती भारतीय राजकारणातील दिर्घकालीन पोकळी आहे. ती भरायला वेळ लागेल. केजरीवाल यांच्या चेहर्‍याला पुढे करून लगेच भरता येईल हा यादवांचा खुळा आशावाद होता. तो भ्रम संपला हे चांगलेच झाले. खरे तर तीच अशा प्रयत्नातील त्रुटी होती. केजरीवाल यांनीच पुढाकार घेऊन यादवांच्या मार्गातला काटा दूर केला असेल, तर चांगलेच म्हणायला हवे ना? देशभरातील अन्य राज्यातील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते गडबडले आहेत. पण त्यांना झटपट परिवर्तनाची घाई नाही. म्हणूनच यादव यांनी त्यांना हाताशी धरून पुढाकार घ्यायला हवा आहे. त्याला केजरीवाल यांचीही हरकत नाही, हा शुभसंकेतच म्हणायचा. कारण आपल्याला दिल्लीखेरीज बाहेर रस नाही, असे त्यांनी म्हणून ठेवलेच आहे. मात्र दिल्लीतही अशा मार्गाने जाऊन ते किती टिकतील त्याची शंकाच आहे.

 बहार, दै. पुढारी  (५/४/२०१५)